Friday 23 March 2018

तावडेंची बुडती बँक विरुद्ध मुंबईचे शिक्षक

छळाचा अंत
अखेर युनियन बँकेतून आपले पगार सुरु झाले आहेत. मुंबै बँकेने ज्यांची खाती युनियन बँकेत होती त्यांची किती अडवणूक केली ते शिक्षकांनी गेले काही महिने अनुभवलं आहे. युनियन बँकेने तसं केलं नाही. युनियन बँकेच्या पुल अकाऊंटमध्ये पैसे येताच पगार जमा होऊ लागले आहेत. ज्यांनी फेब्रुवारीची बिलं आधीच दिली होती त्यांच्या मुंबै बँकेतल्या अकाऊंटवरही युनियन बँकेने पगार त्वरीत जमा केले. सरकारी राष्ट्रीयकृत बँक नियमाने चालते. कुणाच्या मर्जीवर नाही. शिक्षणमंत्र्यांच्या किंवा बँक चेअरमेनच्या मर्जीवर सुद्धा नाही. आधी हायकोर्टाने आणि आता सुप्रिम कोर्टाने स्पष्ट निकाल दिला आहे. मुंबै बँकेचा निर्णय पूर्णपणे रद्द केला आहे. मुंबै बँक असुरक्षित बँक असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. तर नाबार्डच्या ताज्या अहवालात या बँकेत पैसे ठेवणं म्हणजे अत्यंत धोकादायक आहे. ही बँक जोखीमभरी (High Risk) बँक आहे. न्यायालयाचा आदेश, नाबार्डचा अहवाल आणि शासनाचे त्यावर निघालेले आदेश अगदी स्पष्ट आहेत. शिक्षकांचे पगार युनियन बँकेमार्फत पूर्ववत अदा करायचे आहेत. यापुढची सगळी बिलं शिक्षकांचे युनियन बँकेतील अकाऊंट नंबर टाकून सादर करायची आहेत. मार्च एंडींगला चार दिवसांची सुट्टी आहे, हे गृहीत धरून मार्च पेड इन एप्रिलची बिले तातडीने पाठवणे आवश्यक आहे. आपल्या युनियन बँकेच्या बिलांची प्रत तातडीने बजार गेट ब्रँचला आणि त्याची दुसरी प्रत आपल्या शाखेत जमा करावी. 

मुंबै बँक पुन्हा दिशाभूल करील. पण विश्वास ठेवू नका. नागपूर, नाशिकची बँक बुडाली. पगारही बुडाले. कोर्टाचा आणि शासनाचा आदेश स्पष्ट आहे. तो पाळू नका, असं कुणी सांगत असेल तर ते बेकायदेशीर आहे. मुंबै बँक बुडावी असं कुणी म्हणणार नाही. पण बुडणाऱ्या जहाजात कोण बसेल? धोकादायक बनलेल्या बँकेत पैसे ठेवणं यासारखा मूर्खपणा नाही. कुणी अधिकाऱ्याने किंवा क्लर्कने तसं सांगण्याचा प्रयत्न केला तर लगेच कळवा, संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने हायकोर्टात कंटेम्प्टची आणि फसवणुकीची केस दाखल करण्यात येईल.


१ तारखेच्या पगाराची गोष्ट

शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेतून आणि तोही १ तारखेला व्हावा यासाठी सतत चार वर्षे शिक्षक भारतीने संघर्ष केला. मी आमदार झालो २६ जून २००६ ला. पहिल्याच पावसाळी अधिवेशनात पगार १ तारखेला आणि राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याची मागणी मी केली होती. त्याआधी पगार कधीच वेळेवर होत नव्हता. आमदार झाल्यावर १ तारखेचा पगार एवढी एकच गोष्ट केली तरी पुरे, अशी अट आणि अपेक्षा अशोक बेलसरे यांनी व्यक्त केली होती. मोठ्या संघर्षानंतर शिक्षकांची मागणी मान्य झाली. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची कृतज्ञपणे आठवण काढली पाहिजे. त्यांनी १ तारखेच्या पगाराची घोषणा केली. वित्त विभागाने निश्चित केलेल्या १४ बँकांकडून देकार मागवण्यात आले. युनियन बँक ही मुंबईची लीड बँक होती. १ तारखेच्या पगाराचं लेखी आश्वासन फक्त युनियन बँकेने दिलं होतं. नोव्हेंबर २०११ पासून सहा वर्षे बँकेने ते पाळलं. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सहा वर्षांची ही सोय बंद केली आणि नाबार्डने असुरक्षित ठरवलेल्या मुंबै बँकेत पगार नेले. त्याविरोधात शिक्षक भारतीने मोर्चे काढले. निदर्शेने केली. अखेर लढाई कोर्टात न्यावी लागली. हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. 

