Friday, 24 August 2018

अटलजींची गंगा


चाहता हूं, की बेदाग निकल जाऊं।
मेरे पच्छात लोग सिर्फ इतना कहे, की आदमी अच्छा था।

ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग यांना दिलेल्या मनमोकळ्या मुलाखतीत खुद्द अटलबिहारी वाजपेयी असं म्हणाले होते. ते गेल्यावर खरंच लोकांनी सिर्फ इतना ही नही कहाँ, की आदमी अच्छा था। 

लालकृष्ण अडवाणी भावाकुल होणं स्वाभाविक होते. पंतप्रधान मोदीही चालले अंत्ययात्रेत. पण राहुल गांधी, सोनिया गांधी, कॉ. सिताराम येचूरी यांच्या प्रतिक्रियेत आपुलकी भरुन होती. शरद यादव आणि रामचंद्र गुहा यांचे लेख अटलजींचं मोठेपण सांगणारे होते. 

हिंदुत्ववादी मुशीत, संघाच्या तालमीत तयार झालेले अटलबिहारी वाजपेयी. असं काय होतं त्यांच्या व्यक्तीमत्वात? त्यांच्यातल्या उदारतेचं, अपार माणुसकीचं, लोभस संवादाचं अप्रुप सर्वांनाच आहे. शांतीभूषण यांनी तर लिहलं, संघातला धर्मनिरपेक्ष माणूस. हिंदुत्वाचे कठोर टीकाकार रामचंद्र गुहांनाही अटलजींच्या या व्यक्तीमत्वाचं आकर्षण वाटत होतं, 'कविता आणि एककल्ली कडवेपणा याची संगत कशी होऊ शकते? स्वयंसेवक असणारा माणूस अतिसंवेदनशील कविता कसा लिहू शकतो?' अटलबिहारी होतेच तसे कविहृदयाचे, दिलदारवृत्तीचे. शालीन. सभ्य. हळूवार आणि मुलायम. त्यांच्या बोलण्यातली, भाषणातली उब आश्वासक होती. विरोधकांनाच नाही, शत्रूलाही त्यांचं उबदार अलिंगन हवं होतं. 

वाजपेयी त्यांच्या आजाराने विस्मृतीच्या गर्तेत ओढले गेले, त्याला दशक अधिक झालं. पण जनमनाच्या स्मृती पटलावरून त्यांचं नाव कधीच गायब झालं नाही. द्वेषाच्या आणि दुहीच्या अग्नीत देशातले अनेक कोपरे करपत असताना अटलबिहारी वाजपेयी यांचं हिंदुत्व उदार आणि आश्वासक वाटावं हे स्वाभाविक आहे. धार्मिक कडवटपणाला सत्तेची धार चढत असणाऱ्या काळात वाजपेयींच्या  इन्सानीयत आठवण होणं ही तर वर्तमानाची गरज वाटावी. अघोषित दमनयंत्राच्या वातावरणात मोकळ्या श्वासासाठी  अटलजींची जमुरीयत अरुण शौरींनाही आठवावी यात नवल नाही. हे काय रसायन आहे? अटलबिहारी वाजपेयी नावाचं. घनघोर रात्रीच्या क्षितिजावर शुक्राच्या चांदणीचं दर्शन किती लोभस असतं. ती शुक्राची चांदणी अस्ताला गेली की हुरहुर वाटते. वाजपेयी जाण्याने ही हुरहुर सगळ्यांच्याच  काळजात जाणवली. कारण उजव्या क्षितिजावर आता तो शुक्रताराही नाही. 

