Friday, 12 July 2024

तूर्त रजा घेतो, पण कायम तुमच्या सोबत आहे



मा. संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक - बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन टर्म, तुम्ही मला निवडून दिलंत. 18 वर्ष मी तुमचा प्रतिनिधी, तुमचा आमदार होतो. आता मी तुमची रजा घेत आहे, कारण माझी मुदत संपली आहे. या 18 वर्षांमध्ये तुमच्या सर्वांच्या सोबतीमुळे आपण शिक्षकांना सन्मान मिळवून दिला. अनेक प्रश्न मार्गी लावले.

आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या महामानवींचे फोटो आता देशातल्या प्रत्येक शाळेत लागले आहेत. तुम्ही दिलेली साथ आणि शिक्षक भारती यांच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं.

सलाम -
चौथी निवडणूक आपण किरकोळ मतांनी हरलो असलो तरी सुभाष सावित्री किसन मोरे निवडणूक हरलेला नाही. पैसा, सत्ता आणि अपप्रकार यांचीच चर्चा या निवडणुकीत जास्त झाली. या निवडणुकीत विरोधकांकडून चुकीचे मार्ग अवलंबले गेले. त्यांच्याकडे सत्तेची प्रचंड ताकद होती. आपली साधनं अपुरी होती. तरीही आपण सारे निकराने लढलो. प्रलोभनांना भीक न घालता ठाम राहिलो. शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मूल्यांशी कधीही प्रतारणा केली नाही. त्यांनी त्यांचा किल्ला लढवला. निष्ठेने जागले. अनेक सामान्य शिक्षक आणि मुख्याध्यापक, संस्थाचालक यांनीही आपलं इमान विकलं नाही. अनेकांनी आलेली पैशाची पाकीटं परत केली. ज्यांना परत करता आली नाहीत त्यांनी सुभाषला मतदान केलं. न नमता सोबत राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना सलाम !

यापुढच्या संघर्षात आपण सारे एकत्र राहू. शिक्षक भारती संघटना अजून मोठी करू. तुम्ही जेव्हा जेव्हा अडचणीत असाल, तेव्हा शिक्षक भारती तुमच्या सोबत असेल. मी तुमच्या सोबत असेन.

विश्वास आणि निर्धार -
सुभाष मोरे याने अलिकडेच्या पेन्शनच्या लढाईत सर्वांना पेन्शनचा अधिकार मिळवून दिला. निवडणूक आपण गमावली असली तरी सुभाषने दिलेला पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही, एडेड असो किंवा अनएडेड असो आपल्या अधिकाराबद्दल आपण जागरूक राहू. निवडणुकीत ज्यांनी दगाफटका दिला आहे, ते या अधिकारालाही दगाफटका देणार आहेत. पण घाबरू नका, तुमच्यासोबत मी स्वत:, अशोक बेलसरे सर, सुभाष मोरे आणि संपूर्ण शिक्षक भारती ठामपणे उभी राहील. विधीमंडळात नसलो तरी सडकेवर आपण सोबत आहोत.

अनएडेड संस्थांमधील शिक्षकांचं अपरिमित शोषण होतं. त्यांना स्केल सुद्धा मिळत नाही. एडेड शाळेमध्ये लाखांचा पगार, अनएडेड शाळेमध्ये काही हजारात पगार. ही विषमता संपून एडेड प्रमाणे अनएडेडला सुद्धा सन्मानजनक वेतन आणि पेन्शन मिळालं पाहिजे, यासाठी शिक्षक भारतीच्या माध्यमातून आपण सारे प्रयत्न करू. शिक्षक भारती समतेसाठी, समान न्यायासाठी म्हणजे समाजवादी विचारांसाठी कटिबद्ध आहे.

मुंबईतल्या सगळ्या शिक्षण संस्थांना मालमत्ता करातून सूट देण्याचं काम आपण केलं आहे. कोट्यवधी रुपयांचा फायदा या पुढच्या काळात संस्थांना होत राहणार आहे. संस्थांना यात काही अडचण आल्यास मदतीसाठी शिक्षक भारती सदैव सोबत आहे.

