Sunday, 2 October 2016

मराठ्यांचा आक्रोश कशासाठी?



संविधानातला हक्क मागणाऱ्यांना जातीयवादी कसं ठरवणार?

लाखांचे विक्रम मोडत जिल्ह्याजिल्ह्यात निघणारे  मराठ्यांचे मोर्चे कुणाला भीती घालण्यासाठी नाहीत. दलितविरोधी प्रतिमा आरक्षणाच्या मार्गात येईल याचं व्यावहारिक शहाणपण तरुण नेतृत्वाला आहे. ते दलितांच्या विरोधात नाहीत. ते ओबीसींचा वाटा मागत नाहीत. ते मुख्यमंत्र्यांची खुर्ची मागत नाहीत. या मोर्चात चालणारी तरुण मुलं, मुली गेल्या २० वर्षातली शेतकऱ्यांची भयावह कोंडी फोडू मागतो आहे. शेतीच्या उद्ध्वस्ततेतून तो बाहेर पडू मागतो आहे. प्रस्थापितांच्या सत्ता, संपत्ती आणि शिक्षणाच्या मक्तेदारीला तो आव्हान देऊ मागत आहे. फुलेंच्या विचारांशी नातं सांगत प्रतिगामी विचारांना नकार देत आहे.
----------------------------------- 

रांझेच्या पाटलाचे छत्रपती शिवरायांनी हातपाय तोडले होते. स्त्रीची अब्रू घेतली म्हणून. छत्रपती ना पक्षपात करत होते, ना जातीभेद मानत होते. माणुसकीला काळिमा फासणारा अत्याचार खैरलांजीत झाला. अत्याचार करणारे मराठा नव्हते. बिहारमध्ये रणवीर सेनेचा अजून धाक आहे. महाराष्ट्रात आदिवासींची उभी पिकं कापून नेणारी सेना मराठ्यांनी कधीच बांधली नाही.

प्रत्येक पाटील मराठा नसतो. प्रत्येक मराठा हा सरंजामदार किंवा अत्याचार करणारा नसतो. लाखोंनी निघणाऱ्या मराठ्यांच्या मोर्चातला मूक आक्रोश मराठ्यांना नाहक आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका हे सांगण्यासाठीसुद्धा आहे.

कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार निर्दय निर्मम होता. गेल्या २० वर्षात आर्थिक धोरणांनी शेतीतून उठलेल्या शेतकरी समाजाला कोपर्डीची जखम फार लागली आहे. ना शिक्षणाची संधी, ना नोकरीची संधी याने आधीच वैफल्यग्रस्त झालेला आणि सततच्या दुष्काळाने आत्महत्त्यांच्या खाईत लोटलेल्या या समाजाला आता आपली लेकही सुरक्षित नाही हे जास्त लागलं आहे. गावात प्रतिष्ठा आणि अहंकाराच्या कोशात असलेल्या समाजासाठी हा मोठा धक्का होता. औरंगाबाद मोर्चात पुढे असलेली अ‍ॅड. स्वाती नखाते म्हणाली तसं, आजवर टाईट असलेली कॉलर गळून पडली म्हणून. 

यशवंतरावांचे योगदान
यशवंतराव चव्हाणांनी सहकार आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण या दोन पायावर महाराष्ट्राचा विकास उभा केला. या विकासाचा वाटा आणि नेतृत्व अर्थातच मराठा समाजाकडे होतं. ग्रामीण भागातला तो नेणता, जाणता आणि संख्येनेही मोठा समाज असल्याने सत्तेवरही त्याची अवचित पकड आली. ‘फुले, शाहू, आंबेडकर’ ही घोषणाही यशवंतरावांचीच. ती केवळ जातींची बेरीज नव्हती. या घोषणेने मराठी ऐक्य साधण्यात त्यांनी यश मिळवलं. यशवंतरावांचं विकेंद्रित समन्यायी विकासाचं मॉडेल याच विचारांवर उभं होतं. मात्र खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा उघड पुरस्कार करत ते नव्वदीनंतरच्या त्यांच्या अनुयायांनीच मोडून काढलं. त्याचा सर्वात मोठा फटका शेतकरी समाजाला अर्थातच मराठा समाजाला बसला.

गेल्या पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी कळस गाठला. शेतीचा हा पेचप्रसंग केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या समाजांमध्ये त्यामुळे प्रचंड खळबळ सुरू आहे. १९९०-९१ साली महाराष्ट्रात पिकाखालील जमीन खातेदारांची संख्या ९४ लाख ७० हजार इतकी होती. २०१३-१४ ला ती संख्या १ कोटी ३६ लाख ९८ हजार इतकी झाली. याचा अर्थ जमीन मालकी असणाऱ्या खातेदारांची संख्या जवळपास ५० टक्क्यांनी वाढली. पण पिकाखालील क्षेत्र १२.५० लाख हेक्टर्सने कमी झालं. जमीन मालकी असणाऱ्या खातेदारांची खातेफोड झाली. त्यामुळे जमीन मालकी सरासरी ३३ टक्के इतकी घटली. ७८.६ टक्के शेतकरी हे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन धारणा असलेले अल्प भूधारक आहेत. एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अत्यल्प भूधारकांची संख्या ६७ लाख आहे. मराठा समाजातील ९० टक्के समाज या वर्गात येतो. हातातून शेती निसटणारा, शेतीतून बाहेर फेकला जाणारा मराठा शेतकरी आणि इतर मागासवर्ग यांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि म्हणून सामाजिक स्थितीतही आता फरक उरलेला नाही. 

