Friday, 16 November 2018

संयुक्त कृतीची हाकसप्रेम नमस्कार,
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी कार्यालयात आपण निवेदन देणार आहोत. महाराष्ट्रभर दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते यात सहभागी होत आहेत. ही मोठी घटना आहे. म्हणून तुमचं अभिनंदन! तुम्हाला सलाम!

यापुढे सगळेच प्रश्न सुटे सुटे न लढता अशीच संयुक्त कृती करावी लागणार आहे. वस्तीशाळा शिक्षकांची संघटना ८ वर्षांपूर्वी माझ्याकडे आली तेव्हा त्यांना दीड हजार रुपये वेतन मिळत होतं. आज ते सन्मानाने कायम झाले आहेत. त्यांनी एकजुटीने लढाई केली. माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणून हे शक्य झालं. 

आता अंगणवाडी ताईंना शिक्षकाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. डी.एड.बी.एड. बेरोजगारांसाठी सरकारला नोकरभरती करायला भाग पाडायचं आहे. अतिथी निदेशकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. कला, क्रीडा शिक्षकांना पुनर्स्थापित करायचं आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे शोषण थांबवायचे आहे. जुन्या पेन्शनची लढाई आणखी बुलंद करायची आहे. या आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रात / प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांना आणि कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे - संघटना, झेंडे वेगळे असूदेत. काही बिघडत नाही. आपल्या सगळ्यांचं दुःख सारखं आहे. तेव्हा लढाई संयुक्तपणे करुया. 

एमपीएससीची परीक्षा देत लाखो विद्यार्थी नोकरीसाठी झगडत आहेत. पण नोकर भरती सुरु झालेली नाही. नोकरकपात, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण यामुळे नोकऱ्याच बंद झाल्या आहेत. तेव्हा तरुणांनाही सोबत घेऊन एकत्रित कृती करावी लागेल. 

खाजगी क्षेत्र उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी बनलं आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी असोत की दलित, ओबीसी, भटके विमुक्त. आदिवासी असोत की मुस्लिम. मराठा असोत की लिंगायत या सर्वांना खाजगी क्षेत्राचे दरवाजे बंद आहेत. खाजगी क्षेत्राचे दरवाजे उघडण्यासाठी अॅफर्मेटिव्ह अॅक्शनची आपली मागणी आहे. 

आपापल्या जिल्ह्यात संयुक्त कृती समिती स्थापन करा. लोकतांत्रिक जनता दलाचा प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षकांचा आमदार या दोन्ही नात्याने या लढाईत मी तुमच्या सोबत आहे. सर्वांना बरोबर घ्या आपण एकजुटीने ही लढाई यशस्वी करुया. 

या अनुषंगाने विविध मागण्यांच्या संदर्भात संयुक्त मागणी परिषद रविवार दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सांयकाळी ४ वा. परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संयुक्त आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. महाराष्ट्रभरातून विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. आपणही आपल्या सहकाऱ्यांसह अवश्य या, हे आग्रहाचे आमंत्रण. 

आपला,
आमदार कपिल पाटील

Monday, 8 October 2018

तर महाराष्ट्रात देखील व्यापम घोटाळा

आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र -दिनांक : ०८/१०/२०१८
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

विषय - सरकारी नोकर भरती महापरीक्षा पोर्टल मार्फत झाल्यास व्यापम घोटाळ्याची भीती.

विनंती - १) नोकरभरती लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी.
२) सरकारी नोकरीतील रिक्त जागा व भरतीबाबत श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी.

महोदय,
महाराष्ट्र सरकारमधील विविध विभागांमधील नोकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम महापरीक्षा पोर्टल मार्फत चालू आहे.

१. सदर परीक्षा ऑनलाइन असल्या कारणाने व विद्यार्थी संख्या खूपच जास्त असल्याने या परीक्षा एकाच वेळी घेणे अशक्य आहे. या परीक्षा अपुऱ्या संगणकामुळे खासगी संस्थांकडे जसे की सायबर कॅफे, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यासारख्या ठिकाणी सर्रास होत आहेत. सदर ठिकाणी अपुरी शासकीय व्यवस्था व खासगी हितसंबंध यामुळे प्रचंड प्रमाणात सामुहिक कॉपी सारखे गैरप्रकार घडत आहेत. नुकत्याच झालेल्या नगर परिषदमधील भरती प्रक्रियेत सामुहिक कॉपी झाल्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. 

२. एकूण परीक्षार्थींच्या तुलनेत संगणक खूपच कमी असल्याने एकच परीक्षा ७ ते ८ टप्प्यांमध्ये घेतली जातेय. यामुळे प्रश्न पत्रिकेचा दर्जा समान नसतो. अनेक प्रश्न परत परत विचारण्यात येतात. त्यामुळे दर्जा खालावतो तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. 

३. संगणक हे खूपच जवळ जवळ ठेवण्यात येत असल्याने विद्यार्थी चर्चा करुन पेपर सोडवतात. तसेच महापरीक्षा पोर्टलमध्ये परीक्षा प्रक्रियेबाबत खूपच मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे जसे की, वेळेवर परीक्षा न होणे, निकाल वेळेवर न लागणे, प्रश्नपत्रिकेचा दर्जा खूपच असमान असणे इ.

४. ऑनलाईन परीक्षा असल्याने लवकर प्रक्रिया अपेक्षित असताना खूपच जास्त हलगर्जीपणा दाखवला जातो. परीक्षा खाजगी संस्थांमध्ये होत असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर कॉपी करण्यासाठी होत आहे. 

५. या पोर्टलकडे इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्यासाठी मनुष्यबळ व संसाधने उपलब्ध नाहीत. एकूणच येऊ घातलेली महाभरती जर या महापरीक्षा पोर्टलमार्फत झाली तर महाराष्ट्रात देखील मध्यप्रदेश प्रमाणे व्यापम घोटाळा सहज शक्य आहे. प्रमाणिकपणे प्रयत्न करुन परीक्षा उत्तीर्ण होणे या पोर्टल मार्फत अवघड आहे. प्रमाणिक आणि मेहनती परीक्षार्थी उमेदवारांवर हा मोठा अन्याय आहे. 

६. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील ३० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब आढळून येते. यामुळे कार्यक्षमतेवर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला बेरोजगार या पदांच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबतची वस्तुस्थितीही शासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. 

