निधी चौधरींच्या Tweet वर तुटून पडलेल्यांचं डोकं पायल रोहतगी पेक्षा वेगळं नाही. त्यांची तुलना प्रज्ञा ठाकूरशी करत नाही कारण ती पक्की आतंकवादी आहे. निष्पापांचे जीव घेण्याचं समर्थन करणारे आतंकवाद्यांइतकेच भयंकर असतात. पायल रोहतगीची तुलना यासाठी केली की डोक्यात भुसा भरला की काय होतं ते कळावं.
निधी चौधरी महाराष्ट्राच्या केडरमध्ये आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिकेत त्या अतिरिक्त आयुक्त होत्या. आता त्यांची बदली मंत्रालयात झाली आहे. त्या Tweet मुळे.
त्या सुट्टीवर आहेत. बाहेरगावी आहेत. आज सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो. माझं Tweet काहींना समजलं नसेल पण खुद्द मा. शरद पवार साहेबांनी पत्र लिहावं याचं दुःख त्यांना सलत होतं. पवार साहेब पक्के सेक्युलर आहेत. इहवादी आहेत. कर्मकांड, भाकड कथा आणि जातीयवादाला त्यांच्या मनात थारा नाही. त्याहून अधिक म्हणजे साहित्य संस्कृतीचं समृद्ध आकलन असलेले फार थोडे राजकारणी आहेत, त्यापैकी ते एक आहेत. त्यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या गोंगाटात गोंधळून पत्र लिहावं याचं स्वाभाविक आश्चर्य निधी चौधरी यांना वाटत होतं.
निधी चौधरी यांच्या त्या Tweet वर जितेंद्र आव्हाड तुटून पडले. गांधीद्वेष ज्यांनी वर्षानुवर्षे मनात जपून ठेवला आहे, ते मात्र गंमत पाहत आहेत. निधी चौधरी यांनी त्यांचं ते Tweet आता डिलीट केलं आहे. वाचकाला वक्रोक्ती कळत नसेल तर त्या तरी काय करणार. त्यांचं मूळ Tweet मुद्दाम जसंच्या तसं खाली देत आहे -
What an exceptional celebration of 150th Birth Anniversary is going on -
High time, we remove his face from our currency, his statues from across the world, rename institutions/roads named after him! That would be a real tribute from all of us !
ThankU #Godse for 30.01.1948
ही प्रतिक्रिया व्यंगात्मक आहे. वक्रोक्तीचा उत्तम अलंकार आहे. पण मराठी भाषा आणि साहित्यातला विनोद, व्यंग, उपरोध, वक्रोक्ती या अलंकारांचा गंध नसलेल्यांना त्याचं आकलन कसं होणार? त्यांना वाटलं निधी चौधरी गोडसेचं समर्थन करताहेत. गांधींचं चित्र नोटेवरुन हटवायला सांगताहेत. पुतळे पाडायला सांगताहेत.
दोन दशकापूर्वी असंच काहीसं छगन भुजबळांच्याबाबत घडलं होतं. महापौर होते तेव्हा ते. मंडल आयोगाची ठिणगी पडली होती. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे भुजबळ अस्वस्थ होते. बंडाच्या पवित्र्यात होते. त्याच काळात गोडसेची जयंती हिंदुराष्ट्रवाद्यांनी साजरी केली होती. त्यावर भुजबळ उपरोधाने म्हणाले होते, 'आता गांधींचे पुतळे पाडले जातील आणि गोडसेचे पुतळे उभारले जातील.' त्यांच्या टिकेच्या रोखात शिवसेनाही होती. पण उपरोध कळला नाही आणि भुजबळांना गोडसे समर्थक ठरवण्यात आलं. आता जसं निधी चौधरींना ठरवण्यात आलंय.
निधी चौधरी तरुण आयएएस अधिकारी आहेत. इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत. त्यांच्या बॅचच्या त्या टॉपर आहेत. अधिकारी वर्ग सहसा बाकीच्या भानगडीत पडत नाही. पण निधी चौधरी संवेदनशील आहेत. सोशल मीडियावर त्या कायम जागरुक असतात. सोशल मीडियावरचा अतीउत्साह कधी कधी संकटात टाकतो. तसं त्यांचं झालं आहे. इंग्रजी साहित्यातले Satirist जोनाथन स्वीफ्ट (Jonathan Swift 1667 - 1745) ज्यांना माहित आहेत त्यांना निधी चौधरीच्या प्रतिक्रियेतलं व्यंग लगेच कळलं असेल. मात्र व्यंग, उपरोध, विनोद, वक्रोक्ती ज्यांच्या गावी नाही त्यांना काय कळणार?