निसटलेली सत्ता
ऊस तोडणी मजुरांमध्ये ३० टक्के मराठा आहे. मुंबईकर डबेवालाही जातिवंत मराठाच आहे. माथाडी कामगारांमध्ये ८० टक्के मराठा आहे. गावात कधी काळी सामाजिक पत मिरवणाऱ्या ताठ पाठी या ओझ्याने वाकून कैक दशकं झाली आहेत. ही गोष्ट खरी आहे की मराठा आमदारांची संख्या मोठी आहे. पण त्याचं कारण त्यांच्या बहुसंख्येत आहे. मंडल अहवालाच्या अंमलबजावणीनंतर गावातली आणि जिल्ह्यातली सत्ता त्यांच्या हातून निसटली. त्या सत्तेत आता निम्म्याहून अधिक वाटेकरी आले आहेत. ओबीसींना वर्षानुवर्षे नाकारलेला वाटा मंडलने मिळवून दिला. पण निम्मी सत्ता अजून मराठ्यांच्या ताब्यात आहे एवढ्यावरून आज विपन्न अवस्थेत असलेल्या समाजाची मागणी नाकारली जात असेल तर तो अन्याय ठरेल. शेतीतून उद्ध्वस्त झालेला हा समाज शिक्षणात आणि नोकरीत मागे आहे. सत्तेच्या प्रशासनात कालपर्यंत ब्राह्मणांबरोबरच्या स्पर्धेत तो खूप मागे होता. आता तो दलित, ओबीसींशी तुलना करू मागतो आहे. संविधानातल्या आरक्षणाच्या तरतुदींमुळे दलित, ओबीसींना ज्या संधी उपलब्ध झाल्या त्या संधींसाठी तोही आरक्षण मागतो आहे.

पंचवीस वर्षांपूर्वी गुजरातच्या पाठोपाठ माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाच्या विरोधात संघर्षाचा पवित्रा घेतला होता. २५ वर्षात पाणी वाहून गेलं. आता अण्णासाहेबांचे चिरंजीव आमदार नरेंद्र पाटील मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे आहेत. मराठा समाजातलं नवं विचारी नेतृत्व गेल्या पंधरा वर्षात उभं राहिलं आहे. ज्ञानेश महाराव, प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे यांनी गेली काही वर्षे अव्याहत प्रबोधनाची मोहीम चालवली. फुले, शाहू, आंबेडकरांशी नाळ सांगत आरक्षण विरोध संपवला. आरक्षणाच्या मागणीपर्यंत मराठा समाजाला आणून ठेवलं. ही फक्त चार, पाच नावं नाहीत. राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ अधिकारी पदावर पोचलेली अशी अनेक नावं आहेत, त्यांनी सेवा संघाच्या माध्यमातून या प्रबोधनात मोठा वाटा उचलला आहे. या सगळ्यांनी मराठा समाजाचं भगवेकरण रोखलं. कॉ. शरद पाटील, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. आ. ह. साळुंखे, न्या. प. बा. सावंत यांचं साहित्य वाचायला शिकवलं. त्यातूनच विशाल कदम, स्वाती नखाते, कैलास म्हापदी, भैय्या पाटील, स्वप्नील भुमरे यांच्यासारखे तरुण उभे राहिले आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात अशी मुलं आहेत. ती नवा विचार करत आहेत.

गांधी विचाराचं प्रगट दर्शन
मराठा समाजाच्या मूक मोर्चांचं, त्यातल्या संयमाचं कौतुक होत आहे. पण त्यामागे अनेकांचं योगदान आहे. गुजरातमधल्या पाटीदारांचं आंदोलन हिंसक होतं. राजस्थान, हरयाणातल्या गुजर अन् जाटांच्या आंदोलनात जाळपोळ झाली होती. मराठा समाजाच्या आंदोलनात ना जाळपोळ आहे, ना हिंसक घोषणा. त्याहून मोठी गोष्ट ती त्यातल्या महिलांच्या सहभागाची. विध्यांच्या पलीकडे शेतकरी समाजातल्या प्रत्येक आंदोलनापासून त्या समाजाची स्त्री खूप दूर आहे. महाराष्ट्रात मात्र ती मोर्चाचं नेतृत्व करते आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांनी गांधी विचार आणि मार्गाचा जो राजकीय वारसा दिला, त्याचं प्रगट दर्शन मराठा मोर्चातून होत आहे. मराठा मोर्चाला हिणवणारे आणि त्याबद्दल अकारण भीती दाखवणारे गांधींचा द्वेष करणारे आहेत, हे वास्तवही अधोरेखित केलं पाहिजे.

