Sunday, 8 January 2017

तावडे विरुद्ध बेलसरे, झाडे


राज्यात 3 फेब्रुवारी 2017 रोजी होणाऱ्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने कोकण आणि नागपूर मतदार संघातून अनुक्रमे अशोक बेलसरे आणि राजेंद्र बाबुराव झाडे यांना रिंगणात उतरवलं आहे. या नावांची घोषणा करताना लोक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी बेलसरे आणि झाडे यांची लढाई थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी होईल आणि त्यांची अशैक्षणिक धोरणं पराभूत करण्यात कोकण आणि नागपुरमधील शिक्षक यशस्वी होतील असे सांगितले.

कोकण आणि नागपूर विभागातील दोन्ही जागा भाजप प्रणित शिक्षक परिषदेकडे आहेत. मात्र शिक्षणमंत्र्यांच्या धोरणांना वैतागलेले शिक्षक आपला असंतोष या निवडणुकीत प्रगट करतील, असे कपिल पाटील यांनी सांगितले. अशोक बेलसरे हे शिक्षक भारती या शासन मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर राजेंद्र झाडे हे उपाध्यक्ष आहेत.

शिक्षक, मुख्याध्यापकांचा सुरु असलेला छळ आणि गरीबांचं अनुदानित शिक्षण बंद पाडण्याचं कारस्थान या मुद्यावर ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

शिक्षकांची लढाई अन्य कोणत्याही उमेदवारांशी नसून शिक्षण वाचवण्यासाठी बेलसरे आणि झाडे यांना शिक्षक विजयी करतील, असे पाटील म्हणाले. कोकणात 37 हजार शिक्षकांची नोंदणी झाली असून नागपूर विभागाची नोंदणी 35 हजारांच्या घरात आहे. 

अशोक बेलसरे दि. 13 जानेवारी रोजी कोकण भवन, बेलापूर येथे तर राजेंद्र झाडे नागपूर येथे दि. 16 जानेवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सरप्लस शिक्षक, 20 टक्केचे अनुदान, नो वर्क-नो पेचा जीआर, भाषा-विज्ञान आणि गणिताचे शिक्षक कमी करणे, कला-क्रीडा शिक्षकांची पदे संपुष्टात आणणे, रात्रशाळांची दडपशाही, सेल्फीचा अनाठायी आग्रह आणि शिक्षक-मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकण्याची वारंवार धमकी देणे यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱया या निवडणुकीत शिक्षणमंत्र्यांचीच कसोटी लागणार आहे.

मतपत्रिकेवर उमेदवारांचे फोटो

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारांचे फोटो यंदा प्रथमच मतपत्रिकेवर छापले जाणार आहेत. 2012 च्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कपिल पाटील नाव असलेला आणखी एक उमदेवार उतरवण्यात आला होता. निवडणूक चिन्ह किंवा अन्य कोणतंही वेगळेपण नसल्यामुळे आमदार कपिल पाटील यांची 1200 मतं वाया गेली होती. याबाबत भारत निर्वाचन आयोगाकडे कपिल पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर प्रत्येक उमेदवारांच्या नावापुढे त्यांचा फोटो छापण्याचे आयोगाने ठरवले आहे. खुद्द आयोगानेच तसे पत्र कपिल पाटील यांना पाठवले आहे. (सोबतचे पत्र पहावे) फोटो छापण्याची कपिल पाटलांची सूचना सगळ्याच सार्वत्रिक निवडणुकीत अंमलात येणार असल्याचे आयोगाने कळवले आहे. 


Wednesday, 4 January 2017

नव्या विद्यापीठ कायद्यात आरक्षण का नाही?

नवा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा दोन्ही सभागृहात पास झाला आहे. दोन्ही सभागृहाच्या संयुक्त प्रवर समितीकडे मूळ विधेयक होते. या समितीवर मी ही एक सदस्य होतो. 

या समितीवर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ सदस्य सुनिल तटकरे यांच्या आग्रहामुळे माझे नाव जाऊ शकले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माझ्या नावाला सभागृहात कडाडून विरोध केला होता. परंतु संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी आपली लेखी संमती सभापतींकडे पाठवली. अखेर सभापतींनी त्यांच्या अधिकारात माझ्या नावाचा समावेश समितीमध्ये केला. सभागृहाने तो  प्रस्ताव मंजूर केला. त्याबद्दल बापट साहेब आणि सन्मानीय सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा मी ऋणी आहे. शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात जरी विरोध केला तरी समितीच्या कामकाजात त्यांची वागणूक अत्यंत सौजन्यशील होती हे कबूल केले पाहिजे. 

या समितीकडे लोकांच्याही सूचना खूप आल्या होत्या. प्राध्यापक संघटना, शिक्षकेतर संघटना, मागासवर्गीय संघटना आणि छात्र भारती यांनी महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यासर्वांचीच दखल समितीने घेतली. माझी आरक्षणाची सूचना मात्र मान्य होऊ शकली नाही. ५ डिसेंबर २०१६ रोजी अहवाल सादर झाला. त्या अहवाला बरोबरच माझी आणि शरद रणपिसे यांची भिन्न मतपत्रिका जोडणे आवश्यक होते. तसे झाले नाही. मात्र विधेयक सादर करताना मा. शिक्षणमंत्री यांनी कपिल पाटील आणि शरद रणपिसे यांनी भिन्न मतपत्रिका जोडली असल्याचा उल्लेख केला. 

ही भिन्न पत्रिका अहवालात जोडली असती तर अधिक बरे झाले असते. अखेर ती मा. सभापतींना आम्ही दोघांनी सादर केली. 

भिन्न मतपत्रिका सोबत जोडली आहे - 





आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती