Sunday, 18 September 2022

आपला तो 'भाऊ', 'बळी' कुणाचा?



ही गोष्ट आहे, तुमच्याच सोसायटीची आणि तुम्हाला नको असतानाही तुमच्या समोर असलेल्या जिजामाता नगर झोपडपट्टीची. मध्यमवर्गीय माणसाला झोपडपट्टी घाण वाटते. विशेषतः उच्चभ्रू वर्गाला. पण त्याच वस्तीतली मोलकरणी बाई, दूधवाला, वॉचमन, पेपरवाला, गाडी धुणारा या सगळ्यांच्या सेवा त्याला हव्या असतात. त्यांना प्रतिष्ठा देणं बाजूला राहिलं पण त्यांना माणूस म्हणून वागवण्याची तयारी सुद्धा नसते.

महानगरांच्या सोसायट्यांमध्ये आणि वस्त्यांमध्ये जात हरवते म्हणतात. पण ते तितकंसं खरं नसतं. पोटात वर्गभेद असतो आणि डोक्यात न जाणारी जात असते. त्यांच्या संघर्षाची गोष्ट आहे. 'भाऊबळी'.

गोष्ट गंभीर आहे. पण सिनेमा धमाल आहे. सिनेमा पाहताना आपण पोटभरून हसतो. आणि सिनेमा संपताना डोळे झाक केलेली जखम मनात ठसठसत राहते.

कथा, पटकथा अर्थात जयंत पवार यांची आहे. डायलॉगही त्यांचेच आहेत. 'सहाशे बहात्तर रुपयांचा सवाल' अर्थात युद्ध आमुचे सुरू या मूळ कथेवर बेतलेला हा सिनेमा. जयंत ताकदीचा नाटककार, सिनेमा लेखक, कथाकार.  आता आपल्यात नाही. कोविडच्या काळातच जयंत पवारचा कॅन्सरने घास घेतला. त्याचे दोन सिनेमे आधी येऊन गेले आहेत. त्यातला एक 'लालबाग परळ' महेश मांजरेकरने दिग्दर्शित केलेला. आधीच्या दोन चित्रपटांनी जयंत पवारला जो न्याय दिला नाही, तो 'भाऊबळी' ने दिला आहे. म्हणजे त्यांच्या कथांचा जो उद्देश असतो तो कथापटात आणि चित्रपटात साकारला जातोच असं नाही. नितीन वैद्य यांनी मात्र जयंत पवार यांना पुरेपुर न्याय दिला आहे. नितीन वैद्य यांची दृष्टी आणि समीर पाटील यांचं दिग्दर्शन, यामुळे सिनेमा थेट वर्तमानाला भिडतो. वर्तमानातल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर कडक भाष्य करतो. एक काळ होता मध्यमवर्गाला गरीबाबद्दल करुणा होती, आता त्याची जागा क्रौर्याने घेतली आहे. एक काळ त्याला समाजवादाचं स्वप्न पडत होतं आता फॅसिस्ट कवायतखोरांचं त्याला आकर्षण आहे.

नितीन वैद्य हे स्वतः एक प्रतिभावान पण तितकेच संवेदनशील त्याहूनही सामाजिक बांधिलकी जपणारे सिने निर्माते आहेत. पण तरीही आपली कोणतीही कलाकृती प्रचारकी होणार नाही याचं भान ते राखतात. प्रचारकी थाट हा कोणत्याही कलाकृतीला मारतो.

निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांच्यासह नितीन वैद्य यांनी जी भट्टी जमवली आहे, त्यातून तयार झालेला 'भाऊबळी' हा थेट सिनेमागृहात जाऊन पहायला हवा. १६ सप्टेंबर पासून तो सिनेमागृहात लागला आहे. परवा काही मित्रांना, सहहृदांना नितीन वैद्य यांनी सिनेमा पाहायला बोलावलं होतं. आम्ही सहकुटुंब गेलो होतो. तुम्हीही सहकुटुंब जायला हवं. तरच सिनेमाचा आनंद घेता येईल.

या सिनेमावर बऱ्याच जणांनी भरभरून लिहलं आहे. त्यातल्या दोन प्रतिक्रिया द्यायला हव्यात. मंदार भारदेची पोस्ट सिनेमावर आणि वर्तमानावर भाष्य करणारी आहे. म्हणून इथे जशीच्या तशी देतो -
(सविस्तर वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा)


नितीन वैद्य यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील टीव्ही मालिका गाजवल्या आहेत. पण त्यांची बांधिलकी कथावस्तू निवडण्यापुरती नाही. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नितीन वैद्य. त्यांच्यातल्या माणूसपणाबद्दल संध्या नरे पवार काय म्हणतात तेही वाचायला हवं. संध्या नरे म्हणजे जयंत पवारांच्या सहचारिणी. सावंतवाडी येथे पार पडलेल्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा. त्यांची पोस्ट अनकट पुढे वाचा -
(सविस्तर वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा)


आणखी एका कारणासाठी हा सिनेमा पाहायला हवा. नव्या पिढीने डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा 'सामना' पाहिला नसेल. सामनातला अभिनयाचा सामना. 'भाऊबळी' पाहताना उच्चभ्रू सोसायटीतल्या भाऊसाहेबाची भूमिका वठवणाऱ्या चाणक्य फेम मनोज जोशींनी डॉ. लागूंची आठवण करून दिली. आणि जिजाबाई नगर झोपडपट्टीतला दूधवाला बळी साकारला आहे किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांनी निळू फुलेंची. काय कमाल अभिनय आहे. तितकाच संयत आणि मनाचा ठाव घेणारा अभिनय किशोर कदमच करू जाणे. मनोज जोशी आणि किशोर कदम यांची जुगलबंदी सिनेमाघरात प्रत्यक्ष जाऊन पाहायला हवी. रसिका आगाशे, संतोष पवार, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी यांच्या धमाल भूमिकांचं कौतुक केलं नाही तर कृतघ्नपणा ठरेल. आपल्या भूमिकांमध्ये त्या सगळ्यांनी जीव ओतला आहे.

नुकताच हिंदी दिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने नसरुद्दीन शहा यांनी मंगलेश डबराल यांची कविता BBC हिंदी साठी सादर केली. 'भाऊबळी' बद्दल वाचताना ती कविता जरूर ऐका. भाऊबळी आणि ती कविता वर्तमानावर सारखंच भाष्य करतात. एक जळजळीत कवितेसारखा सिनेमा.  दुसरी भवतालच्या वर्तमानाची सिनेमासारखी कविता.
(व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा)


- कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद)