Thursday, 3 November 2016

दिवाळीचे दिवे, उजेडाची फुले


ऐन दिवाळीत एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरत होता. दिवाळी कुणाची? आपली की त्यांची? ब्राह्मणांची की बहुजनांची? बहुजनांनी अन् बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये? मुस्लिम, ख्रिश्चनांनी करू नये?

आकाश कंदिल खिडकीत लावत असताना या प्रश्नांचा विचार करत होतो. आमचं घर नास्तिक. ना घरात देव्हारा. ना कोणता पूजा-पाठ. पण दिवाळीत भाताचं कणिस लावून दारात तोरण बांधतो. आकाश कंदिल लावतो. घरात फराळ केला जातो. नवे कपडे घालतो. दिवाळीचा आनंद जो घराघरात असतो. तोच आनंद आमच्या घरातही असतो. लहानपणापासून दिवाळीचा हा आनंद मनात साठत आला आहे. माझे ८२ वर्षांचे वडील आजही शेतात राबतात. तेही अधार्मिक. पण आई सश्रद्ध. म्हणून दिवाळीचा आनंद आई वडिलांनी कधी कमी होऊ दिला नाही. मुंबईत तर घरात सगळेच सण जोरात साजरे करतो. बुद्ध पौर्णिमा,  ईद आणि ख्रिसमसही. अर्थात शेतकऱ्याचं घर असल्याने दिवाळीचा आनंद काही और असतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी भाताच्या पेंढय़ा अंगणात रचून उडवं उभं राहिलं की दिवाळीचे वेध लागतात. धान्याच्या राशी अशा अंगणात आल्या की दिवाळी येणारच.

पहिला दिवा लागतो वसुबारसला. वसू म्हणजे वासुकी राजा. नागवंशी. थेट ब्रह्मदेवाशी लढला. पशुधनाच्या रक्षणासाठी. त्याच्या आठवणीचा हा दिवस.

दुसरा दिवा नरकासुरासाठी. नीतिमान योद्धय़ासाठी.

तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा. पुरोहितांनी त्याचं कर्मकांड केलं. पण ही बाई लढवय्यी. आर्यांशी दोन हात करणारी. त्यांनी पळवून नेलेलं गोधन सोडवून आणणारी. म्हणून धनाला लक्ष्मीचं नाव मिळालं. अशोक राणांनी ती बौद्धानुयायी होती, असं म्हटलंय. भारतीयांनी तिची आठवण आजही मनात जपली आहे.

चौथा दिवस बळीराजाचा. दिवाळीचा सणच तर त्याचा. तीन हजार वर्षे काळजाच्या कुपीत जपून ठेवलेली बळीराजाची पणती असंख्य ज्योतींनी उजळते ती ही दिवाळी. वामनाने डोक्यावर पाय ठेवत ढकललं होतं बळीराजाला पाताळात. वामन विष्णूचा अवतार मानला जातो. वामनाचं मंदिर देशात कुठेही सापडत नाही. बळीराजा मात्र आजही हृदयात कायम आहे.

शेतकऱ्याचं दुसरं नाव बळीराजा. काळ्या मातीत राबणारा तो. ऊन, पावसाशी मैत्री करत. ओल्या - सुक्या दुष्काळाशी चार हात करत. सर्जनशीलतेचा फाळ जमिनीत रुजवत नांगरणी करणारा. मढं झाकून पेरा करणारा. असंख्य पोटांची चिंता करणारा. कधी अटळ परिस्थितीशी सामना करणारा. फाळाची तलवार करत लढणारा. पण कधीच दावा करत नाही तो तारणहार म्हणून. मोक्षदाता म्हणून.

त्या बळीराजाच्या स्वागताचा सोहळा म्हणून असते दिवाळी. दक्षिणेत ओणम साजरा होतो, तोही बळीराजाच्या स्वागतासाठीच. केरळात पाऊस आधी येतो. पीकही आधी हाती लागतं. म्हणून ओणमही दिवाळी आधी येतो. जमिनीत पेरलेलं बी, भरलेल्या कणसावाटे तरारून वर येतं. पाताळात ढकललेला बळीराजा पुन्हा भेटायला येतो तो हा असा.