अटलबिहारी वाजपेयी संघाचे होते. भाजपाचे नेते होते. बहुसांस्कृतिक, बहुवांशिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक अशा भारताला कट्टर हिंदुत्वाच्या सीमा विभाजीत करतात. भाजपची जिथे जिथे सत्ता आहे, तिथे तिथे उना, दादरी, सोनपेठ सारख्या घटना घडतात. तेव्हा तेव्हा विभाजनाची जखम अधिकच दुखरी बनते. अशी जखम वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी नाही दिली. आघाडीच्या सर्वसमावेशक राजकारणाला त्यांनी प्रधान्य दिलं. ही गोष्ट खरी की त्यांच्याच काळात पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला गेला. कामगार हक्काचे कायदे शिथिल झाले. शिक्षणाच्या अधिकाराला मर्यादा पडल्या. निर्गुंतवणुकीकरणाला वेग आला. सार्वजनिक क्षेत्राला ओहोटी लागली. वाजपेयी सरकारचा हा आर्थिक कार्यक्रम नरसिंहराव सरकारपेक्षा वेगळा नव्हता. त्यामुळे या प्रश्नाचा दोष एकट्या वाजपेयींचा नाही. काँग्रेसच्या नरसिंहराव सरकारचाही तितकाच आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांची किंमत आपण आज मोजतो आहोत. त्यात ढकललं असेल नरसिंहरावांनी पण वाजपेयींनी काही वाचवलं नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये एक फरक आहे. काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे. त्यामुळे त्या परंपरेतली मूल्ये जपणारे, देश समजणारे आणि देशाला साद घालू शकणारे नेते स्वातंत्र्योत्तर काळातही काँग्रेस देऊ शकली. संघ भाजपच्या विचारसरणीत ही मांदियाळी कधीच नव्हती. संघाचा किंवा भाजपचा कोणताच नेता देशाला साद घालू शकत नव्हता. अपवाद फक्त अटलबिहारी वाजपेयींचा. आसेतू हिमाचल देशवासियांशी बोलू शकणारी ती ताकद फक्त वाजपेयींकडे होती. हिंदुत्वाच्या सांप्रदायिक राजकारणापेक्षा आपली शेवटची ओळख 'आदमी अच्छा था!' ही त्यांना जास्त प्रिय होती. म्हणूनच संघ आणि भाजपच्या मर्यादा ते ओलांडू शकत होते. संवेदनशील, कविहृदयाशिवाय हे शक्य नाही. माणुसकीला पडणाऱ्या सीमा त्यांना मान्य नव्हत्या. 

पुरावा खुद्द वाजपेयींच्या भाषणाचाच देतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यात केलेल्या भाषणाचा. स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजकीय हिंदुत्वाचे जनक. सावरकर भारतमातेला राष्ट्रपुरुषाच्या रुपात पाहतात. ते मातृभू नाही, पितृभू मानतात. देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करत, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तेव्हा सावरकरांचे उद्गार होते, 'धर्मांतर हे राष्ट्रांतरच'. वाजपेयींना स्वातंत्र्यवीर वंदनीय होते. त्यांच्या कवितेत भारत राष्ट्रपुरुषच आहे. तरीही वाजपेयींचं हिंदुत्व सावरकरांपेक्षा वेगळं आहे. वाजपेयी आपल्या सावरकरांवरच्याच भाषणात म्हणाले होते, 'आपल्याकडे धर्मांतरण म्हणजे जणू राष्ट्रांतरण, असे आपण मानले आणि परस्परांमधल्या दुराव्याच्या रेषा अधिक ठळक करत राहिलो.'

अटलबिहारी वाजपेयी यांचं भारताचं आकलनही तितकच प्रगल्भ आहे. आपल्या भाषणात ते म्हणतात, 'भारतात चाल करुन आलेल्या प्रत्येक आक्रमकाने इथल्या दुहीचा फायदा उठवला. आपसातल्या भिंती तशाच जपण्याच्या नादात स्वतः लढवून कमावलेल्या गोष्टी, आक्रमकाच्या पायी घालत गुडघे टेकले. प्लासीची लढाई आठवा. जितके लोक मैदानात उतरून लढत होते. त्याहून दुप्पट लोक काठावर उभे राहून लढाईचा तमाशा पाहत होते. काहींना रणभूमीवर उतरायची परवानगीच नव्हती. उरलेल्यांना लढणाऱ्यांचा पराभवच हवा होता.' शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. कवी हृदयाचे अटलबिहारी वाजपेयी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्याधीग्रस्त महाकवी नामदेव ढसाळांना भेटायला गेले. ते फक्त कवी म्हणून? मला तेव्हा पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर वाजपेयींच्या पुण्यातल्या या भाषणात मिळालं.

पंडित नेहरुंविषयीचं त्यांचं प्रेम कधीच लपून राहिलं नाही. जनता पक्षात पहिल्यांदा ते परराष्ट्र मंत्री झाले. तेव्हा त्यांच्या दालनातली पंडित नेहरुंची तसबीर आधीच हलवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी फर्मान सोडलं आणि ती तसबीर पुन्हा भिंतीवर आली. परराष्ट्र व्यवहारात नेहरु नीतीच्याच मार्गाने  ते चालत राहिले. परराष्ट्र मंत्री असताना आणि पंतप्रधान असतानाही. पंचशीलाचा गुलाब नेहरुंप्रमाणे त्यांच्या कोटावर कायम होता.  

संघ भाजपात दीनदयाळांचा अंत्योदय आणि एकात्म मानवतावाद सांगितला जातो. पण त्यालाही असलेल्या मर्यादा वाजपेयींनी ओलांडल्या होत्या. जनता पक्षातून फुटून भारतीय जनता पक्षाची निर्मिती करताना वाजपेयींकडेच नेतृत्व होतं. जनसंघाच्या या नव्या अवताराला गांधीवादी - समाजवादाचं कोंदण देण्याचा प्रयत्न अटलबिहारी वाजपेयी यांनीच केला होता. त्यांचं स्कूल संघाचं होतं असं सर्वच म्हणतात. पण संघाच्या आधी ते आर्यसमाजी होते. त्यांचे वडील, त्यांचं घर आर्यसमाजी होतं. तो संस्कार ते कधीच विसरले नसावेत. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त केलं. '... We are sorry for that', असं ते प्रांजळपणे म्हणाले. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण दिली. त्याआधी नोव्हेंबर १९६६ मध्ये संतप्त साधूंची झुंड गोहत्या बंदीची मागणी करत संसदेवर चाल करुन गेली. तेव्हा त्या आतताईपणाला विरोध करणारे अटलबिहारी वाजपेयी एकमेव होते. 'गोहत्या बंदीच्या मागणीसाठी आक्रसताळ्या, हिंसक मार्गाचा अवलंब करणाऱ्यांनी आपल्या या बेमुर्वत कृत्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे पातक केले आहे.' असं पत्रकच त्यांनी प्रसिद्ध केलं. अमेरिकेच्या दौऱ्यावर होते पंतप्रधान वाजपेयी. राष्ट्राध्यक्षांच्या मेजवानीत बीफचीही डीश होती. कोणीतरी त्यांना त्याबद्दल हळूच कानात सांगितलं. वाजपेयी खळखळून हसत म्हणाले, 'अरे या गाई अमेरिकन आहेत. भारतीय नाहीत.' कश्मीरचं ३७० कलम हा भाजपच्या अजेंड्यावरचा एक विषय. पण कश्मीर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी वाजपेयी साहेबांनी कश्मीरीयतला अधिक महत्व दिलं. 

किती विलक्षण, दिलदार माणूस होता. सुसंस्कृत उदार, माणूसकीने ओथंबलेला नेता होता. त्यांचं भारतावर प्रेम होतं. भारताची त्यांची कल्पना ही हिंदुत्वाच्या कोंदणात बसणारी नव्हती. प्राचीन आक्रमकांनी भारताला सोने की चिडीया म्हटलं. आताचेही नेते सोने की चिडीया म्हणून भारताचं वर्णन करतात. वाजपेयी मात्र म्हणतात, 'इसका कंकर-कंकर शंकर है, इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।' हा फरक आहे. वाजपेयींची ही गंगा मैली होऊ देता कामा नये. दुरावा, दुही आणि द्वेष यांचा मळ गंगेत जाऊ नये, असं मानणाऱ्या प्रत्येकाला अटलजींची जरुर आठवण होत राहील. 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


