Thursday, 14 July 2016

झाकीर नाईकचं समर्थन कशासाठी करता?



बांग्लादेशातल्या बॉम्बस्फोटांनी डॉ. झाकीर नाईक नावाचा धर्मप्रचारक प्रकाशात आला आहे. त्यांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी असते. त्यांच्या सभेत कुणी गरीब, मेहनतकश मुसलमान नसतो. पांढरपेशांचीच गर्दी जास्त असते. स्टेज भव्य दिव्य असतं. वाणी तशीच 'दिव्य'. पारंपरिक मौलवीच्या वेशात हा माणूस कधीच नसतो. अगदी सुटाबुटात. अन् भाषण फडर्य़ा इंग्रजीत. पण शैलीही विलक्षण छाप टाकणारी. फॉलोअर्सही त्याला जगभर आहेत. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणार्‍यांची संख्या सव्वा कोटींहून अधिक आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात त्यांच्या अनेक सभा झाल्या आहेत. एकदा मुद्दाम गेलोही होतो ऐकायला. त्यांच्या वडिलांची ओळख होती. पक्का कोकणी माणूस. तेच एकदा आपल्या डॉक्टर मुलाचे इस्लामिक सेंटर दाखवायला घेऊन गेले होते. तेव्हा एवढा बोलबाला नव्हता. पण विदेशी मदत खूप मिळत असावी, याचा अंदाज येत होता. डॉक्टरकीची प्रॅक्टीस करण्यापेक्षा हा धंदा बरा. आपल्याकडे बाबा लोकांची काही कमी नाही. हल्ली नव्या बाबांना चमत्कार दाखवावे लागत नाहीत. फक्त वाणीवर आणि भाषेवर प्रभुत्व हवं. डॉ. झाकीरकडे ते प्रभुत्व तर आहेच. पण कमालीची स्मरणशक्ती आणि प्रचंड पाठांतर. कुराणावर बोलता बोलता गीता आणि बायबलचे दाखले मुखोद्गत द्यायचे. हातात कागद नसतो. कुराणातली आयत आणि सुराचा नंबर त्याच्या जीभेवर. पण गीतेचा अध्याय कितवा, ओळ कितवी हे सांगत संस्कृत श्लोक घडाघडा बोलतात. तेव्हा ऐकणारे अचंबित होतात. प्रेषित आणि इस्लाम यांच्या उदयाचं भाकित वेदांमध्ये आधीच सांगितलेलं आहे, असा दाखला या माणसाने दिल्यावर समोरचा शिक्षित माणूस भाबडेपणाने झाकीरचा मुरीद होतो. 

झाकीरच्या पीस टीव्हीवर बांगलादेशने बंदी घातली आहे. बांगलादेशचं हसिना सरकार सेक्युलर आहे. बहुसंख्य मुस्लिम असूनही देश सेक्युलर आहे. देशाची घटना सेक्युलर आहे. मधल्या काळात खलिदा झीयाबाईंचं सरकार आलं आणि त्यांनी इस्लामला राष्ट्र धर्माचा दर्जा दिला. झीयाबाईंचा पराभव करत प्रचंड मतांनी अवामी लिग सरकार आलं. शेख हसिना बांगलादेशचे निर्माते बंग बंधू शेख मुजीबर रेहमान यांच्या कन्या. अवामी लिगचं आणि बांगलादेशाचं नेतृत्व करतात. धार्मिक कट्टरवादामुळे त्या परेशान आहेत. गेले दोन वर्षे बांगलादेश अंतर्गत हिंसाचार आणि आतंकवादाने बेजार आहे. सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्यांच्या पाठोपाठ आता बॉम्बस्फोट घडू लागले आहेत. ढाक्यातल्या स्फोटानंतर प्रथमच ही बाब समोर आली की, अतिरेक्यांना चिथावणी मिळाली होती, ती डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणातून.

डॉ. झाकीर नाईक मुंबईतच राहतात. भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कधीच कारवाई केलेली नाही. किंवा संशयाने त्यांच्यावर पाळतही ठेवलेली नाही. डॉ. अनिरुद्ध बापू, नरेंद्र महाराज यांना जशी गर्दी होते तशी डॉ. झाकीरच्या भाषणांना गर्दी होत असावी, असंच पोलीस आणि गुप्तचरही मानत होते. त्यामुळे आतंकवादाशी त्यांचा संबंध जोडला गेला नसेल. संबंध नसेलही कदाचित. पण त्यांच्या भाषणातून ढाक्यातल्या अतिरेक्यांना प्रेरणा (चिथावणी) मिळाली. त्याचं काय?