निधी चौधरी पक्क्या गांधीवादी आहेत. गेले काही महिने द्वेषाचं राजकारण करणारे सोशल मीडियावर जो धुरळा उडवत आहेत त्यातून आलेल्या उद्वेगातून निधी चौधरींनी Tweet केलंय. इतिहासाची मोडतोड, महापुरुषांची घृणास्पद निंदा नालस्ती रोज सुरु असते. गांधींवर तर अनाप शनाप लिहणंही सुरु आहे. त्यामुळे निधी चौधरी यांनी चिडून ते व्यंग लिहलं. काळ कसा आला आहे, हे त्यांना सांगायचं होतं. त्यांनी आता सविस्तर खुलासा केला आहे. जुने अनेक स्क्रिनशॉट पुन्हा टाकले आहेत. खरं तर गरज नव्हती त्याची. पण खुलासा करावा लागला त्यांना.
अडचण निधी चौधरींची नाही. केवळ मराठीच नाही एकूणच भारतीय समाजाच्या आकलनाची आहे. आपलं शिक्षण आणि आपला भाषा साहित्य व्यवहार यांचा प्रदेश आपण किती संकुचित करुन ठेवला आहे. व्यंगही आपल्याला कळू नये. भावना लगेच उद्यपीत होतात. हिंसक होतात.
दिनकर मनवरची कविता आली तेव्हाही असंच घडलं. पाणी कसं अस्तं, या त्या कवितेवरुन किती वादळ आलं. पाणी हा शब्द मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये... या पहिल्या ओळीने कवितेची सुरवात होते. भिती शब्दाच्या उच्चाराची तर आहेच. पाणी की पानी. पाण्याला सोवळं आहे. स्पृश्य - अस्पृश्यता आहे. इतिहास आणि वर्तमानातल्या असंख्य वेदना पाणी कसं अस्तं या कवितेल्या प्रतिमा व्यक्त करतात.
काळं असावा पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरुन?
या कवितेतल्या तिसऱ्या ओळीवरुन वादळ उठलं. आदिवासी तरुणांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. नामदेव ढसाळ न वाचलेल्या आंबेडकरी तरुणांचीही प्रतिक्रिया तशीच होती. कविता कुणी समजूनच घेत नव्हतं. दिनकर मनवरांनी कवितेत वापरलेल्या प्रतिमा इतक्या भन्नाट आणि अपूर्व होत्या की तोड नाही. त्याअर्थाने ही ऐतिहासिक कविता. मुद्दाम काही ओळी देतो.
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माणसांची
ते ही पाणी पाणीचं अस्तं.?
पाणी स्पृश्य असतं की अस्पृश्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?
आदिवासींच्या आदिम दुःखालाही पाझर फोडणारी कविता समजली नाही. दिनकर मनवरही अधिकारी आहेत. त्यांना माघार घ्यावी लागली. निधी चौधरी यांनी माघार घेऊ नये.
असंच काहीसं घडलं होतं वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या कवितेबद्दल तीही कविता अशीच व्यंगात्मक होती. कळली नाही कुणाला. त्यातले शब्दप्रयोग श्लील अश्लीलतेच्या वादात सापडले. गोडसेवादी पतीतपावन संघटनेने गांधी कैवाराचा देखावा करत कवीला कोर्टात खेचलं. त्याबद्दलचा लेख सोबतची लिंक क्लीक करुन वाचता येईल - https://kapilpatilmumbai.blogspot.com/2015/06/blog-post_66.html
काही समजून न घेता जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा समजायचं वैचारिक मांद्य आलं आहे. आपण सगळेच त्याचे शिकार आहोत. चिंता करणारी सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर ती ही आहे. हे वैचारिक मांद्यच फॅसिझमला स्वार करत असतं.
माझी नम्र विनंती आहे आदरणीय शरद पवारांना त्यांनी त्यांचं पत्र मागे घ्यावे अन्यथा एका संवेदनशील आणि महात्माजींच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या अधिकारी बाईंचा बळी जाईल.
- कपिल पाटील
This comment has been removed by the author.
ReplyDelete़खरेय... गोडसेवादी गांधी वाद्यांचा व कर्तव्य तत्पर महिला अधिका-याचा परस्पर काटा तोही शरद पवारांकडून निघतोय म्हणून खुश ़़आहेत. वैचारिक दिवाळखोरी ़एवढी की तुमचा मांद्य
ReplyDeleteशब्द त्यांना समजणार नाही... English Satire समजत नाही, पण मराठी व्यंग सुद्धा समजत नाही... मेंदू विकले आहेत... निधी चौधरींचा दिनकर मनवरांसारखा बळी जाऊ नये.त्यांना पाठिंबा... डॉ.लता प्रतिभा मधुकर
निधी चौधरी प्रकरणानंतर उपरोधिक बोलताना भीती वाटायला लागली कारण कुठलाही विचार व पार्श्वभूमी समजून न घेता फक्त प्रसिध्द च्या हव्यासापोटी टोकाची टीका व ट्रोल केलं जातंय. डाव्या व उजव्या दोन्हीही बाजुंनी
ReplyDeleteमला वाटत निधी चौधरी किंवा पायल रेहतोगी या उद्याच्या भावी प्रज्ञा ठाकूर आहेत.विशिष्ट विचारधारेच समर्थन करताना त्याचा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार न करणाऱ्या प्रवृत्तीची मानस अविचारी असतात.असाच प्रत्यय निधी व पायल च्या बाबतीत राज्याला येतोय.ज्या प्रकरणावर आदरणीय व जाणकार शरद पवार साहेबांना भाष्य करण्याची वेळ येते याचा अर्थ नक्कीच परिस्थिती चिंताजनक आहे.सनदी अधिकारी हवेत उत्तम व्यवस्थापनासाठी ना की समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी.आशा प्रवृत्तीला डोक्यावर घेणं अविचारी प्रवृत्तीला खतपाणी घातल्यासारखे होईल.