तरी या सर्व परीक्षा महापरीक्षा पोर्टलमार्फत न घेता त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात. एकूण रिक्त जागांची उपलब्धता व भरती याबाबत सरकारने श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी, ही विनंती. 
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, एलजेडी महाराष्ट्र 

Friday, 24 August 2018

अटलजींची गंगा


चाहता हूं, की बेदाग निकल जाऊं।
मेरे पच्छात लोग सिर्फ इतना कहे, की आदमी अच्छा था।

ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग यांना दिलेल्या मनमोकळ्या मुलाखतीत खुद्द अटलबिहारी वाजपेयी असं म्हणाले होते. ते गेल्यावर खरंच लोकांनी सिर्फ इतना ही नही कहाँ, की आदमी अच्छा था। 

लालकृष्ण अडवाणी भावाकुल होणं स्वाभाविक होते. पंतप्रधान मोदीही चालले अंत्ययात्रेत. पण राहुल गांधी, सोनिया गांधी, कॉ. सिताराम येचूरी यांच्या प्रतिक्रियेत आपुलकी भरुन होती. शरद यादव आणि रामचंद्र गुहा यांचे लेख अटलजींचं मोठेपण सांगणारे होते. 

हिंदुत्ववादी मुशीत, संघाच्या तालमीत तयार झालेले अटलबिहारी वाजपेयी. असं काय होतं त्यांच्या व्यक्तीमत्वात? त्यांच्यातल्या उदारतेचं, अपार माणुसकीचं, लोभस संवादाचं अप्रुप सर्वांनाच आहे. शांतीभूषण यांनी तर लिहलं, संघातला धर्मनिरपेक्ष माणूस. हिंदुत्वाचे कठोर टीकाकार रामचंद्र गुहांनाही अटलजींच्या या व्यक्तीमत्वाचं आकर्षण वाटत होतं, 'कविता आणि एककल्ली कडवेपणा याची संगत कशी होऊ शकते? स्वयंसेवक असणारा माणूस अतिसंवेदनशील कविता कसा लिहू शकतो?' अटलबिहारी होतेच तसे कविहृदयाचे, दिलदारवृत्तीचे. शालीन. सभ्य. हळूवार आणि मुलायम. त्यांच्या बोलण्यातली, भाषणातली उब आश्वासक होती. विरोधकांनाच नाही, शत्रूलाही त्यांचं उबदार अलिंगन हवं होतं. 

वाजपेयी त्यांच्या आजाराने विस्मृतीच्या गर्तेत ओढले गेले, त्याला दशक अधिक झालं. पण जनमनाच्या स्मृती पटलावरून त्यांचं नाव कधीच गायब झालं नाही. द्वेषाच्या आणि दुहीच्या अग्नीत देशातले अनेक कोपरे करपत असताना अटलबिहारी वाजपेयी यांचं हिंदुत्व उदार आणि आश्वासक वाटावं हे स्वाभाविक आहे. धार्मिक कडवटपणाला सत्तेची धार चढत असणाऱ्या काळात वाजपेयींच्या  इन्सानीयत आठवण होणं ही तर वर्तमानाची गरज वाटावी. अघोषित दमनयंत्राच्या वातावरणात मोकळ्या श्वासासाठी  अटलजींची जमुरीयत अरुण शौरींनाही आठवावी यात नवल नाही. हे काय रसायन आहे? अटलबिहारी वाजपेयी नावाचं. घनघोर रात्रीच्या क्षितिजावर शुक्राच्या चांदणीचं दर्शन किती लोभस असतं. ती शुक्राची चांदणी अस्ताला गेली की हुरहुर वाटते. वाजपेयी जाण्याने ही हुरहुर सगळ्यांच्याच  काळजात जाणवली. कारण उजव्या क्षितिजावर आता तो शुक्रताराही नाही. 

अटलबिहारी वाजपेयी संघाचे होते. भाजपाचे नेते होते. बहुसांस्कृतिक, बहुवांशिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक अशा भारताला कट्टर हिंदुत्वाच्या सीमा विभाजीत करतात. भाजपची जिथे जिथे सत्ता आहे, तिथे तिथे उना, दादरी, सोनपेठ सारख्या घटना घडतात. तेव्हा तेव्हा विभाजनाची जखम अधिकच दुखरी बनते. अशी जखम वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी नाही दिली. आघाडीच्या सर्वसमावेशक राजकारणाला त्यांनी प्रधान्य दिलं. ही गोष्ट खरी की त्यांच्याच काळात पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला गेला. कामगार हक्काचे कायदे शिथिल झाले. शिक्षणाच्या अधिकाराला मर्यादा पडल्या. निर्गुंतवणुकीकरणाला वेग आला. सार्वजनिक क्षेत्राला ओहोटी लागली. वाजपेयी सरकारचा हा आर्थिक कार्यक्रम नरसिंहराव सरकारपेक्षा वेगळा नव्हता. त्यामुळे या प्रश्नाचा दोष एकट्या वाजपेयींचा नाही. काँग्रेसच्या नरसिंहराव सरकारचाही तितकाच आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांची किंमत आपण आज मोजतो आहोत. त्यात ढकललं असेल नरसिंहरावांनी पण वाजपेयींनी काही वाचवलं नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये एक फरक आहे. काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे. त्यामुळे त्या परंपरेतली मूल्ये जपणारे, देश समजणारे आणि देशाला साद घालू शकणारे नेते स्वातंत्र्योत्तर काळातही काँग्रेस देऊ शकली. संघ भाजपच्या विचारसरणीत ही मांदियाळी कधीच नव्हती. संघाचा किंवा भाजपचा कोणताच नेता देशाला साद घालू शकत नव्हता. अपवाद फक्त अटलबिहारी वाजपेयींचा. आसेतू हिमाचल देशवासियांशी बोलू शकणारी ती ताकद फक्त वाजपेयींकडे होती. हिंदुत्वाच्या सांप्रदायिक राजकारणापेक्षा आपली शेवटची ओळख 'आदमी अच्छा था!' ही त्यांना जास्त प्रिय होती. म्हणूनच संघ आणि भाजपच्या मर्यादा ते ओलांडू शकत होते. संवेदनशील, कविहृदयाशिवाय हे शक्य नाही. माणुसकीला पडणाऱ्या सीमा त्यांना मान्य नव्हत्या. 

