दिनांक : १८/०४/२०१९
प्रति,
मा. शिक्षण निरीक्षक
उत्तर विभाग, मुंबई.
महोदय,
घाटकोपर येथील साईनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील महिला शिक्षकांनी संस्थाचालकाच्या सततच्या अश्लील व असभ्य भाषा आणि वर्तनाला कंटाळून संस्थाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ९ एप्रिल २०१९ रोजी एका महिला शिक्षिकेला केबीनमध्ये बोलावून दमबाजी केल्याने त्या बेशुद्ध झाल्या व त्यांना तातडीने शाळेतील शिक्षिकांनी रुग्णालयात आयसीयुमध्ये ऍडमिट केले. (संबंधित महिला शिक्षिकेचे नाव उघड होऊ नये म्हणून इथे उल्लेख केलेला नाही.)
संबंधित घटना कळताच मी शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांना त्याच दिवशी घटनास्थळी पाठवले होते. त्यांनी शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या समवेत जाऊन घाटकोपर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. मी स्वतः हॉस्पिटलमध्ये पीडित शिक्षिका आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शाळेत जाऊन सर्व शिक्षकांचीही बैठक घेतली. त्यातून कळलेली वस्तुस्थिती धक्कादायक आणि संतापजनक आहे.
संस्थाचालक नामदेव घाडगे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी १२ एप्रिलला शिक्षक भारतीने घाटकोपर पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढला होता. संस्थाचालकाच्या मानसिक व आर्थिक शोषणाने संतापलेल्या महिला शिक्षकांच्या सोबत मुंबईतील सर्व शिक्षक आहेत. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगिता पाटील, कल्पना शेंडे, श्रीमती डिसोजा या सर्वांच्या समवेत मी स्वतः घाटकोपर पोलीस स्टेशन आणि मुलुंड येथे डिसीपी मा. श्री. अखिलेश सिंग यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणात पीडित शिक्षिकेचीही फिर्याद नोंदवून घेण्याचा आग्रह धरला. त्यानुसार ती तक्रार आता नोंदवून घेतली आहे. शाळेमध्ये अशी घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपल्याशी बोलल्यानंतर आपण तातडीने दखल घेतली त्याबद्दल मी आभारी आहे. मात्र शिक्षण निरीक्षक या नात्याने आपण तातडीने या घटनेसह पुढील मुद्यांवर चौकशी करुन प्रशासक नेमण्याची कारवाई केली पाहिजे, या मागणीसाठी हे सविस्तर पत्र. महिला शिक्षकांचा सन्मान आणि प्रतिष्ठा याबाबत कोणतीही तडजोड कदापि होता कामा नये. घाटकोपर साईनाथ संस्थेत जे घडलं आहे, ते अत्यंत लज्जास्पद आणि चीड आणणारं आहे.
साईनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शाळेतील लाईट बील, पाणी बील, मेंटेनन्स आपल्या पगारातून देत आहेत. इतकेच नव्हे शाळेतील सौर उर्जेसाठी, पत्राशेडसाठी, शाळेतील कोणत्याही उपक्रमासाठी शिक्षकांकडून वारंवार वर्गणी काढली जात होती. केवळ वर्गणीच नाही तर महिला शिक्षकांवरही अश्लाघ्य भाषेचा वापर वारंवार संस्थाचालकाकडून करण्यात येत होता. शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार हे लक्षात आल्यावर संस्थाचालकांनी शिक्षकांकडे पैसे मागायला सुरवात केली. शिक्षकांनी नकार दिल्यानंतर संस्थाचालकांनी दमबाजी करत अश्लील भाषेचा वापर केला. संस्थाचालक नामदेव घाडगे दारू पिऊन शाळेत येतात. फक्त स्टाफ रुममध्ये त्यांनी सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे महिला शिक्षिकांची प्रायव्हसी धोक्यात येते. हे कॅमेरे तातडीने बंद केले पाहिजेत.
संबंधित पीडित शिक्षिकेच्या बाजूने शाळेतील सर्व शिक्षक ठामपणे उभे राहिले. पोलिसात जाण्याचे त्यांनी धैर्य दाखवले. त्या सर्वांच्या पाठीशी शिक्षक भारतीचे पदाधिकारी उभे राहिले, याचा शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मला अभिमान वाटतो. आपणही या शिक्षकांच्या बाजूने उभे राहावे, अशी अपेक्षा आहे.
साईनाथ शाळेत महिला शिक्षकांची संख्या मोठी आहे. त्या प्रचंड घाबरलेल्या आहेत. सर्वच शिक्षक दहशतीखाली आहेत. शैक्षणिक वातावरण बिघडलेले आहे. शिक्षकांचे आर्थिक व मानसिक शोषण सुरू आहे. महिला शिक्षकांबद्दल ज्या पद्धतीचे अश्लाघ्य शेरेबाजी केली जाते, त्याचा उल्लेखही या पत्रात करता येत नाही. विद्यार्थी आणि पालकांचीही आर्थिक लुबाडणूक होत आहे. मुंबईतील शिक्षण संस्था या नियमाने व सचोटीने काम करत असतात. तिथे गैर घडत नाही. मुंबईच्या संस्था पैसे मागत नाहीत हा आजवरचा लैकिक आहे. मात्र साईनाथ शिक्षण संस्था व संस्थाचालक घाडगे यांच्यासारखे अपवाद मुंबईची शैक्षणिक प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत. घाडगेने मुंबईला कलंक लावला आहे. त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पोलीस त्यांचे काम करतील परंतु शिक्षण निरीक्षक म्हणून आपण तातडीने सदर शाळेवर प्रशासक नेमावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करावी, ही विनंती. तसेच संस्थाचालक नामदेव घाडगे यांच्यापासून असलेला धोका लक्षात घेता आणि त्यांच्या विकृत शेरेबाजीला प्रतिबंध करण्यासाठी घाडगे यांना शाळेच्या आवारात येण्यास प्रतिबंध करण्यासाठी आपण स्वतः पोलीस व शासनाकडे शिफारस करावी, ही विनंती.
धन्यवाद!
आपला स्नेहांकित,