या मोर्चांचं आणखी वैशिष्ट्य हे की, त्यांनी कोपर्डीच्या घटनेचा संदर्भ असूनही या आंदोलनाला दलितविरोधी होऊ दिलेलं नाही. अ‍ॅट्रॉसिटीच्या संदर्भात मागणी जरूर आहे. पण ती त्या कायद्याचा गैरवापर होऊ देऊ नका, एवढीच मर्यादेत. या आंदोलनाची पहिली ठिणगी टाकणारे संजीव भोर पाटील यांनी स्वत: वारंवार त्याचा खुलासा केला आहे. अहमदनगरच्या मोर्चात कोपर्डीबद्दलचा क्षोभ व्यक्त करतानाच अन्य समाजातील स्त्रियांवरील अत्याचारांबाबतही आमची संवेदना तीच आहे, असे सांगायला मुली विसरल्या नाहीत.

प्रकाश आंबेडकरांचं स्वागत
या मोर्चांचं नेमकं आकलन फक्त प्रकाश आंबेडकर यांना झालं. भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले रामदास आठवले यांनी ‘...खून बहे तो बहेने दो’, अशी भडकावू भाषा केली. पण ही भाषा म्हणजे संघ विचाराचा डाव आहे, असा स्पष्ट आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी प्रतिमोर्चांना विरोध केला. संविधानानुसार मराठा समाजाला त्यांच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. हे मोर्चे दलितविरोधी नाहीत; सरकारविरोधी आहेत, हे त्यांनी सांगून टाकलं. गेल्यावर्षी पुण्यात गांधी के बचाव में आंबेडकर मैदान में, अशी घोषणा देणारे प्रकाश आंबेडकर यांची ही भूमिका स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्यासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मीडियावर म्हणून मराठा समाजातून त्यांच्यावर स्वागताचा पाऊस पडला.

खरा प्रश्न आहे तो मराठा समाजाच्या आरक्षण द्यायचं कसं? आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी आरक्षण विरोधकांकडून केली जाते. ती फसवी आहे. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणांची नव्हे आर्थिक मदतीची गरज असते. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानात नाही. संविधानातील कलम ३४० नुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग कोण? हे ठरवण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगाला आहे. तर १६ (४) नुसार नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागासवर्गाला पर्याप्त प्रतिनिधित्व नाही अशा वर्गाकरता आरक्षणाची तरतूद करता येते. मंडल आयोगाच्या शिफारशींनंतर ओबीसींच्या अभ्युदयाचा मार्ग मोकळा झाला. मंडलच्या शिफारशीनुसार कर्नाटकात आणि मध्य प्रदेशात मराठा समाजाला आरक्षण मिळतं. महाराष्ट्रात कुणबी आणि कुणबी मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती मिळतात. मराठा समाजाची मुख्य मागणी याच आरक्षणाच्या विस्ताराची आहे. अडचण आणि संघर्ष इथेच आहे. मराठा समाजाला अधिकचा वाटा देताना ओबीसींच्या सवलती काढून घेतल्या जातील अशी भीती दाखवली जाते. कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेता येत नाही.

मराठा समाजाला आणखी १५ ते १६ टक्के आरक्षण द्यायचं असेल तर ते कसं देणार? ओबीसींच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल. भटक्या - विमुक्तांमध्ये जसं अ, ब, क, ड करण्यात आलं तोच मार्ग अवलंबता येईल. मराठ्यांसाठी जे अधिक आरक्षण करावे लागेल त्याला राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१ (क) नुसार नवव्या अनुसूचीमध्ये घटना दुरुस्ती करून संरक्षण मिळवता येईल. या अनुसूचीत एकदा समावेश केला की त्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार आहे. त्यांची इच्छा असेल तर त्यांना हे करता येईल. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक आरक्षण आहेच. हा प्रश्न मागच्या सरकारने भिजत ठेवला. मी स्वत: विधान परिषदेत १८ एप्रिल २०१३ रोजी मराठा आरक्षणावरील चर्चेत तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, ही मागणी केली होती. पण पृथ्वीराज चव्हाण सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि घटनात्मक आधार नसलेली राणे समिती नेमली. त्यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत पडला. नवं सरकारही ती हिंमत दाखवत नाही.