ईडा, पिडा टळो बळीचं राज्य येवो. अशी प्रार्थना प्रत्येक माय त्यादिवशी आपल्या मुलांना ओवाळताना करत असते. अशी प्रार्थना जगात कुठे नसेल. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बळीचं राज्य मागणारी. त्या बळीराजाच्या स्वागताची दिवाळी का नाही साजरी करायची? असंख्य दिव्यांची रोषणाई त्यादिवशी केली जाते. अमावास्या संपून नवा दिवस सुरू होतो तो बळीराजाच्या आठवणीने. प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा मुलगा तो बळीराजा. त्याच्या बळीवंशाची हकीगत डॉ. . . साळुंखेंनी सांगितली आहे. ती मुळात वाचायला हवी. दिवाळी साजरी करायची की नाही, या प्रश्नाचं उत्तर त्यातून मिळेल.

हा सण असा आहे की तो या देशाशी, त्याच्या निसर्गाशी, शेतीशी आणि शेतकऱ्याशी जोडलेला आहे. अन्नदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. कर्मकांडाचा शेंदूर पुरोहित फासत राहणार. पण शेंदराने विदृप केलेला आपला नायक नाकारण्याचं कारण काय? अन् आनंद साजरा करायला धर्माचं बंधन हवं कशाला? अनेक प्रसिद्ध दर्ग्यांमध्ये दिवाळीला दिव्यांची आरास केली जाते. खेड्या पाड्यातले ख्रिस्ती बांधव दिवाळीतही घरात गोडधोड करतात. जैन, बौद्ध, शैव कुणीही असा, बळीराजा त्या प्रत्येकाचा पूर्वज आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा आनंद आहे. केरळात ओणमही असाच हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लिमांच्या घरात साजरा होतो.  

शेवटचे तीर्थंकर महावीरांचं निर्वाण अश्विन अमावास्येलाच झालं. म्हणून जैन दिवाळीत सुतक नाही पाळत. ज्ञानाचा प्रकाश निमाला म्हणून दु: नका करू. असंख्य दीप उजळा, असं सांगतात.

'गये से भवुज्जोये, दव्वुज्जोयं करिस्समो'

'ततस्तु: लोक: प्रतिवर्षमादरत् प्रसिद्धदीपलिकयात्र भारते'
दीपावलीचा जैन आणि भारत संदर्भ असा आहे. एक काळ दिगंबर जैन धर्माचा महाराष्ट्रात मोठा प्रभाव होता. तो पुढे ओसरला पण दीपावली मागे ठेऊन. 

इतिहास लिहणाऱ्यांचा असतो. बळी भारता ऐवजी वामन अवताराच्या आरत्या लिहिल्या गेल्या. ओणम महाबळीच्या स्वागतासाठी साजरा होतो. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यादिवशी बळीच्या डोक्यावर पाय ठेवणाऱ्या वामनाच्या चित्रासह वामन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. वामन जयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्यांचं आज राज्य आहे. म्हणून बळीराजाला विसरायचं का? अयोध्येत 'रामा'चा पत्ता नाही. सर्वत्र नथुरामाचा प्रयोग सुरू आहे. म्हणून महात्म्याला विसरायचं का? ७० वर्षे होतील आता. कधी हिंमत झाली नव्हती त्यांची. आज वामन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. उद्या नथुराम जयंतीच्या दिल्या जातील. म्हणून घाबरून कसं चालेल. अमावास्येनंतर प्रतिपदा येतेच. बळी प्रतिपदा.

कवी बा. . बोरकरांच्या शब्दांत,

नको घाबरू...
पंख आवरू...
अनावरा आकाश खुले
पल्याड आहे प्रकाश तिष्ठत
उजेडाची घेऊन फुले!

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

टीप - वरच्या चित्रातली बळीराजाची प्राचीन मूर्ती संग्रहालय शास्त्रज्ञ डॉ. सदाशिव गोरक्षकर यांच्या संग्रहातील. मूळ मुंबईकर कुटुंबांमध्ये बळीप्रतिपदेला या मूर्तीची पूजा होते. 


पूर्वप्रसिद्धीदै. पुण्यनगरी नोव्हेंबर २०१६

Tuesday, 1 November 2016

पळशीकर, नाईक यांना श्रद्धांजली



आचार्य पळशीकर
वसंत पळशीकर यांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रसंग क्वचितच आला. भेटले ते एक दोनदा शिबिरातच. खूपदा  समाज प्रबोधन पत्रिकेतून आणि नवभारतमधून. महाराष्ट्रात कार्यकर्ता घडवणार्याा आचार्यांची एक मोठी परंपरा आहे. दादा धर्माधिकारी, विनायकराव कुलकर्णी, नरहर कुरुंदकर, डॉ. ना. य. डोळे, बाळासाहेब भारदे, वि. स. पागे. हे सगळे गांधींना मानणारे. पण एकाच पठडीतले नव्हेत. भारदे-पागे काँग्रेसी परंपरेतले. धर्माधिकारी, कुलकर्णी, कुरुंदकर, डोळे हे सारे समाजवादी शिलाचे, गांधी मार्गी कार्यकर्ते घडवणारे. भारदे-पागे यांना मी ऐकलं आहे. पण माझी पिढी त्या स्कूलमधली नाही. दादा धर्माधिकारी, विनायकराव, नरहर कुरुंदकर, ना. य. डोळे यांच्या शिबिरातून आम्ही सारे घडलो. वसंत पळशीकर हे याच आचार्य कुळातले.