डॉ. झाकीर नाईकला मौलवी किंवा मुफ्ती इस्लामचे खरे प्रचारक मानत नाहीत. उलेमांची मान्यता तर कधीच नव्हती. आता काही सर्मथनार्थ पुढे आले आहेत. फॉलोअर्सनी केलेल्या कृत्याबद्दल डॉक्टरला कसं जबाबदार धरता येईल? असा त्यांचा सवाल आहे. डॉक्टर फक्त कुराणाचा अर्थ सांगतात, असं त्यांचं म्हणणं आहे. ओसाबा बिन लादेनचंही अप्रत्यक्ष सर्मथन करणार्‍या झाकीर नाईकने ढाक्यातल्या बॉम्बस्फोटाचा आधी निषेध केला नव्हता. बांगलादेश सरकारने आक्षेप घेताच वादळ उठलं आणि डॉ. नाईक जागे झाले. निरपराध माणसाची हत्या म्हणजे मानवतेची हत्या. पवित्र कुराणाला मानवतेची हत्या मान्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी आता दिली आहे. 

झाकीर नाईक त्यांच्या प्रवचनात त्यांच्या भाषणात जो इस्लाम सांगतात तो इस्लामचा खरा अर्थच नसल्याचं अनेक मुफ्तींचं म्हणणं आहे. इस्लाम शांतीचा आणि मानवतेचा संदेश देतो. द्वेष शिकवत नाही. नाईक यांच्या भाषणातून अन्य धर्मियांबद्दल द्वेषाचं विष पेरलं जातं, ते या मुफ्तींना मान्य नाही. योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची किंवा प्रज्ञा ठाकूर हिंदू धर्माच्या नावाने बरळतात त्यात आणि झाकीर नाईक यांच्या बरळण्यात अक्षराचाही फरक नाही. जयंत आठवले सनातन धर्म म्हणून जे सांगतात त्यातला हिंदू शब्द काढून मुस्लिम शब्द टाकला की त्याच वाक्याच्या पुढे डॉ. झाकीर नाईक हे नाव सहज लिहिता येईल. इतकं दोघांमध्ये बेमालुम साम्य आहे. डॉ. झाकीर कुराणाचा आधार घेतात आणि जयंत आठवले गीतेचा आधार घेतात. गीतेचा अर्थ सांगताना ज्ञानेश्‍वरांनी पसायदान मागितलं. लोकमान्यांनी गीता रहस्य सांगत स्वातंत्र्य आंदोलनाला नेतृत्व दिलं. महात्मा गांधींनी गीतेचाच आधार घेत अंहिसेचं आणि सत्याग्रहचं शस्त्र परजलं. त्याच गीतेचा आधार घेत जयंत आठवले द्वेष आणि हिसेंचा विखारी प्रचार करतात. राजा चेरिमनने समतेचा संदेश देणार्‍या इस्लामला १४00 वर्षांपूर्वी भारतात आणलं. इस्लामच्या शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणारं सुफीयान निजामुद्दीन अवलीया आणि गरीब नवाज मोहिद्दिन चिस्ती यांनी भारतात फुलवलं. मकदुम अली माहिमी याच प्रेमाचा संदेश देत कोकण-कुतूब झाले. 

डॉ. झाकीर नाईक याच्या प्रवचनातल्या शाब्दिक कसरतीत प्रेम, करुणा नाही. द्वेष आणि विखारच असतो.जयंत आठवलेच्या सनातनी शिष्यानी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांचा बळी घेतला. डॉ. झाकीर नाईकचं वाचून बांग्लादेशातल्या त्या तरुणांनी बॉम्बस्फोटात निष्पापांचे बळी घेतले. डॉ. जयंत आठवले आणि डॉ. झाकीर नाईक यात फरक करता येणार नाही. डॉ. झाकीर नाईकचं समर्थन कुणीही करू नये. बांग्लादेशीयांची तेवढीच अपेक्षा आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १३  जुलै  २०१६

3 comments:

  1. डोळ्यात अंजन घालणारा, सर्व तरुणाईने वाचावा व झाकीर किंवा जयंत आठवले यांच्या विषारी प्रचाराला बळी पडू नये म्हणून अनेकांपर्यंत पोचवावा असा लेख. लता प्रतिभा मधुकर

    ReplyDelete
  2. अत्यंत परखड, उत्तकृठ भाषाशैली संतुलित विचार मांडणारा व डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.

    ReplyDelete
  3. True, very true. There is no spirituality practised at Sanatan Sanstha. Dr Jayant Athavale uses mind control techniques to control the followers. Read my blog http://sanatanveil.blogspot.in/2016/11/normal-life-after-sanatan-ashram-ponda.html. I am an ex-member and have experienced it first hand.

    ReplyDelete