प्रस्थापितांच्या शोषणाचा मराठा पहिला बळी
मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे की नाही? हे ठरवण्याचा मुद्दा फक्त बाकी राहतो. विदर्भ आणि खान्देशातील कुणबी ओबीसींमध्ये समाविष्ट आहेत. कोकणातला कुणबी हा पूर्णपणे वेगळा गट आहे. अति मागास आणि निम अस्पृश्यता वाट्याला आलेला असा हा गट आहे. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातल्या बाकी मराठ्यांची स्थिती आज नेमकी काय आहे? शैक्षणिकदृष्ट्या तो मागासलेला आहे. विद्यार्थ्यांची गळती खूप मोठी आहे. आरक्षण नाही आणि पैशामुळे पुढे शिकताही येत नाही. शिक्षणाच्या खासगीकरणाने आणि व्यापारीकरणाने उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून मराठा समाज कधीच फेकला गेला आहे. उद्ध्वस्त शेतीमुळे तो कंगाल बनला आहे. अल्प भूधारक आणि हातावर पोट भरणारा वर्ग मोठा आहे. त्याची सामाजिक पत काय आहे? प्रस्थापित वर्गाशी त्याचा फक्त रोटी व्यवहार आहे. बेटी व्यवहार होत नाही. कर्जबाजारीप्रमाणामुळे आत्महत्त्या करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याच्या पाठोपाठ वाताहत झालेल्या कुटुंबांची संख्या आता लाखाहून अधिक आहे. मराठा समाजाचं हे वास्तव केवळ जातीच्या उतरंडीवर तो कधीकाळी वर होता एवढ्यासाठी त्याला आरक्षणापासून दूर ठेवू शकणार नाही. साखरसम्राट, शिक्षणसम्राट, गुत्तेदार, आमदार, खासदार आणि झेडपीतील प्रस्थापित यांच्याकडे पाहून वंचित मराठा समाजाला न्याय नाकारता येणार नाही. या प्रस्थापितांच्या शोषणाचा तर तो पहिला बळी आहे.

कुणबी आणि मराठे हे वेगळे नाहीत. (कोकणातला कुणबी वगळून.) देशातलं पहिलं आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली लागू केलं. ब्राह्मण, कायस्थ, शेणवी आणि तत्सम उच्च जाती वगळून सर्वांना त्यांनी पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं. शाहू महाराज छत्रपती होते. परंतु त्यांच्या संस्थानात मराठा समाजालाही पर्याप्त प्रतिनिधित्व नव्हतं. म्हणून मराठ्यांसह सर्वच मागासवर्गीयांना त्यांनी आरक्षण दिलं. 

पंजाबराव देशमुखांचं विदर्भातल्या कुणव्यांनी ऐकलं म्हणून त्यांना आरक्षण मिळालं. सातवाहनांच्या साडेचारशे वर्षांच्या राजवटीत प्रशासनात महारट्ट म्हणून सामिल झाले म्हणून मराठे झाले, एरवी सारे कुणबीच. सदानंद मोरे म्हणतात, हातात तलावर असेल तेव्हा मराठा, नांगर असेल तेव्हा कुणबी. खुद्द छत्रपती शिवरायांना पुरोहित वर्गाने क्षत्रियत्व नाकारलं. अफजल खानाने छत्रपतींना ‘कुणब्यांचा छोरा’ म्हणून हिणवलं. छत्रपती शाहूंना ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्र नाकारले. बरे देवा कुणबी केलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. कुळवाडी कुणबी शेतकऱ्यांची कैफियत महात्मा फुलेंनी ब्रिटिश सरकारपुढे मांडली. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीच्या विरोधात शेठजी, भटजींच्या विरोधात आसूड ओढला. ब्रिटिश साम्राज्याच्या राजपुत्राला शेतकऱ्याचं पागोटं नेसून म. फुले भेटायला गेले होते. ते पागोटं आता फाटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठ्यांचा आक्रोश प्रस्थापितांच्या विरोधात आहे. प्रकाश आंबडेकर म्हणतात, मोर्चे सरकारच्या विरोधात आहेत. अस्वस्थ मराठा समाज प्रस्थापितांच्या विरोधात आहेच. म्हणून त्यांनी मोर्चात त्यांना पुढे येऊ दिलं नाही. पाठी चालायला भाग पाडलं. पण मोर्चातला क्षोभ सरकारविरुद्ध अधिक आहे. या सरकारने त्यासाठी खूप कारणं दिली आहेत. कोपर्डीची चार्जशीट अजून बनलेली नाही. सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्याला जगवणाऱ्या सहकारी क्षेत्रावर घाव घातला. सहकारी कारखाने, बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्या सर्वच अडचणीत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेवरच हल्ला झाला आहे.

शिक्षणसंस्थांवरचा हल्ला
या सरकारने दुसरा हल्ला चढवलाय तो शिक्षण संस्थांवर. गेल्या वीस वर्षांत शिक्षणसम्राटांनी काढलेली दुकानं सोडून द्या. त्यांना सरकारने हात लावलेला नाही. पण महाराष्ट्राला शिकवलं ते गांधी, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी उभ्या राहिलेल्या शिक्षण संस्थांनी. कर्मवारी भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बापूजी साळुंखे यांनी या संस्था उभ्या केल्या आहेत. रयतेने उभ्या केलेल्या संस्थांना चोर ठरवलं जात आहे. शिक्षकांना रोज अवमानित केलं जात आहे. अनुदानित शाळांमध्ये शिक्षक उरणार नाहीत आणि विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना अनुदान मिळणार नाही, अशा दुहेरी संकटात महाराष्ट्राचं शिक्षण सापडलं आहे. राज्याचे शिक्षणमंत्री तर आता गणित आणि इंग्रजीला पर्याय देऊ म्हणतात. इंग्रजी ही जगाची भाषा. गणित ही विज्ञानाची, बाजाराची भाषा. तीच बहुजनांच्या मुलांना येणार नाही, अशी व्यवस्था केल्यानंतर असंतोषाचा भडका उडणार नाही तर काय? 