पळशीकरांना ऐकणं आणि वाचणं यात वेगळा आनंद असतो. गांधीवादी, समाजवादी किंवा डावे अशा साच्यात पळशीकरांना बसवता येणार नाही. पण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रश्नांचं आकलन करताना पळशीकरांची मदत यापैकी कोणत्याही गोटातल्या कार्यकर्त्याला हमखास होऊ शकायची. त्यांची ग्रंथ परंपरा मोठी नाही. तसे ते भाषण परंपरेतले. त्यांची सगळी भाषणं जर ग्रंथीत केली तर मोठा विचारसाठा उपलब्ध होईल. परिवर्तनवादी विचारांना नवचिंतन, नवा दृष्टीकोन आणि सम्यक चिकित्सा देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते पळशीकरांनी. विशेषतः धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या या प्रश्नांची उकल करताना पळशीकरांचं चिंतन नेहमी चौकटी बाहेरचं राहिलं आहे. त्यांची शैली अनाक्रमक पण ठाम होती. आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या सहवासात ते राहिले. भूदान आंदोलनात ते चालले. आंनदवनात रमले. मेधाताई पाटकरांच्या समवेत नर्मदा आंदोलनातही त्यांनी झोकून  दिलं. या सर्वांचा स्पर्श त्यांच्या प्रत्येक संवादातून जाणवत असे. ते कधीही एकांगी झाले नाहीत. पण त्यांच्या चिकित्सक मांडणीतली आर्तता कार्यकर्त्यांना नवी उमेद, नवा ओलावा देऊन जात असे. नव भारताचा आणि नव परिवर्तनाचा त्यांना अखंड ध्यास असे. समाज परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी वसंत पळशीकर मोठा आधार होते. त्यांच्या जाण्याने तो आधार गेल्याची हुरहुर जाणवत राहणार आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

-----------------


डॉ. अब्दुल करीम नाईक
डॉ. अब्दुल करीम नाईक यांचा इंतकाल परवा झाला. कोकणातला हा माणूस. शिकला, डॉक्टर झाला. बॉम्बे सायकीएट्रिक सोसायटीचे ते अध्यक्ष होते. पण शिक्षण क्षेत्रात अधिक रस होता. कोकणात आणि मुंबईत शिक्षण संस्था उभ्या करण्यात अनेकांना त्यांनी मदत केली. मुस्लिम ओबीसींच्या चळवळीमुळे त्यांची ओळख झाली होती. आपल्या मुलाच्या इस्लामिक रिसर्च सेंटरच्या लायब्ररीत ते घेऊन गेले होते. डॉक्टर धार्मिक होते, पण उदार परंपरेतले. सर्व धर्मीयांशी संवाद ठेवणारे. विशेषतः कोकणावर प्रेम करणारे. त्यांचा जन्म रत्नागिरीचा. एरव्ही धर्मवादी माणूस मुस्लिम ओबीसींच्या चळवळींशी फटकून वागतो. पण डॉ. ए. के. नाईकांना त्याबद्दल कौतुक होतं. कोकणातल्या मागासवर्गीय मुस्लिमांना विशेषतः मच्छिमार दादलींना पुढे जाण्याचा मार्ग मिळेल याचं त्यांना अप्रूप होतं.

त्यांच्या मुलाचं नाव सर्वांना माहीत आहे. डॉ. झाकीर नाईक. डॉ. झाकीर नाईकांच्या भूमिकेशी सहमत होण्याचं कारण नाही. पण झाकीर नाईकांचे वडील आहेत म्हणून डॉ. अब्दुल करीम नाईक यांची उपेक्षा करुन चालणार नाही. शिक्षण आणि वै़द्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाला सलाम! त्यांना विनम्र श्रद्धांजली.

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


Wednesday, 26 October 2016

ब्राह्मण मुख्यमंत्री असावा काय?



