मोरा गोरा अंग ले ले, मोहे श्याम रंग दे
Take my fair body away, and give me a dark skin
या गीतातले शब्द गुलजारांचे आहेत. पण गीत प्राचीन आहे. द्वापार
युगापासून राधा ते गात आली आहे. कृष्णाच्या शाम रंगाने युगानु युगे भुरळ घातली
आहे भारतीय मनाला. पण परवा राज्यसभेत खासदार शरद यादव यांनी दाक्षिणात्य काळ्या
रंगाचं कौतुक काय केलं, मंत्री महोदया स्मृती ईराणी भडकून काय उठल्या. दोन्ही
हातांचे तळवे एकमेकांवर आपटत त्यांनी हात जोडले. आणि यादव साहेबांनी महिलांच्या रंगाच्या
भानगडीत पडू नये असं फर्मावलं.
स्मृती ईराणींचं ठिक आहे, पण कणीमोळी आणि मायावती यांनीही बिचकून का
बोलावं? काळ्या रंगाचा अभिमान हा द्रविड चळवळीचा एक भाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचारातून हातात अंगार घेतलेल्या नामेव ढसाळांच्या पिढीने दलित पँथरसाठी ब्लॅक पँथरची
प्रेरणा घेतली होती. 80च्या दशकात अरुण अरुण कांबळेंसारखे नेते काळ्या रंगाचे
गुणगान गात होते. द्रविड आत्मसन्मानाच्या चळवळीवर दक्षिणेचं राजकारण आजही उभं आहे.
ते उभं करणार्या करुणानिधींची कन्या कणीमोळीच्या नेणीवेतही गोर्या रंगाचं आकर्षण
असावं, आणि काळ्या रंगाबद्दल न्यून याचं आश्चर्य वाटतं. कांशिराम गेल्यापासून सुश्री
मायावतींना आंबेडकरवादाचा अर्थ समजून सांगायला कोणी उरलं नसावं.
गौर वर्णीय आर्यांच्या वंश अहंकारावर उभ्या राहिलेल्या संघ सावरकर प्रणित
राजकीय हिंदुत्वाचा सध्या बोलबाला आहे. त्या गोंगाटाने सुश्री मायावती आणि श्रीमती
कणीमोळी कदाचित गांगरल्या असाव्यात. वाचन आणि व्यासंगाशी संबंध नसलेल्या इलेक्ट्रॉनिक
मिडियातल्या अनेक दिग्गजांचा गोंधळ उडणं तर स्वाभाविक आहे.
स्मृती ईराणी यांचा वाचनाशी काय संबंध, असा सवाल करणं औधत्याचं ठरेल.
त्या मनुष्यबळ विकासाच्या मंत्री आहेत. शिक्षणमंत्री आहेत. केंद्र सरकारचा चेहरा
आहेत. म्हणून अनभिषिक्त प्रवक्त्याही आहेत. त्यांनी शरद यादव यांना प्रश्न करणं
आणि आगपाखड करणं हा वर्णाधारीत राजकारणाचा भाग आहे. बाकीच्यांचं काय? त्यांना समजून
घ्यायला हवं. त्यांच्याच नव्हे आपल्या सर्वांच्याच नेणीवेत गोर्या रंगाचं आकर्षण आहे.
शरद यादव यांचं सभागृहातलं आणि मैदानातलं बोलणंही तत्वचिंतनात्मक
असतं. त्यामुळे कधी कधी त्यांचे शब्दप्रयोग आणि मांडणी अनेकांच्या डोक्यावरुन जाते.
पण आपल्या बेबाक बोलण्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत. बोलतात ते विचारपूर्वक. बोलल्यानंतर
बदलत नाहीत. इन्कार करत नाहीत. परिणामांची तमा बाळगत नाहीत. कालही ते म्हणाले, चाहे
धरती फट जाय, हम माफी नही माँगेंगे. शरद यादव स्त्री विरोधी नाहीत. स्त्री सन्मानाच्या
बाजूने उभे आहेत.