बळीराजा विपन्नतेच्या पाताळात लोटला जात असताना सरकार पक्षाचे अध्यक्ष वामन जयंतीच्या शुभेच्छा देतात, तेव्हा नांगराचा फाळ जमिनीत नाही, सरकारविरोधातच उगारला जाणार.

खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यामुळे उद्ध्वस्त झालेले जगभरातले समूह हिंसेचा आश्रय घेत असताना महाराष्ट्रातला हा मोठा समाज गांधींच्या मार्गाने आंबेडकरांच्या संविधानातला हक्क मागत असेल तर त्याला जातीयवादी ठरवायचं की त्याचं स्वागत करायचं?

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि  लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी - लोकमत, मंथन रविवार दि. २ ऑक्टोबर २०१६

Wednesday, 28 September 2016

मुख्यमंत्री, बळीराजाचं ऐकाल काय?


मोर्चे थांबत नाहीत. पण त्यात घोषणा नाहीत. आवाज नाही. मोर्चे लाखा-लाखांच्या संख्येने निघताहेत. पण त्यात हिंसेचा लवलेश नाही. मोर्चे झुंडी-झुंडीने येत आहेत. पण त्यात झुंडशाहीला शिरकाव नाही. जमावाला शिस्त नसते म्हणतात, इथे नेत्याशिवाय जमाव अथांग आहे. पण बेशिस्तीला जागा नाही. एरव्ही मोर्चानंतर कचरा किती पसरलेला असतो. इथे कचर्‍याचा मागमूस नाही. मोर्चा जितका मोठा तितकी मोर्चात बाईला जागा कमी असते. इथे आया-बहिणींचा महासागर लोटला आहे. मनात त्यांच्या भितीचा लवलेश नाही. कोपर्डीचं दु:ख उरात आहे. मनात संताप दाटून आहे. पण द्वेषाला त्यात जागा नाही.

कोपर्डीच्या अमानुष घटनेनंतर महिन्याने मोर्चा निघाला. तेव्हा किती नावं ठेवली गेली. मोर्च्यातल्या मागणीवरून प्रश्न केले गेले. शंका उपस्थित केल्या गेल्या. काही चॅनेल्सनी तर मोर्चा तुमच्या विरोधात आहे का? तुम्हांला त्याची भीती वाटते का? असेही प्रश्न करून पाहिले. पण खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच हस्तक्षेप केल्यानंतर भितीचा बागुलबुवा उडून गेला.

मोर्चा दलित विरोधी आहे काय? ओबीसी विरोधी आहे काय? मुख्यमंत्री विरोधी आहे काय? सगळे फाटे फोडून झाले. एका पाठोपाठ निघणार्‍या मोर्चांनी सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन टाकली आहेत. अॅट्रॉसिटीच्या मागणीवरूनही भडकवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही फक्त गैरवापर थांबवा म्हणतो आहोत. दुसर्‍याच्या वाट्यातलं आरक्षण मागतो म्हणून आरोप झाला. आम्ही हिस्सेदारी नाही, आमचा अधिकार मागतो आहोत. आमच्या मुलांचं भविष्य सुनिश्‍चित करू मागतो आहोत. मोर्चेकरांच्या या उत्तरांनी भडकवणार्‍यांचे मनसुबे पराभूत झाले. आरोप झाले तरी कुणी अंगावर जात नाही. समुद्रात फेकलेला दगड कुठे गडप होतो पत्ता लागत नाही. तरंगही उठत नाही. फेकलेल्या आरोपांचे दगड संयमाच्या जनसागराने गिळून टाकले.

हे सारं विलक्षण आहे. अभूतपूर्व आहे. महात्माजींच्या अहिंसक सामुदायिक सत्याग्रहाचा असा प्रत्यय स्वातंत्र्योत्तर काळात क्वचितच दिसला असेल. एका नाही, प्रत्येक मोर्चातलं हे दर्शन आहे. एका मागोमाग मोर्चे निघताहेत. अतिप्रचंड संख्येने निघाताहेत. आपल्या ताकदीचं विराट दर्शन घडवताहेत. पण मोर्चे मूक आहेत. मूक असूनही खूप बोलत आहेत. गांधीजींच्या सगळ्या शस्त्रांचा इतका अनुपम एकत्रित वापर कुठे झाला नसेल. मौनाची ताकद किती मोठी असते, याचं सामुहिक दर्शन यापूर्वी असं घडलं नसेल. गांधीजींच्या मौनाचा विनोबाजींनी वापर केला होता. अण्णा हजारेंनी ते शस्त्र वापरलं होतं आणि त्या मौनातली ताकद देशाने अनुभवली होती. पण या मोर्चात कुणी एक विनोबा भावे नाहीत. कुणी एक अण्णा हजारे नाहीत. ओठ बंद असूनही बोलता येतं. न बोलताही खूप काही सांगता येतं. धिक्काराचा शब्द न उच्चारताही नापसंतीचा दाहक उच्चार करता येतो. मागणीची घोषणा न करताही मागणीचा बाण अचूक मारता येतो. रक्ताचा थेंब न सांडताही प्रतिपक्षाला जायबंदी करता येतं. लढाई ज्या प्रस्थापितांशी, सरकार पक्षाशी त्यांना बोलायला मात्र बाध्य करता येतं. सत्तेचं सिंहासन हलवता येतं.