मराठय़ांचे मूक मोर्चे निघू लागल्यापासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्याला पुष्टी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे उत्तर खणखणीत आहे, 'केवळ ब्राह्मण असल्याच्या कारणावरून मला दूर केले जाणार नाही. काही चुका झाल्या तरच बदल होईल; अन्यथा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ मी पूर्ण करेन.'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतकेच बोलून थांबलेले नाहीत. 'मंत्री नेमण्याचा आणि मंत्र्याला काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे,' असे त्यांनी सुनावले आहे. मुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न भगवान गडावरचा होता. पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत आपल्यामुळे मंत्री झाल्याचे सांगितले. तर धनंजय मुंडेंना लाल दिवा आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांचे उत्तर भगवान गडाच्या संदर्भात असले, तरी इशारा तिसर्‍या मंत्र्याला होता. पंकजा ताईंच्या उद्गारात अहंकार प्रकटला असला, तरी या घडीला त्या काही मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धक नाहीत. पब्लिसिटी, अॅडव्होकसी आणि लॉबिंगसाठी स्वत:ची यंत्रणा उभे केलेले एक ज्येष्ठ मंत्री गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मीडियात त्यांच्या बातम्या आणण्यात त्यांचे पीआर डिपार्टमेंट यशस्वी होत असले, तरी अॅडव्होकसी आणि लॉबिंगचा कस दिल्लीत लागायचा आहे.

मोर्चांनंतर सुरू झालेली चर्चा भाजपाच्या अंतर्गत हालचालींना वेग देत असल्याचा सुगावा मुख्यमंत्र्यांना लागला असणार, म्हणून त्यांनी उघडपणे उत्तर दिलं. मुख्यमंत्री कोण असावे? हा सत्ताधारी पक्षाचा अधिकार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असावे आणि नसावे हे महाराष्ट्रात जातीवरून ठरणार काय? हा खरा प्रश्न आहे. मराठय़ांचे मोर्चे निघत आहेत आणि मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, एवढय़ावरून हा प्रश्न उपस्थित होत असेल, तर मामला गंभीर आहे. तशी मागणी मोर्चांनी केलेली नाही. मोर्चांना बदनाम करण्यासाठी कुणी ती आग लावत असेल, तर ती गोष्ट आणखी गंभीर आहे.

ही ठिणगी टाकली कुणी? त्याला हवा दिली कुणी?
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजी राजे यांना भाजपाने राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर नेमले. तेव्हा मोर्चे निघायचे होते. भाजपाची ती खेळी विलक्षण होती. प्रमोद महाजनांची आठवण करून देणारा तो डाव खुद्द मुख्यमंत्र्यांनी टाकला होता. त्यावर महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांची दिलेली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय भूगर्भात अस्वस्थता निर्माण करून गेली. 'पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे. पेशवे फडणवीसांना नेमायचे. आता फडणवीस थेट छत्रपती नेमायला लागले आहेत.' पवार साहेबांची ही प्रतिक्रिया नुसती खोचक नव्हती. महाराष्ट्राच्या राजकीय गोलावरील टेक्टॉनिक प्लेट्स हलवण्याची ताकद त्या प्रतिक्रियेत होती. त्या प्रतिक्रियेने ठिणगी पडली. त्या ठिणगीला भाजपाच्या अंतर्गत राजकारणात हवा देण्याचे काम नंतर लगेचच सुरूही झाले. म्हणून त्याची दखल खुद्द फडणवीसांना घ्यावी लागली.

कोल्हापूरच्या संभाजी राजांच्या नेमणुकीवरून ती प्रतिक्रिया आली म्हणून आठवले. फाटक्या गादीसाठी का भांडता? असे यशवंतराव चव्हाणांनी कोल्हापूरच्या दत्तक विधानावरती म्हटले होते. यशवंतरावांचा हेतू प्रामाणिक होता; पण तरीही त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. शरद पवारांना त्यांच्या ताज्या विधानाची किंमत मोजावी लागणार नाही. उलट किंमत मिळेल. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरानंतर विशेषत: मराठवाड्यात हरवलेला प्रभाव त्यांना पुन्हा अलीकडच्या घटनांनी मिळवता आला आहे. एका मोठय़ा समाजातल्या राजकीय विभागणीला रोखून पुन्हा एकदा एकसंध करण्याची संधी ते पाहात असतील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद ब्राह्मणाकडे असावे की नसावे? आणीबाणीनंतर देशात जनता राजवट आली. महाराष्ट्रातही परिवर्तन घडू लागले होते. जनता पक्षाला संधी असूनही आणि सर्वांचे एकमत असूनही एस. एम. जोशी यांनी मुख्यमंत्री पद नाकारले. महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री नको, असे डी कास्ट झालेले एस. एम. म्हणाले. पुढे शरद पवारांना त्यांनीच मुख्यमंत्री केले. सेनेची सत्ता आली, तेव्हा बाळासाहेब खेरांनंतर महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री झाला. शरद पवार ज्यांना पंत किंवा श्रीमंत म्हणून हाक मारत ते मनोहर जोशी मुख्यमंत्री होण्यामध्ये त्यांचाच रोल महत्त्वाचा होता. पवारांनी तो केला नसता, तर सुधीर जोशी कदाचित मुख्यमंत्री झाले असते. त्यांना हुलकावणी मिळाली. मनोहर जोशींना जावे लागले आणि नारायण राणे आले ते निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण मुख्यमंत्री नको, या प्रमोद महाजनांच्या भूमिकेमुळे.