सुप्रिम कोर्टाने जोरदार तडाखा लगावल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे भानावर आले आणि मुंबईतील शिक्षकांच्या पगाराच्या आदेशावर त्यांनी तब्बल ३९ दिवसांनंतर सही केली. शिक्षणमंत्र्यांनी मुंबई हायकोर्टाचं ऐकलं नाही, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा लेखी आदेश देऊनही ते पाळले नाहीत. त्यांनी आदेश पाळले असते आणि हायकोर्टाने मारलेल्या ताशेऱ्यातून धडा घेतला असता, तर मुंबईतल्या शिक्षकांचे पगार १ मार्चलाच झाले असते. अख्ख्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे पगार गेली तीन महिने ताटकळले आहेत. ऑनलाईन शालार्थ प्रणाली बंद पडली आहे. ऑफलाईनचे आदेश काढण्यासाठी सुद्धा त्यांनी असाच दीड महिना काढला. मी स्वतः वित्त विभागाकडे गेलो तेव्हा कळलं, ऑफलाईन बिलाचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवलेलाच नव्हता. शिक्षणमंत्र्यांचा कारभार असा सुरु आहे आणि शिक्षणमंत्री आरोप करताहेत, 'आमदार कपिल पाटील यांच्या हट्टापायी शिक्षकांचे वेतन होऊ शकलेले नाही.' 


भांडण श्रेयाचे नाही. अधिकाराचे आहे. सुरक्षित बँकेचे आहे. खुद्द हायकोर्टाने असुरक्षित बँकेत शिक्षकांचे पगार का? असा सवाल विचारला. आधी म्हटल्याप्रमाणे नाबार्डच्या ताज्या अहवालात मुंबै बँक अतिजोखमीची झाल्याचं म्हटलं आहे. शिक्षकांचे पगार कष्टाचे, घामाचे आहेत. नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, बुलढाणा या बँका बुडाल्या. त्यात पगारही बुडाले. ठेवीही बुडाल्या. एक रुपया सुद्धा अजून मिळालेला नाही. ही वेळ मुंबईतील माझ्या शिक्षकांवर येईपर्यंत मी शांत का बसावं?


पगार श्रेयाच्या वादात अडकले नव्हते, शिक्षणमंत्र्यांच्या अहंकारात अडकले होते. १९ मार्चला त्यांनी घोषणा केली. तोपर्यंत ते म्हणत होते, हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही पुन्हा युनियन बँकेतून पगार करत आहोत पण सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला २० ते २५ दिवस लागतात. 


इतकं खोटं राज्यातील शिक्षणमंत्री कसं बोलू शकतात? आदेश काढायला फक्त १ दिवस लागतो. आदेशानंतर पुढची प्रक्रिया व्हायला २० दिवस लागतात. वित्त विभागाच्या नियमानुसार महिन्याच्या ७ तारखेला पगाराची बिलं सादर करायला लागतात. शिक्षण निरीक्षक किंवा शिक्षणाधिकारी २० तारखेपर्यंत बिलांची तपासणी करतात. २० तारखेला ट्रेझरीकडे बिलं जातात. ट्रेझरीकडे आठ दिवस तपासणी होते. २८ तारखेला आरबीआयकडे एंट्री करावी लागते. २९ तारखेला बँकेकडे पगार जातो. बँकेला व्हेरिफिकेशनसाठी दोन दिवस दिलेले असतात. तेव्हा १ तारखेला पगार होतो. ही प्रक्रिया दिवस कमी केले तरी पूर्ण व्हायला किमान आठवडा लागतो. 


हायकोर्टाचा निर्णय आला ९ फेब्रुवारीला. तेव्हाच ही प्रक्रिया सुरु केली असती तर १ तारीख चुकली नसती. लॉ अँण्ड ज्युडीशिअरी डिपार्टमेंटने शिक्षण खात्याला लेखी सल्ला दिला होता की, सुप्रिम कोर्टात जायचं असलं तरी शिक्षकांचे पगार थांबवता येणार नाहीत. ते त्वरीत हायकोर्टाच्या आदेशानुसार युनियन बँकेतून करणं आवश्यक आहे. मुंबै बँकेचा निर्णय हायकोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. मुंबै बँकला १ दिवसाची सुद्धा मुदतवाढ कोर्टाने दिलेली नाही. सरकारी वकीलांनी सुप्रिम कोर्टात जाण्यासाठी स्टे मागितला हायकोर्टाने तोही नाकारला. ही सर्व वस्तुस्थिती असूनही अहंकार आणि हट्टापायी किंवा मुंबै बँकेच्या हितसंबंधांमुळे शिक्षकांचे पगार जाणीवपूर्वक थांबवण्यात आले. 


या दरम्यान आणखी काही घटना घडल्या. 


१९  फेब्रुवारीला शिक्षक भारतीने शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षकांना नोटीस पाठवली. मार्चमध्ये पगार आला नाही म्हणून ८ मार्च रोजी पुन्हा अवमान याचिकेची नोटीस पाठवली. 