पुरावा खुद्द वाजपेयींच्या भाषणाचाच देतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यात केलेल्या भाषणाचा. स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजकीय हिंदुत्वाचे जनक. सावरकर भारतमातेला राष्ट्रपुरुषाच्या रुपात पाहतात. ते मातृभू नाही, पितृभू मानतात. देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करत, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तेव्हा सावरकरांचे उद्गार होते, 'धर्मांतर हे राष्ट्रांतरच'. वाजपेयींना स्वातंत्र्यवीर वंदनीय होते. त्यांच्या कवितेत भारत राष्ट्रपुरुषच आहे. तरीही वाजपेयींचं हिंदुत्व सावरकरांपेक्षा वेगळं आहे. वाजपेयी आपल्या सावरकरांवरच्याच भाषणात म्हणाले होते, 'आपल्याकडे धर्मांतरण म्हणजे जणू राष्ट्रांतरण, असे आपण मानले आणि परस्परांमधल्या दुराव्याच्या रेषा अधिक ठळक करत राहिलो.'

अटलबिहारी वाजपेयी यांचं भारताचं आकलनही तितकच प्रगल्भ आहे. आपल्या भाषणात ते म्हणतात, 'भारतात चाल करुन आलेल्या प्रत्येक आक्रमकाने इथल्या दुहीचा फायदा उठवला. आपसातल्या भिंती तशाच जपण्याच्या नादात स्वतः लढवून कमावलेल्या गोष्टी, आक्रमकाच्या पायी घालत गुडघे टेकले. प्लासीची लढाई आठवा. जितके लोक मैदानात उतरून लढत होते. त्याहून दुप्पट लोक काठावर उभे राहून लढाईचा तमाशा पाहत होते. काहींना रणभूमीवर उतरायची परवानगीच नव्हती. उरलेल्यांना लढणाऱ्यांचा पराभवच हवा होता.' शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. कवी हृदयाचे अटलबिहारी वाजपेयी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्याधीग्रस्त महाकवी नामदेव ढसाळांना भेटायला गेले. ते फक्त कवी म्हणून? मला तेव्हा पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर वाजपेयींच्या पुण्यातल्या या भाषणात मिळालं.

पंडित नेहरुंविषयीचं त्यांचं प्रेम कधीच लपून राहिलं नाही. जनता पक्षात पहिल्यांदा ते परराष्ट्र मंत्री झाले. तेव्हा त्यांच्या दालनातली पंडित नेहरुंची तसबीर आधीच हलवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी फर्मान सोडलं आणि ती तसबीर पुन्हा भिंतीवर आली. परराष्ट्र व्यवहारात नेहरु नीतीच्याच मार्गाने  ते चालत राहिले. परराष्ट्र मंत्री असताना आणि पंतप्रधान असतानाही. पंचशीलाचा गुलाब नेहरुंप्रमाणे त्यांच्या कोटावर कायम होता.  

संघ भाजपात दीनदयाळांचा अंत्योदय आणि एकात्म मानवतावाद सांगितला जातो. पण त्यालाही असलेल्या मर्यादा वाजपेयींनी ओलांडल्या होत्या. जनता पक्षातून फुटून भारतीय जनता पक्षाची निर्मिती करताना वाजपेयींकडेच नेतृत्व होतं. जनसंघाच्या या नव्या अवताराला गांधीवादी - समाजवादाचं कोंदण देण्याचा प्रयत्न अटलबिहारी वाजपेयी यांनीच केला होता. त्यांचं स्कूल संघाचं होतं असं सर्वच म्हणतात. पण संघाच्या आधी ते आर्यसमाजी होते. त्यांचे वडील, त्यांचं घर आर्यसमाजी होतं. तो संस्कार ते कधीच विसरले नसावेत. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त केलं. '... We are sorry for that', असं ते प्रांजळपणे म्हणाले. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण दिली. त्याआधी नोव्हेंबर १९६६ मध्ये संतप्त साधूंची झुंड गोहत्या बंदीची मागणी करत संसदेवर चाल करुन गेली. तेव्हा त्या आतताईपणाला विरोध करणारे अटलबिहारी वाजपेयी एकमेव होते. 'गोहत्या बंदीच्या मागणीसाठी आक्रसताळ्या, हिंसक मार्गाचा अवलंब करणाऱ्यांनी आपल्या या बेमुर्वत कृत्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे पातक केले आहे.' असं पत्रकच त्यांनी प्रसिद्ध केलं. अमेरिकेच्या दौऱ्यावर होते पंतप्रधान वाजपेयी. राष्ट्राध्यक्षांच्या मेजवानीत बीफचीही डीश होती. कोणीतरी त्यांना त्याबद्दल हळूच कानात सांगितलं. वाजपेयी खळखळून हसत म्हणाले, 'अरे या गाई अमेरिकन आहेत. भारतीय नाहीत.' कश्मीरचं ३७० कलम हा भाजपच्या अजेंड्यावरचा एक विषय. पण कश्मीर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी वाजपेयी साहेबांनी कश्मीरीयतला अधिक महत्व दिलं. 

किती विलक्षण, दिलदार माणूस होता. सुसंस्कृत उदार, माणूसकीने ओथंबलेला नेता होता. त्यांचं भारतावर प्रेम होतं. भारताची त्यांची कल्पना ही हिंदुत्वाच्या कोंदणात बसणारी नव्हती. प्राचीन आक्रमकांनी भारताला सोने की चिडीया म्हटलं. आताचेही नेते सोने की चिडीया म्हणून भारताचं वर्णन करतात. वाजपेयी मात्र म्हणतात, 'इसका कंकर-कंकर शंकर है, इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।' हा फरक आहे. वाजपेयींची ही गंगा मैली होऊ देता कामा नये. दुरावा, दुही आणि द्वेष यांचा मळ गंगेत जाऊ नये, असं मानणाऱ्या प्रत्येकाला अटलजींची जरुर आठवण होत राहील. 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