अन् आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या जातीची. ते स्वत: जात, पात मानत नाहीत. जाती सापेक्ष वागत नाहीत. तो संस्कार त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. भाजपामध्ये जी उदार, आधुनिक नेत्यांची फळी आहे, त्या गटातले ते आहेत. ही फळी भाजपात अल्पसंख्य आहे; पण अन्य भाजपा मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत हे ठामपणे सांगता येईल की, फडणवीस 'खट्टर'वादी नाहीत. भाजपात जात पात पाहिली जात नाही, हे मात्र खरे नाही. जात हे वास्तव आहे आणि कोणताही राजकीय पक्ष त्या वास्तवापासून दूर जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे, यापेक्षा तो कोणत्या बाजूचा आहे, हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राने ब्राह्मण्याला कायम नकार दिला आहे, ब्राह्मणाला नाही. फुले-शाहू-आंबेडकर ते थेट यशवंतराव चव्हाण या सर्वांचा इतिहास तेच सत्य अधोरेखित करतो. महात्मा फुलेंच्या शाळेसाठी आपला वाडा देणारे नारायणराव भिडे, शाहू महाराजांची वेदोक्त प्रकरणात पाठराखण करणारे राजारामशास्त्री भागवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थनार्थ मनुस्मृती जाळणारे बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणात त्यांना साथ देणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २६ ऑक्टोबर २०१६

Thursday, 20 October 2016

गजानन खातू मुंज्या नाही बनले



गजानन खातू ७५ वर्षांचे झाले. परवा दादरच्या शिवाजी मंदिरात त्यांचा सुंदर सत्कार सोहळा झाला. डॉ. बाबा आढाव, मेधाताई पाटकर, पुष्पाताई भावे, अॅड. प्रकाश आंबेडकर, अच्युत गोडबोले, सौमित्र, कवयित्री नीरजा अशी खूप सारी मोठी माणसं जमली होती. सेवा दल, समता आंदोलन, साने गुरुजी स्मारक, अपना बाजार अशा समाजवादी परिवारातली माणसं तर खूप आली. साहित्य, कला क्षेत्रातले लोकही आवर्जून आले. खातूंचा परिवारच मोठा आहे. 

खातू भाईंनी अपना बाजार सोडलं त्याला २५ वर्षे झाली असतील. पण अपना परिवाराला खातू भाईंनी जी ओळख मिळवून दिली तीच खातू भाईंची ओळख आजही बनून राहिली आहे.

सहकाराचं क्षेत्र उभं, आडवं कोलमडत असताना समाजवादी परिवारानं उभ्या केलेल्या सहकारातल्या संस्था मात्र अबाधित उभ्या आहेत. त्यांचं छप्पर फाटलेलं नाही. त्यांचे खांब कोलमडलेले नाहीत. त्यांच्या भिंतीना भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली नाही. गिरणगाव कधीच मोडून पडलं. पण त्या गिरणी कामगारांसाठी सुरू झालेला अपना बाजार आजही टिकून आहे. कामगारांनीच तो उभा केला होता. आता दुसर्‍या पिढीच्या हातात सूत्रे आहेत. मात्र निष्ठा, निरलसता, पारदर्शकता आणि चोख व्यवहार या चार खाबांवर तो आजही उभा आहे. दादा सरफरे गेले, उपेंद्र चमणकर, आत्माराम शिंदेही गेले. सुरेश तावडेही आता नाहीत. दत्ताराम चाळके आता अपना परिवाराचे प्रमुख आहेत. अपना बँक ते सांभाळतात. अपना बँक आता काही हजार कोटींची झाली आहे. प्रचंड मोठी झाली आहे. पण ती बँकही त्याच चार खाबांवर उभी आहे. सरफरे, तावडे जेव्हा होते, तेव्हा ते जे सांगत होते, तेच आज दत्ताराम चाळकेही सांगतील. उमेश ठाकूर, अगदी सुपार बाजारचे किशोर देसाईही सांगतील. ऋषिकेश तावडेला विचारा, तोही तेच सांगेल. अपना बाजारला, अपना परिवाराला ही जी ओळख मिळाली आहे ती गजानन खातूंमुळे. गजानन खातू हे काही अपना बाजारचे संस्थापक नव्हेत. या परिवाराचे ते कधी प्रमुखही नव्हते. अपना बाजारचं व्यवस्थापन ते सांभाळत. समाजवादी सहकारी संस्थेचं व्यवस्थापकीय नेतृत्व करताना त्यांनी जे काही केलं त्यामुळे अपना बाजारला सहकाराच्या क्षेत्रात, मुंबईतल्या ग्राहक चळवळीत एक वेगळी ओळख मिळाली. त्यांचं व्यवस्थापन कौशल्य, अर्थशास्त्राचा अभ्यास, बाजाराची अचूक नाडी, भविष्याचा वेध आणि समाजवादी दृष्टी यामुळे ही ओळख ते निर्माण करू शकले.

