प्रति,
मा. ना. श्री. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा. ना. श्री. रामराजे नाईक निंबाळकर
सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.
मा. ना. श्री. नाना पटोले
अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.
मा. अध्यक्ष
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. त्यासंदर्भात आयोगाने 14 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. मात्र या परिपत्रकाबाबत अनेक विद्यार्थ्यांचे आक्षेप आहेत.
राज्यात जवळपास 2 लाख 70 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक अशा शहरांमध्ये हे सर्व विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येत असतात. डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तेव्हा याच शहरांच्या केंद्रांची निवड नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व विद्यार्थी आपापल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे निवडलेली परीक्षा केंद्रे बदलून स्वतःच्या जिल्ह्यात द्यावीत अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
मात्र 14 ऑगस्टच्या आयोगाच्या परिपत्रकानुसार फक्त पुणे जिल्हा हे केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच महसूल विभागाच्या मुख्यालयातील जिल्हा केंद्र निवडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महसूल विभागातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महसूल मुख्यालयी जिल्ह्यात परीक्षेसाठी यावं लागणार आहे. व पुणे या केंद्राच्या व्यतिरिक्त केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना तर कुठलेच केंद्र बदलून मिळणार नाही. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रवासाला मर्यादा आहेत. जिल्ह्याबाहेर प्रवासावर निर्बंध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे केंद्र निवडण्याचा अधिकार मान्य करणे आवश्यक आहे.
कृपया सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार, विनंतीनुसार आपापल्या किंवा सोयीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्याबाबत आदेश व्हावेत, ही विनंती.
धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, विपस
दिनांक : 15 ऑगस्ट 2020
-------------------------------------------
यासंदर्भात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी, छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि MPSC विद्यार्थी चळवळीत कार्यरत असणारा माझा सहकारी निलेश निंबाळकर याने याबद्दल लिहलेलं खुलं पत्र स्वयंस्पष्ट आहे.विद्यार्थ्यांच्या अडचणी यातून स्पष्ट होत आहेत. ते पत्र पुढील प्रमाणे ...
-------------------------------------------
20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेचे केंद्र बदलून देता येत नाही ही आत्तापर्यंत mpsc ची भूमिका होती. परंतु 14 ऑगस्टला MPSC ने फक्त पुणे केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र बदलून मिळणार ते पण स्वतःचा जिल्हा नाही तर विभागाचे मुख्यालय केंद्र असणार असे परिपत्रक काढले. म्हणजेच केंद्र बदलून देता येतात तर मग सगळ्यांना का नाही व ते पण जिल्हा केंद्र का नाही, फक्त पुणे हेच एकमेव केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हा न्याय का??? याबत मुख्यमंत्री यांना खुले पत्र...
प्रति,
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब.
महाराष्ट्र राज्य
महोदय,
20 सप्टेंबर रोजी M PSC ची राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 2 लाख 70 हजार च्या जवळपास विद्यार्थी बसणार आहेत. हे सर्व विद्यार्थी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक यासारख्या शहरांमध्ये अभ्यास करत असतात. त्यामुळे या मुलांनी नेहमी प्रमाणे ही परीक्षा देण्यासाठी डिसेंबर 2019 मध्ये जाहिरात आली तेव्हा याच केंद्राची निवड केली. परंतु आता कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही सर्व मुले आपल्या आपल्या मूळ गावी गेली आहेत. त्यामुळे MPSC ने परीक्षा केंद्र बदलून द्यावीत, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. ही परीक्षा सर्व 36 जिल्हा केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वतःचा जिल्हा परीक्षा केंद्र म्हणून मिळावा अशी मागणी करत होते. त्या संदर्भात MPSC ने 14 ऑगस्टला प्रसिद्ध पत्रक जरी केले.
त्यानुसार;
(1) पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागाच्या बाहेरील जिल्हा / शहरांमधील कायमस्वरुपी रहिवासाचा पत्ता नमूद असलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली विभागांच्या मुख्यालयाचे (म्हणजे मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती) केंद्र निवडण्याची मुभा देण्यात येत आहे.
(2) प्रस्तुत परीक्षेकरिता पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागांतर्गत असलेल्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्हयांतील कायमस्वरुपी रहिवासाचा पत्ता (Permanent Address) असलेल्या उमेदवारांना जिल्हा केंद्र बदलण्याची मुभा नाही.
