Thursday, 26 July 2018

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

सर्वपक्षीय बैठक बोलवा. निर्णय घ्या. 
छ. शाहू महाराज आरक्षण दिन
२६ जुलै २०१८ 
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,
दोन वर्षे अहिंसेच्या मार्गाने मूक मोर्चे काढूनही आरक्षण मिळालं नाही, म्हणून मराठा समाजातील तरुणांच्या असंतोषाने पुन्हा पेट घेतला आहे. आरक्षणाची मागणी अत्यंत संयमाने, घटनात्मक मार्गाने सगळ्या पुराव्यानिशी मांडण्यात आली. महात्माजींच्या अहिंसक सामुदायिक सत्याग्रहाचा विलक्षण अविष्कार मराठा समाजाने दाखवून दिला. पण तरीही मागणी पदरात पडली नाही. आता हे आंदोलन आणखी भडकण्याआधी सरकारनेच मार्ग काढला पाहिजे. 

मुख्यमंत्री म्हणून आपण स्वतः पुढाकार घ्यायला हवा. ज्येष्ठ नेते मा. श्री. शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी आणि विधिमंडळातील सर्व गटनेत्यांशी तातडीने चर्चा करायला हवी. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा संकट निर्माण झालं, पेचप्रसंग निर्माण झाला, संवेदनशील प्रश्न उभा राहिला तेव्हा तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः विरोधी पक्षातील सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली होती. समाजातील धुरीणांना साद घातली होती. मार्ग त्यातून निघाला होता. यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि विलासराव देशमुख यांनी याच मार्गाने राज्यात भडकलेले वणवे शांत केले होते. 

मराठा समाजाची मागणी स्वच्छ आहे. नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. ही मागणी न्याय्य आहे. भारतीय संविधानानुसार हे आरक्षण देणे शक्य आहे. 

प्रश्न असा आहे की - 
१. हे आरक्षण ओबीसी म्हणून देता येईल काय?
२. ओबीसीमधील आधीच्या प्रवर्गांचा हिस्सा त्यातून सुरक्षित राहील काय?
३. ५० टक्क्यांवरुन अधिक आरक्षण देता येईल काय?

या तिन्ही प्रश्नांचं उत्तर होय असं आहे. 

संविधानातील कलम १५(४) आणि १६(३) व १६(४) या तरतूदींनुसार आरक्षण देता येतं. द्यावं लागतं. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे त्याला वंचित ठेवता येणार नाही. मराठा समाज हा संत तुकाराम आणि महात्मा फुले यांच्या भाषेत कुळवाडी कुणबी आहे. शोषित शुद्र आहे. महात्मा फुलेंनी ब्रिटीशांपुढे ज्यांचं दुःख मांडलं आणि ज्यांच्यासाठी आसुड ओढला तोच हा शुद्र मागासवर्गीय शेतकरी समाज आहे. या देशातलं पहिलं आरक्षण ज्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिलं, त्यात मराठा समाजाचा समावेश होता. शाहू महाराजांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कुणब्यांची परिषद घेतली तोच हा समाज आहे. डॉ. पंजाबराव देशमुखांनी अत्यंत शहाणपणाने पुढाकार घेतला त्यामुळे विदर्भातील मराठा-कुणबी प्रवर्गातील सर्व जातींना कुणबी म्हणून सवलती मिळू लागल्या. उर्वरित महाराष्ट्रात तसे घडले नाही. मंडल आयोगाच्या वेळीही विरोध झाला. म्हणून हा समाज सवलतींपासून वंचित राहिला आहे. 

हे झाले ऐतिहासिक पुरावे. एकेकाळचा कथित सत्ताधारी वर्ग आज शेतीतून पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. कर्जबाजारीपणामुळे खंगला आहे. शेती परवडत नाही. नोकरी मिळत नाही. शिक्षण महाग आहे. तरुण वैफल्यग्रस्त होतो आहे. लग्न होत नाहीत. रोज अवमान होतो. त्यामुळे फास घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रातील लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी फास लावून घेतला. महात्मा फुले इंग्लडच्या युवराजाला डोक्यावर पागोटं नेसून शेतकऱ्याच्या वेशात भेटायला गेले होते. ते पागोटं पार फाटलं आहे. त्या फाटलेल्या पागोट्याची कैफियत आता तरी ऐकणार का? 