मुंबईवर पकड असलेला शेवटचा काँग्रेस नेता 
गुरुदास कामत जिंदादिल माणूस होता. गोरापान, लालबुंद चेहरा. भारदस्त खानदानी व्यक्तिमत्व. पेहरावही तसाच. बोलण्यामध्ये दरारा. पण प्रेमाने ओथंबलेला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारा लगेच प्रभावीत होतो. कामत पक्के काँग्रेसी. पक्षनिष्ठा अविचल. मतभेद किती होवोत. अगदी हायकमांडशीही. पण पक्षाला त्यांनी कधी दगा दिला नाही. मनाने, वृत्तीने धार्मिक. ईश्वरनिष्ठ. विचाराने मात्र धर्मनिरपेक्ष. पक्के सेक्यूलर. त्यात कधी तडजोड केली नाही. युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. तेव्हाचं त्यांचं भाषण आजही स्मरणात आहे. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुखांना आव्हान दिलं होतं. काँग्रेसवाले कधी शिवसेनेच्या वाटेला जात नाहीत. पण कामत साहेब अंगावर घेत. बिंदास्त माणूस होता. धडाकेबाज बोलणार तसंच धडाकेबाज वागणार. कामाचा धडाकाही तितकाच मोठा. लोकसंग्रह अफाट. कार्यकर्त्यांना मायेने जपणारा. त्यांच्या मदतीला धावून जाणारा. सत्ता नसली तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामतांचा आधार होता. मुंबईतील काँग्रेस जीवंत, जीतीजागती ठेवण्यामध्ये कामतांचा निसंशय वाटा आहे. हायकमांडला त्याची जाणीव होती. त्यामुळे कामतांच्या दोनदा राजीनामा नाट्यानंतरही हायकमांडने त्यांचा आदर राखला. 

मुंबई काँग्रेसचं संघटन वाढवताना त्यांनी कधीही गैरमार्गाचा वापर केला नाही. अडचणीत, दंग्याधोप्यात लोकांच्या बाजूने उभा राहणारा, सामाजिक सलोख्यासाठी झटणारा नेता होते कामत साहेब. झोपडपट्टीतल्या सामान्य माणसाच्या बाजूने ते नेहमी उभे राहत. मुंबईचं बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक वैशिष्ट्य हे स्वतः कामतांचंही वैशिष्ट्य होतं. त्यामुळे सर्व गटातटांना, सामाजिक समुहांना ते आपले वाटत होते. मधल्या काळात कामतांना मुंबई काँग्रेसमधून दूर ठेवण्यात आलं. पण त्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. कामत हीच काँग्रेसची मुंबईतील ताकद होती. त्याची पुरेशी दाद मिळाली नाही. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात त्यांना ऐनवेळी लढायला सांगण्यात आलं होतं. तेव्हा ते घरी भेटायला आले होते. तिथून आम्ही दोघं मृणालताईंच्या घरी गेलो. ताईंनी त्यांना आशिर्वाद दिला. कामतांची ओळख आधीपासून होतीच. पण तेव्हापासून संबंध अधिक दृढ झाले. 

कामत साहेब अकाली गेले. त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये पोरकेपणाची भावना नक्कीच दाटली असेल. स.का.पाटील आणि मुरली देवरा यांच्यानंतर मुंबईवर पकड असलेला शेवटचा काँग्रेस नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. 

गुरुदास कामत यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


लढणारा संपादक
ज्येष्ठ समाजवादी पत्रकार, संपादक, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, माजी खासदार कुलदीप नय्यर बुधवारी (२२ ऑगस्ट) रात्री आपल्यातून गेले. ९४ वर्षांचं समृद्ध आयुष्य ते जगले. एक साधा वार्ताहर ते संपादक अशी पत्रकारितेत मजल त्यांनी गाठली. पत्रकार आणि राजकीय भाष्यकार म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. आणिबाणी लागू झाल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून सत्तेच्या विरोधात आवाज उठवला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरफदारी केली. सत्तेच्या विरोधात बोलणारा पत्रकार म्हणून त्यांना तेव्हाच्या सरकारने तुरुंगात पाठवलं. कुलदीप नय्यर यांनी जेल भोगली. पण मागे हटले नाहीत. त्यांच्यातला पत्रकार जेलमधून उजळून निघाला. जेलच्या अनुभवावर 'इन जेल' हे त्यांचं पुस्तकही गाजलं. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्यात त्यांचा प्रभाव पडत असे. 'द स्टेटमन' या दिल्लीतून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी दैनिकाच्या संपादकपदी त्यांचं नाव झालं. राजकीय स्तंभलेखक म्हणून त्यांनी जगभरच्या वर्तमानपत्रात स्तंभलेख लिहिले. ८० वर्तमानपत्रात आणि १४ भाषांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. हा विक्रम जगातल्या खूप कमी पत्रकारांच्या नावावर असावा. 

कुलदीप नय्यर मुळचे सियालकोटचे. पंजाब प्रांतातला हा भाग आता पाकिस्तानात आहे. लाहोरला त्यांचं उच्चशिक्षण झालं. फाळणी झाली आणि नय्यर कुटुंब भारतात आलं. फाळणीचं दुःख, दंगली, विद्वेष आणि धार्मिक उन्माद यांच्या झळा सोसलेले कुलदीप नय्यर पक्के सेक्युलर बनले. सेक्युलर विचार ही त्यांची जीवनशैली बनली. फाळणीचं दुःख भोगलेले नायर हे काही एकटे नाहीत. ख्यातनाम अभिनेते सुनिल दत्त, राजकपूर, दिलीपकुमार, न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर, गीतकार गुलजार ही आणि यांच्यासारखी अनेक माणसं फाळणीच्या दुःखाने पोळली पण कडवाहट नाही. उलट सेक्युलर बनली. 

कुलदीप नय्यर यांनी भारत-पाकिस्तान मैत्रीचा ध्यास घेतला होता. त्यासाठी ते सतत कृती कार्यक्रम आखत, प्रयत्न करत. नायर सिद्धहस्त लेखकही होते. त्यांनी जवळपास १५ पुस्तकं लिहिली. 'बियॉण्ड द लाईन्स', 'इंडिया आफ्टर नेहरू', 'ट्रॅजेडी ऑफ पंजाब', शहीद भगतसिंह यांच्या जीवनावरचे 'विदाऊट फिअर' ही त्यांची गाजलेली पुस्तकं. शेवटच्या क्षणापर्यंत ते लिहित आणि काम करत होते. 

आणिबाणीच्या काळात जेल भोगून लढलेला विचारवंत पत्रकार कुलदीप नय्यर यांचं जाणं आजच्या अघोषित आणिबाणीच्या काळात सेक्युलर आणि लोकशाही प्रेमींना चटका लावणारं आहे. त्यांची उणीव जाणवत राहीलच पण अघोषित आणिबाणीच्या विरोधात लढणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

कुलदीप नय्यर यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


विजयी कॅप्टन 
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, पद्मश्री अजित वाडेकर यांच्या निधनाने आपण एका विजयी कॅप्टनला आणि जिंदादिल माणसाला पारखे झालो आहोत. इंग्लंडच्या धर्तीवर भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट सिरीजमध्ये अजित वाडेकर यांनी पहिला विजय मिळवून दिला. आणि ते भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनले. शेवटपर्यंत भारतीयांनी त्यांच्यावर विजयी कॅप्टन म्हणून भरभरुन प्रेम केलं. 

वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकून दिला कपिल देवने. पण त्या विजयाचा पाया अजित वाडेकरांनी इंग्लडला हरवून घातला होता, हे विसरता येणार नाही. 

क्रिकेटसाठी त्यांचं योगदान सर्वांना माहीतच आहे. पण त्यांची सामाजिक जाणीवही तीव्र होती. त्याचं प्रत्यंतर आलं लातूर भूंकपाच्या वेळी. लातूरचा भूकंप हा सर्वांनाच हादरवणारा होता. तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात वाडेकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यानिमित्ताने द्वारकानाथ संझगिरी यांच्यामुळे वाडेकर यांच्याशी जडलेला स्नेह अखेरपर्यंत राहिला.

या महान क्रिकेटपटूला विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


ऑगस्ट महिना आणि दुःखाचा डोंगर 
यंदाचा ऑगस्ट महिना केरळमध्ये दुःखाचा महापूर घेऊन आला. केरळमध्ये लाखो नागरीक बेघर झाले. शेकडो प्राण गेले. देशावर दुःखाचा डोंगर कोसळला. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. त्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं अकाली निधन झालं. ज्येष्ठ समाजवादी पत्रकार कुलदीप नय्यर हेही आपल्याला सोडून गेले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी याच महिन्यात गेले. मेजर कौस्तुभ राणे यांनाही याच महिन्यात वीर मरण आले. दिग्गज क्रिकेटर अजित वाडेकर यांचेही नुकतेच निधन झाले आहे. मराठी नाटकात अमर झालेली मोरुची मावशीची भूमिका करणारे अभिनेते विजय चव्हाण यांचेही अकाली निधन झाले. अशा एक ना अनेक दुःखाच्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागलं. सर्वांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------

कपिल पाटील
(लेखक लोकतांत्रिक जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार आहेत.)


Thursday, 26 July 2018

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

सर्वपक्षीय बैठक बोलवा. निर्णय घ्या. 
छ. शाहू महाराज आरक्षण दिन
२६ जुलै २०१८ 
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,
दोन वर्षे अहिंसेच्या मार्गाने मूक मोर्चे काढूनही आरक्षण मिळालं नाही, म्हणून मराठा समाजातील तरुणांच्या असंतोषाने पुन्हा पेट घेतला आहे. आरक्षणाची मागणी अत्यंत संयमाने, घटनात्मक मार्गाने सगळ्या पुराव्यानिशी मांडण्यात आली. महात्माजींच्या अहिंसक सामुदायिक सत्याग्रहाचा विलक्षण अविष्कार मराठा समाजाने दाखवून दिला. पण तरीही मागणी पदरात पडली नाही. आता हे आंदोलन आणखी भडकण्याआधी सरकारनेच मार्ग काढला पाहिजे. 

मुख्यमंत्री म्हणून आपण स्वतः पुढाकार घ्यायला हवा. ज्येष्ठ नेते मा. श्री. शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी आणि विधिमंडळातील सर्व गटनेत्यांशी तातडीने चर्चा करायला हवी. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा संकट निर्माण झालं, पेचप्रसंग निर्माण झाला, संवेदनशील प्रश्न उभा राहिला तेव्हा तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः विरोधी पक्षातील सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली होती. समाजातील धुरीणांना साद घातली होती. मार्ग त्यातून निघाला होता. यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि विलासराव देशमुख यांनी याच मार्गाने राज्यात भडकलेले वणवे शांत केले होते. 

मराठा समाजाची मागणी स्वच्छ आहे. नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. ही मागणी न्याय्य आहे. भारतीय संविधानानुसार हे आरक्षण देणे शक्य आहे. 

प्रश्न असा आहे की - 
१. हे आरक्षण ओबीसी म्हणून देता येईल काय?
२. ओबीसीमधील आधीच्या प्रवर्गांचा हिस्सा त्यातून सुरक्षित राहील काय?
३. ५० टक्क्यांवरुन अधिक आरक्षण देता येईल काय?

या तिन्ही प्रश्नांचं उत्तर होय असं आहे. 

संविधानातील कलम १५(४) आणि १६(३) व १६(४) या तरतूदींनुसार आरक्षण देता येतं. द्यावं लागतं. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे त्याला वंचित ठेवता येणार नाही. मराठा समाज हा संत तुकाराम आणि महात्मा फुले यांच्या भाषेत कुळवाडी कुणबी आहे. शोषित शुद्र आहे. महात्मा फुलेंनी ब्रिटीशांपुढे ज्यांचं दुःख मांडलं आणि ज्यांच्यासाठी आसुड ओढला तोच हा शुद्र मागासवर्गीय शेतकरी समाज आहे. या देशातलं पहिलं आरक्षण ज्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिलं, त्यात मराठा समाजाचा समावेश होता. शाहू महाराजांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कुणब्यांची परिषद घेतली तोच हा समाज आहे. डॉ. पंजाबराव देशमुखांनी अत्यंत शहाणपणाने पुढाकार घेतला त्यामुळे विदर्भातील मराठा-कुणबी प्रवर्गातील सर्व जातींना कुणबी म्हणून सवलती मिळू लागल्या. उर्वरित महाराष्ट्रात तसे घडले नाही. मंडल आयोगाच्या वेळीही विरोध झाला. म्हणून हा समाज सवलतींपासून वंचित राहिला आहे. 

हे झाले ऐतिहासिक पुरावे. एकेकाळचा कथित सत्ताधारी वर्ग आज शेतीतून पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. कर्जबाजारीपणामुळे खंगला आहे. शेती परवडत नाही. नोकरी मिळत नाही. शिक्षण महाग आहे. तरुण वैफल्यग्रस्त होतो आहे. लग्न होत नाहीत. रोज अवमान होतो. त्यामुळे फास घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रातील लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी फास लावून घेतला. महात्मा फुले इंग्लडच्या युवराजाला डोक्यावर पागोटं नेसून शेतकऱ्याच्या वेशात भेटायला गेले होते. ते पागोटं पार फाटलं आहे. त्या फाटलेल्या पागोट्याची कैफियत आता तरी ऐकणार का? 