खातू भाईंचा स्वभाव तसा सौम्य. पण विचारात स्पष्टता आणि ठामपणा. प्रत्यक्ष संघर्षात ते कधी उतरले नसले तरी संघर्षाच्या चळवळीत असणार्‍या प्रत्येकाला गजानन खातूंचा मोठा आधार वाटतो. पक्षीय राजकारणात ते तसे रमले नाहीत. त्यांचा तो पिंडही नाही. पण त्यांची राजकीय मतं ठाम असतात. आग्रहाने ते मांडतात. जुनाट कल्पनांना ते कधीच धरून बसत नाहीत, हे त्यांचं आणखी वैशिष्ट्यं. बदलत्या राजकारणाचा त्यांना अचूक वेध असतो. अर्थशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे असेल, मार्क्‍सवादी दृष्टिकोन असल्यामुळे असेल अर्थकारणातलं राजकारण त्यांना नेमकं कळतं. जागतिकीकरणामुळे बदललेलं जग आणि बदलेला देश ज्यांना लवकर ओळखता आला, त्यात गजानन खातू सर्वात पुढे आहेत.

अपना बाजारमधल्या निवृत्तीनंतर खातू भाईंचं एक स्वप्न होतं सस्ता बाजारचं. ते काही साकार झालं नाही. मात्र त्यांची सस्ता बाजारची कल्पना वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या रूपात बाजारात तर दिसतेच आहे. खातूंच्या अशा अनेक कल्पना आहेत. जागेपणी पाहिलेली ती स्वप्नं आहेत. फक्त स्वप्नंच नाही, खूप आधी त्यांनी पाहिलेल्या गोष्टी आज प्रत्यक्षात दिसताहेत. ते स्वत: पाहताहेत. त्यांचं ते द्रष्टेपण.

अपना बाजारातल्या स्वेच्छा निवृत्तीनंतर गजानन खातूंनी एका मोठय़ा प्रकल्पाला वाहून घेतलं. माणगावला साने गुरुजींचं राष्ट्रीय स्मारक उभं केलं. ५० एकरात निरंतर चालणारं शिबीर केंद्र. त्या केंद्रात, तिथल्या शिबिरात येणार्‍या तरुण मुलांनी साने गुरुजींना पाहिलं आणि थोडं मनात रुजवलं तरी खूप झालं, असं खातूंना वाटतं. पण गजानन खातू तिथे कायमचे ट्रस्टी बनले नाहीत. जे संस्था उभ्या करतात ते तर सोडा आयते आलेलेही वेताळ आणि मुंज्या बनून झाडावर बसून राहतात. गजानन खातू कोकणातले असूनही वेताळ आणि मुंज्या बनले नाहीत. 'प्रश्नांची उत्तरं दिली नाहीस तर तुझीच अनेक शकलं होऊन तुझ्या पायाशी पडतील,' असा शाप कधी ते देत नाहीत. हे स्मारक, ती संस्था त्यांनी तरुणांच्या हाती सोपवली आहे.