५ मार्च रोजी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांनी पगार देण्याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले. 


७ मार्चला पुन्हा भेटलो, मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सचिवांना पुन्हा लेखी आदेश दिले. 


१२ मार्च. आदिवासी, शेतकर्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चा होती. पाच ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते. मी आणि जयंत पाटील चर्चेत सहभागी होतो. चर्चा संपली होती. अनौपचारिक गप्पा सुरु होत्या. इतक्यात तिथे शिक्षणमंत्री आले. त्यांना पाहून मुख्यमंत्री स्वतःहून म्हणाले, मी कपिल पाटील यांना म्हटलं आहे की सरकार सुप्रिम कोर्टात जाणार नाही. पगाराचे आदेश आजच काढा. शिक्षणमंत्री म्हणाले, उद्या काढतो. शिक्षणमंत्र्यांचा 'उद्या' तब्बल ७ दिवसांनी उजाडला. 


१३ मार्चला मी शिक्षण सचिव नंदकुमार यांना भेटलो. त्यांना म्हणालो, मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश दिला आहे. पगाराचे काय झाले? 


शिक्षण सचिव म्हणाले, मला आदेश मिळालेले नाहीत. मी पत्र पाहिलेले नाही. 


मी चिडलो. त्यांच्याच कंप्युटरवर आवक नोंद दाखवली. तसं दडवून ठेवलेलं पत्र शिपायाने शोधून काढलं. शिक्षण सचिवांची त्यावर सही होती. पण कार्यवाही झाली नव्हती. 


१४ मार्च. मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना सचिव कसं खोटं बोलत आहेत असं पुन्हा लेखी पत्र दिले. मुख्यमंत्र्यांनी त्यावर लेखी निर्देश दिले आणि सचिवांना फोन लावला. लॉ डिपार्टमेंटने सल्ला देऊनही तुम्ही पगाराचे आदेश का काढले नाहीत? आता लगेच काढा. मुख्यमंत्र्यांनी फर्मावले.


काय गंमत १५ मिनिटात सचिवांनी फाईल तयार केली. मला म्हणाले, आधी शिक्षणमंत्र्यांची सही घ्यावी लागेल. अर्ध्या तासात शिक्षणमंत्र्यांकडे फाईल पोचली. तावडेंनी ढूंकूनही पाहिलं नाही. 


१५ मार्च. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे विधान भवनात शिक्षण  मंत्र्यांना भेटले. शिक्षणमंत्री म्हणाले, मुंबै बँक चालेल असं आधी लेखी लिहून द्या. 


हिरमुसल्या चेहऱ्याने हे तिन्ही नेते बाहेर आले. पाठोपाठ शिक्षणमंत्री आले. मी त्यांना म्हणालो, सही का करत नाही? मुख्यमंत्र्यांकडे फाईल का पाठवत नाही?


शिक्षणमंत्र्यांचं उत्तर - सही करुन मुख्यमंत्र्यांकडे फाईल कधीच पाठवली आहे. 


शिक्षणमंत्र्यांच्या ओएसडींना मी विचारलं, फाईल गेली का? त्यांचं उत्तर होतं, नाही. अजून मंत्र्यांची सही व्हायची आहे. 


शिक्षणमंत्री खोटं बोलत होते. 


१९ मार्चची दुपार. अॅड. अमोल चितळेंचा दिल्लीहून सीनिअर कौंसिल राजीव पाटील यांना फोन आला. सुप्रिम कोर्टाने सरकारची एसएलपी डिसमिस केली आहे. हायकोर्टाने शिक्षणमंत्र्यांवर ओढलेले ताशेरे काढण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. सुप्रिम कोर्टाने तीही फेटाळली. 


१९ मार्च दुपारी १ वाजता शिक्षणमंत्र्यांनी अखेर सही केली. फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. संध्याकाळी उशिरा पगाराचे आदेश निघाले. तब्बल ३९ दिवसांनंतर. 


शिक्षणमंत्री म्हणत होते, २० ते २५ दिवस लागतात. एकाही शिक्षकाने आपलं युनियन बँकेचं खातं बंद केलेलं नाही. फक्त सरकारने आपलं पुल अकाऊंट अॅक्टिव्ह करण्याचे आणि बिलं स्विकारण्याचे आदेश फक्त काढायचे होते. एकही बिल परवापर्यंत डिपार्टमेंटने स्विकारलेलं नव्हतं. आम्ही सरकारच्या आदेशाची वाट पाहतो आहोत, असं अधिकार सांगत होते. सुप्रिम कोर्टात जाण्याचा तावडेंचा अधिकार मान्य केला तरी लॉ डिपार्टमेंटने स्पष्ट बजावलं होतं की, शिक्षकांचे पगार थांबवता येणार नाहीत. शिक्षणमंत्र्यांनी कुणाचंच ऐकलं नाही. मुख्यमंत्र्यांनाही फसवलं. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या ६ लाख शिक्षकांचे पगार तर कोर्टात अडकलेले नव्हते. जानेवारीचा आता मिळाला. फेब्रुवारीचा पगार त्यांना अजून मिळालेला नाही. 


