Wednesday, 17 June 2020

सिंहासन हलवणार दिगू टिपणीस


महाराष्ट्राच्या राजकारणावर अरुण साधूंची 'सिंहासन' कादंबरी खूप गाजली. जब्बार पटेलांनी त्यावर चित्रपटही काढला. त्यात दिगू टिपणीस नावाच्या पत्रकाराची व्यक्तिरेखा होती. राजकारणातले ते निर्दय डावपेच, उलथापालथी यांचा साक्षीदार होता दिगू टिपणीस. चित्रपटाची अखेर अस्वस्थ, वेडापिसा झालेल्या दिगू टिपणीसला दाखवून होते.

दिनू रणदिवे आणि जगन फडणीस या दोन पत्रकारांनी महाराष्ट्राची राजकीय पत्रकारिता चार दशके गाजवली. जगन फडणीस आजारपणातून आधीच निघून गेले. दिनू रणदिवे यांना 95 वर्षांचं आयुष्य लाभलं. पण दोघांची अखेर कफल्लक फकिरा सारखीच होती. दोघेही शेवटपर्यंत अस्वस्थ होते. दोघांच्याही जीवाची तगमग सुरू असायची. सामान्य माणसांशी, गरिबांशी, दुबळ्यांशी नाळ त्यांची जोडलेली होती. 
सिंहासन मधला तो दिगू टिपणीस दिनू रणदिवे आणि जगन फडणीस या दोघांचंच प्रतिबिंब होतं. 

दिनू रणदिवे, जगन फडणीस आणि सिंहासनकार अरुण साधू या तिघांच्या सोबत पत्रकारितेत काम करण्याची संधी मला मिळाली. तिघांकडून खूप शिकलो. तिघेही डाव्या विचारांचे. अरुण साधू मार्क्सवादी. दिनू रणदिवे आणि जगन फडणीस समाजवादी. तिघांच्याही जीवन निष्ठा शेवटच्या माणसाला वाहिलेल्या. 

अरुण साधू साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. तशी शैली जगन फडणीस आणि दिनू रणदिवे यांच्याकडे नव्हती. पण या दोघांची बातमीदारी अस्सल होती.  जगन फडणीसांचे 'महात्म्याची अखेर' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रणदिवेंचेही काही दीर्घ वृत्तांत एकत्र केले असते तर दोन, चार पुस्तकं सहज होऊ शकली असती. 

दिनू रणदिवे लोक विलक्षण माणूस. सत्ताधाऱ्यांना हलवण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांनी उघडकीस आणलेल्या सिमेंट प्रकरणात शेवटी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनाही पायउतार व्हावं लागलं. बातमीचा माग काढताना ते पिच्छा सोडत नसत. सत्ताधाऱ्यांची पर्वा करत नसत. पण रणदिवेंनी एकदा बातमी दिली की त्याचा खुलासा परत करावा लागत नसे. 

रेल्वेच्या संपात ते दादर स्टेशनला दिवसभर उभे राहिले. किती ट्रेन जाताहेत हे मोजण्यासाठी. सगळं काही सुरळीत सुरू आहे, असं सांगणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा रणदिवेंनी पर्दाफाश केला. 

रणदिवे मूळ आमच्या चिंचणीचे. पालघर जिल्ह्यातले. तिथल्या शेतकरी आणि आदिवासींशी असलेली नाळ त्यांनी पत्रकारितेतही जपली. राष्ट्र सेवा दल आणि डॉ. राममनोहर लोहियांमुळे त्यांच्या पत्रकारितेला एक समाजवादी दृष्टी होती.

एकदा त्यांना स्मशानभूमीत जावं लागलं होतं. आडोश्याला उभा असणारा एक खिन्न चेहरा त्यांनी पाहिला. रणदिवेंनी त्याला विचारलं, काय झालं? 

त्या माणसाचं मुल गेलं होतं. दफनाला जागा नव्हती. पावसाने पाणी साचलं होतं. त्या स्मशानभूमीत दफनासाठी पण स्वतंत्र जागा होती. रणदिवेंनी त्याला ती जागा दाखवली. 

तो म्हणाला, तिथे मला परवानगी मिळाली नाही. कारण ती हिंदू दफनभूमी आहे आणि मी दलित आहे. माझ्यासाठी जागा मिळाली नाही. म्हणून पाणी साचलेल्या जागीच लहानग्या मुलाला दफन करावं लागलं. पाणी साचलंय माझ्या मुलाला सर्दी होईल हो. म्हणून तो ओक्साबोक्शी रडायला लागला. 

त्याच्या उत्तराने रणदिवे हादरले. 'मुंबईतल्या हिंदु दफनभूमीत दलितांना जागा नाही.' ही बातमी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स मध्ये गाजली. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. गजहब झाला. त्याच दिवशी संध्याकाळी शासनाने आदेश काढला, सर्व जातींना एकच स्मशानभूमी आणि दफनभूमी राहील. 