मराठा मोर्चाने हे सारं करून दाखवलं आहे. एकेकाळचा सत्ताधारी वर्ग शेतीतून उद्ध्वस्त झाला आहे. दुष्काळाने खंगला आहे. शेती परवडत नाही. नोकरी मिळत नाही. शिक्षण महाग आहे. वरून राज्यकर्ता म्हणून रोज अवमान आहे. कर्जात घर बुडालं आहे. फास घेणार्‍यांची संख्या वाढते आहे. नसलेल्या पावसाने होरपळवलं आणि राज्यकर्त्यानीच लुबाडलं. पाटलाची ओटीच शिल्लक राहिलेली नाही. आता लेकही सुरक्षित नाही. यामुळे जखमी झालेला मराठा समाज एकवटला आहे. लाखा लाखाने जमतो आहे. त्याच्या मागणीबाबत जे बोलायचं ते सरकारने बोललं पाहिजे. मागच्या सरकारने काय केलं तो पाढा वाचून आता चालणार नाही. राज्यकर्ता वर्ग म्हणून या समाजाची उपेक्षा यापुढे करून चालणार नाही. महाराष्ट्रातला एक तृतीयांश समाज आहे हा. काही हजार कुटुंबांमधील सत्ता सोडली तर बाकीचा समाज आजही कुणबी आहे. संत तुकारामांच्या आणि महात्मा फुलेंच्या भाषेत कुळवाडी कुणबी आहे. ब्रिटींशापुढे महात्मा फुलेंनी ज्यांचं दु:ख मांडलं होतं, ज्यांच्यासाठी आसूड ओढला होता तोच हा समाज आहे. त्याचं दर्शन घडवण्यासाठी प्रिन्सला भेटायला महात्मा फुले पागोटं घालून गेले होते. आता ते पागोटेही फाटलेलं आहे. त्या फाटलेल्या पागोट्याची कैफियत कोण ऐकणार?

मागच्या सरकारने नाही काय केलं. फक्त समित्या नेमल्या. आयोगाकडे पाठवलं. पण त्यातून निर्णय आणण्यासाठी जे करायला हवं ते केलं नाही. दोष त्यांच्या पदरात मोठा आहे. पण दोषाचा कोळसा नव्या सरकारला उगाळता येईल काय? नवं सरकार आपलं नाही, ही अविश्‍वासाची भावना अधिक आहे. ज्या सहकाराने इतके वर्षे सांभाळलं, ते सहकार क्षेत्र मोडून टाकलं जात आहे. बाजार समित्या मोडल्या जात आहेत. शिक्षण संस्थांवर आघात होतो आहे. ज्यांनी शिक्षण उभं केलं, त्यांनाच अवमानित केलं जात आहे. शेतकरी बळीराजा दारिद्रय़ाच्या पाताळात गाडला जात असताना वामन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विश्‍वास निर्माण होणार कसा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माथाडी कामगारांच्या सभेत गेले. बोलले. ते पुरेसं नाही. करावं लागेल. दोष विरोधकांना, पक्षांतर्गत विरोधकांना देऊन चालणार नाही. बळीराजाला साथ द्यायची की नाही हे त्यांना ठरवायचं आहे. नियतीने ती जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे.

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि  लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २८ सप्टेंबर  २०१६ 

Wednesday, 21 September 2016

विनाअनुदानित व अतिरिक्त शिक्षकांचा छळ कशासाठी?



प्रति,
मा. शिक्षणमंत्री महोदय,

सप्रेम नमस्कार,
गणपतीपूर्वी पगार दिले नाहीत तर माझे विसर्जन करा, असं आपण म्हणाला होतात. २० टक्के पगाराचा जीआर काढण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला तो विसर्जनानंतरचा. उशिरा का होईना, या निर्णयाचं स्वागत करण्याची सोयसुद्वा आपण ठेवलेली नाही. पगाराच्या २० टक्केच रक्कम मिळणार आहे, ती मिळविण्यासाठी या शाळांना आणि त्यांच्या शिक्षकांना दिव्य करावं लागणार आहे. त्यातून २० टक्के तरी हाती लागतील का?

दु:खावर अशा आणखी डागण्या कशासाठी देता आहात? १५ वर्षांनंतर २०टक्के म्हणजे १०० टक्के होण्यासाठी आणखी पाच वर्षे लागणार आहेत. पहिलं अनुदान सुरू करण्यासाठी शाळेत आधी बायोमॅट्रीक यंत्र लावावं लागणार. १ आणि २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांचा समावेश त्यात नाही. बाकीच्या अटी इतक्या जाचक आहेत की त्या पूर्ण करताना दमछाक होणार आहे. गणपती गेले, या शिक्षकांच्या घरी दिवाळी तरी येऊ दे. पण नाही. तरीही जीआर काढला म्हणून आभार मानायचे? 