मुंबईवर पकड असलेला शेवटचा काँग्रेस नेता 
गुरुदास कामत जिंदादिल माणूस होता. गोरापान, लालबुंद चेहरा. भारदस्त खानदानी व्यक्तिमत्व. पेहरावही तसाच. बोलण्यामध्ये दरारा. पण प्रेमाने ओथंबलेला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारा लगेच प्रभावीत होतो. कामत पक्के काँग्रेसी. पक्षनिष्ठा अविचल. मतभेद किती होवोत. अगदी हायकमांडशीही. पण पक्षाला त्यांनी कधी दगा दिला नाही. मनाने, वृत्तीने धार्मिक. ईश्वरनिष्ठ. विचाराने मात्र धर्मनिरपेक्ष. पक्के सेक्यूलर. त्यात कधी तडजोड केली नाही. युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. तेव्हाचं त्यांचं भाषण आजही स्मरणात आहे. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुखांना आव्हान दिलं होतं. काँग्रेसवाले कधी शिवसेनेच्या वाटेला जात नाहीत. पण कामत साहेब अंगावर घेत. बिंदास्त माणूस होता. धडाकेबाज बोलणार तसंच धडाकेबाज वागणार. कामाचा धडाकाही तितकाच मोठा. लोकसंग्रह अफाट. कार्यकर्त्यांना मायेने जपणारा. त्यांच्या मदतीला धावून जाणारा. सत्ता नसली तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामतांचा आधार होता. मुंबईतील काँग्रेस जीवंत, जीतीजागती ठेवण्यामध्ये कामतांचा निसंशय वाटा आहे. हायकमांडला त्याची जाणीव होती. त्यामुळे कामतांच्या दोनदा राजीनामा नाट्यानंतरही हायकमांडने त्यांचा आदर राखला. 

मुंबई काँग्रेसचं संघटन वाढवताना त्यांनी कधीही गैरमार्गाचा वापर केला नाही. अडचणीत, दंग्याधोप्यात लोकांच्या बाजूने उभा राहणारा, सामाजिक सलोख्यासाठी झटणारा नेता होते कामत साहेब. झोपडपट्टीतल्या सामान्य माणसाच्या बाजूने ते नेहमी उभे राहत. मुंबईचं बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक वैशिष्ट्य हे स्वतः कामतांचंही वैशिष्ट्य होतं. त्यामुळे सर्व गटातटांना, सामाजिक समुहांना ते आपले वाटत होते. मधल्या काळात कामतांना मुंबई काँग्रेसमधून दूर ठेवण्यात आलं. पण त्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. कामत हीच काँग्रेसची मुंबईतील ताकद होती. त्याची पुरेशी दाद मिळाली नाही. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात त्यांना ऐनवेळी लढायला सांगण्यात आलं होतं. तेव्हा ते घरी भेटायला आले होते. तिथून आम्ही दोघं मृणालताईंच्या घरी गेलो. ताईंनी त्यांना आशिर्वाद दिला. कामतांची ओळख आधीपासून होतीच. पण तेव्हापासून संबंध अधिक दृढ झाले. 

कामत साहेब अकाली गेले. त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये पोरकेपणाची भावना नक्कीच दाटली असेल. स.का.पाटील आणि मुरली देवरा यांच्यानंतर मुंबईवर पकड असलेला शेवटचा काँग्रेस नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. 

गुरुदास कामत यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


लढणारा संपादक
ज्येष्ठ समाजवादी पत्रकार, संपादक, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, माजी खासदार कुलदीप नय्यर बुधवारी (२२ ऑगस्ट) रात्री आपल्यातून गेले. ९४ वर्षांचं समृद्ध आयुष्य ते जगले. एक साधा वार्ताहर ते संपादक अशी पत्रकारितेत मजल त्यांनी गाठली. पत्रकार आणि राजकीय भाष्यकार म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. आणिबाणी लागू झाल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून सत्तेच्या विरोधात आवाज उठवला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरफदारी केली. सत्तेच्या विरोधात बोलणारा पत्रकार म्हणून त्यांना तेव्हाच्या सरकारने तुरुंगात पाठवलं. कुलदीप नय्यर यांनी जेल भोगली. पण मागे हटले नाहीत. त्यांच्यातला पत्रकार जेलमधून उजळून निघाला. जेलच्या अनुभवावर 'इन जेल' हे त्यांचं पुस्तकही गाजलं. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्यात त्यांचा प्रभाव पडत असे. 'द स्टेटमन' या दिल्लीतून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी दैनिकाच्या संपादकपदी त्यांचं नाव झालं. राजकीय स्तंभलेखक म्हणून त्यांनी जगभरच्या वर्तमानपत्रात स्तंभलेख लिहिले. ८० वर्तमानपत्रात आणि १४ भाषांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. हा विक्रम जगातल्या खूप कमी पत्रकारांच्या नावावर असावा. 