छळायचं म्हणून किती छळायचं? मुलं कमी झाली म्हणून नाही, निकष बदलले म्हणून शिक्षक सरप्लस केले जात आहेत. रात्रशाळांवर कुऱ्हाड चालवली गेली. दुर्गम भागातल्या १३०० शाळा बंद केल्या. मराठी भाषा दिनी शिवाच्या वाडीवरची शाळा बंद झाली. आता महिना होईल. तिथली ११ मुलं, मुली शाळेत गेलेली नाहीत. गुढीपाडवा महाराष्ट्राचा सण. नव्या वर्षाचा. नव्या वर्षाची सुरवात पगाराविना झाली. पेन्शनच्या अधिकारासाठी हजारो तरुण शिक्षक आणि कर्मचारी संघर्ष करत आहेत. सेवाज्येष्ठतेवरुन शिक्षकांमध्ये भांडण लावून दिलं आहे. विनाअनुदानित शिक्षकांना २० टक्के देतो म्हणून सांगितलं, अजून घाोषित - अघोषितमध्ये अडकवून ठेवलं आहे. १३ वर्षे झाली बिनपगारी काम करत आहेत. या छळाचा अंत कधी होणार?


ता.क.

महाराष्ट्रातील शिक्षकांची स्थिती काय? जानेवारीचा पगार मार्चमध्ये आला. फेब्रुवारीचा पगार गुढी पाडवा गेला, अजून आलेला नाही. शालार्थ प्रणाली अजून चालू झालेली नाही. 

- कपिल हरिश्चंद्र पाटील

आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
kapilhpatil@gmail.com

Monday 19 March 2018

मुंबईच्या शिक्षकांना अखेर सुप्रीम कोर्टाने न्याय दिला आहे


दि. 19 मार्च 2018 -
मुंबै बँक असुरक्षित असल्याने त्या बँकेत एक दिवसही शिक्षकांचे पगार ठेवता येणार नाहीत, इतका स्पष्ट निकाल मा. मुंबई हायकोर्टाने दिला होता. नाबार्डच्या ताज्या अहवालात मुंबै बँक किती असुरक्षित आहे, हे स्पष्ट झालं आहे. परंतु मुंबै बँक वाचवण्यासाठी मुंबईच्या शिक्षकांना वेठीस धरून शिक्षण मंत्र्यांनी पगार होऊ दिले नाहीत. शिक्षक भारती आणि इतर यांच्या बाजूने मुंबई हायकोर्टाने स्पष्ट निकाल दिला होता. त्याविरोधात शिक्षणमंत्री आणि मुंबै बँक सुप्रीम कोर्टात गेले. पण सुप्रीम कोर्टाने जोरदार तडाखा लगावला. शिक्षणमंत्री आणि मुंबै बँकेचं अपील फेटाळून लावलं. 

सुप्रीम कोर्टाने तावडेंची याचिका फेटाळल्या नंतर सरकारी वकिलांनी शिक्षण मंत्र्यांवर मुंबई हायकोर्टाने मारलेले ताशेरे काढून टाकण्याची मागणी केली. पण सर्वोच्च न्यायालयाने ती ही मागणी फेटाळली. आणि त्यासाठी पुन्हा हायकोर्टात जा असे सांगितले. 


शिक्षक भारतीच्या विरोधात तावडे आणि मुंबै बँक हे दोघे सुप्रीम कोर्टात गेले होते. शिक्षक भारतीच्या वतीने अॅड. अमोल चितळे यांनी जोरदार बाजू मांडली. मुंबै बँकेच्या विरोधात नाबार्डनेही ही बँक असुरक्षित आणि अतिजोखमीची ठरवल्याचा अहवाल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबै बँकेच्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली. आणि हायकोर्टाचा निर्णय उचलून धरला. 

घटनाक्रम -
1.
मुंबई हायकोर्टाने दि. 9 फेब्रुवारीला निकाल दिला होता. 

2.
दि. 19 फेब्रुवारीला निकालाची अधिकृत प्रत मिळताच लॉ अँड ज्यूडीशेअरी डिपार्टमेंटने युनियन बँके मार्फत पगार करण्याचा सल्ला दिला.

3.
दि. 5 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार कपिल पाटील भेटले. युनियन बँकेमार्फत तातडीने पगार देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

4.
दि. 7 मार्चला पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट. मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश. तरीही कार्यवाही नाही. 

5.
दि. 12 मार्च चार ज्येष्ठ मंत्री आणि आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचे शिक्षणमंत्री तावडे यांना आदेश. पगाराचे आदेश आजच काढा. सुप्रीम कोर्टात जाऊ नका. 