हम ने गलत क्या कहाँ? शरद यादव यांचा हा सवाल होता. राम आणि कृष्ण काय
काळे नव्हते. मोरा गोरा अंग ले ले, मोहे श्याम रंग दे हे गीत का गायलं जातं? देशातले
बहुसंख्य लोक आणि महिला काळ्या रंगाच्या, सावळ्या रंगाच्या आहेत. दाक्षिणात्य स्त्रीया
तर अधिक सुंदर आहेत. आमच्या उत्तरेकडच्या स्त्रीयांपेक्षा त्या खुबसुरत आहेत. केवळ काळ्या
रंगाने नाही. रुपानेही. बांध्यानेही. गोरा रंग श्रेष्ठ हा डोक्यात शिरला आहे. मॅट्रिमोनियल
जाहिरातीत म्हणून गोरी बायको हवी, अशी मागणी असते. सावळ्या रंगाच्या पुरुषांनाही गोरी
बायकोच हवी असते. शरद यादव यांच्या या बोलण्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे?
तरीही इलेक्ट्रॉनिक मिडियाला प्रश्न पडला, शरद यादव क्या बोल गये?
माझा साधा प्रश्न आहे, शरद यादवजी ने क्या गलत कहाँ?
गांधी आणि लोहियांचं नाव का घेता? उगाच आमच्या बायकांच्या रंगाला नावं
ठेवू नका? असा सवाल स्मृती ईराणींनी पुन्हा विचारला आहे.
डॉ. राममनोहर लोहिया काय म्हणत होते? श्यामल वर्णाची नेहमीच उपेक्षा
झाली आहे असे नव्हे, किमान हिुंस्थानात तरी तसे झालेले नाही. संस्कृत साहित्यात
कृष्णवर्णीय श्यामा सुंदर मानली आहे. ती काळीच असली पाहिजे असे नव्हे; ती जर सुंदर
आणि तरुण असली, तरी तिला श्यामा म्हणत. म्हणजेच यौवन आणि लावण्य एकच मानले जाई.
शरद यादव पक्के लोहियावादी आहेत. त्यांच्या मांडणीमध्ये
लोहिया ठासून भरलेले असतात. भारतीय संसदेत मधु लिमयेंच्या नंतर लोकशाही समाजवादी विचारांचा
दुसरा मोठा प्रवक्ता नाही. एकमेव शरद यादव आहेत. स्त्री दास्य व्यवस्थेचे समर्थक
असलेले सत्ताधारी वर्गातले नेते शरद यादवांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करत आहेत.
जाती प्रथा आणि स्त्री दास्य ही देशाच्या अधःपतनाची पाळंमुळं आहेत. अशी नर नारी समता
सांगणार्या लोहियांचे शिष्य आहेत शरद यादव. जात, वर्ण, रंग आणि लिंग भेदाच्या
विरोधात ज्यांची मांडणी स्पष्ट आहे, त्यात शरद यादव यांचा समावेश आहे.
स्त्री सुंदर आणि रुपवान मानायची, ती कोणत्या निकषावर? शरद यादव
यांना दाक्षिणात्य स्त्री आणि त्यांचा काळा रंग गोर्या रंगापेक्षाही अधिक उजळ वाटतो.