अनुदानित शाळांचं दु:खही त्याच वाटेवर आहे. राज्य सरकारच्या नव्या संचमान्यतेने हजारो शिक्षक अतिरिक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पारदर्शक केल्याबद्दल शिक्षक परिषदेने तुमचे आभार मानल्याची बातमी वाचली. शिक्षकांना मुंबई बाहेर जावे लागणार नाही, असा दिलासाही आपण दिल्याचे वाचले. पगार बंद केल्याच्या केवळ अफवा आहेत आणि त्या राजकीय हेतूने पसरवल्या जात असल्याचे आपण म्हटले आहे. 

अफवा काय आहेत? गेल्या तीन महिन्यांपासून रात्रशाळा शिक्षकांचे पगार बंद आहेत. खैरुल इस्लाम शिक्षण संस्था कोर्टात गेली म्हणून त्यांचेही पगार बंद आहेत. अल्पसंख्य शिक्षणसंस्था मधील अतिरिक्त शिक्षकांना 'नो वर्क, नो पे' चा जीआर लागू झालेला आहे. मराठी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे पगार ऑफलाईन झालेले आहेत. समायोजन झाले नाही तर 'नो पेची भीती आहे. विनाअनुदानित शिक्षकांना गणपतीपूर्वी पगार मिळणार होता, अजून मिळालेला नाही.

या सर्व जणू अफवा आहेत, हा नवीनच धडा आपण शिकवत आहात, त्याबद्दल आपले स्वागत करावे की आभार मानावे? शिक्षकांवर असलेल्या आपल्या या खास प्रेमाचा अनुभव गेली दीड-दोन वर्षे राज्यातील सारे शिक्षक घेत आहेत. मुंबईत ६०० शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. समायोजन फक्त १४३ जणांचे होणार आहे. उरलेल्या ४५७ जणांचे समायोजन आपण कुठे करणार आहात?

नव्या संचमान्यतेमुळे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत, हे आपण मान्य करता, हे काही कमी नाही. शिक्षक अतिरिक्त झालेले नाहीत. ते केले गेले आहेत. आरटीई लागू झाल्यानंतरही ते अतिरिक्त झाले नव्हते. तुम्ही संचमान्यतेचे निकष बदलले म्हणून शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. आधी अतिरिक्त करायचं. पगार ऑफलाईन करायचे आणि समायोजन होईल म्हणून सांगायचे. याला दिलासा म्हणायचे? 

२८ ऑगस्ट २०१५ चा जीआर तीन भाषांना मिळून एकच शिक्षक देतो. गणित-विज्ञानाला मिळून एक शिक्षक देतो. समाजशास्त्राला शिक्षक देतच नाही. ७ ऑक्टोबर २०१५चा जीआर कला, क्रीडा शिक्षकांना ५० रुपये तासावर काम करायला सांगतो. महाराष्ट्रातल्या गरीब आणि बहुजनांच्या मुलांचं भाषा, विज्ञान आणि गणित शिक्षण दर्जेदार करण्याची आपली ही योजना अचंबित करणारी आहे. समाजशास्त्राला शिक्षक द्यायचा नाही, याचा अर्थ देशाचं संविधान आणि नागरिकांचे अधिकार विद्यार्थ्यांना कळू नयेत, हाच त्याचा अर्थ होऊ शकतो. ऑलिम्पिक विजेत्यांचा सत्कार आपल्या सरकारने केला. घसघशीत बक्षीसं त्यांना दिली. आम्हाला आनंद आहे. शाळेला एक कला, क्रीडा शिक्षक देऊन त्या शाळेतल्या मुलांना हा आनंद देता येणार नाही का? इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषा विषयांना वेगळा शिक्षक मिळाला तर त्या मुलांच्या पालकांना दिलासा मिळणार नाही का? 

रात्रशाळांनी आपलं काय वाकडं केलं आहे? दिवसाच्या शाळांच्या संचमान्यतेचे निकष रात्रीच्या शाळांना लावता येत नाहीत. रात्रशाळांसाठी स्वतंत्र निकष लावले जातील, असे स्वत: आपण विधान परिषदेत आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? रात्रीच्या शाळेत कष्ट करणारी मुलं शिकतात. त्यांना तीन तासात सारं काही शिकवायचं असतं. अतोनात मेहनत घेतात आमचे शिक्षक. अनेक रात्रशाळांनी १०० टक्के निकाल लावले आहेत. ८०० पैकी २५० शिक्षक फक्त रात्रशाळेवर अवलंबून आहेत. त्यांचे पगारच बंद झाले आहेत. मुलाचं नुकसान होतं त्याचा तर हिशेब नाही. या मुलांनी मोर्चा काढला. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलांच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शब्द टाकला. पण रात्रशाळांना मदत करण्याची तुमची अजून तयारी दिसत नाही. त्यासाठी कोणता मुहूर्त पाहत आहात? 