ReplyDeleteखूप छान दादा, मीदेखील सुरवातीला निधी चौधरींवर संतापलो होतो, पण ह्या सगळ्यातून थोडा मनस्ताप होईल, फायदा मात्र जास्त होईल, नकारात्मक प्रसिद्धी माणसांना पंतप्रधान पदापर्यंत घेऊन गेलेली आपण पाहिले आहे
ReplyDeleteफारच छान मांडलं आहेस तु कपिल. मी जेव्हा फडणवीसांनी त्यांची बदली केली हे वाचलं तेव्हाच मला दाट संशय आला. गांधींच्या विरुध्द बोलणार्यावर फडणवीसांनी कारवाइ केलीय हे कसं शक्य आहे. ते तर अति आनंदी झाले असतील. पवारांबद्दल काय बोलायचं वय झाल्यानं आता योग्य अयोग्य कळेनासं झालयं की पक्षावरची पकड संपत चाललीय. आव्हाडसारख्या भंपक माणसाच्या बोलण्यावर पवारसाहेब प्रतिक्रिया देणार असतील तर दुसरं काय म्हणणार?
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteनिधी चौधरी कुणी राजकारणी स्री नसून भारतीय प्रशासनाचा गाडा हाकणार्यांपैकी एक आहेत हे विसरुन चालणार नाही आणि भा.प्र.से.मधिल अधिकार्यांसाठी एक निश्र्चित अशी आचार संहिता आखून दिलेली असते, त्या आचार संहितेअंतर्गत राहूनच आपली सेवा बजावायची असते. मग भलेही एखाद्या बाबतीत आपले मत सरकारी मान्यतेच्या विरुद्ध असले तरीही ते सर्वसामान्य जनतेसमोर प्रकट न करण्याचे पथ्य त्यांना पाळावे लागते याचे भान निधी चौधरी यांना राहिले नाही याचे आश्चर्य वाटते.
ReplyDeleteछान सर..
ReplyDeleteMahatma gandhicha logo aslelya notacha wapr brhtachar darudukan va ettar bekaideshir dhandyasathi vapar karu naye.tyanchasathi vegla logocha wapr karun nota chapaya.
ReplyDeleteMahatma gandhicha logo aslelya notacha wapr brhtachar darudukan va ettar bekaideshir dhandyasathi vapar karu naye.tyanchasathi vegla logocha wapr karun nota chapaya.
ReplyDeleteआयएएस अधिकारी असलेल्या निधी चौधरी या गांधींना मानणाऱ्या असल्या तरी त्यांचे हे ट्विट उपहासात्मक अजिबात वाटत नाही. म्हणजे त्यांना उपहास जमलाय हे खरे नाही. नाहीतर त्यांना मागच्या पोस्ट स्पष्टीकरणासाठी उचकटून काढाव्या लागल्या नसत्या. बाकी त्या गांधी द्वेषी असत्या तरी खुद्ध त्या महात्म्याने त्यांना माफ ही केलं असतं. त्यामुळे पुढच्या कोणत्याही कथानकाची आवश्यकता नव्हती...
ReplyDeleteअगदी खरंच आहे सर तूम्ही लिहीलेले. निधी मँडम च्या लिखाणावर दंगा करणा-यांना उपहासात्मक लिखाण समजले नाही असं मी मानत नाही. निधी मॅडमनी ज्या धडाक्याने त्यांच्याकडे असलेल्या खात्यात सुधारणा केल्या त्यामुळे भ्रष्टाचार बंद झाला आहे. आणखी काही खात्यात सुधारणा चालू आहेत.
ReplyDeleteआपल्या राजकीय पक्षांना 'टी चंद्रशेखर, तुकाराम मुंढें' यांच्यासारखे अधिकारी असले की भ्रष्टाचार करता येत नाही. त्यामुळेच षडयंत्र रचून मिडीयाला हाताशी धरून निधी मॅडम ना हटवले गेले आहे.