साने गुरुजींच्या 
वाङ् मयाने  महाराष्ट्राला हजारो धडपडणारी मुले दिली. या धडपडणार्‍या मुलांनी महाराष्ट्राला निरलस, निर्लोभ, निर्मोह वृत्तीने खूप काही दिलं. विधायक घडवलं. ज्यांनी डोंगराएवढं काम केलं ती सारी नावं तर आपल्याला माहीत आहेत. बाबा आमटेंपासून यदुनाथ थत्तेंपर्यंत. प्रकाश मोहाडीकरांपासून शाहीर साबळेंपर्यंत. शाहीर आत्माराम पाटलांपासून निळू फुलेंपर्यंत. मृणालताईंपासून स्मिता पाटीलपर्यंत. एकनाथ ठाकूरांपासून मेधा पाटकरांपर्यंत. पु. लं. देशपांडेंपासून म. सु. पाटलांपर्यंत. सा. रे. पाटलांपासून सदाशिव पाटलांपर्यंत. डॉ. बाबा आढावांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंत. कॉ. पानसरेंपासून ते भाई वैद्यांपर्यंत. महाराष्ट्रभर अशी खूप मोठी माणसं होती आणि आहेत. सगळे बाबा आमटेंएवढे किंवा पु. लं. इतके मोठे आणि प्रसिद्ध झाले नसतील. पण त्यांनी केलेलं काम खूप मोठं आहे. त्या त्या क्षेत्रातले ते मानदंड आहेत. गजानन खातू त्यापैकी एक आहेत.

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि  लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १९ ऑक्टोबर २०१६ 

Thursday, 13 October 2016

खाडिलकर सरांच्या डोळ्यातलं पाणी



मागच्या आठवड्यात खाडिलकर सरांना भेटायला गेलो होतो. कोकणात. गणपतीत ते गावी गेले होते. अचानक पॅरेलेसिसचा अॅटॅक आला. ब्रेन हॅम्रेज झालं. कोकणातच सुट्टीवर गेलेल्या इनामदार सरांना ही बातमी कळली. त्यांनी फोन केला. खाडिलकर सरांना शोधायचं कसं हाच प्रश्न होता. अविवाहित. नातेवाईक कुणी ते माहीत नव्हतं. मसुरे त्यांचं गाव एवढंच माहीत होतं. 

खाडिलकर सर म्हणजे अरुण खाडिलकर. छबिलदासचे. ठाण्याच्या मो. ह. विद्यालयाचे निवृत्त उपमुख्याध्यापक. पण सरांची खरी ओळख रात्रशाळा आहे. रात्रशाळा मुख्याध्यापक संघाचे ते अध्यक्ष आहेत. राज्यात १७५ रात्रशाळा आहेत. त्यापैकी १५० रात्रशाळा मुंबईत आहेत.  दिवसभर कष्ट करणारी मुलं 
रात्रशाळेत शिकण्याचा प्रयत्न करतात. घरात कुणीच कमावतं नसतं. ही मुलंच कमावती. रात्रशाळेतल्या या मुला-मुलींशी बोला. मग कळेल. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे. ज्या वयात दिवसा शाळेत शिकावं आणि संध्याकाळी खेळावं, टीव्ही पहावा त्या वयात परिस्थितीने नकार दिलेली ही मुलं. कुणी भांडी घासतं. कुणी रेस्टॉरंटमध्ये वेटर आहे. कुणी फॅक्टरीत आहे. कुणी कुरिअर बॉय आहे. त्यांची वयं थोडी मोठी आहेत. शिकण्याचं वय करपून गेल्यानंतरही शिकण्याची हिंमत ही मुलं-मुली करतात. त्याबद्दल त्यांना सलाम करायला हवा. या रात्रशाळांना वाहून घेतलेले व्ही. व्ही. चिकोडीकर, अरुण खाडिलकर, अशोक बेलसरे हे तिघे रात्रीच्या शिक्षण विश्‍वास सगळ्यांना माहीत आहेत. सय्यद सर, चाफेकर सर, देशपांडे सर, कांबळे सर, पवार सर, त्रिवेदी सर, मीनाताई कुरुडे, शहाणेबाई अशी कितीतरी नावं सांगता येतील. निवृत्त झाले तरी रात्रशाळांची चिंता त्यांची संपत नाही. चिकोडीकर नव्वदीच्या घरात पोहोचलेत. खाडिलकर सरांनी सत्तरी कधीच पार केली आहे. पण या म्हातार्‍यांचा काम करण्याचा पीळ काही सुटत नाही. छात्रभारतीत काम करत होतो तेव्हापासून या सार्‍यांना ओळखतो आहे. शरद कदम, अरुण लावंड, मेल्विन गोन्सालविस या माझ्या सहकार्‍यांना तेव्हापासून आश्‍चर्य वाटत आलं आहे. या वयात या मंडळींकडे ऊर्जा येते कुठून? 