6.
दि. 13 मार्च आमदार कपिल पाटील शिक्षण सचिवांना भेटले. सचिव म्हणाले माझ्याकडे आदेश नाहीत. त्यांच्या कम्प्युटर वर पत्र मिळाल्याची नोंद होती.

7.
दि. 14 मार्च पुन्हा एकदा कपिल पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सचिवांना फोन केला, आजच आदेश काढा. पंधरा मिनिटात फाईल तयार. फाईल शिक्षणमंत्र्यांकडे रवाना. शिक्षणमंत्र्यांनी सही केली नाही.

8.
दि. 16 मार्च कपिल पाटील शिक्षणमंत्र्यांना भेटले. मी सही करून फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. पण शिक्षणमंत्र्यांनी सहीच केली नव्हती. आणि फाईलही पाठवली नव्हती.शिक्षणमंत्री चक्क खोटं बोलत होते.

सुप्रीम कोर्टात अपील (SLP) केल्याची माहिती मुख्यमंत्र्यापासून दडवून ठेवण्यात आली.

9.
दि. 19 मार्च मा. सुप्रीम कोर्टाने शिक्षणमंत्र्यांना फटकारले. मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

शिक्षणमंत्र्यांच्या आडमुठी धोरणामुळेच आणि अहंकारामुळेच शिक्षकांचा गुढी पाडवा पगाराविना गेला. रिटर्न्स फाईल झाली नाहीत. एकट्या कमावणाऱ्यांचे हाल झाले. 

हा विजय माझा किंवा शिक्षक भारतीचा नसून मुंबईतल्या तमाम शिक्षकांचा आहे.
- आमदार कपिल पाटील


काही दस्तावेज माहितीस्तव - 
(क्लीक करा आणि मोठे करून वाचा)

1.
THE STATE GOVERNMENT OF MAHARASHTRA Vs SHIKSHAK BHARATI
सुप्रीम कोर्ट - 19 मार्च 

2.
अखेर शालेय शिक्षण विभागाचे आदेश निघाले   - 19 मार्च 



3.
शिक्षण उपसंचालक, मुंबई यांचेही आदेश निघाले   - 19 मार्च




4.
THE STATE GOVERNMENT OF MAHARASHTRA Vs SHIKSHAK BHARATI
मुंबई हायकोर्ट - 9 फेब्रुवारी



5.
आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश  - 5 मार्च 


6.
आमदार कपिल पाटील यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश  - 14 मार्च 

पगार वेळेवर होणारच. मुंबईतल्या शिक्षकांच्या साथीला सलाम! 
- कपिल पाटील https://www.youtube.com/watch?v=6i14bVdHjh4

Friday 16 March 2018

शिक्षणमंत्र्यांची छळछावणी


रविवारी गुढीपाडवा आहे. पण पगाराचा पत्ता नाही. मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे राजकारण खेळताहेत. शिक्षकांना ते माहीत आहे. पण शिपाई एकटा कमावता असतो. पगारही कमी असतो. तो तर हवालदील झाला आहे. शिक्षकांचे घराचे हप्ते चुकले आहे. पेनल्टी बसली आहे. पण तावडे साहेबांना त्याची पर्वा नाही. 'चोराच्या उलट्या बोंबा', अशी एक मराठीत म्हण आहे. म्हणे कपिल पाटलांनीच पगार अडवून ठेवले आहेत. 

दुसरा महिना उजाडला तरी तावडे पगार का करत नाहीत? खुद्द मा. मुख्यमंत्र्यांनी सर्व ज्येष्ठ मंत्र्यांच्या समक्ष सुनावलं, तरी तावडे का ऐकत नाहीत? इतका द्वेष का?   शिक्षणमंत्र्यांच्या छळछावणीत महाराष्ट्रातले शिक्षक आणि महाराष्ट्राचं शिक्षण कैद आहे. 

पत्रकारांनी विचारलं की ते म्हणतात, 'मी शिक्षण मंत्री आहे, शिक्षक मंत्री नाही.'

मुंबई हायकोर्टाने स्पष्ट निकाल दिला आहे. कडक ताशेरे ओढले आहेत. शिक्षणमंत्र्यांचं नाव घेऊन इतके कठोर ताशेरे कोर्टाने ओढले आहेत की दुसरे संवेदनशील मंत्री असते तर त्यांनी राजीनामा देऊन टाकला असता. तुमचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पगार युनियन बँकेत ठेवता. आणि शिक्षकांचे पगार मात्र असुरक्षित बँकेत ठेवता? असा रोकडा सवाल मा. हायकोर्टाने सरकारी वकीलांना विचारला होता. पगाराबाबतचे हायकोर्टाचे जजमेंट ऐतिहासिक आणि लॅण्डमार्क असल्याची प्रतिक्रिया न्यायालयीन वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 

सुप्रिम कोर्टाचे एक ज्येष्ठ निवृत्त न्यायमूर्ती एका कार्यक्रमात मला म्हणाले, 'हे ऐतिहासिक जजमेंट आहे. लॅण्डमार्क आहे. हायकोर्टाचे हे जजमेंट पुढे अनेक लोकांना कामी येणार आहे.'

