Monday, 29 September 2014

गांधी जयंतीची सुट्टी रद्द करण्याचं कारण काय ?

दिनांक : 29/09/2014

प्रति,
मा.श्री. स्वाधीन क्षत्रिय
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य


महोदय,
भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱया  ̒स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय ̓ या मोहिमेची सुरुवात 2 आॅक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधी जयंतीचं अाैचित्य साधून करण्यात येणार आहे. त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. 2 आॅक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. शाळांनाही म्हणून सुट्टी असते. मात्र यावर्षी पंतप्रधानांनी योजना राबवण्यासाठी ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. मुलांना त्यासाठी शाळेत यावं लागणार आहे. वर्गाची, आवाराची, स्वच्छतागृहांची सफाई करावी लागणार आहे. तसं फरमान राज्याच्या शिक्षण सचिवांच्या सहीने केंद्राच्या अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण यांच्या पत्राचा हवाला देऊन सर्व शाळंना पाठवण्यात आला आहे.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्वच्छता मोहिमेचं कुणीही संवेदनशील नागरिक स्वागतच करेल. पण त्यासाठी गांधी जयंतीची सुट्टी रद्द करण्याचं कारण काय ?  हा दिवस राष्ट्रीय सणाचा आहे. बापूंच्या स्मरणाचा आहे. स्वातंत्र्याच्या आनंदाचा आहे. सण आनंदासाठी असतो. तो आनंद हिरावून घेण्याचं कारण काय ?

यासंबंधीचे केंद्र व राज्य सरकारची परिपत्रकं पाहिली असता 25 सप्टेंबर ते 31 आॅक्टोबर या कालावधीत   ̒स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय  ̓ ही मोहिम राबवायची आहे. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह बांधणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. निर्मल भारत योजने अंतर्गतचा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 आॅगस्ट दिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना, प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह बांधण्याचं आवाहन केलं. त्या आवाहनाचा भाग म्हणूनच ही मोहिम आखण्यात आली आहे.

प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह बांधण्याचा आदेश मा. सुप्रीम कोर्टाने दीड-दोन वर्षापूर्वीच दिला आहे. शिक्षण हक्क कायद्यात तशी स्पष्ट तरतूदही आहे. मी स्वतः या दोन बाबींचा पाठपुरावा करत मा. उप मुख्यमंत्र्याकडे मुंबईतल्या शाळांसाठी निधी मागितला. मार्च 2013 मध्ये 36 कोटीचा निधी वित्त विभागाने मंजूरही केला. लालफितीच्या कारभारामुळे मध्ये वर्ष गेलं. मात्र 15 आॅगस्ट 2014 रोजी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन आवाहन करत होते. त्याचवेळी पहिल्या स्वच्छतागृहाचं उद्घाटन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धारावीत झालं. धारावीच्या गणेश विद्यालयात पहिलं बायो टाॅयलेट लागलेलं आहे. येत्या 6 महिन्यात/वर्षभरात प्रत्येक शाळेत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.  ̒स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय  ̓ ही मोहिम भारत सरकारने घोषणा करण्यापूर्वीच राज्यात सुरू झाली  आहे. त्यामुळे 2 आॅक्टोबरला शाळेची सुट्टी रद्द करण्याची गरज नाही. दिवाळीची सुट्टी सुरू होईपर्यंत केव्हाही हा उपक्रम राबवता येईल आणि पुढेही सुरु ठेवता येईल.

गांधी जयंतीचा दिवस हा पारंपारिक सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. भारताला स्वाधीनता आणि स्वातंत्र्य देणाऱया सर्वच स्वातंत्र्यसेनानींच्या आठवणीचा हा उत्सव आहे. महात्माजींचं महत्त्व कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमेचं कारण दाखवत आनंदाची सुट्टीच रद्द करण्याचा छूपा हेतू तर त्यामागे नाही ना ? अशी साधार शंका वाटते.

कृपया याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा. गांधी जयंतीची सुट्टी कायम ठेवावी आणि स्वच्छता मोहिमेचा उपक्रम 31 आॅक्टोबरच्या कालावधीत शाळांनी सोयीनुसार राबवावा. याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, ही विनंती.
धन्यवाद !

आपला स्नेहांकीत,
कपिल पाटील, वि.प.स.
kapilhpatil@gmail.com


No comments:

Post a Comment