गोर्या रंगामागचं राजकारण देशाच्या सर्वोच्च सभागृहात धाडसाने मांडल्याबद्दल शरद यादव
यांचं खरं तर अभिनंदन करायला हवं. लोहियांनी त्यांच्या रंग आणि सौंदर्य या ललित निबंधात
या राजकारणाची नेमकी चिकित्सा केली आहे -
''सौंदर्याच्या निकषाबद्दलची ही विकृत दृष्टी राजकीय प्रभावातून
निर्माण होत असली पाहिजे. जवळपास तीन शतके युरोपाचे गौरवर्णी लोक जगावर वर्चस्व
गाजवत आहेत; सत्ताधारी बनून राहिलेले आहेत. सत्ता आणि समृद्धी सदैव त्यांच्या अधीनच
होती. गौरेतरांजवळ मात्र सत्तासमृद्धीचा अभाव होता. युरोपच्या गौरवर्णीयांप्रमाणे आफ्रिकेच्या निग्रोंची
सत्ता जगावर असती, तर नारी सौंदर्याचे निकष नक्कीच वेगळे झाले असते. निग्रोंची कातडी
साटीनसारखी मुलायम असते, असे कवी आणि ललित लेखकांनी म्हटले असते. इतकेच नव्हे,
तर त्या कातडीचा स्पर्श आणि दर्शन मुलायम असते इतकेच नव्हे, तर त्या कातडीचा
स्पर्श आणि दर्शन ही प्रतिष्ठा वाढवणारी आहे, असेही त्यांनी मानले असते. निग्रोंचे
सुंदर ओष्टद्धय किंवा शोभिवंत नाक, त्यांना उत्फुल्ल दिसले असते. राजकारण
सौंदर्यकल्पनांवरही वर्चस्व गाजवते. सत्ता-विशेषकरुन सर्वंकष सत्ता तर सुंदरही दिसू लागते.''
भारतीय अभिजात साहित्यात गोर्या रंगाचं कौतुक अभावानेच आढळतं. रंगात
रंग तो शाम रंग ही भारतीय संकल्पना ब्रिटीशांच्या आगमनाबरोबर पुसली गेली आणि गेल्या
250 वर्षात भारतीय नेणीवेची गोर्या रंगाने पकड घेतली. मॅक्समुल्लरच्या आर्य सिद्धांताने
बळ मिळालेल्या आर्य-वंशवर्ण वर्चस्ववादी हिुंत्वाच्या राजकारणाने गोरा रंग आणखी
सफेद केला. आर्य श्रेष्ठत्वासाठी रंगाचा नवाच आधार मिळाला. 'ब्लॅक इज ब्युटीफूल'
या 'ब्लॅक प्राईड' मुव्हमेंटची सुरवात 60च्या शतकात अमेरिकेत झाली. तेव्हा भारतीय
वर्तमानपत्रातल्या जाहिराती गोरीच बायको हवी, या मागणींनी भरून गेल्या होत्या.
गुलामांच्या बाजारांनी, रंगभेदांनी, अमानुष शोषणांनी आणि माणूसपण जाळणार्या अपमानांनी
बरबटलेली शतके मागे टाकत आफ्रिकेत आणि अमेरिकेत काळ्या बंडाचे वारे
वाहत होते, तेव्हा काळ्या रंगाने अपमानित झालेली भारतीय स्त्री अपमान आणि अप्रतिष्ठित
भविष्यांनी आणखीन काळवंडून जात होती.
हे कधी घडत होतं? वहिनीच्या किंकाळ्या ऐकून राजा राममोहन रॉय सती
प्रथेच्या विरोधात उभे राहिले. त्याला दोनशे वर्षे उलटून गेलेली आहेत. स्त्री दास्याची
बेडी तोडण्यासाठी महात्मा फुले शाळा उघडत होते. त्याला दिडशे वर्षे उलटून
गेलेली आहेत. जात, वर्ण, धर्म, रंग, लिंग भेद संपुष्टात आणण्याचा पुकारा करणारं
संविधान डॉ. बाबासाहेबांनी दिलं त्याला अर्ध शतकही उलटून गेलेले आहे. तेव्हा हे
घडत होतं. रंगावरुन नाव ठेवलं जात आहे. नाकारालं जात आहे. भेदाचा रंग अजून गडद आहे.