माजी अतिरिक्त अटर्नी जनरल म्हणाले, 'ग्रेट जजमेंट आहे.'

'अक्षरशः लूट थांबवली. हा सरकारचा पैसा आहे. शिक्षकांना असुरक्षित बँकेतून कोर्टाने वाचवलं आहे.' न्याय वर्तुळातली तिसरी प्रतिक्रिया. 

संतप्त प्रतिक्रिया
मला येणाऱ्या फोनवरच्या प्रतिक्रिया खूप तीव्र आणि संतप्त असतात. म्हणतात सर हाणा त्यांना. एक मुख्याध्यापिका म्हणाल्या, 'असा राग येतो की धरुन ..... वाटतं.' 

एक शिपाई दादा म्हणाले, 'साहेब मला सांगा काय करु ते? माझ्या मुलाची फी भरायची राहिली आहे. सणाला पैसे नाहीत.' 

त्या सर्वांना मी सांगतो आहे, 'आपल्याला असं नाही करता येत. आणखी थोडं सहन करु.'

माझे आई, वडील शिक्षक होते. गावाकडच्या शेतात माझे ८४ वर्षांचे वडील आजही राबतात. त्यांनी माझ्यावर साने गुरुजींचा संस्कार केला आहे. मी गांधींना मानतो. त्यामुळे तो मार्ग सोडून कधी वागू शकत नाही. मी कुणाला कधीही अपशब्द वापरत नाही. आयुष्यात कधी शिवी दिली नाही. राग मलाही येतो. पण संयमात ताकद असते. 

परवा सभागृहात नाही का चंद्रकांत दादा किती रागावले होते. अत्यंत शांत मानले जाणारे ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. नंतर त्यांचा राग शांत झाला. 

आज सकाळी पायऱ्यांवर बसलो होतो. पगाराचा फलक घेऊन. तावडे साहेबांच्या पाठोपाठ चंद्रकांत पाटील आले. विलेपार्ले येथील भाजपचे आमदार आणि माझे जुने मित्र पराग अळवणी माझ्याशी बोलत उभे होते. चंद्रकांत दादा माझ्याकडे पाहून त्यांना म्हणाले, 'एकटा संघर्ष करत असतो.' ज्येष्ठ मंत्र्यांनी दिलेली ती दाद होती. 


त्रास तर खूप होतोय. ९ फेब्रुवारीला मा. हायकोर्टाचा निकाल आला. तेव्हापासून पाठी लागलोय. दगडावर डोकं फुटावं तसा शिक्षणमंत्र्यांचा प्रतिसाद आहे. १९ फेब्रुवारीला कोर्टाच्या निकालाची अधिकृत प्रत सरकारला प्राप्त झाली. त्यावर शिक्षण खात्याने लगेच आदेश काढला असता तर १ मार्चला युनियन बँकेतून पगार झाला असता. ०५ ऑक्टोबर २०११ चा मूळ जीआर रद्द झालेला नाही. युनियन बँकेत सर्वांची खाती आहेत. पुल अकाऊंट आहे. फक्त एक आदेश हवा होता. पण आदेश काढण्यात आला नाही. सुप्रिम कोर्टात जाण्याची तयारी सुरु झाली. लॉ अॅण्ड ज्युडीशिअरी डिपार्टमेंटला सल्ला विचारण्यात आला. त्यांनी उत्तर दिलं, 'आधी हायकोर्टाच्या आदेशानुसार शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून वितरीत करणे सरकारवर बंधनकारक आहे. सुप्रिम कोर्टाच्या स्टे साठी थांबता येणार नाही.' लॉ सेक्रेटरींचा हा सल्ला मंत्र्यांनी मानला नाही. ५ मार्चला अखेर मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो. त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. पुन्हा ७ मार्चला गेलो. त्यांनी पुन्हा आदेश दिले. पण तरीही हालचाल नाही. 

०५ मार्चचं पत्र आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश (पत्रावर क्लीक करा आणि मोठे करून वाचा)



खोटं बोलणारे शिक्षण सचिव
१२ मार्चला अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चा होती. मी आणि जयंत पाटील हजर होतो. चंद्रकांत दादा, गिरीष बापट, एकनाथ शिंदे, गिरीष महाजन हे ज्येष्ठ मंत्री आणि मोर्च्याचे नेते उपस्थित होते. चर्चा संपल्यानंतर अनौपचारीक गप्पा सुरू होत्या. इतक्यात विनोद तावडे तिथे आले. ते खूर्चीवर बसताच मुख्यमंत्री स्वतःहून त्यांना म्हणाले, 'मी कपिल पाटलांना सांगितलं आहे. सरकार सुप्रिम कोर्टात जाणार नाही. पगाराचे आदेश आजच काढा.' सोमवारी १२ मार्चची ही गोष्ट. १३ तारखेला मी शिक्षण सचिव नंद कुमार यांच्याकडे गेलो. ते म्हणाले 'मला मुख्यमंत्र्यांचे आदेशच मिळालेले नाहीत.' राज्याचे शिक्षण सचिव इतकं खोटं बोलू शकतात? मी त्यांच्या कंप्युटर वरची मुख्यमंत्र्यांचे पत्र पोचल्याची नोंद दाखवली. तेव्हा ते वरमले. म्हणाले 'पण आम्ही सुप्रिम कोर्टात अपिल केलं आहे. दोन महिने पगार होणार नाहीत.' 