अतार्किक, अशैक्षणिक निकष लादून शिक्षकांना अतिरिक्त करता. त्यातून होणारं मुलांचं नुकसान भरून कसं काढणार? अनेक शिक्षक निवृत्तीला आले आहेत. त्यांना अतिरिक्त ठरवून दूर फेकण्यात आलं आहे. त्यांच्या पेन्शनचे पेपर कधी तयार होणार? महिला शिक्षकांची संख्या जास्त आहे. त्या महिला शिक्षकांच्या त्रासाचा विचार तुम्ही करणार की नाही? २०-२० वर्षे सेवा झाली आहे. तुमच्या एका आदेशाने त्या ऑफलाईन झाल्या आहेत. मुलांची गरज असताना शिक्षकांना अवमानित करण्याचं हे तंत्र कशासाठी? नव्या संचमान्यतेचा अट्टाहास कशासाठी? शिक्षकांना छळण्यासाठी की विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेण्यासाठी? मा. शिक्षणमंत्री उत्तर द्या.

तरीही आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, वि.प.स.

(लेखक, शिक्षक आमदार, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आणि लोक भारतीपक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २१ सप्टेंबर  २०१६ 

Thursday, 15 September 2016

विनोद तावडेंना पत्र



प्रति,
मा. ना. श्री. विनोद तावडे
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,
काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत कुर्ल्याच्या होली क्रॉस हायस्कूलमध्ये शिक्षक थांबून होते. त्यात मोठ्या संख्येने महिला होत्या. सकाळी ९ पासून त्या आल्या होत्या. रात्रीचे १० वाजले तरी जाऊ शकत नव्हत्या. अहो, घरी त्यांची मुलं वाट पाहत होती. मी काल दिल्लीला होतो. रात्री थेट तिथे गेलो. डोळ्यात त्यांच्या पाणी होतं. अतिरिक्त शिक्षकांना असं दिवसभर उभं करुन, छळून आपण काय मिळवणार आहात?

जी स्थिती मुंबईत तीच स्थिती साऱया राज्यात आहे. ४२२९ शिक्षक अतिरिक्त आहेत. जे शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत त्यांच्यावरचा वर्कलोड वाढणार आहे. शिक्षक अतिरिक्त झाले, त्यात त्यांचा दोष नाही. आरटीई कायदा आणि नियम यामुळे ते अतिरिक्त झालेले नाहीत. जुन्या संचमान्यतेच्या निकषानुसारही ते अतिरिक्त झालेले नाहीत. २८ ऑगस्ट २०१५ चा जीआर काढल्याने हे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. संचमान्यतेचे निकष तुम्ही बदलल्यामुळे हे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.

विद्यार्थ्यांना विषयानुसार शिक्षक मिळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेत आहात. मी काल दिल्लीत होतो. भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱयांना भेटलो. त्या चर्चेतून एक स्पष्ट झालं की, ३० किंवा ३५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक ही मिनिमम / किमान अट आहे. तुकडीत निर्धारित संख्या नाही म्हणून शिक्षक नाकारता येणार नाही. तीन भाषांना मिळून १ शिक्षक हा आरटीईचा विपर्यास आहे. प्रत्येक भाषेला किमान १ शिक्षक ही आरटीईची अपेक्षा आहे. उघड आहे, अनुदानित शाळा बंद करण्याचा आपला डाव आहे.

सिंधुदुर्ग जिह्याचे आप्पा सामंत दिल्लीत तळ ठोकून आहेत. सुप्रिम कोर्टात केस सुरु आहे. कोर्टात आव्हान दिलं म्हणून सिंधुदुर्ग जिह्याचे पगार थांबवले जातात. खैरुल इस्लाम संस्था कोर्टात गेली म्हणून त्यांचे पगार थांबवण्यात आले. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांवर नो वर्क, नो पे ची जबदरस्ती करण्यात येत आहे. बाकीचे अतिरिक्त शिक्षक सुपात आहेत.

कृपया हे थांबवा. शिक्षण उद्ध्वस्त करु नका. शिक्षकांना अपमानित करु नका. अन्यथा ...

आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, वि.प.स.
_______________________________________________

प्रति,
मा. ना. श्री. विनोद तावडे
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,
गणपतीपूर्वी विनाअनुदानित शिक्षकांना पगार देण्याची आपण घोषणा केली होती. 
टिव्हीवर तुम्ही केलेल्या स्वतच्या अभिनंदनाची जाहिरातही पाहिली.
आज गणपतीचं विसर्जन आहे. उद्या तरी जीआर निघेल काय?

शिक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. आहेत.
मंत्रीमंडळाचा निर्णय झालाच आहे ना. 
मग जीआर काढण्यात काय अडचण आहे?
आता अडचण सांगू नका. आणखी ताणू नका. 
पगार सुरू करा, हीच विनंती.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, वि.प.स.

दिनांक : १५/०९/२०१६