देव, धर्म आणि श्रद्धा यांच्या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवाक्षर सुद्धा कधी काढलं नाही. केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्याचं काम हा महान सारस्वत करत होता. तरीही त्यांचा खून का झाला? दीड महिना उलटून गेला अजून खूनीही सापडत नाहीत.
डॉ. दाभोलकर हे थेट साने गुरूजी परंपरेतले. सौम्य प्रवृत्तीचे. तरीही सनातन्यांना ते सहन झालं नाही. गणेशोत्सवाला विधायक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेकडो गावात त्यांनी एक गाव एक गणपतीचा उपक्रम करायला लावून मंडळामंडळातली व गटागटातली भांडणे मिटवली. गणपती विसर्जन प्रूषणमुक्त व्हावं, नैसर्गिक रंगाचा वापर व्हावा यासाठीसुद्धा ते मोहिम चालवत होते. हे दाभोलकर करू शकत होते कारण श्रद्धांनाही विधायक वळण देता येतं यावर त्यांचा विश्वास होता. सत्य, शिव, सुंदराची प्रार्थना म्हणणार्या साने गुरुजी परिवारातले ते होते.
ज्या अंधश्रद्धा निर्मूलन बिलाला सनातनीच नव्हे तर राज्यातल्या विरोधी पक्षांनीही जोरदार विरोध केला, त्या विधेयकात 'श्रद्धा' हा शब्दच नाही. इतकचं कशाला 'अंधश्रद्धा' हा शब्दही त्यात नाही. धर्माचा, कोणत्याच धर्माचा तर मागमूस सुद्धा नाही. तरीही ओरड का होते आहे?
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा हा मूळ ठराव तर शिवसेना-भाजप युतीचे सरकार होतं त्या काळातला. 18 वर्षांत कायद्याचा मूळ मसुदा पातळ झाला आणि विरोधाची धार मात्र तीव्र. छोट्या निरागस मुलांना पळवून त्यांचा नरबळी द्यायचा. त्यासाठी उद्दुक्त करायचं. मुलींचं आणि स्त्रियांचं लैगिंक शोषण करायचं. म्हणजे फसवून, स्वतः देवपुरूष असल्याचे सांगत थेट बलात्कार करायचा. तंत्र मंत्राच्या नावाखाली अत्यंत विकृत अघोरी प्रथा लादायच्या. हा ज्यांचा धंदा बनला होता, ते कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत नामानिराळे होत राहिले. मानवत खून खटल्यात मारणारे फासावर गेले, मारायला लावणारे कमी शिक्षेने निसटले. हे सारं रोखण्यासाठी कायदा का नको? दाभोलकर फक्त तर एवढंच मागत होते.
तरीही दाभोलकरांचा जीव घेण्यापर्यंत सनातन्यांची मजल गेली.
साने गुरूजींच्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीचा माणूस अधिक प्रभावी असतो. श्रद्धावानांच्या हृयाला हात घालू शकतो. म्हणून सनातन्यांना तो डेंजरस वाटतो. देव, धर्म आणि श्रद्धा हा ज्यांच्यासाठी धंदा असतो, शोषणाचं साधन असतं, आणि त्याहीपेक्षा राजकारणाचं हत्यार असतं त्यांना दाभोलकर अधिक धोकादायक वाटतात.
तुकाराम त्यांना अधिक धोकादायक वाटत होते. ज्ञानेश्वरांचा म्हणून तर छळ झाला. जीवंतपणी विवेकानंद त्यांना अडचणीचे होते. महात्मा गांधींना मारणार्या नथुरामाची परंपरा नवी नाही. धर्माचं दुकान चालवणार्यांना खरा धार्मिक अडचणीचा असतो. इहवादी असूनही दाभोलकरांची वाट खर्या धार्मिकासारखी होती.
बहुसंख्य हिन्दू समाजाला हे चांगलंच उमजून आहे. तो श्रद्धावान आहे. धर्मपरायण आहे आणि म्हणूनच तो सनातन्यांपासून कायम दूर राहिला आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांना छळणार्यांची वृत्ती त्यांना माहित आहे. त्यांची नावंही लक्षात राहू नयेत, इतका त्यांना त्याचा तिटकारा आहे. ज्ञानोबा माऊली एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर मात्र वारकर्यांच्या हृयात युगानुयुगे सुरु आहे. उदार हिंदू बधत नाही. राजकीय हिंदुत्वाला साथ देत नाही. म्हणून हिंदुंच्या मनात राडा करण्याचा सनातन्यांचा डाव गेल्या दोन अडीच शकांपासून सुरु आहे. बाबरी मशिदिच्या विध्वंसापासून त्याची सुरवात झाली.