कुलदीप नय्यर मुळचे सियालकोटचे. पंजाब प्रांतातला हा भाग आता पाकिस्तानात आहे. लाहोरला त्यांचं उच्चशिक्षण झालं. फाळणी झाली आणि नय्यर कुटुंब भारतात आलं. फाळणीचं दुःख, दंगली, विद्वेष आणि धार्मिक उन्माद यांच्या झळा सोसलेले कुलदीप नय्यर पक्के सेक्युलर बनले. सेक्युलर विचार ही त्यांची जीवनशैली बनली. फाळणीचं दुःख भोगलेले नायर हे काही एकटे नाहीत. ख्यातनाम अभिनेते सुनिल दत्त, राजकपूर, दिलीपकुमार, न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर, गीतकार गुलजार ही आणि यांच्यासारखी अनेक माणसं फाळणीच्या दुःखाने पोळली पण कडवाहट नाही. उलट सेक्युलर बनली. 

कुलदीप नय्यर यांनी भारत-पाकिस्तान मैत्रीचा ध्यास घेतला होता. त्यासाठी ते सतत कृती कार्यक्रम आखत, प्रयत्न करत. नायर सिद्धहस्त लेखकही होते. त्यांनी जवळपास १५ पुस्तकं लिहिली. 'बियॉण्ड द लाईन्स', 'इंडिया आफ्टर नेहरू', 'ट्रॅजेडी ऑफ पंजाब', शहीद भगतसिंह यांच्या जीवनावरचे 'विदाऊट फिअर' ही त्यांची गाजलेली पुस्तकं. शेवटच्या क्षणापर्यंत ते लिहित आणि काम करत होते. 

आणिबाणीच्या काळात जेल भोगून लढलेला विचारवंत पत्रकार कुलदीप नय्यर यांचं जाणं आजच्या अघोषित आणिबाणीच्या काळात सेक्युलर आणि लोकशाही प्रेमींना चटका लावणारं आहे. त्यांची उणीव जाणवत राहीलच पण अघोषित आणिबाणीच्या विरोधात लढणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

कुलदीप नय्यर यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


विजयी कॅप्टन 
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, पद्मश्री अजित वाडेकर यांच्या निधनाने आपण एका विजयी कॅप्टनला आणि जिंदादिल माणसाला पारखे झालो आहोत. इंग्लंडच्या धर्तीवर भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट सिरीजमध्ये अजित वाडेकर यांनी पहिला विजय मिळवून दिला. आणि ते भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनले. शेवटपर्यंत भारतीयांनी त्यांच्यावर विजयी कॅप्टन म्हणून भरभरुन प्रेम केलं. 

वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकून दिला कपिल देवने. पण त्या विजयाचा पाया अजित वाडेकरांनी इंग्लडला हरवून घातला होता, हे विसरता येणार नाही. 

क्रिकेटसाठी त्यांचं योगदान सर्वांना माहीतच आहे. पण त्यांची सामाजिक जाणीवही तीव्र होती. त्याचं प्रत्यंतर आलं लातूर भूंकपाच्या वेळी. लातूरचा भूकंप हा सर्वांनाच हादरवणारा होता. तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात वाडेकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यानिमित्ताने द्वारकानाथ संझगिरी यांच्यामुळे वाडेकर यांच्याशी जडलेला स्नेह अखेरपर्यंत राहिला.

या महान क्रिकेटपटूला विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


ऑगस्ट महिना आणि दुःखाचा डोंगर 
यंदाचा ऑगस्ट महिना केरळमध्ये दुःखाचा महापूर घेऊन आला. केरळमध्ये लाखो नागरीक बेघर झाले. शेकडो प्राण गेले. देशावर दुःखाचा डोंगर कोसळला. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. त्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं अकाली निधन झालं. ज्येष्ठ समाजवादी पत्रकार कुलदीप नय्यर हेही आपल्याला सोडून गेले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी याच महिन्यात गेले. मेजर कौस्तुभ राणे यांनाही याच महिन्यात वीर मरण आले. दिग्गज क्रिकेटर अजित वाडेकर यांचेही नुकतेच निधन झाले आहे. मराठी नाटकात अमर झालेली मोरुची मावशीची भूमिका करणारे अभिनेते विजय चव्हाण यांचेही अकाली निधन झाले. अशा एक ना अनेक दुःखाच्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागलं. सर्वांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------

कपिल पाटील
(लेखक लोकतांत्रिक जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार आहेत.)