ओबीसी म्हणूनच मराठा समाजातील जातींना सवलत द्यावी लागेल. आधीच्या ओबीसी जातींचं काय? आधीच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हा प्रश्न ओबीसींमध्ये तीन गट करुन सोडवता येईल. ओबीसींमध्ये आधीच दोन गट करण्यात आले आहेत. भटके विमुक्त आणि इतर मागासवर्गीय. भटक्या विमुक्तांमध्येही अ, ब, क, ड असे चार गट करण्यात आलेत. मग मराठा समाजासाठी वेगळा ओबीसी गट का केला जात नाही? करणे शक्य आहे. निर्णय सरकारने घ्यायचा आहे. असं करण्याला ओबीसींचा विरोध नाही. 

मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांहून अधिक जागा वाढवाव्या लागतील. ५० टक्क्यांहून अधिक जागा वाढवायला सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा अडसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अडसर कुठेही नाही. डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेत केलेल्या चर्चेनुसार ६९टक्क्यांपर्यंत आरक्षण देणे कायद्याने शक्य आहे. तामिळनाडू सरकारने ते केलं आहे. राज्य घटनेच्या नाईन्थ शेड्युल्ड (९वी अनुसूची)मध्ये महाराष्ट्राच्या वाढीव आरक्षण कायद्याचा समावेश केला की त्याला इम्युनिटी मिळेल. फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. कारण ही इम्युनिटी देण्याचं काम भारतीय संसदेचं आहे. केंद्र सरकारने ठरवलं तर विरोधी पक्षांची त्याला साथ मिळेल. 

मराठ्यांना नव्याने आरक्षण द्यायचं नसून शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण पुनर्प्रस्थापित करायचं आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांतून जन्मलेल्या आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवता येणार नाही. आता आणखी वेळ काढू नये. निर्णय घ्यावा, ही विनंती.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
प्रदेशाध्यक्ष, लोकतांत्रिक जनता दल, महाराष्ट्र प्रदेश


या आधी लिहलेले लेख पुढीलप्रमाणे -

मुख्यमंत्री, बळीराजाचं ऐकाल काय?
https://kapilpatilmumbai.blogspot.com/2016/09/blog-post_27.html

मराठ्यांचा आक्रोश कशासाठी?
https://kapilpatilmumbai.blogspot.com/2016/10/blog-post.html

ताराबाईंचं वादळ आणि मराठ्यांच्या लेकी
https://kapilpatilmumbai.blogspot.com/2016/10/blog-post_4.htmlMonday, 2 July 2018

शिक्षकांच्या हिंमतीला सलाम

नव्या लढाईचा संकल्प 

माझ्या मुंबईकर शिक्षक बंधूनों आणि भगिनींनो, 
मी माझ्या मुंबईकर शिक्षकांबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. तिसऱ्यांदा तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली आहे. त्याच निष्ठेने आणि त्याच तळमळीने यापुढेही मी काम करत राहीन. यावेळची लढाई खूप मोठी होती. एका बाजूला सत्ता, पैसा आणि त्यांची ताकद. दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शिक्षक. पण मुंबईतले शिक्षक हरले नाहीत. घाबरले नाहीत. दचकले नाहीत. तुम्ही तितक्याच निष्ठेने आणि तितक्याच तडफेने कौल दिलात. आधी त्यांनी आपली नोंदणी होऊ दिली नाही. ज्यांची नोंदणी झाली त्यांचे फॉर्म गायब केले. ते पोहचू दिले नाहीत. दिलेली नावं सुद्धा गायब करण्यात आली. ७ हजार शिक्षकांचा मतदानाचा अधिकारच हिरावून घेतला गेला. पण ज्यांची नोंदणी झाली त्यांनी सारं पणाला लावून मतदान केलं. पैशाची पाकिटं घरी आली. पण त्याला बळी कुणी पडलं नाही. इथून, तिथून धमक्या आल्या. धमक्यांना कुणी घाबरलं नाही. सगळी सरकारी यंत्रणा काम करत होती. शाखेशाखेतून फोन जात होते. नगरसेवक, आमदार, मंत्री बुथवर येऊन बसले होते. पण मुंबईकर शिक्षक बहाद्दर आहे. हिंमतवान आहे. त्याने हिंमतीने मतदान केलं आणि शिक्षकांना विकत घेता येत नाही, हे दाखवून दिलं. 

चाणक्याचा अवमान झाला. चाणक्याने सत्ता उलथवून दाखवली. मुंबईच्या शिक्षकांनी अवमान, अप्रतिष्ठा, अवहेलना, छळ आणि नंतर पैशाचं अमिष, दबाब आणि धाकधपटशाही या कशालाही जुमानलं नाही. माझ्या मुंबईकर शिक्षक बंधूनों आणि भगिनींनो, माझा तुम्हाला सलाम आहे. मी अत्यंत कृतज्ञ आहे. मी तुमच्यासमोर अत्यंत विनम्र आहे. अफाट धैर्य दाखवलंत तुम्ही. 

ज्यांनी आपल्याला छळलं, त्रास दिला त्यांना सरप्लस करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि ते नक्की होणार आहे. महाराष्ट्रभरातले शिक्षक मोठ्या आशेने  मुंबईकर शिक्षकांकडे पाहत होते. मीडिया पाहत होता. साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं. कपिल पाटील काय टिकणार? असं भल्याभल्या विश्लेषकांचं म्हणणं होतं. पण मुंबईच्या शिक्षकांनी निर्धार केला आणि ते सगळे संभ्रम दूर करुन टाकले. 

आता पुढची लढाई आहे. आपण साऱ्यांनी मिळून ती लढायची आहे. हिंमतीने असंच लढायचं आहे. पेन्शनची लढाई असेल. सरप्लसची असेल. नाईट स्कूलची असेल. Cashless medical smart कार्डाची असेल. सातव्या वेतन आयोगाची असेल. ऑनलाईनच्या ओझ्याची असेल. अभ्यासक्रम बदलाची असेल. बेसलेस बेसलाईन परीक्षेची असेल. या प्रत्येक लढाईत आपण अशीच एकजुट टिकवली तर नक्कीच यशस्वी होऊ. ही लढाई फक्त शिक्षकांची नव्हती आणि नाही ही. ही सर्वसामान्यांची लढाई आहे. गरीबांची आणि मध्यमवर्गाची पण आहे. शिक्षण महाग करुन सोडलेलं आहे, त्या विरुद्धची ही लढाई आहे. शाळांचं कंपनीकरण, विद्यापीठांचं खाजगीकरण या विरोधातली ही लढाई आहे. शैक्षणिक समाजवादाची ही लढाई आहे. ही लढाई राजकीय आहे. या लढाईत आता सर्वांची साथ हवी. या मोठ्या लढाईची तयारी आपण सारे मिळून करुया. 

