Thursday, 20 October 2016

गजानन खातू मुंज्या नाही बनले



गजानन खातू ७५ वर्षांचे झाले. परवा दादरच्या शिवाजी मंदिरात त्यांचा सुंदर सत्कार सोहळा झाला. डॉ. बाबा आढाव, मेधाताई पाटकर, पुष्पाताई भावे, अॅड. प्रकाश आंबेडकर, अच्युत गोडबोले, सौमित्र, कवयित्री नीरजा अशी खूप सारी मोठी माणसं जमली होती. सेवा दल, समता आंदोलन, साने गुरुजी स्मारक, अपना बाजार अशा समाजवादी परिवारातली माणसं तर खूप आली. साहित्य, कला क्षेत्रातले लोकही आवर्जून आले. खातूंचा परिवारच मोठा आहे. 

खातू भाईंनी अपना बाजार सोडलं त्याला २५ वर्षे झाली असतील. पण अपना परिवाराला खातू भाईंनी जी ओळख मिळवून दिली तीच खातू भाईंची ओळख आजही बनून राहिली आहे.

सहकाराचं क्षेत्र उभं, आडवं कोलमडत असताना समाजवादी परिवारानं उभ्या केलेल्या सहकारातल्या संस्था मात्र अबाधित उभ्या आहेत. त्यांचं छप्पर फाटलेलं नाही. त्यांचे खांब कोलमडलेले नाहीत. त्यांच्या भिंतीना भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली नाही. गिरणगाव कधीच मोडून पडलं. पण त्या गिरणी कामगारांसाठी सुरू झालेला अपना बाजार आजही टिकून आहे. कामगारांनीच तो उभा केला होता. आता दुसर्‍या पिढीच्या हातात सूत्रे आहेत. मात्र निष्ठा, निरलसता, पारदर्शकता आणि चोख व्यवहार या चार खाबांवर तो आजही उभा आहे. दादा सरफरे गेले, उपेंद्र चमणकर, आत्माराम शिंदेही गेले. सुरेश तावडेही आता नाहीत. दत्ताराम चाळके आता अपना परिवाराचे प्रमुख आहेत. अपना बँक ते सांभाळतात. अपना बँक आता काही हजार कोटींची झाली आहे. प्रचंड मोठी झाली आहे. पण ती बँकही त्याच चार खाबांवर उभी आहे. सरफरे, तावडे जेव्हा होते, तेव्हा ते जे सांगत होते, तेच आज दत्ताराम चाळकेही सांगतील. उमेश ठाकूर, अगदी सुपार बाजारचे किशोर देसाईही सांगतील. ऋषिकेश तावडेला विचारा, तोही तेच सांगेल. अपना बाजारला, अपना परिवाराला ही जी ओळख मिळाली आहे ती गजानन खातूंमुळे. गजानन खातू हे काही अपना बाजारचे संस्थापक नव्हेत. या परिवाराचे ते कधी प्रमुखही नव्हते. अपना बाजारचं व्यवस्थापन ते सांभाळत. समाजवादी सहकारी संस्थेचं व्यवस्थापकीय नेतृत्व करताना त्यांनी जे काही केलं त्यामुळे अपना बाजारला सहकाराच्या क्षेत्रात, मुंबईतल्या ग्राहक चळवळीत एक वेगळी ओळख मिळाली. त्यांचं व्यवस्थापन कौशल्य, अर्थशास्त्राचा अभ्यास, बाजाराची अचूक नाडी, भविष्याचा वेध आणि समाजवादी दृष्टी यामुळे ही ओळख ते निर्माण करू शकले.

खातू भाईंचा स्वभाव तसा सौम्य. पण विचारात स्पष्टता आणि ठामपणा. प्रत्यक्ष संघर्षात ते कधी उतरले नसले तरी संघर्षाच्या चळवळीत असणार्‍या प्रत्येकाला गजानन खातूंचा मोठा आधार वाटतो. पक्षीय राजकारणात ते तसे रमले नाहीत. त्यांचा तो पिंडही नाही. पण त्यांची राजकीय मतं ठाम असतात. आग्रहाने ते मांडतात. जुनाट कल्पनांना ते कधीच धरून बसत नाहीत, हे त्यांचं आणखी वैशिष्ट्यं. बदलत्या राजकारणाचा त्यांना अचूक वेध असतो. अर्थशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे असेल, मार्क्‍सवादी दृष्टिकोन असल्यामुळे असेल अर्थकारणातलं राजकारण त्यांना नेमकं कळतं. जागतिकीकरणामुळे बदललेलं जग आणि बदलेला देश ज्यांना लवकर ओळखता आला, त्यात गजानन खातू सर्वात पुढे आहेत.

अपना बाजारमधल्या निवृत्तीनंतर खातू भाईंचं एक स्वप्न होतं सस्ता बाजारचं. ते काही साकार झालं नाही. मात्र त्यांची सस्ता बाजारची कल्पना वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या रूपात बाजारात तर दिसतेच आहे. खातूंच्या अशा अनेक कल्पना आहेत. जागेपणी पाहिलेली ती स्वप्नं आहेत. फक्त स्वप्नंच नाही, खूप आधी त्यांनी पाहिलेल्या गोष्टी आज प्रत्यक्षात दिसताहेत. ते स्वत: पाहताहेत. त्यांचं ते द्रष्टेपण.