(3) वरीलप्रमाणे व्यवस्था कार्यान्वित करण्याकरीता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या
प्रोफाईल द्वारे दिनांक 17 ऑगस्ट, 2020 रोजी दुपारी 14.00 ते दिनांक 19 ऑगस्ट, 2020 रोजी 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना वरीलप्रमाणे महसुली मुख्यालय असलेले जिल्हा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
(4) जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.
(5) प्रत्येक महसुल विभागाच्या मुख्यालयातील जिल्हा केंद्राची कमाल क्षमता लक्षात घेवून "प्रथम येणा-यास प्राधान्य"
(first-apply- first allot) या तत्वानुसार केंद्र निवडण्याची मुभा असेल. संबंधित केंद्राची कमाल क्षमता संपुष्टात आल्यानंतर त्या केंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नाही...
वरील MPSC च्या परिपत्रकाच्या आधारे केंद्र बदलण्याच्या मागणी बाबत काही अन्यायकारक बदल करण्यात आले आहेत;
ते म्हणजे
1) पुणे व्यतिरिक्त परीक्षा केंद्र असणाऱ्यांना केंद्र बदलता येणार नाही. त्यांना तिथे जाऊन परीक्षा द्यावी लागेल उदा: सोलापूरच्या विद्यार्थ्यांने नागपूर परीक्षा केंद्र असेल तर त्याला परीक्षा द्यायला नागपूरला जावे लागेल.
2) केंद्र बदल्यण्याची मुभा फक्त पुणे जिल्हा हे केंद्र असणाऱ्यांच देण्यात आली आहे. हा इतर जिल्हा केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय आहे व प्रादेशिक भेदभाव करणारा आहे.
3)पुणे केंद्राची क्षमता ही 40 हजार आहे तर त्यापैकी अंदाजे 20 ते 25 हजार उमेदवार हे पुणे विभागातीलच असतील.
राहिले फक्त 15 ते 20 हजार उमेदवार. त्यांना सुध्दा फक्त विभागीय ठिकाणी केंद्र बदलून भेटणार, जिल्हा केंद्र नाहीच.
म्हणजे प्रवास आलाच. फक्त पुणे केंद्रावरील उमेदवारांना केंद्र बदल म्हणजे 2.75 लाख उमेदवारांमधील अंदाजे 15 ते 20 हजार लोकांना याचा फायदा बाकी जणांचा काय ?
4) मराठवाडा आणि विदर्भातील काही उमेदवारांनी पुण्यात असताना केंद्र निवडताना पुणे केंद्राची 40 हजाराची क्षमता संपली या कारणाने पुणे शेजारील सातारा, नगर, नाशिक सोलापूर, सांगली या ठिकाणी परीक्षा केंद्र निवडलेले. त्यांच्या बाबतीत आयोगाने काहीच सूचना दिली नाही
5) कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा यांना सुद्धा पुणे विभागीय केंद्र 250 ते 300 km आहे, हे विसरून चालणार नाही. तसेच पुण्यातील कोरोनाचा धोका वेगळाच. तसेच बाकी जिल्ह्यांना सुद्धा त्यांचे विभागीय केंद्र दूरचे आहेत. म्हणजे उमेदवारांना प्रवास करावाच लागणार आहे.
6) ज्यांनी मुंबई, औरंगाबाद, नाशिक असे केंद्र निवडले आहेत त्यांचं काय??? महाराष्ट्रत विविध जिल्ह्यातील कितीतरी विद्यार्थी SIAC मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती इत्यादी जागी महाराष्ट्र सरकारच्या स्पर्धा परीक्षाची तयारी करून घेणारे Institute आहेत, त्या ठिकाणी येत असतात आणि ते विद्यार्थी तीच शहरे परीक्षा केंद्र म्हणून निवडतात. असे कितीतरी विद्यार्थी आहेत... त्यांचा आयोगाने विचार केलाय का?? फक्त पुणे मध्येच स्पर्धा परीक्षेची तयारी केल्या जाते असं आयोगाला किंवा इतरांना वाटत का??
द्यायचे तर सर्वांना बदलून द्या...
7) जर पुणे केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र बदलून देता येते तर इतरांना का नाही, तरी कोरोना महामारीत सरसकट केंद्र बदलून स्वतःच्या जिल्हा ठिकाणी परीक्षा केंद्र द्यावेत, ही नम्र विनंती.
निलेश निंबाळकर
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
(9960255114)