शहिद
हेमंत करकरे यांच्या वीर पत्नी कविता करकरे यांनी पतीच्या बलिदानानंतर अत्यंत धीरोदात्तपणे
परिस्थितीचा सामना केला. हेमंत करकरे यांच्याप्रमाणेच दहशतवादाला धर्म नसतो असे हिंमतीने
सांगत धर्मनिरपेक्ष मूल्यांचा झेंडा उंच धरला.
भारतीय
प्रजासत्ताकाला सुरूंग लावणारे कारस्थान करणाऱया प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहीत यांच्यासारख्या
घरभेदी दहशतवाद्यांना गजाआड केलं म्हणून हेमंत करकरे यांच्यावर तथाकथित देशभक्तांनी
हल्ला चढवला होता. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल अत्यंत असभ्य आणि घाणेरडी भाषा वापरली
गेली होती. पण करकरे विचलीत झाले नाहीत. हेमंत करकरे यांनी तो भयंकर कट उधळून लावला
याबद्दल भारतीय जनतेला सदैव त्यांच्या ऋणात राहावं लागेल. वीर पत्नी म्हणून त्यांना
त्यावेळी साथ देणाऱया कविता करकरे यांनी त्याकाळात हिंदुत्ववाद्यांच्या विषारी प्रचाराचा
तितक्याच निग्रहाने सामना केला. त्याची आठवणही सदैव राहिल. तर 26/11 च्या पाकीस्तानी
दहशतवाद्यांचा देशावरील हल्ल्याचा सामना करण्यासाठी बडे बडे अधिकारी कचरत होते. तेव्हा
करकरे, कामटे, साळसकर, शिंदे आणि अोंबळे मरणाच्या वेढ्यात शिरले. स्वकीय आणि विदेशी
दहशतवादाच्या विरोधात लढताना वीर मरण आलेले हेमंत करकरे हे पहिले शहिद पोलीस अधिकारी
ठरतात. कविता करकरे आणि त्यांच्या कुटुंबाचा हा त्याग अपरिमित आहे.
हेमंत
करकरे यांचं हाैतात्म्य आम भारतीयांच्या मनात खोल करुन गेलं आहे. दहशतवादाच्या नावाने
प्रस्थापित राजकीय पक्षांनी जे राजकारण चालवलं होतं, त्यांना आम माणसाच्या मनातली ही
जखम कळलेली नाही. 26/11 उजाडेपर्यंत हेमंत करकरेंना खलनायक ठरवणारे राजकारणी किती बनेल
होते. याचं दर्शन पुढील तीन दिवसातच दिसलं. आपली चूक झाली हे कबूल करण्याइतका प्रामाणिकपणा
त्यांच्याकडून अपेक्षित नाही. त्यांची मदत नाकारुन वीरपत्नी कविता करकरे यांनी चोख
उत्तर दिलं होतं. एका राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फार मोठी धनराशी घेऊन आले होते.
पण करकरे मॅडमनी अत्यंत ठामपणे त्यांना परतवून लावलं.
श्रीमती
कविता करकरे या शिक्षिका होत्या. शिक्षक भारती परिवाराच्या त्या सदस्य होत्या. सावित्रीबाई
फुले-फातिमा शेख पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. लोकभारतीच्या कार्यक्रमातही
त्या सहभागी झाल्या होत्या. ताडदेवच्या बी.एड. काॅलेजमधून प्राध्यापिका म्हणून त्यांनी
शेकडो शिक्षक घडवले आहेत. त्यांचं वाचन खूप होतं. त्या कविता करत. म्हणून लग्नानंतर
हेमंत करकरे यांनी त्यांचं नाव कविता ठेवलं. कविता करकरे दादरच्या राजा शिवाजी विद्यालय
(किंग जाॅर्जच्या) विद्यार्थीनी. अभ्यासात खूप हुशार. अलिकडेच त्यांनी शिक्षण शास्त्रात
पी.एच.डी. ची तयारी सुरु केली होती. करकरेंच्या आठवणींचं पुस्तकही त्यांनी लिहायला
घेतलं होतं. ते सगळंच अपूर्ण राहिलं.
त्यांच्या
जाण्याने एक निरागस, सात्विक पण तितकंच धीरोदात्त व्यक्तिमत्व हरपलं आहे.
धैर्यवान
वीर करकरे दाम्पत्याची मुलंही तशीच आहेत. म्हणूनच आपल्या वीरमातेचा पार्थिव देह दान
करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याच धीरोदात्तपणे आणि देशनिष्ठेने.
कपिल
पाटील
शिक्षक
आमदार, मुंबई
अध्यक्ष,
लोक भारती
kapilhpatil@gmail.com
No comments:
Post a Comment