बुद्धीप्र्रामाण्यवाद आणि विज्ञाननिष्ठा यांची पहिली ओळख मला झाली ती चालना नावाच्या मासिकातून. दरमहिन्याला चालना यायचा. आणि आधी वाचून काढायचो अरविंद हरि राऊत यांचं संपादकीय.
अरविंद हरि राऊत डहाणूतल्या नरपडचे. पण जन्म वरोरचा. बालपणही वरोरमधलं. जीवन व गुंजी हे त्यांच्या आजोबा आणि आजीचं नाव. जीवनगुंजी या नावानंच त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं. ते काही केवळ आत्मकथन नाही. आताच्या पालघर जिह्यातल्या ग्रामीण जीवनाचं मनोज्ञ वर्णन त्यात आहे. वरोर चिंचणी पासून डहाणू बोर्डी पर्यंत हा सगळा तालुका प्रामुख्याने आदिवासी. उरलेली वस्ती कुणबी, वाडवळ, भंडारी, बौद्ध, मांगेले-कोळी यांची. हा सगळा परिसर महाराष्ट्रातल्या इतर गावांसारखाच पण गाव गाड्यातल्या जाती भेदाची धार इथे फार बोथट झालेली. समुद्राच्या लाटा किनाऱयावरचे बांध जसे फोडून टाकतात तसेच काहीसे इथले भेदाचे बांध अरविंद राऊत यांच्या पिढीने फोडून टाकले आहेत. साने गुरुजी, चित्रे गुरुजी, गोदुताई परुळेकर आदींच्या प्रेरणतेतून तयार झालेल्या या पिढीने समाजसुधारणेचं वारं या भागात फिरवलं. आणि ते समाजानेही सहज स्विकारलं.
अरविंद भाई कट्टर नास्तिक. इथल्या वाडवळ समाजाचं संघटन करताना त्यांनी जाती जातीतल्या अंध रुढींना सुरुंग लावला. अंधश्रद्धेची खुळं कधीच मिटवून टाकली. मृत्यूनंतरचे सोपस्कार कमी केले. देव देवस्कीचं अवडंबर कमी केलं. त्यामुळे त्यातून होणारे गैरप्रकार किंवा शोषण संपलं. शिक्षण वाढलं. विकासाची नवी दृष्टी मिळाली. आणखी एक साने गुरुजी परिवाराने दिलेलं निहायत चांगुलपण इथल्या गावागावात आणि समाजासमाजात दिसतं. चांगुलपणाची ही बाग (वाडी) वाडवळांमधल्या या नव्या नेतृत्वाने चांगलीच पिकवली. त्याला मांगेले, भंडारी, बौद्ध, कुणबी या साऱयांनीच साथ दिली.
मृत्यूनंतर
माणूस कुठे जातो? स्वर्गात की नरकात की कैलासात? माझे काका अॅड. लक्ष्मण पाटील यांची श्रद्धांजली सभा गावात होती. निवेदकाने सवयीप्रमाणे कैलासवासी असा उल्लेख केला. काकांचे वैचारिक सहोदर माझे भावोजी यशवंत राऊत यांनी त्यास आक्षेप घेतला, म्हणाले, कैलास आहे कुठे? लक्ष्मण पाटील स्वर्ग, नरक या भाकड कथा मानत नव्हते. त्यामुळे कैलासवासी म्हणणे हे चुकीचे आहे. फार तर पंचतत्वात विलिन असं म्हणा. यशवंत राऊत यांनी ठामपणे सांगितल्यावर कैलास आणण्याची कुणाची हिंमत होती. लक्ष्मण पाटील काय किंवा यशवंत राऊत काय अशी असंख्य माणसं पालघर जिह्यात तुम्हाला सापडतील. आज साठी-सत्तरीच्या पलिकडे गेलेली ही मंडळी अत्यंत इहवादी वृत्तीने वावरतात. म्हातारपण त्रासदायक ठरुनही बुवाबाजी किंवा धार्मिक अवडंबराच्या नादी ही मंडळी लागत नाहीत. ती अरविंद राऊतांप्रमाणे निरिश्वरवादी आहेत असं नाही. ईश्वराला मानतात पण अवडंबर ठोकरतात. अशांची संख्याही मोठी आहे. देव येऊन रोज लुडबुड करतो यावर या मंडळींचा विश्वास नाही. ही सारीच मंडळी समाजवादी वृत्तीची. गांधी व साने गुरुजींना मानणारी.
पालघर जिह्यात चांगुलपणा, भ्रष्टाचाराला विरोध, कर्मकांडाचा धिक्कार, विधायकतेचा ध्यास या वृत्तीने भारलेली एक पिढीच आहे.
ही जादु कुणी केली? उत्तर एकच आहे, अरविंद हरि राऊत.
प्रश्न एवढाच आहे, हा प्रवाह आता थोडा क्षीण होतो आहे. तो वाढत राहील तर अरविंदभाईंचं स्मरण होत राहील.
______________________________________
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
______________________________________
No comments:
Post a Comment