नथुराम समर्थनाचं नाटक याच काळातलं आहे, जे अजून सुरु आहे. हे नाटक यासाठी सुरु आहे, की माणसाला मारण्याचं समर्थन करता यावं. खुद्द महात्मा गांधींना मारण्याचं समर्थन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रंगमंचावर गेली अनेक वर्षे होत आहे. केवळ नाटकातूनच नाही अनेक माध्यमातून द्वेषाची होळी पेटवत त्यात उदारता आणि बंधुभावाच्या समिधा टाकल्या जात आहेत. त्यामुळे दाभोलकरांचाही खून पचवता येईल हा त्यामागचा त्यांचा कयास होता.
अंथरुणावर पडून मरण्यापेक्षा, दाभोलकरांना गोळ्या लागून मृत्यू आला, ही ईश्वराची कृपाच म्हणायची, असं जयंत आठवले उघडपणे म्हणतात आणि हिंदूंच्या विरोधात विधेयक कशाला अशी ओरड त्यांचं छूपे समर्थन करणारे उजवे पक्ष करतात. वटहुकुम निघाल्यानंतर राज्यात दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणी करत जादुटोणा करणार्या बंगाली बाबांना पोलिसांनी अटक केली, ते हिंदू नाहीत. मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात असा कायदा करा म्हणणार्यांना ही चपराक ठरावी. हे बंगाली बाबा मुस्लिम आहेत. इस्लाम धर्मात चमत्कार आणि जादूटोण्याला मान्यता नाही. माणसाला चमत्कार करता येत नाही आणि मीही त्यामुळे चमत्कार करु शकत नाही, असं खुद्द मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांनी त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणार्यांना सुनावलं होतं. तरीही बंगाली बाबा जादूटोण्याच्या नावावर लुटालुट करतात, हे काही लपून नाही. कायद्याला धर्म नसतो. पण खोट्या प्रचाराचा धुरळा लोकांच्या डोळ्यात उडवल्याशिवाय खून करता येत नाही. महात्माजींचा खून 55 कोटींसाठी केल्याचा असाच तद्दन खोटा आणि बेशरम प्रचार नथुरामीवादी आजही करतात. विधेयक कोणत्याच धर्माच्या विरोधात नसताना ते हिंदू विरोधी आहे, असा खोटा प्रचार अजूनही सुरु आहे, तो दाभोलकरांचा खून करणार्या मारेकर्यांच्या समर्थनासाठीच.
तालिबानी असोत किंवा सनातनी दहशतवाद हा दहशतवाद असतो. आणि त्यांची पहिली शिकार ते ज्या धर्मातले असतात त्या धर्मातली माणसंच असतात. सीमेपलिकडच्या दहशतवा़द्द्यानी कश्मिरमध्ये आतंक सुरु केल्यानंतर त्यात जान गेलेले बहुतेक मुस्लिमच होते. शेकडोनी नाही हजारोनी. पाकिस्तानच्या सीमाप्रांतात तालीबान्यांनी गोळ्या घातल्या त्या मलाला युसुफझाईच्या डोक्यात. तीने शाळेत जाऊ नये म्हणून. महात्माजींना मारणारा नथुराम होता. दाभोलकरांच्या डोक्यात गोळ्या घालणारे नथुरामीच आहेत.
नथुरामी प्रवृत्ती केवळ गोळ्या घालण्याचं समर्थनच करत नाही, आसारामच्या बाजूनेही उभी असते. नातवंडांपेक्षा लहान मुलींवर अतिप्रसंग करणार्या साधुंमधल्या हैवानाना लपवलं जातं, ते परधर्मीयांच्या द्वेषाआड.
नथुरामी ते आसारामी हे आव्हान परतवून लावायचं कसं?
हा प्रश्न केवळ अंधश्रद्धा निर्मुलनाचा नाही. ढोंगी बाबांच्या अटकावाचा नाही. ज्ञानेश्वर, कबीरांपासून ते तुकारामांपर्यंत सर्वच संतांनी या ढोंगी बाबांच्या विरोधात 'जळो त्यांचे तोंड' अशी जबरस्त आघाडी उघडलेली आहे. 'नवसे कन्या पुत्र होती, तरी का कारणे पती' असा सवाल संत तुकारामांनी कधीच विचारुन ठेवला आहे. शोषणावर उभी राहिलेली ही व्यवस्था उद्धवस्त करावीच लागेल. प्रबोधनाची यात्रा अखंड सुरु ठेवावी लागेल. पण त्यातून नथुरामी ते आसारामी हे आव्हान संपुष्टात येणार नाही. हे आव्हान धार्मिक नाही, राजकीय आहे. त्याला राजकीयच उत्तर द्यावं लागेल.
नथुरामी आणि आसारामी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आसारामला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आसारामसाठी त्यांनी राम जेठमलानी सारखा नामांकित वकील उभा केला आहे. जेठमलानी काय म्हणाले? त्यांनी दोष त्या निरागस मुलीवरच लावला. तिला म्हणे आजार आहे. Girl has disease which draws her to men. म्हणजे त्या मुलीवर जो अतिप्रसंग झाला त्यात आसारामचा दोष नाही मुलीचाच दोष आहे. इतकं निर्लज्ज विधान राम जेठमलानी कसं करू शकतात? पंतप्रधानाच्या उमेदवारीसाठी भांडणारे भाजपाचे नेते जेठमलानी यांच्या वाढदिवसाला एकत्र येतात. त्यांचा केक कापतात. आणि दुसऱ्या दिवशी जेठमलानी आसरामाचं वकीलपत्र घेतात. याचा अर्थ काय?