येत्या शनिवारी तोच संकल्प आपल्याला करायचा आहे. येत्या शनिवारी म्हणजे ७ जुलैला संध्याकाळी ४ वाजता शिवाजीमंदिर, दादर, मुंबई. होय चलो शिवाजीमंदिर, दादर. शरद यादव, राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूर ही सगळी मंडळी  येणार आहेत. आपणही एकत्र येऊया आणि नव्या लढाईचा संकल्प सोडूया. मी वाट पाहतोय तुमची. जरुर या. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,
कपिल हरिश्चंद्र पाटील

Friday, 22 June 2018

पैशाची पाकिटं येऊ लागली, पण मुंबईकर शिक्षक विकला जाणार नाही, तो स्वाभिमानी आहे!


प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
सोमवार दि. २५ जून रोजी मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. आजपर्यंत प्रस्थापित राजकीय पक्षांनी शिक्षकांना फारसं महत्व दिलं नव्हतं. पण आता अचानक त्यांचं शिक्षकांबद्दल प्रेम जागं झालं आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांवर दबाब टाकायला सुरवात झाली आहे. कडी त्याहून आणखी आहे. घराघरात जाऊन भगवी पाकिटं दिली जात आहेत. ५ हजार तर कुठे १० हजार मताचा भाव केला जात आहे. 

पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, शिक्षकांना विकत घेता येतं, असा समज या नेत्यांनी करून घेतलेला  दिसतो. मुंबईचा शिक्षक स्वाभिमानी आहे. त्याला एकच भूक आहे, ती आत्मसन्मानाची. म्हणून तो कपिल पाटील सोबत राहून बलाढ्य सरकारशी लढतो आहे. 

किती छळलं गेलं. परेशान केलं गेलं. बेसलेस बेसलाईन आणि सदैव ऑफ राहणारी ऑनलाईन यांच्या कामाचं ओझं लादलं गेलं. हक्काची पेन्शन हिरावून घेण्यात आली. भर्ती बंद केली गेली. शिक्षकांना सरप्लस केलं गेलं. कला-क्रीडा शिक्षकांना संपवलं गेलं. अनुदान नाकारलं गेलं. २० टक्क्यांवर बोळवण करण्यात आली. हे झालं सरकारकडून. 

तावडे साहेबांनी तर छळ मांडलाच आहे. पण ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे त्यांनी तरी काय केलं? बीएमसीच्या शाळा ओस पाडल्या. खाजगी संस्थांच्या शाळा चांगल्या चालल्या आहेत. पण अशा ७० प्राथमिक शाळांना महापालिकेचे सत्ताधारी अनुदान द्यायला तयार नाहीत. मतांसाठी पाकिटं वाटायला त्यांच्याकडे पैसे आहेत. पण पगार द्यायला पैसे नाहीत. शाळांची मैदानंही यांनीच पळवून नेली. बड्या क्लबना बीएमसी मैदान देतं पण शाळांना देत नाही. 

आता त्यांना पैशानी मतं खरेदी करायची आहेत. संस्थाचालकांबद्दल त्यांना आता अचानक प्रेम आलं आहे. सरकारमध्ये तर तुम्हीही सामिल आहात ना. विद्यापीठाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण होत असताना तुम्ही मूग गिळून का होतात? शाळांच्या कंपनीकरणाचं बिल सेना आणि भाजपच्या कॅबिनेटने मंजूर केलं. विधानसभेतही ते मंजूर केलं. मात्र विधानपरिषदेत गेले दोन अधिवेशनं शाळांच्या कंपनीचं बिल मंजूर झालेलं नाही. केवळ कपिल पाटील ठामपणे उभा राहिला आहे म्हणून. दोन्ही सत्ताधाऱ्यांना फक्त कपिल पाटीलची भीती म्हणून वाटते. 

शिक्षणाचा सत्यानाश रोखण्याचं काम हा एकटा करतो, म्हणून दोघांनाही कपिल पाटील नको आहे. पण मुंबईकर सर्वसामान्य शिक्षक कपिल पाटलाच्या मागे ठामपणे उभा आहे. आता फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. घरोघरी पैशाची पाकीट देण्यासाठी दोघांमध्ये चुरस लागली आहे. 

शिक्षकांचा असा अवमान यापूर्वी कधी झाला नव्हता. पण मुंबईतला शिक्षक कधीही विकला जाणार नाही. मुंबईकर शिक्षक हा स्वाभिमानी आहे. आपली अस्मिता, आपला आत्मसन्मान तो कधीच विकणार नाही. ज्यांनी कधी ढुंकूनही आपल्या प्रश्नांकडे बघितलं नाही त्यांना तो तारणहार कधीच मानत नाही. मुंबईकर शिक्षकांची एकजूट अभेद्य आहे. आपली लढाई तो कधीही कमजोर होऊ देणार नाही. 

पाकिटं वाटणाऱ्यांच्या नेत्यांना मी विचारू इच्छितो, हे पाकिटबाज राजकारण तुम्हाला मान्य आहे काय? छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि असा अभद्र व्यवहार करणाऱ्यांना संरक्षण द्यायचं हे काही बरोबर नाही. लढाई लोकशाही मार्गाने करा. पण शिक्षकांचा कृपा करून अवमान करू नका. तुमच्या हातात महापालिकेची सत्ता आहे. पण शाळा शिक्षकांना अनुदान नाही. पगार नाही. पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ यांना बटीक करू नका. 

शिक्षक मित्रहो, मी तुम्हाला एकच अश्वासन देतो, एकच विश्वास देतो. २५ जून रोजी तुम्ही तर भरघोस मतदान करणार आहात. पदवीधर मतदार संघातून आपला जालिंदर सरोदेही निवडून येईल. आणि २८ जून रोजी जेव्हा निकाल येईल त्यावेळेला आपल्याला सरप्लस करणारे तावडे साहेब हेही सरप्लस झालेले असतील, याची खात्री बाळगा. 