1 तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून पगार देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण करू शकलो. पुढे महाराष्ट्रभर शिक्षकांना त्याचा फायदा झाला. शिक्षण सेवक नावाचा अपमान पुसला, मानधन वाढवलं. सरप्लस महिला शिक्षिकांना मुंबई बाहेर जाऊ दिलं नाही. रात्रशाळा वाचवल्या. शिक्षकांच्या कामाचे तास कमी केले. स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम बदलला. महापुरात वाहून गेलेल्या शाळांना नवीन इमारती मिळवून दिल्या. तत्कालीन शिक्षणमंत्र्यांचा अन्यायकारक मसुदा स्क्रॅप करायला लावला. शाळांचं कंपनीकरण करणारं बिल रोखलं. कंपनीमार्फेत होणाऱ्या शिक्षक भरतीला विरोध केला. खाजगी विद्यापीठात आरक्षणाची तरतूद करायला भाग पाडलं. विद्यार्थी फ्रेंडली टाईमटेबल बनवले. वस्तीशाळा शिक्षकांना कायम केले. यादी मोठी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार होते तेव्हा त्यांनी प्रसूती रजेचं बिल कामगार नेते एन. एम. जोशींच्या मदतीने मांडलं होतं. ते मंजूर झालं होतं. पुढे देशाचे मंजूर मंत्री म्हणून बाबासाहेबांनी देशातील महिलांना तीन महिन्यांची प्रसूती रजा बहाल केली होती. त्याच महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षक भारतीचा आमदार म्हणून मी जेव्हा गेलो तेव्हा ती रजा आपण सहा महिन्यांची केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक म्हणून मी हे करू शकलो, याचा मला अभिमान आहे.

समाजवादाची लढाई -
इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ?

इंग्लंडमध्ये लेबर पार्टी 400 पार जाऊन जिंकली आहे. फ्रान्समध्ये फॅसिझमला तिथल्या जनतेने नकार दिला. तर इराणमध्ये सुधारणेच्या दिशेने एक पाऊल पडलं आहे. सामाजिक न्याय आणि समतेसाठी समाजवादाची लढाई पुढील काळात आपल्याला एकजुटीने लढावी लागेल. शोषण संपवण्यासाठी समाजवादाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यासाठीच शिक्षक भारती आणि समाजवादी गणराज्य पार्टीचा आग्रह आहे. या पुढच्या लढाईत आपण आपल्या चुका, त्रुटी दुरुस्त करू आणि शिक्षक आणि सामान्यांच्या हितासाठी एकत्र राहू. लढू आणि जिंकू.

शिक्षक आणि शिक्षण विरोधी हितसंबंधीय समाजवादी विचारांचा रस्ता रोखत राहणार असले तरी आपण सारे रणात उभे आहोत. आणि हे रण आपणच जिंकणार आहोत.

तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद !

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील
संस्थापक अध्यक्ष, शिक्षक भारती
अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी

दि. 12 जुलै 2024

------------------

विधान परिषद कपिल पाटलांसारख्या चांगल्या संसदपटूला मुकणार आहे - देवेंद्र फडणवीस
Tap to watch - https://youtu.be/eTIhvj1n3o4   

यशवंतरावांना अपेक्षित, समाजवादाचा पाळणा सत्तर वर्षात हलला नाही याचं दु:ख - कपिल पाटील 

वैचारिक मतभेद असूनही सगळ्यांना कपिल पाटील आपला माणूस कसे वाटतात ? - निलम गोऱ्हे 

कपिल पाटील जबाबदारीला वाहून घेतलेला लोकप्रतिनिधी - एकनाथ शिंदे 

सतेज पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांनी कपिल पाटील यांना काय शुभेच्छा दिल्या ?

🙏

11 comments:

  1. आम्ही आपल्या सोबत आहोत...

