Wednesday, 3 May 2023

... म्हणून महाराष्ट्र शाहीर प्रत्येकाने पाहायला हवा

 




'महाराष्ट्र शाहीर' अप्रतिम चित्रपट. प्रत्येक मराठी माणसाने पाहायला हवा. ही केवळ शाहीर साबळेंची गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या शाहीरी परंपरेची ही गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या लोकसंगीत, लोककला आणि लोकसंस्कृतीची लोकधारा आहे. स्वातंत्र्य चळवळीतल्या शाहीरी योगदानाची कथा आहे. साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहात आणि अस्पृश्यता निर्मूलनात महाराष्ट्र शाहीरांनी दिलेल्या योगदानाची कथा आहे.

जेमतेम सातवी पर्यंत पोचलेल्या पण गाण्याचं वेड लागलेल्या एका मुलाने घरातल्या आग्रहाखातर गाणं सोडलं. पण साने गुरुजींनी "गाणं हा तुझा श्वास आहे, तो तू मोकळेपणाने घे." असं त्या मुलाला सांगितलं. आणि महाराष्ट्राला महाराष्ट्र शाहीर मिळाला.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत आपल्या शाहीरीने महाराष्ट्र पेटवणाऱ्या या शाहीराला यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रचाराला बोलावलं, तेव्हा शाहीर साबळे यांनी त्यांना ठामपणे नकार दिला. मराठी माणसाच्या अन्यायावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या मोहिमेला साथ देण्यासाठी 'आंधळं दळतंय' या लोकनाट्याचा धडाका शाहीर साबळेंनी लावला. पण त्याच शिवसेनेला हिंसाचारी वळण लागल्यावर शाहीर त्यापासून अलिप्त झाले.

'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राजा बढेंचं गीत आज महाराष्ट्र गीत बनलंय. तेही शाहीर साबळे यांच्या आवाजातूनच. त्या गाण्याच्या सगळ्या ओळी शाहीर साबळेंनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. दारिद्र्याशी संघर्ष केला. देशासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी, समतेच्या चळवळीसाठी तितक्याच ठामपणे ते उतरले. महाराष्ट्र विरोधकांना यमुनेचं पाणी पाजलं. त्यांच्या शाहीरीतून अवघा सह्याद्री गरजला. विचाराने ते पक्के समाजवादी होते.

शाहीर साबळेंनी आपल्या गावात पसरणी (तालुका वाई) येथे मंदिर प्रवेश सत्याग्रह केला तेव्हा साने गुरुजींना बोलवलं होतं. साने गुरुजींसोबत सेनापती बापट, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील आले होते. महाराष्ट्र ज्यांच्या ज्यांच्या मुळे घडला अशी ही मोठी माणसं होती. शाहीर साबळे तेव्हा लहान होते. पण आता ते त्याच रांगेत जाऊन बसले आहेत. सह्याद्रीच्या कातळावर कृष्णराव साबळेंनी आपल्या शाहीरीने अभिमानाची लेणी कोरली.

'महाराष्ट्र शाहीर' हा शाहीर साबळेंचा बायोपिक. पण कुठेही तो डॉक्युमेंटरी बनला नाही. त्यात नाट्य आहे. एंटरटेनमेंट आहे. सिनेमाचा सगळा मसाला आहे. एखादी म्युझिकल नाईट पहावी तसा हा चित्रपट आहे. शाहीर साबळेंच्या सगळ्या गाण्यांचा मनमुराद आनंद घेत पहावा. मराठी चित्रपट असूनही प्रोडक्शनच्या खर्चात केदार शिंदेने जरा सुद्धा कंजूषी केलेली नाही. अफलातून पिक्चर आहे. थेटरात जाऊन बघण्या सारखा.

अंकुश चौधरीने लाजवाब काम केलंय. शाहीर साबळेंच्या भूमिकेचं बेरिंग अतिशय चांगलं पकडलंय. शाहिरांची पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका सना शिंदेंने समर्थपणे निभावली आहे. ‘संगीत देवबाभळी’ या नाटकातून कसदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या शुभांगी सदावर्ते यांनी शाहीर साबळे यांची आई लक्ष्मीबाई साबळे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे. शाहिरांची दुसरी पत्नी राधाबाई साबळे यांची भूमिका  अश्विनी महांगडे यांनी तितक्याच ताकदीने निभावली आहे. छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता अमित डोलावत याने साने गुरुजींची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. शाहिरांच्या आजीची भूमिका निर्मिती सावंत यांनी निभावली आहे. सर्वच कलाकारांची कामं चांगली आहेत. आणि अर्थात केदार शिंदेंचं दिग्दर्शन व अजय अतुलचं संगीत जोरदार.

मराठी भाषा, कला आणि संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने 'महाराष्ट्र शाहीर' पहायला हवा. 
- कपिल पाटील