Mumbai teachers : How to cast your vote
Tap to Watch - https://youtu.be/WAZPt4Ux0bI


आपला, 
कपिल हरीश्चंद्र पाटील   1

Monday, 18 June 2018

त्यांच्या कळपात सामिल होण्यात काय अर्थ आहे?

जालिंदर सरोदे आणि डॉमिनिका डाबरे यांनाही निवडून द्या शिक्षक आणि पदवीधर बंधू भगिनींनो,
येत्या २५ जून २०१८ रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात मतदान होणार आहे. २५ जूनची तारीख स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासात एका काळा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यादिवशी आणिबाणी जाहीर करण्यात आली होती. सारा देश तुरुंग बनला होता. सगळीकडे चीडीचूप झालं होतं. जयप्रकाश नारायण यांच्यासह विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं गेलं होतं. पण आणिबाणी उठली तसं देशातील जनतेने मतांचा स्फोट घडवला. सगळा अंधार मिटून गेला. 

आजही भयाचं वातावरण आहे. अघोषित आणिबाणी आहे. आवाज उठवणाऱ्यांना छळलं जात आहे. परेशान कोण नाही? शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, शिक्षक. समाजातला विचार करणारा प्रत्येक घटक ही परेशानी, ही बेचैनी सोसतो आहे. पण यातलं कुणीही हिम्मत हरलेलं नाही. या असंतोषाचं नायकत्व शिक्षक आणि पदवीधरांकडे आहे. त्रास, परेशानी, छळ, अन्याय यांना उत्तर देण्यासाठी तो सज्ज आहे. २५ जून २०१८ रोजी मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर उत्तर देणार आहेत. असाच प्रतिसाद कोकणातून आणि नाशिकमधून मिळणार आहे. 

मुंबई शिक्षक मतदार संघातून मी स्वतः म्हणजे कपिल हरिश्चंद्र पाटील

मुंबई पदवीधर मतदार संघातून जालिंदर देवराम सरोदे

कोकण पदवीधर मतदार संघातून डॉमिनिका पास्काल डाबरे

हे लोक भारतीचे - शिक्षक भारती व लोकतांत्रिक जनता दलाचे पुरस्कृत उमेदवार आहेत. 

नाशिक शिक्षक मतदार संघातून संदीप बेडसे यांनाही आपले समर्थन आहे. 

मुंबईतून कपिल पाटील यांच्यासोबत जालिंदर देवराम सरोदे यांना शिक्षकांनी उमेदवारी का दिली आहे? कोकणातून डॉमनिका डाबरे यांचं समर्थन शिक्षक भारती का करत आहे? 

उत्तर सरळ आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ हे सत्ताधारी वर्गाला विधान परिषदेत बिलं पास करण्यासाठी संख्याबळ नव्हे. विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठी, संविधानिक मूल्यांसाठी जागतं राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदार संघांची निर्मिती केली. विधान परिषदेत मी एकटेपणाने लढतो आहे. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातले लोक काही शत्रू नव्हेत. पण ते कुणाच्या बाजूने उभे आहेत. शिक्षणाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण करणारे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हतबल मतदार असे चित्र आहे. खाजगीकरण आणि व्यापारीकरणाच्या विरोधात विधान परिषदेत मी ठाम उभा राहिलो. खाजगी विद्यापीठाचे बिल रोखण्याचा प्रयत्न केला. शाळांच्या कंपनीकरणाचे बिल पास होऊ दिलेले नाही. नोकरदार वर्गांच्या विरोधातली बिलं दोन्ही सभागृहात पास होत असताना, त्या विरोधात ठामपणे मतदान करत राहिलो. एकेकाळी सदानंद वर्दे, ग. प्र. प्रधान, मधु देवळेकर, प्रमोद नवलकर या मतदार संघांचं प्रतिनिधित्व करत. आज माझ्या सोबतीला पदवीधर मतदार संघाची साथ नाही. पदवीधर मतदार संघ अनाम आणि अबोल झाला आहे. परवा पदवीधरांच्या एका सभेत बोलताना, 'तुमचा पदवीधर आमदार कोण?' असा प्रश्न विचारला. खरंच कुणाला माहित नव्हतं. राज्य घटनेत गप्प राहण्यासाठी हे मतदान संघ निर्माण केलेले नाहीत. प्रतिनिधी बोलत नाहीत असं नाही. पण कसोटीच्या वेळी गप्प बसतात. सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस - शेकाप यांची मिलिभगत होते, तेव्हा त्यांच्या कळपात सामिल होण्यात काय अर्थ आहे?

शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी मुंबईत आले. त्यांनी पाठींबा जाहीर केला. प्रस्थापित पक्ष कसे वागतात, कार्यकर्त्यांची माती कशी करतात, त्याची वेदना त्यांनी ऐकवली. प्रस्थापितांच्या वळचणीला जे जात नाहीत ते कुणाला घाबरत नाहीत आणि तेच बदल घडवू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मुंबईतल्या बुडणाऱ्या भ्रष्ट बँकेत पगार नेले म्हणून शिक्षक घाबरले नाहीत. ते लढले म्हणून जिंकले. रात्रशाळा, दुर्गम भागातल्या शाळा सरकारने बंद केल्या आणि अवघं शिक्षण मोडायला निघाले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी कर्जात बुडण्याची वेळ सामान्य माणसावर आली आहे. तो अंधार दूर करण्याची ताकद शिक्षक आणि पदवीधर यांच्यातच आहे. 

हे मतदार संघ काय करू शकतात? हे मुंबईच्या शिक्षकांना विचारा. मुंबईच्या शिक्षकांना आता पदवीधरांची साथ हवी आहे. जालिंदर देवराम सरोदे यांची उमेदवारी त्यासाठी आहे. लढवय्या शिक्षक आणि अभ्यासू कार्यकर्ता आहे. डॉमिनिका डाबरे वसईची रणरागिणी म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईतील शिक्षकांना कपिल हरिश्चंद्र पाटील नावाचा आमदार आहे. पदवीधरांनाही आमदार मिळायला हवा. ज्यांची नोंदणी झाली आहे, त्यांना आवर्जून सांगा. मुंबई पदवीधर मतदार संघात जालिंदर देवराम सरोदे या नावापुढे इंग्रजीत नंबर 1 चं मत नोंदवा. कोकण पदवीधर मतदार संघात डॉमिनिका डाबरे यांच्या नावापुढे इंग्रजीत नंबर 1 चं मत नोंदवा.

आपला,
कपिल हरिश्चंद्र पाटील