अपना बाजारातल्या स्वेच्छा निवृत्तीनंतर गजानन खातूंनी एका मोठय़ा प्रकल्पाला वाहून घेतलं. माणगावला साने गुरुजींचं राष्ट्रीय स्मारक उभं केलं. ५० एकरात निरंतर चालणारं शिबीर केंद्र. त्या केंद्रात, तिथल्या शिबिरात येणार्‍या तरुण मुलांनी साने गुरुजींना पाहिलं आणि थोडं मनात रुजवलं तरी खूप झालं, असं खातूंना वाटतं. पण गजानन खातू तिथे कायमचे ट्रस्टी बनले नाहीत. जे संस्था उभ्या करतात ते तर सोडा आयते आलेलेही वेताळ आणि मुंज्या बनून झाडावर बसून राहतात. गजानन खातू कोकणातले असूनही वेताळ आणि मुंज्या बनले नाहीत. 'प्रश्नांची उत्तरं दिली नाहीस तर तुझीच अनेक शकलं होऊन तुझ्या पायाशी पडतील,' असा शाप कधी ते देत नाहीत. हे स्मारक, ती संस्था त्यांनी तरुणांच्या हाती सोपवली आहे.

साने गुरुजींच्या 
वाङ् मयाने  महाराष्ट्राला हजारो धडपडणारी मुले दिली. या धडपडणार्‍या मुलांनी महाराष्ट्राला निरलस, निर्लोभ, निर्मोह वृत्तीने खूप काही दिलं. विधायक घडवलं. ज्यांनी डोंगराएवढं काम केलं ती सारी नावं तर आपल्याला माहीत आहेत. बाबा आमटेंपासून यदुनाथ थत्तेंपर्यंत. प्रकाश मोहाडीकरांपासून शाहीर साबळेंपर्यंत. शाहीर आत्माराम पाटलांपासून निळू फुलेंपर्यंत. मृणालताईंपासून स्मिता पाटीलपर्यंत. एकनाथ ठाकूरांपासून मेधा पाटकरांपर्यंत. पु. लं. देशपांडेंपासून म. सु. पाटलांपर्यंत. सा. रे. पाटलांपासून सदाशिव पाटलांपर्यंत. डॉ. बाबा आढावांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंत. कॉ. पानसरेंपासून ते भाई वैद्यांपर्यंत. महाराष्ट्रभर अशी खूप मोठी माणसं होती आणि आहेत. सगळे बाबा आमटेंएवढे किंवा पु. लं. इतके मोठे आणि प्रसिद्ध झाले नसतील. पण त्यांनी केलेलं काम खूप मोठं आहे. त्या त्या क्षेत्रातले ते मानदंड आहेत. गजानन खातू त्यापैकी एक आहेत.

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि  लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १९ ऑक्टोबर २०१६ 

19 comments:

  1. नंबर एक साहेब...

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लेख आहे कपिल दादा .

    ReplyDelete
  3. कपिल सर,
    फारच सुंदर,मार्मिक लेखन आहे हे !
    अतिशय अचूक चित्रण केलेत तुम्ही भाईंचे.

    ReplyDelete
  4. सुंदर लेख साहेब. .छान..

    ReplyDelete
  5. सुंदर लेख साहेब. .छान..

    ReplyDelete
  6. सुंदर लेख साहेब. ..छान..

    ReplyDelete
  7. सुंदर लेख साहेब. ..छान..

    ReplyDelete
  8. खातू साहेबांचा नितळ प्रामाणिकपणा विलोभनीय आहे.मी उजवा तर ते डावे. तरीही आमची मैत्री.ते माझे व्यवसायिक गुरूच.त्यांना हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  9. मनाला भावणारा लेख साहेब.

    ReplyDelete
  10. मनाला भावणारा लेख साहेब.

    ReplyDelete
  11. अतिशय मार्मिक आणि भावणारा लेख.....

    ReplyDelete
  12. अतिशय मार्मिक आणि भावणारा लेख.....

    ReplyDelete
  13. समाजवादी विचारांचा कृतीनिष्ठ अविष्कार
    म्हणजे खातू सर
    निर्मोही, निर्लेप, व्यक्तिमत्वावर सुंदर लेख वाचायला मिळाला

    ReplyDelete
  14. समाजवादी विचारांचा कृतीनिष्ठ अविष्कार
    म्हणजे खातू सर
    निर्मोही, निर्लेप, व्यक्तिमत्वावर सुंदर लेख वाचायला मिळाला

    ReplyDelete
  15. समाज उत्थानाची तळमळ आणि त्यासाठी त्याग करणार्या सर्वच महामानवांना वंदन! गजानन खातू जीं चं अभिनंदन 🌹

    ReplyDelete