मला पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं. १४ मार्च. ते ऐकताच मुख्यमंत्री थक्क झाले. त्यांनी थेट नंदकुमारांना फोन लावला, 'तुम्हाला लॉ अॅण्ड ज्युडीशिअरी डिपार्टमेंटने सांगूनही तुम्ही पगार का सुरु केले नाहीत? आजच आदेश काढा.' १५ मिनिटात आदेश तयार झाले. फाईल शिक्षणमंत्र्यांकडे गेली. तीन दिवस झाले. शिक्षणमंत्री अजूनही सही करत नाहीत. आज रात्री (१६ मार्च) विधान भवनातून बाहेर पडताना ते म्हणाले, 'मी सही करुन मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली आहे.' 

१४ मार्चचं पत्र आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश (पत्रावर क्लीक करा आणि मोठे करून वाचा)
छळ करणारे शिक्षणमंत्री
मी जबाबदारीने सांगतो, 'शिक्षणमंत्री खोटं बोलत आहेत.' फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेलेली नाही. शिक्षणखात्यात पडून आहे. सोमवारी सुप्रिम कोर्टात केस आहे. मुख्यमंत्र्यांचं न ऐकता शिक्षण खातं आणि मुंबै बँक सुप्रिम कोर्टात गेले आहेत. सोमवारी काय निकाल लागतो त्याची वाट शिक्षणमंत्री पाहत आहेत. इतकं खोटं बोलणारे शिक्षणमंत्री मी पाहिले नाहीत. शिक्षकांना असे छळणारे शिक्षणमंत्री झाले नाहीत. रात्रशाळा बंद करणारे. दुर्गम भागातल्या छोट्या शाळा बंद करणारे शिक्षणमंत्री जगाच्या पाठीवर कधी पाहिलेत का?

एका मुलीच्या शाळेसाठी जपानची ट्रेन तीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या स्टेशनवर थांबत होती. आमचे शिक्षणमंत्री शिक्षणाच्या ट्रेनमधून गरीब मुलांना ढकलून बाहेर काढत आहेत. शाळांचं कंपनीकरण करत आहेत. शिक्षकांना सरप्लस करत आहेत. कुठे कुठे बदली करुन टाकली आहे सरप्लस शिक्षकांची. छळाला काही अंत हवा. परवा तर तीन गुजराती शाळेतील महिला शिक्षकांना 'उसनवार तत्वावर' मंत्रालयात बदली करण्यात आली. महिलांच्या बाबत इतका अपमानास्पद शब्द वापरावा याचं तारतम्य राहिलेलं नाही. मी मुख्यमंत्र्यांना ते दाखवलं. ते थक्क झाले. त्यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्यामुळे शिक्षण सचिव कार्यवाही करतील, पण मध्ये आडवे शिक्षणमंत्री आहेतच. खरं तर परीक्षांच्या काळात शिक्षकांच्या बदल्या आणि समायोजन करण्याचं कारण काय? समोर गुढी पाडवा दिसतो आहे. हायकोर्टाचे आदेश आहेत. मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. मी अक्षरशः रोज जातो आहे. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे आणि कार्यवाह प्रकाश शेळके, शशिकांत उतेकर, लीना कुलकर्णी गेले महिनाभर कोर्ट, मंत्रालय, शिक्षण उपसंचालक अशा फेऱ्या मारताहेत. पण शिक्षणमंत्र्यांना पाझर फुटत नाही. 

संवेदनशील मुख्यमंत्री
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या साऱ्या काळातला प्रतिसाद संवेदनशील आहे. तक्रारीला जागा नाही. १२ मार्चच्या शेतकरी मोर्च्याला त्यांनी जसा प्रतिसाद दिला. तितक्याच संवेदनशीलतेने आज दुपारी पायरीवर मला ते म्हणाले, 'हायकोर्टाच्या आदेशानुसार तुमचे पगार त्यांना (शिक्षणमंत्र्यांना) करावेच लागतील.'