गांधींचा झाडू सोयीसाठी हातात घेणार्यांना गांधी नावाचा विचार आणि
मार्ग नको आहे. स्त्रीयांच्या रंगाबाबत गांधी काय म्हणाले होते? महात्मा होण्याच्या
आधी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. 'दक्षिण आफ्रीकाना सत्याग्रहनो इतिहास'
या नावाने गुजरातीत त्यांनी पुस्तकच लिहलं आहे. वालजी गोविंजी देसाई यांनी त्याचा इंग्रजी
अनुवाद प्रसिद्ध आहे. अलिकडेच आपल्या पंढरीनाथ सावंतांनी थेट गुजरातीतून मराठी
अनुवाद केला आहे. आफ्रिकेचा इतिहास सांगताना गांधीजीनी काळ्या रंगाबद्दल
लिहिलंय -
''1914 मध्ये या विस्तीर्ण प्रदेशात हबशींची वस्ती जवळजवळ पन्नास लाख
आणि गोर्यांची वस्ती साधारण तेरा लाख होती. हबश्यांमध्ये झुलू फार धिप्पाड नि रुपसुंदर
मानले पाहिजेत. 'रुपसुंदर' हे विशेषण मी हबश्यांच्या बाबतीत हेतुपूर्वक वापरले आहे.
सफेद कातडी आणि धारदार नाक यांवर आपण सौंदर्याचा शिक्का मारतो. पण हा समज घटकाभर
बाजूला ठेवला तर झुलूंना घडवण्यात ब्रह्मदेवाने काही कमतरता ठेवली आहे असे आपल्याला
वाटणार नाही. स्त्री आणि पुरुष दोघेही उंच आणि उंचीच्या प्रमाणात रुंद छातीचे
असतात. पोटर्या आणि दंड मांसाने भरलेले नेहमी गोलाकार दिसतात. स्त्री किंवा पुरुष
वाकून किंवा पोक काढून चालताना क्वचितच पहायला सापडतो. ओठ जरुर मोठे व जाड असतात.
पण सबंध शरीराच्या आकाराच्या प्रमाणात किंचितही बैडोल असतात असे मी तरी म्हणणार
नाही. डोळे गोल आणि तेजस्वी असतात. नाक थबकट आणि मोठ्या तोंडाला शोभावे एवढे मोठेच
असते. त्यांच्या डोक्यावरचे कुरळे केस त्यांच्या शिसवासारख्या काळ्या आणि तुकतुकीत
कातडीवर शोभून दिसतात. एखाद्या झुलूला विचारले, की दक्षिण आफ्रिकेत राहणार्या
हबशी जमातींमध्ये सर्वात जास्त सुंदर कोणती? तर तो आपल्या जमातीसाठी दावा करेल आणि
मला त्यात त्याचे जराही अज्ञान दिसणार नाही. युरोपात आज सँडो वगैरे त्यांच्या शिष्यांचे
बाहू, हात वगैरे घडविण्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत. त्यांतील काही एक प्रयत्न न करता
या जमातीचे अवयव घट्ट आणि आकाराने सुंदर रीतीने घडलेले बघायला मिळतात. विषुववृत्ताच्या
जवळ राहणार्या रहिवाशांची चामडी काळीच असणार. हा निसर्गनियमच आहे. आणि निसर्ग जे जे
घडवतो त्यात सौंदर्यच असते असे आपण मानले तर आपण सौंदर्याविषयीच्या संकुचित आणि
एकतर्फी विचारांपासून वाचू शकू. एवढेच नव्हे तर हिुंस्तानातही आपली कातडी काळवंडली
तर आपल्याला सवयीने लाज वाटते आणि नावड निर्माण होते तिच्यापासून आपण मुक्त होऊ.''
देशाच्या राष्ट्रपित्याने गायलेलं हे मुक्ती गीत ईराणी बाईंनी वाचलं
असण्याची शक्यता कमीच आहे. ब्रिटींशांच्या जोखडातून भारताला गांधींनी मुक्त केले. काळवंडलेल्या
बुद्धी दंभातून भारतीयांची मुक्तता मात्र अजून व्हायची आहे.
कपिल हरिश्चंद्र पाटील
सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com
No comments:
Post a Comment