    ReplyDelete
  2. सर आपल्यासारखा लोकप्रिय, सहकारी नेता मिळण ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. विशेष शाळा व विशेष शिक्षकांच्या समस्यांवरील आपले मार्गदर्शन भविष्यातही मिळावे. आपल्या यापुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. आम्ही आपल्या सदैव ऋणात राहू

    ReplyDelete
  4. धन्यवाद साहेब💐💐💐आपण शिक्षकांसाठी जे-जे केलेले आहे ते म्हणजे इतर शिक्षक आमदारांसाठी एक आदर्श उदाहरण राहील.आम्ही सुदैव आपल्यासोबत राहू.पुढील व्यापक कारकिर्दीसाठी आपणास कोटी,कोटी शुभेच्छा💐💐💐

    ReplyDelete
  5. साहेब आपण वस्तीशाळा शिक्षकांचे मायबाप आहात आम्हाला पोटापाण्याचा मार्ग आपण सुकर करून दिला त्यामुळे आम्ही साडे आट हजार वस्तीशाळा शिक्षक तुमच्यासोबत सदैव आहोत कधीही मुंबईत हाक दिली तर क्षणात आपल्यासाठी आम्ही लाखोंचा समुदाय उभा करू तुम्ही आमच्यासाठी दैवत आहात पुढेही असणार यात शंकाच नाहि... जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  6. सर तुम्ही आमच्या अडचणीच्या वेळी वेळोवेळी मागे उभे राहून आम्हाला केलेली मदत मी कधीही विसरणार नाही तुम्ही असे सतत आमच्या पाठीशी राहा हीच आमची इच्छा आहे आम्ही तुम्हाला कधीही रिटायर होऊन देणार नाही

    ReplyDelete
  7. सर तुमच्या विचारांचा पुरस्कर्ता आहे..
    तुमच्या सोबत खूपच कमी वेळा भेट झाली पण तुमच्या विचाराने प्रभावित झालो
    पुरोगामी चळवळीमध्ये नेहमीच तुमच्या सोबत असेन.

    ReplyDelete
  8. आम्हा वस्तीशाळा शिक्षकांसाठी आपन तर दैवत आहात साहेब यात शंका नाही .आम्ही नेहमी आपल्या सोबत आहोत .
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  9. साहेब नमस्कार! सर तुम्ही रजा घेता हे ऐकल्यावर थोडंसं दुःख झाले.कारण आज तुमच्या मुळेच वस्तीशाळा शिक्षक हा मानाने जगत आहे. तुमच्या मुळेच सर्व शिक्षक अगदी आपल आयुष्य आनंदात आपल्या कुटुंबीयांसोबत घालवत आहेत.जर तुम्ही आमच्या साठी भांडले नसते तर सोन्याचा घास मिळाला नसता.थोडीशी नुसती कल्पना जरी केली की आम्ही कायम झालो नसतो तर? आज आम्ही या पदावर नसतो साहेब . सर्व वस्तीशाळा शिक्षकांना तुम्ही उच्च स्थान दिले आहे. इंजिनीयर होणे सोपे आहे पण शिक्षक होण कठीण ते काम साहेब तुम्ही केलेत. साडे आठ हजार शिक्षकांना तुम्ही त्यांची हक्काची भाकरी मिळवून दिलीत.तुमचे हे ऋण फेडता न येण्यासारखेच आहेत. साहेब या साठी तुम्ही मात्र कशाचीही अपेक्षा नाही ठेवली. निःस्वार्थ आपले चांगले कार्य करत राहिलात. याची आम्हाला कायम जाणीव राहील .त्या बद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद ! आपण तर वस्तीशाळा शिक्षकांसाठी एक दैवतच आहात. शिक्षक आमदार म्हणून आदर्श असेल तर तो तुमचाच ! साहेब या आधीही आम्ही तुमच्यासाठी धावत यायचो. आणि या पुढे ही आम्ही तुमच्यासाठी सदैव सोबत असणार आहोत.याबाबतीत तिळमात्र शंका नाही. साहेब पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! आणि तुम्हाला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय शिक्षक भारती!

    ReplyDelete
  10. हा महा भ्रष्टाचारी, नीच, शिक्षक विरोधी, सडका समाजवादी कायमचा निरोप घे.

    ReplyDelete