परवा व्हाटस्अपवर कुणाची तरी प्रतिक्रिया होती शेतकऱ्यांच्या मोर्च्यातून वेळ मिळाला असेल तर कपिल पाटलांनी शिक्षकांकडे पहावं. शेतकऱ्यांच्या प्रति इतकी असंवेदना व्यक्त करणारे तावडेचेचं मित्र असू शकतात. त्या मोर्च्यातल्या शेतकऱ्यांची मुंबईतल्या शिक्षकांच्या प्रती आणि विद्यार्थ्यांच्या प्रती किती प्रेमाची आणि काळजीची भावना होती, हे सांगायला हवं. 

रक्ताळलेल्या पायांचा मोर्चा
सोमवारी विधान भवनावर २०० किलोमीटर चालत हजारो आदिवासी आणि शेतकरी बांधव आले. पायातल्या चपला कधीच तुटल्या होत्या. असंख्य अनवाणी. पायांना जखमा. त्यातून भळभळणारं रक्त गरम डांबरी रस्त्यावर सुकत होतं. शहापूर आणि ठाण्यात आले तेव्हा शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं जेवण दिले. तोपर्यंत सुकवलेल्या भाकऱ्या आणि लसणाची चटणी घशाखाली ढकलत बाया बापड्या चालत होत्या. अनेकांचं रक्त कमी झालं होतं. मुलुंड चेकनाक्यापासून रविवारी त्यांच्यासोबत मी चालत होतो. जालिंदर सरोदे सोबत आपले कितीतरी शिक्षक त्या मोर्च्यात चालले. मोर्चा सोमवारी मुंबईत चालणार होता, त्यादिवशी दहावीचा गणिताचा पेपर होता. बारावीचाही पेपर होता. मोर्च्याचे नेते कॉ. जीवा पांडू गावीत आणि कॉ. अशोक ढवळे यांना मी म्हणालो, 'सोमवारी पेपर आहेत. मोर्च्याने मुंबईत ट्रॉफिक जाम होईल. मुलांचे हाल होती. म्हणून मोर्चाचं टाईमटेबल बदलता येईल का? माझी विनंती आहे. मुंबईचा शिक्षक आमदार म्हणून तुमच्या कानावर ही गोष्ट घालणं आवश्यक आहे.'

मुंबईच्या मुलांसाठी ४३ किलोमीटर पायतोड
आणि काय आश्चर्य? गावित, ढवळे आणि नवले यांनी आदिवासी आणि शेतकऱ्यांना विचारलं. निर्णय घेतला, रात्रीच चालायचा. दिवसभर कडक उन्हात चालले होते सर्व. रात्री पुन्हा २ वाजता निघाले. पहाटे सहाच्या आत आझाद मैदानात पोचले. त्याच रक्ताळलेल्या पायांनी एका दिवसात आणि एका रात्रीत ४३ किलोमीटर चालली माणसं. हे लिहताना माझ्या डोळ्यात पाणी आहे. मला खात्री आहे, तुमच्याही डोळ्यात पाणी असेल हे वाचताना. किती त्याग. दुःख त्यांचं मोठं. पण मुंबईतल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून हे आदिवासी चालले. 

मुख्यमंत्र्यांनी मोर्च्याला दिलेला प्रतिसाद संवेदनशील होता. त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना पाठवलं होतं. रविवारी तेही चालत होते. पण रात्रभरही हे लोक चालतील, याची कल्पना त्यांनी केली नव्हती. दहा मिनिटात सौमय्या ग्रऊंड रिकामं झालं. ज्वाइर्ट कमिशनर देवेन भारती यांनी महाजनांना कळवलं. महाजन लगेच आले आणि तेही रात्रभर चालले. 

आदिवासी शेतकरी तसे चालले म्हणून सरकारलाही झुकावं लागलं. संयम, त्याग आणि आत्मक्लेश यांच्याशिवाय विजय प्राप्त होऊ शकत नाही. गांधींनी शिकवलेला सत्याचा मार्ग आहे हा. लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली निघालेल्या त्या मोर्च्याने हाच मार्ग अवलंबला म्हणून ते जिंकले. 

मी सदैव विरोधात उभा असतो. सरकार कुणाचंही असो. निखिल वागळे म्हणाले तसं, 'सामान्यांच्या बाजूने आपण परमनंट विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे.' विलासराव देशमुख यांचं माझ्यावर किती प्रेम होतं, हे सर्वांना माहित आहे. पण विचारांना पटलं नाही तेव्हा सरकारवर टीका करत होतो. विधेयकाच्या विरोधात मतदान करत होतो. विलासराव देशमुख यांनी कायम शिक्षकांच्या बाजूने कौल दिला. तेव्हाही नाही का वसंत पुरके आपल्याला किती छळत होते. पण पुरके परवडले असं म्हणायची आता वेळ आहे. मला खात्री आहे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोच कौल देतील. तावडेंचा शिक्षकांना छळणारा मसुदा माझ्या सांगण्यावर याच मुख्यमंत्र्यांनी स्क्रॅप केला होता. म्हणून माझा भरोसा आहे. 

आपला