दीडशे वर्षांच्या रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न १९८८ मध्ये झाला होता. आम्ही बॅटरी मोर्चा काढला. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. राम मेघे शिक्षणमंत्री. तेव्हा पोलीस लाठय़ा मारत नसत. पोलिसांनी सरळ मोर्च्याची  बाजू घेत सरकारला कळवलं. रात्री दहा वाजता मंत्रालय पुन्हा उघडलं. तेव्हापासून रात्रशाळेवर सरकारने कधी वाईट नजर टाकली नाही. विलासराव देशमुख यांनी शिक्षणमंत्री असताना तर रात्रशाळांना खूपच ताकद दिली. विद्यार्थ्यांना पुस्तकं मोफत द्यायला सुरुवात केली. मुख्यमंत्री असताना भाडंही माफ करून टाकलं. 

मागच्या काही वर्षात या रात्रशाळांचा दर्जा वाढावा म्हणून निकिता केतकर यांच्या 'मासूम' संस्थेमार्फत 'मुख्याध्यापक संघ' आणि 'शिक्षक भारती'ने अनेक उपक्रम राबवले. साठहून अधिक शाळांमध्ये विशेष वर्ग चालवले जातात. शिक्षकांना खास प्रशिक्षण दिलं जात. फिरती प्रयोगशाळा असते. वह्या-पुस्तकं मोफत दिली जातात. रोज रात्री पौष्टिक आहार दिला जातो. निकिता केतकर यांच्या समवेत रात्रशाळेचे निवृत्त मुख्याध्यापक अंकुश जगदाळे स्वत: 
अॅकॅडेमिक बाजू सांभाळतात. त्यामुळे काही शाळा तर शंभर टक्के निकाल देऊ लागल्या आहेत. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात पहिली आलेली रात्रशाळेची विद्यार्थीनी थेट इंग्लडच्या राणीला भेटून आली. प्रिन्स बरोबर इंग्रजीत बोलून आली. पण या रात्रशाळांवर पुन्हा एकदा वाईट नजर पडली आहे. रात्रशाळांसाठी माध्यमिक शाळा संहितेत खास तरतूद आहे. १९६८ मधील शिक्षण आणि समाजकल्याण विभागाच्या विशेष अहवालानुसार अनेक सुधारणा अंमलात आल्या. १३ फेब्रुवारी १९७८ मध्ये विशेष सवलती देण्यात आल्या. रात्रशाळांसाठी स्वतंत्र संचमान्यतेचे निकष आहेत. ते सगळं गुंडाळून ठेवून रात्रशाळांवर आता बुलडोझर फिरवण्यात येतो आहे. २८ ऑगस्ट २०१५ च्या दिवस शाळांच्या निकषाखाली रात्रशाळाही रगडल्या गेल्या आहेत. तीन भाषांना मिळून एक शिक्षक. विज्ञान आणि गणितालाही एक शिक्षक. आठवी, नववी, दहावी मिळून फक्त तीन शिक्षक. रात्रशाळेतील २५० शिक्षकांना ठरवून काढून टाकण्यात आलं आहे. गणिताला आणि इंग्रजीला शिक्षक नाहीत. कुठे सायन्सला शिक्षक नाही. हिंदी, मराठी कुणी शिकवायचं त्याचा पत्ता नाही. अडीच-तीन तासात गोळीबंद शिकवण्यासाठी असलेली व्यवस्था मोडून काढण्यात आली आहे. 

रात्रशाळा विद्यार्थ्यांनी पुन्हा मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्यांवर प्रधान सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले. १ ऑगस्टची ती गोष्ट. दोन महिने उलटून गेलेत. शिक्षण विभाग उलटी कार्यवाही करत आहे. अधिकार्‍यांना शाळेत पाठवून दमदाटी करताहेत. विद्यार्थ्यांना सांगताहेत ओपन स्कूलमध्ये 
अॅडमिशन घ्या. १७ नंबरचा फॉर्म भरा. रात्रशाळेत का शिकता? हे काय शिकायचं वय आहे का? जरा दमानं विचारलं तर अधिकारी म्हणतात आम्हांला मंत्रालयातून आदेश आहे. राजापेक्षा राजनिष्ठ. 

खाडिलकर सरांचा डावा हात आणि डावा पाय हलत नव्हता. पण बोलू लागले आहेत. परवा अशोक बेलसरे, जयवंत पाटील, सुभाष मोरे, संजय वेतुरेकर यांच्या समवेत त्यांना भेटलो. तर पहिला प्रश्न त्यांनीच विचारला, 'नाईटचं काय झालं?'

मी म्हणालो, 'मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, होईल काहीतरी. तुम्ही काळजी करू नका.'

मला म्हणाले, 'दोन महिने झाले. शिक्षक नाहीत.' खाडिलकर सरांच्या दोन्ही डोळ्यांत पाणी होतं. 

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि  लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १२ ऑक्टोबर २०१६