ओबीसी म्हणूनच मराठा समाजातील जातींना सवलत द्यावी लागेल. आधीच्या ओबीसी जातींचं काय? आधीच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हा प्रश्न ओबीसींमध्ये तीन गट करुन सोडवता येईल. ओबीसींमध्ये आधीच दोन गट करण्यात आले आहेत. भटके विमुक्त आणि इतर मागासवर्गीय. भटक्या विमुक्तांमध्येही अ, ब, क, ड असे चार गट करण्यात आलेत. मग मराठा समाजासाठी वेगळा ओबीसी गट का केला जात नाही? करणे शक्य आहे. निर्णय सरकारने घ्यायचा आहे. असं करण्याला ओबीसींचा विरोध नाही. 

मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांहून अधिक जागा वाढवाव्या लागतील. ५० टक्क्यांहून अधिक जागा वाढवायला सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा अडसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अडसर कुठेही नाही. डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेत केलेल्या चर्चेनुसार ६९टक्क्यांपर्यंत आरक्षण देणे कायद्याने शक्य आहे. तामिळनाडू सरकारने ते केलं आहे. राज्य घटनेच्या नाईन्थ शेड्युल्ड (९वी अनुसूची)मध्ये महाराष्ट्राच्या वाढीव आरक्षण कायद्याचा समावेश केला की त्याला इम्युनिटी मिळेल. फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. कारण ही इम्युनिटी देण्याचं काम भारतीय संसदेचं आहे. केंद्र सरकारने ठरवलं तर विरोधी पक्षांची त्याला साथ मिळेल. 

मराठ्यांना नव्याने आरक्षण द्यायचं नसून शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण पुनर्प्रस्थापित करायचं आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांतून जन्मलेल्या आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवता येणार नाही. आता आणखी वेळ काढू नये. निर्णय घ्यावा, ही विनंती.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
प्रदेशाध्यक्ष, लोकतांत्रिक जनता दल, महाराष्ट्र प्रदेश


या आधी लिहलेले लेख पुढीलप्रमाणे -

मुख्यमंत्री, बळीराजाचं ऐकाल काय?
https://kapilpatilmumbai.blogspot.com/2016/09/blog-post_27.html

मराठ्यांचा आक्रोश कशासाठी?
https://kapilpatilmumbai.blogspot.com/2016/10/blog-post.html

ताराबाईंचं वादळ आणि मराठ्यांच्या लेकी
https://kapilpatilmumbai.blogspot.com/2016/10/blog-post_4.html21 comments:

 1. सर,या ज्वलंत समस्येला अतिशय सहजसोप्या कळेल अशा भाषेत शासणास पर्याय दिला आहे,

  ReplyDelete
 2. पोटतिडकिने आपण जो विषय मांडला आहे तो फडणवीस सरकारला माहीत नाही किंवा कळत नाही अस नाही पाटील साहेब त्यांना माहीत असून सुध्द्दा आरक्षण द्यायचे नाही आणि तांत्रिक मुद्दा उपस्थित करायचा तो म्हणजे हा की आरक्षण हि बाब कोर्टात आहे म्हणून .

  ReplyDelete
 3. खुप छान लिहलेत, मुत्सदी पनाने लिहलेत ,अभ्यासपूर्ण लिखाण केलेत आपण, आपले राजकीय तारतम्य आणि भान वाचून आनंद द्विगुणित झाला .

  ReplyDelete
 4. विदारक सत्य...

  ReplyDelete
 5. अगदी बरोबर आहे सर योग्य वेळी मुख्यमंत्र्यांना आपण सुचवलं व सुनावलं आहे मराठा शेतकरी समाजाचे अवस्था आज फार दयनीय आहे तो नाव दलित म्हणून प्रस्तापित झाला आहे काकासाहेब शिंदेचे जे झालं ते फार वाईट झालं उभा महाराष्ट्र हळहळला यामध्ये काळ सोकावण्याची भीती आहे शेतकरी आत्महत्या संपता संपता नाहीत.काकासाहेब शिंदे अमर रहे त्यांच बलिदान व्यर्थ जाणार नाही पण सर्वाधिक मराठा शेतकरी आत्महत्या पाठोपाठ तरुणांची बलिदान ही तमाम मराठा नेतृत्वाला लगावलेली सणसणीत चपकार आहे व सर्व बाजून समाजाची शोषण कोंडी होत असल्याची जणू हा रोख ठोक पुरावाच आहे पण शेतकरी व तरुणा आता गप्प बसणार नाहीत मारायचं नाही मारायचं वाकवायच आपल्या हिताच्या आड येणाऱ्या व्यवस्थेला हा मोर्चा आज रस्त्यावर आहे उद्या सर्वच सत्ताधारी व प्रस्थापितांची कोंडी होऊ शकते प्राप्त परिस्थितीत काही निर्णय घेता येत नसलं तर न्यायालयाने आता यात हस्तक्षेप केला पाहिजे तरच जळणारा महाराष्ट्र विझवता येईल पण तो विझवायचा कोणाच्या हिताचा नाही अस वाटतंय
  *@नितीनभाऊ झिंजाडे करमाळा

  ReplyDelete
 6. अगदी बरोबर सरजी पण हे शासनकर्ते अराजकता वाढवण्याचाच प्रयत्न करतात

  ReplyDelete
 7. Aarakshan deta yenar nahi mhananaryana changle uttar milale...

  ReplyDelete
 8. Aarakshan deta yenar nahi mhananaryana changle uttar milale...

  ReplyDelete
 9. ११ मुख्य मंतरी १५ वर्ष सतत राज्य तरी हि आरक्षण दिले नाही. बिना मागासपणा तपासता आरक्षण कोर्टात टिकणार नाही. त्यासाठी पूर्वी काहीच केले नाही. बाकी सरकारी नौकरीत जर आधीच १६ टक्केहून जास्त मराठा असतील तर.....

  ReplyDelete
 10. माननीय आमदार कपिल भाऊ
  मराठा जातील ओबीसी म्हणून हे आरक्षण देताना न्यायमूर्ती शिरपूरकर आणि उल्हास बापट
  यांनी राज्य घटना दुरुस्ती झाली तरी ती राज्य घटनेच्या गाभ्याशी सुसंगत नाही असे विधान
  जाहीर वृत्त वाहिनी वर चर्चेत केले -ते तार्किक आहे

  त्यामुळे मराठा जातीमध्ये आर्थिक दुर्बलता असणे हे वेगळे आणि ते मागास किंवा अप्रगत असणे हि बाब राज्य घटनेच्या मूलभूत सिद्धांताशी सुसंगत नाही कारण न्याय या तावत्वावर आधारलेली आहे
  या बाबत जाती व्यवस्था तिचा असेलला जाच अन्याय शोषण जसे दलित आदिवासी यांचे झाले तसे मराठी जातीचे समूह म्हणून झाले काय ?
  मागास चा आधार जाती व्यवस्था मुळे होत असलेला अत्याचार माणसाला माणूस म्हणून
  मान्य न करणं हे मराठा जाती सोबत झाले काय ? तसे सत्य असल्यास काही अडचण नाही
  हे न्या शिरपूरकर यांनी वारंवार सांगितले आहे .
  म्हणजे घटना दुरुस्ती झाली तरी सर्वोच्च न्यालयाच्या निकालाधारे ती टिकेल ?
  तरीही मराठा मधील वंचित पीडित याना संविधानांतर्गत आरक्षण मिळाले पाहिजे
  मात्र ओबीसी ला धक्का न लावता -- अन्यथा अलुतेदार बलुतेदार जाती ज्यांना शूद्र संबोधले
  ज्यांचा कैवार महात्मा फुले यांनी घेतला त्यांच्यात आणि मराठा मध्ये विनाकारण संघर्ष व्हायचा !

  ReplyDelete
 11. Sir jatinihay janganana karane jaruri ahe tyasathi prayatna kele pahijet.

  ReplyDelete
 12. आपण योग्य रीतिने प्रश्न मांडला आहे।

  ReplyDelete
 13. धन्यवाद कपिल सर
  तुमच्या पत्राची दखल अखेर मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. त्यांनी विरोधीपक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. काही चांगला मार्ग निघेल अशी आशा करूया.

  ReplyDelete
 14. २४ एप्रिल १९७३ नंतरच्या अनुसूची 9 मधील सर्व कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येते.परिणामी आरक्षणाच्या कायद्याला संरक्षण मिळत नाही. आणि मुळात अनुसूची 9 घटनेशी विसंगत आहे.

  ReplyDelete
 15. Kapial tu nehmicha samjvadi chalvalishi nigdiat rahila hahes ani thula hi vate ki marathana arakshan milayal pahije ya badal dhanyvad atta jast divas amhi vatt pahanar nahi maratha taruan manvi bomb banuan rajyakartyancha gharat ghustial ani mg tumhi tyana antakwadi mahnal krupay ti veel amchavar yeu dyachi ki nahi he thumhi tarva

  ReplyDelete
 16. Saheb tumachi madat havi hoti krupaya karun mala help kara
  8652281892

  ReplyDelete