राज्यातले आणि दिल्लीतीले सत्ताधारी (कॉंग्रेस - राष्ट्रवादीवाले) स्वतःला सेक्युलर म्हणवत असले तरी नथुरामी ते आसारामी या पिलावळीला त्यांनीही जागोजागी सांभाळले आहे. सत्तेला धोका येईल, तेव्हाच नथुरामी शक्तींकडे ते बोट दाखवतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही फासिस्ट नथुरामी शक्तींच्या अटकावात रस नाही. अन्यथा हेमंत करकरे यांनी सुरु केलेली मोहिम या सत्ताधार्यांनी थांबवली नसती. महिना उलटल्यानंतरही खूनी सापडत नाहीत याचं खरं कारण हे आहे.
दाभोलकरांच्या हत्येमुळे राज्यातल्या सगळ्याच विवेकशील, संवेनशील नागरिकांच्या मनात उठाव आहे. नथुरामी फासिस्ट शक्तींच्या विरोधात जे जे डावे पुरोगामी आहेत, फुले, शाहू, आंबेडकरवादी आहेत, गांधीवादी आहेत, उदार वारकरी अन सुफी आहेत. हे सर्वच एकत्र येत आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रभर निर्धार होतो आहे. त्यातून पर्यायी राजकारण उभे राहिले तरच फासिस्ट शक्ती आणि मतलबी सत्ताधारी यांना उत्तर मिळेल.
आमदार कपिल पाटील
kapilhpatil@gmail.com
Its a very powerful and to the point statement made by Shri Kapil Patil. Issues he has raised are so vital that need to be responded by Mah Govt as well as persons like Mr. Athavale. Congrats for being clear, straight but not vicious.
ReplyDeleteIt is perfect diagnosis of socio- political disorder . The only problem lies in collective efforts. This century demands collaborations. Scientists and industralists are aware of this fact. The mindset of social organization is still in 20th century.
ReplyDeleteAtul Deulgaonkar
कपिल सर सर्वात पहील्यांदा लोकाना हे कळायला हवे की इतक्या वर्षा पासन टिकलेला धर्म वाईट परंपरा बंद केल्याने कसल्या ही प्रकारे धोक्यात येत नसतो . आज काल तर मंदीर ही लुटण्याची (कायदेशीर पने) साधन झालीये.प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडली की धर्मा वेड्याना सहज
ReplyDeleteकोणत्याही आणि कसल्याही कामासाठी वापरता येऊ शकत..........................................
खरंतर जोपर्यंत खुनी सापडत नाहीत तोपर्यंतच्या संभाव्य अटकळींवर हे आपण काढलेले निष्कर्ष आहेत. धार्मिक कडवेपणातूनच दाभोलकर सरांची हत्या झाली असावी या समजावर आधारीत हे मत आहे. शक्यता अशीही आहे की या हत्येमागचे कारण धार्मिक नसून आर्थिक असावे कारण ज्या लोकांची दुकानदारी या धर्माच्या आड चालू होती त्यांचाही यात हात असू शकतो. पण असे लोक धार्मिकही असत नाहीत व निधर्मिही असत नाहीत ते स्वधर्मि असतात. त्याच्या वर्तनाचा दोष आपण इतरांना का द्यायचा? वास्तविक या हत्येची अप्रत्यक्श जबाबदारी शासनाचीही आहे. संविधानाने सोपविलेल्या मुलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करणे हे शासनाचे उत्तरदायित्व आहे ते शासन करीत नसल्यामुळे ती जबाबदारी दाभोलकर सरांना पार पाडावी लागली. हिंसेचा, बळाचा अधिकार लोकशाहीत शासनाला दिलेला असतो शासनाने योग्य कारणासाठी तो वापरलाच पाहिजे. पण शासनाच्या शिवाय कोणी हिंसेचा वापर आपल्या मतासाठी समाजात करू धजत असेल तर तेही मोठे शासनाचे अपयश आहे.आता उपलब्ध असलेल्या कोणत्याही पक्शाकडे संविधानाशी प्रामाणिक राहून राज्यकारभार करण्याची पात्रता नाही त्यामुळे नवा राजकीय पर्याय असण्याची गरज आहे. प्रश्न आहे तो डाव्या अथवा उजव्या अशा विचारधारेत विवेकी मत न विभागता केवळ लोकशाही व संविधानाच्या रक्शणाच्या मुद्द्यावर ते एकवटले पाहिजे. तेवढी लवचिकता आपल्याकडे आहे का?
ReplyDelete