राजेंद्रबाबू दर्डा आज 70 वर्षांचे झाले. विश्वास बसणार नाही इतकी ऊर्जा आणि चैतन्य त्यांच्यात रसरसून भरलेलं असतं. बाबूजी म्हणजे जवरहलाल दर्डा यांच्यानंतर त्यांचा वैचारिक, राजकीय आणि व्यावसायिक वारसा विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा या दोन्ही बंधूनी आजवर इमानाने सांभाळला आहे. आणि पुढची पिढीही तो सांभाळेल याचा विश्वास या दोन्ही बंधूंच्या मुलांनी आपल्या कर्तृत्वाने दिला आहे.
जवाहरलाल दर्डा स्वातंत्र्यसेनानी. तुरुंगवास भोगलेले. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक सरकारांमध्ये मंत्री राहिले. पण गांधी, नेहरूंच्या विचारांचा वारसा त्यांनी पुढच्या पिढीत रुजवला. 'लोकमत' हे दैनिक बाबूजींनी सुरु केलं. पण महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात आणि प्रत्येक शहरात मराठी वर्तनमानपत्रांमध्ये 'लोकमत' अव्वल आहे. याचं कारण विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा या बंधूंची ती कमाल आहे.
या बंधूनी मला खूप प्रेमही दिलं. राजेंद्रबाबूंनी थोडं अधिकचं. 'लोकमत'मध्ये असताना मुंबईचा वार्ताहर म्हणून मी दोघांसोबतही काम केलं आहे. मग राजेंद्रबाबू मंत्री झाले, तेव्हापासून मीही आमदार आहे. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी जे महाराष्ट्राला दिलं त्याचा ऋणनिर्देश करणं आवश्यक आहे. मंत्री होताच त्यांनी सर्व शिक्षक आमदारांना चर्चेला बोलावलं होतं. नंतर सभागृहात शिक्षणाच्या प्रश्नांवर शिक्षक आमदार आक्रमक झाल्यानंतरही किंवा सरकारवर टीका करतानाही शिक्षणमंत्र्यांनी त्याचं कधी वाईट वाटून घेतलं नाही. उलट प्रत्येक टीकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
वस्तीशाळांच्या प्रश्नावर सरकारशी संघर्षाचा प्रसंग आला. मी परळच्या कामगार मैदानात उपोषणाला बसलो तर राजेंद्रबाबू दुसऱ्याच दिवशी धावत आले. मला म्हणाले, 'कपिल, तू उपास का करतो? मी प्रश्न सोडवतो.'
त्यांनी फार दिवस घेतले नाहीत. अवघ्या तीन दिवसात प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांना राजेंद्रबाबूंनीच बाजू समजावून सांगितली. मुख्यमंत्री स्वतः माझ्याशी फोनवर बोलले. 'मंत्रिमंडळात नक्की निर्णय करतो. मागणी मान्य करतो.' असं सांगितलं.
पुन्हा उपास सोडवायला राजेंद्रबाबू मैदानात रात्री हजर झाले. सर्वांना शब्द दिला. पुढे शब्द पाळलाही. साडे आठ हजार वस्तीशाळा शिक्षक कायम झाले. पूर्ण पगारावर आले. ते ऋण विसरता येणार नाहीत म्हणून नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली वस्तीशाळा शिक्षक राजेंद्रबाबूंचा वाढदिवस आवर्जून साजरा करतात.
आरटीईच्या एका तरतुदीचा गैरअर्थ काढत अधिकाऱ्यांनी शिक्षकांना आठ - आठ तासांची ड्युटी लावली होती. आणि आठ - आठ तास शाळा भरवण्याचं परिपत्रक काढलं होतं. राजेंद्रबाबूंना त्यातली त्रुटी लक्षात आणून देताच त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि सभागृहात तशी घोषणाही केली. अध्यापनाचे तास पूर्ववत केले.
राज्यातल्या शाळांसाठी कम्प्युटर प्रयोगशाळा सुरू करण्याची कल्पनाही त्यांचीच. त्यांच्याच कार्यकाळात 8 हजार शाळांना कम्प्युटर मिळाले. शिक्षण खात्यात ई लर्निंग आणलं. इंग्रजी सुधारायला लावलं. गणित आणि विज्ञानाचे अभ्यासक्रम सीबीएसईच्या अॅट पार राजेंद्रबाबूंनीच आणले. जमिनीवर बसणाऱ्या 24 लाख मुलांना पॉलिमर डेस्क बेंच दिले. शाळांना ग्रीन बोर्ड दिले. फी नियंत्रण कायदा आणला.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण सेवकांच्या मुद्द्यावर माझ्या खाजगी बिलाने सरकार अडचणीत आलं होतं. शिक्षणमंत्री असलेले राजेंद्र दर्डा त्यावेळेस विमानाने नागपूरहून निघत होते. पण त्यांना विधान परिषदेतील प्रसंग कळताच ते विमानातून उतरले. सभागृहात आले. घोषणा केली, मानधन वाढवण्याची आणि शिक्षण सेवक हे अवमानकारक नाव बदलण्याची. त्या सर्वांना आता परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक म्हटलं जातं.
वेतनेतर अनुदान पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही त्यांच्याच. उच्च व कनिष्ठ माध्यमिक विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द वगळण्याचा निर्णयही त्यांचाच. मुंबईतल्या शिक्षकांना 1 तारखेला पगार मिळावा म्हणून कोअर बँकिंग सुविधा देणाऱ्या बँकांमार्फत ईसीएस पद्धतीने वेतन देण्याची मागणी शिक्षक भारतीने केली. ती ही राजेंद्रबाबूंनीच पूर्ण केली.
राजेंद्रबाबू दर्डा यांनी शिक्षण मंत्री म्हणून केलेलं हे काम कधीही विसरता येणार नाही. ते उत्तम लेखक आहेत. पत्रकारही आहेत. आमदार, मंत्री झाल्यानंतरही त्यांच्यातली पत्रकारिता आणि लेखक त्यांनी विसरू दिलेला नाही. आजही ते लिखाण करतात. उत्तम लिहतात. राजेंद्रबाबू असोत किंवा विजयबाबू असोत यांनी बदलत्या राजकारणात एक पथ्य पाळलं आहे, सर्वांशी दोस्ती त्यांची असते. पण आपल्या मूळ विचारांशी ते प्रतारणा करत नाहीत. माणुसकीचा धर्म सोडत नाहीत. महावीरांच्या अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रहाचं व्रतही इमानाने पाळतात. अनेकांतवादाचा पुरस्कार करतात. भारताच्या विविधतेचं हे सूत्र महावीरांनीच तर सर्वप्रथम सांगितलं होतं. महावीरांचा तो धर्म विचार राजेंद्रबाबूंच्या पूर्ण जीवनात आढळतो. पुढची 30 वर्षही राजेंद्रबाबू असेच कार्यरत राहतील आणि 100 वा वाढदिवस करण्याची संधी देतील याची खात्री आणि याच शुभेच्छा!
- आमदार कपिल पाटील