जंतर मंतरवर खरंच जंतर मंतर झालं. सत्ताधारी हादरले. विरोधी पक्षांनाही कल्पना आली नाही. अभिजित दीपके आणि सोनम वांगचूक यांची कुचेष्टा सुरू होती. पण खांद्यावर कोणत्याच पक्षाचा झेंडा नसलेले लाखो तरुण मुलंमुली दिल्लीत आले. जंतर मंतरला जाणारा प्रत्येक चौक भरला होता. अजित अंजुम आणि निखिल वागळे या जेष्ठ पत्रकारांनी आणीबाणीपासूनचा काळ अनुभवला आहे. जेपींच्या जनआंदोलनात लाठ्याही खाल्ल्या आहेत. ते दोघेही म्हणत होते, असा उस्फूर्त असंतोष, अशी धग त्यांनी चाळीस – पन्नास वर्षात अनुभवली नव्हती.
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात व्यवस्थापन होतं. बर्याच मोठ्या शक्ती होत्या. पण दीपके आणि वांगचूक यांनी सुरवात केली तेव्हा आंदोलकांच्या डोक्यावर छतही नव्हतं. दीपकेने सुरवात केली तेव्हा फारसा प्रतिसाद नव्हता. कॉकरोच जनता पार्टीची कल्पना दीपकेला सुचली आणि दोन कोटी फॉलोअर्स जोडले गेले, तेव्हा हा गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड डाव असल्याचा आरोप झाला. आंदोलन तर आम्ही करणार हे कोण ? इथपर्यंत सवाल विचारले गेले. कॉकरोच या नावाचाही उपहास केला गेला.
नीटची फेरपरीक्षा झाली. त्यामुळे आंदोलन संपणार असाही अनेकांचा समज झाला. प्रत्यक्षात परीक्षेला बसलेले 22 लाख, परीक्षेची तयारी करणारे 50 लाख आणि मागच्या काही परीक्षांमध्ये अपयश आल्याने मनात शल्य बाळगणारे एखाद कोटीच्या वर अशा दीड ते दोन कोटी तरुणांच्या कुटुंबांच्या स्वप्नांचा हा प्रश्न होता. परीक्षेच्या तयारीसाठी आणि जमेल त्यांनी, त्यांच्या पालकांनी कोचिंग क्लाससाठी लावलेली आयुष्यभराची पुंजी या सगळ्यांचा हा प्रश्न होता. छात्र भारतीचे अनिकेत घुले, सचिन काकड, शाहीद, चेतन, दीप्ती, लेसली महाराष्ट्रभरातील मित्र घेऊन गेले होते. ते सांगत होते. ‘सर, संघटनांचे कार्यकर्ते आम्ही काही हजारात असू. सामान्य घरातली मुलं आणि काहींचे पालकही आले होते. ती गर्दी लाखाहून अधिक होती. ते चिडलेले होते. संतप्त होते. मेट्रोच काय सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद होतं. ते चालू असते तर गर्दी आणखी काही लाखांनी वाढली असती.’
जे अंतर राखून होते, जे गरळ ओकत होते, जे आरोप करत होते आणि आता वरातीमागून जे घोडं पुढे दामटत आहेत त्या मित्रांना एवढच सांगायचं आहे, ही लाखांची गर्दी स्पॉन्सर्ड नसते. लढणार्या तरुणांना नावं ठेवायची नसतात. तरूणाईच्या या जंतरमंतरने धार्मिक उन्मादाचा घंटारव मागे टाकला आहे. स्वप्नांचा आवाज पहिल्यांदा मोठा झाला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदी असंतोष संघटित केला, म्हणून त्यांना असंतोषाचे जनक मानलं गेलं. गेल्या दशकभराच्या धूसर, संभ्रमित आणि भयप्रद वातावरणात पहिल्यांदाच इतका मोठा असंतोष संघटित झाला आहे. या असंतोषाचं जनकत्व अर्थातच अभिजित दीपके आणि सोनम वांगचूक यांच्याकडे जात आहे. त्यांच्या आंदोलनाची हाक आणि त्यामागचा उद्देश अत्यंत मर्यादित होता. त्यांच्या राजकीय भविष्याची आज चर्चा करण्याची गरज नाही. त्यांना समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, डिंपल यादव, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा अपवाद वगळता कुणीही बळ दिलं नाही. असं का घडावं ?
आजवरच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आंदोलनांचं नेतृत्व, उच्चभ्रू जातीवर्गातून पुढे आलेलं असायचं. पहिल्यांदाच असं घडलं आहे की, असंतोषाचं नेतृत्व एक दलित तरुण आणि एक आदिवासी शास्त्रज्ञ करत आहे. एक, ‘माझा रंग निळा आहे. मी जय भीम आहे’, असं अभिमानाने सांगतो आहे. दुसरा, गांधीजींच्या मार्गाने आजवर रचनात्मक वाटचाल करणारा लद्दाखचा बौद्ध आहे. ज्या असंतोषाला आणि आंदोलनाला जातीधर्माचा रंग नाही अशा देशव्यापी लोकलढ्याचं नेतृत्व अनुसूचीत जाती आणि जमातीचे दोन प्रतिनिधी करत आहेत. त्यांची हाक सर्ववर्गातल्या तरुणांनी ऐकली आहे.
स्वातंत्र्य आणि संविधानाने काय बदल घडवला? तर तो बदल हा आहे. पंच्याहत्तर वर्षांनंतर बदललेलं हे चित्र आहे. मार्क्सच्या भाषेत सर्वहारा वर्ग क्रांतीचे नेतृत्व करत असतो. दीपके आणि वांगचूक नेते झाले, ही काहींची पोटदुखी तर नाही ना ?
या पुढचं राजकारण काय असेल त्याची चर्चा राजकीय नेत्यांना करू देत. व्यवस्था परिवर्तन हा मुद्दा आहे. राजकीय स्पर्धेत तो हरवतो. म्हणून राजकारणही बदलण्याची गरज आहे. प्रस्थापित आजचे असोत की कालचे. पत्ते पिसून व्यवस्था परिवर्तन होणार नाही. आज दीपके, वांगचूक आहेत. उद्या उमर खालिदही बाहेर येईल. हे तिघं हातात हात घेतील आणि सगळा समाज एकमय होईल. तेव्हा रस्ता सापडेल.
तोवर माझाच रस्ता खरा. आणि माझाच तेवढा पत्ता. या चर्चेत आपण गुरफटायची गरज नाही.
- कपिल पाटील