मुख्यमंत्री काय म्हणाले? आणि विरोधी पक्ष नेत्यांनी काय आरोप केला? नेत्याच्या मुलाने काय प्रताप केले? आणि दुसऱ्या युवराजाने मदतीचे फोटो कसे काढले? यावर सध्या वर्तमानपत्रांचे रकाने आणि माध्यमांचे बाईट्स भरलेले असतात. 

पण मुंबईतल्या स्मशानभूमीत जातीभेद चालतो, ही बातमी रणदिवेंच देऊ शकले. 

लॉकडाऊनमध्ये उद्ध्वस्त झालेल्या आणि हजार, दोन हजार किलोमीटर पायी चालत निघालेल्या स्थलांतरित कामगारांच्या रक्ताळलेल्या पायांची बातमी किती माध्यमं चालवतात?

अशा बातम्यांपासून माध्यमं व्यवस्थित Social Distancing  पाळत असतात. रणदिवेंच्या बातमीदारीत ना Social Distancing होतं ना Physical. 

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा वारसा ज्या घरात आहे. त्या घरातले उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत. प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे,शाहीर अमरशेख, सेनापती बापट यांच्या लढ्यातून संयुक्त महाराष्ट्र झाला. 105 हुतात्मे झाले. महाराष्ट्र जन्माला घातलेल्या या आंदोलनाचा जन्मच मुळी दिनू रणदिवेंमुळे झाला. पहिली ठिणगी त्यांनीच टाकली. शिवाजी पार्कच्या पहिल्या सभेचे आयोजक ते आणि प्रभाकर कुंटे होते. 

संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे साप्ताहिक रणदिवेंनी सुरू केलं होतं. पहिला अंक त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दादरच्या रस्त्यांवर ओरडत विकला आणि तासाभरात 2 हजार प्रति संपल्या.  पुढे 50 हजारावर खप गेला होता. गोवा मुक्ती आंदोलनातही रणदिवेंनी तुरुंगवास भोगला. 

संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेसाठी रणदिवे सर्वप्रथम प्रबोधनकार ठाकरेंकडे गेले होते. तिथेच त्यांची बाळासाहेब ठाकरेंशी ओळख झाली आणि पत्रिकेच्या पहिल्या अंकापासून बाळासाहेबांची पहिली वहिली व्यंगचित्र प्रकाशित होऊ लागली. हे मैत्र्य त्या दोघांनी अखेरपर्यंत जपलं. दोघांचे अरेतुरेचे संबंध होते. 

दिनू रणदिवे नेता मानत ते राममनोहर लोहियांना आणि एस.  एम. जोशींना. पण आंदोलन संपल्यानंतर ते राजकारणात गेले नाहीत. पत्रकारीतेतच रमले. महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला. रणदिवे अखेरपर्यंत तिथेच राहिले. चीफ रिपोर्टर म्हणून निवृत्त झाले. 

दिनू रणदिवे माझ्या गावचे. समाजवादी विचाराचे. सेवा दलाचे. त्यामुळे त्यांचं प्रेम खूप लाभलं. अलीकडच्या काळात त्यांची फारसी भेट होत नव्हती. पण काल अखेरचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा गलबलून गेलो. त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचं महिन्यापूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे एकटे पडले होते. घरी करणारं कुणी नव्हतं. महाराष्ट्र टाइम्सचा हॅरीश शेख आणि दीपा कदम हे पत्रकार दांपत्य त्यांची अखेरच्या काळात सेवा करत होते. संजय व्हनमाने लालबागच्या राजाकडून त्यांना रोज डबा पाठवत होता. समर खडस सांगत होता हॅरीस आणि दीपाने खूप सेवा केली. लॉकडाऊनच्या काळात अशा माणसांचे हाल पाहवत नसतात. पण तरुण पत्रकार मित्र आस्थेने काम करतात याचंही कौतुक वाटतं.

काही दिवसांपूर्वी दिनू रणदिवे यांना गृहमंत्री अनिल देशमुख भेटायला आले होते. रणदिवेंनी त्यांना काय विचारलं असेल? 

लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांचे हाल होताहेत. कधी संपेल हे?

महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा दिनू रणदिवे मानदंड होते. मापदंड.

- कपिल पाटील

2 comments:

  1. छान लिहिले आहे. नव्या पिढीला हे माहीत नव्हतं... किंबहुना जुन्या माणसांना कोणी लक्षात ठेवत नाहीत. ' जुने जाउद्या मरणालागुनि ' हे चुकीच्या ठिकाणी इम्पलिमेंट होते हल्ली. आभारी आहे

    ReplyDelete
  2. अशी आदर्शवत व महान व्यक्तीमत्त्वे निवर्तल्या नंतर माहीत होणे, हे आपल्या पिढीचे दुर्दैव म्हणावे लागेल. चमको गिरीच्या आजच्या काळात कर्तव्यपराडमुख अशी माणसं भेटणे दुर्लभ आहे. महाराष्ट्राच्या पायाभरणीच्या ह्या रचाणाकाराचा चरण स्पर्श करणे, आपल्यासाठी सहज सोपे होते इतके ते सहजप्राप्य आणि साधे होते. पत्रकारिता, समजसेवा आदींचा मापदंड म्हणजे दिनू रणदिवे होत. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete