Friday, 3 July 2015

योगामागचा छुपा योग

 

बुद्धांचा योग पतंजलीने लांबवला. पुढच्या योगदिनाला डॉ. हेडगेवार आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लागले तर नवल नाही. पतंजली आणि नरेंद्र मोदी यांना योगाला मान्यता मिळवून देण्याचं श्रेय तर जरूर देता येईल. पण डॉ. हेडगेवारांचा योगाशी संबंध काय? योगापेक्षा विविधतेने भरलेल्या भारतीय संस्कृतीला एकाच साच्यात ओतण्याचा प्रयास आहे.

तदा द्रष्टुः स्वरूपेवस्थानम्।।
स्वतवर, स्वतच्या चित्तावर ताबा मिळवण्यासाठी योगाचा हेतू आहे, असं पातंजली सूत्र सांगतं. 21 जूनला जागतिक योगा डे साजरा करायला लावणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यामागचा हेतू काय आहे?

त्यांची 56 इंच छाती आणि 56 इंच जुबान एव्हाना अवघ्या देशाला आणि जगालाही माहीत झाली आहे. बाजारात मोठ्या आवाजात जो विकतो त्याचाच माल विकला जातो. युपीएच्या अनेक योजना मोदींनी त्यांचं लेबल लावून यापूर्वीच विकून टाकल्या आहेत. आता प्राचीन योग शास्त्रावर योगी नरेंद्रचार्यांचं लेबल लागलं तर नवल नाही.

भारतीय परंपरा आणि भारतीय मानसिकता यांची नाडी त्यांना पक्की कळली आहे. त्यात त्यांचा हात धरणारा दुसरा राजकीय नेता नाही. भारतीय अध्यात्मात दर्शनाचा दर्जा मिळालेल्या योगशास्त्राचा अचूक वापर मोदींनी केला. तर त्यावर आक्षेप घेण्याचंही कारण नाही. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी या प्राचीन व्यायामशास्त्राला ते जागतिक मान्यता मिळवून देत असतील तर त्यावरही हरकत घेण्याचं कारण नाही. भारतीय संस्कृतीच्या एका देणगीला जागतिक मान्यता मिळत असेल तर त्याबद्दल अभिमान बाळगायला हवा. ती मिळवून देण्याचं काम प्रधानमंत्री करत असतील तर तेही तितकेच अभिनंदनाला पात्र आहेत. परंतु मोदी आणि संघ, भाजप परिवाराचा हेतू तितका निर्भेळ आणि निर्मळ आहे काय? अन्यथा 21 जूनची तारीख त्यांनी निवडली नसती.

योगशास्त्राचे कर्ते ऋषी पतंजली मानले जातात. योगाचा शोध त्यांनी लावला काय? योगशास्त्र त्याआधीही होतं. पतंजलींनी ते सर्वप्रथम सूत्रबद्ध पद्धतीने मांडलं. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यना आणि ध्यान-धारणेचाच योग हा विकसित भाग मानला जातो. योग, विपश्यना आणि ध्यानö धारणा ही वैदिक की अवैदिक असा वाद होऊ शकतो. परंतु उपलब्ध पुरावे हे प्रकार अवैदिक असल्याचेच जास्त सांगतात. वैदिकांपेक्षा श्रमण संस्कृतीशी त्यांचं अधिक नातं आहे. धर्माचा त्यात काही संबंध नाही. आणि अगदी देवाशीही संबंध नाही. खुद्द पातंजली सूत्रात ईश्वराचा एकदाच उल्लेख येतो. शंकराचार्यांपासून सुरू झालेल्या हिंदूधर्म परंपरेशीही त्याचं नातं नाही. वैदिकांचं हत्यार यज्ञ होता. अवैदिक श्रमण योग, विपश्यना आणि ध्यानाच्या मार्गाने आत्मशोधाचा प्रयत्न करत हेते. बुद्ध आणि महावीरांच्या वाटेवरून चालणाऱयांची ही साधनं होती. तथागतांनी अष्टांगिक मार्ग सांगितला. अष्टांगिक योग हे त्याचंच संकरित रूप आहे. सांख्य-योग ही भारतीय दर्शनातली जोडी आहे. सांख्य दर्शन कपिल मुनींचे. ते पूर्णपणे निरीश्वरवादी तर योग ईश्वरवादी. कपिल मुनी हा प्रल्हादाचा मुलगा. तर बळीराजाचा काका. डॉ. . . साळुंखेंनी बळीवंश आणि अन्य संशोधनात ते कधीच सिद्ध केलं आहे.

वैदिकांच्या विजयांनंतर अवैदिकांची अनेक शास्त्रं आणि परंपरा  त्यांनी लांबवल्या आणि वैदिक शेंदूर फासून पुनर्स्थापित केल्या. ज्या पातंजलींचं योगशास्त्र आज उपलब्ध आहे, तेच मूळात ..पूर्व दुसऱया शतकातलं आहे. सम्राट अशोकाचा खापर पणतू सम्राट बृहद्रथाचा खून त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंगाने कपटाने केला आणि वैदिक धर्माची स्थापना केली. वैदिकीकरणाच्या त्या कामात पतंजलीची मदत झाली. योगशास्त्राच्या वैदिकीकरणाची सुरवात तेव्हापासूनची आहे. चार्वाक पंथीय आर्य चाणक्यांचं अर्थशास्त्र चंद्रगुप्तापासून बृहद्रथापर्यंत मौर्य राजवटीचं संविधान म्हणून काम करत होतं. पुष्यमित्र शुंगाच्या काळातच अर्थशास्त्र रद्द करून मनुस्मृतीची रचना झाली. म्हणून संघ परिवाराला त्याबद्दल विशेष आस्था आहे. पुढे आर्य चाणक्यालाच लांबवण्यात वैदिकांना आणि संघ परिवाराला यश आलं. आता योगावर पतंजलीनंतर मोदींचं लेबल लागत आहे

विदेशातही योग खूप लोकप्रिय आहे. पण तो धर्माचा किंवा ईश्वरप्राप्तीचा मार्ग म्हणून नव्हे. अनेक भारतीय, अभारतीय प्रचारकांनी योगाचं फ्यूजन जगभर नेलं. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून तर तो लोकप्रिय आहे. पण भारतीय मनात योगाच्या गूढ सिद्धीबद्दल अधिक कुतूहल अन् आकर्षण आहे. त्यामुळे योगशास्त्रात प्रवीण असणाऱयांना ते सिद्ध पुरुष मानतात. जगभर योगाच्या उपयुक्ततेबद्दल असलेली मान्यता हेरून नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशनची मान्यता मिळवली. योगाला कमोडिटी बनवू नका, असं योगपथावर मोदींनी आवाहन केलं खरं, पण रामदेव बाबांपासून श्री श्री रविशंकरांपर्यंत योगाची कमोडिटी कधीच बनली आहे. मोदींमधल्या हुशार व्यापाऱयाला बाजार कळतो. कमोडिटी बनवू नका हे आवाहन ते करत होते, तेव्हा भारतीय मनात रुजलेल्या योग सिद्धीच्या आध्यात्मिक गूढ आकर्षणालाच ते हाक मारत होते. म्हणून योगाबद्दल वेगळी भाषा बोलणारे वेगळे पडत होते. लव्ह जिहादपासून घर वापसीपर्यंतच्या वादावर सोयीस्कर मौन धारण करणारे संघ परिवाराचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी योगपथावरून कुठला राजपथ आक्रमत आहेत, हे सांगण्याची गरज आहे काय? 21 जूनचा दिवस सर्वात मोठा असतो म्हणून योग दिनाची निवड झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि राजकीय हिंदुत्वाचे संवर्धक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृतिदिन आहे 21 जून. आपल्या आद्य गुरूच्या 75व्या स्मृतिदिनाला एवढी मोठी गुरुदक्षिणा देणारा दुसरा संघ स्वयंसेवक झाला नसेल.

पतंजली आणि नरेंद्र मोदी यांचं श्रेय नाकारण्याचं कारण नाही. वैदिक, अवैदिकांचा संघर्ष आजच्या योगपथावर आणण्याचंही कारण नाही. भारतीय संस्कृती संघर्ष आणि संकरातूनच विकसित झाली आहे. योग हाही एक सांझी विरासत आहे. सामायिक वारसा आहे. आचार्य पतंजली हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते. आयुर्वेदाच्या चरक संहितेचं संस्करण त्यांनीच केलं. पाणिनीच्या व्याकरणावर महाभाष्य रचलं. राजयोगाचे ते प्रवर्तक नाहीत. परंतु योगदर्शन या अधिकारी ग्रंथामुळे जणू तेच योगाचे प्रणेते बनले. पण म्हणून त्यांचं महत्त्व कमी होत नाही. ते सव्यसाची संपादक होते. उत्तम निरुपणकार होते. व्यासंगी भाष्यकार होते. त्यांनी योगाने चित्ताचा, व्याकरणाने भाषेचा आणि वैद्यकाने शरीराचा मळ दूर केला. म्हणून त्यांना अकराव्या शतकातल्या भर्तृहरीने अभिवादन केलं आहे. योगाने शरीराबरोबर चित्तशुद्धी अपेक्षित असते. अंहिसेच्या स्वीकाराबरोबर वैरभावाच्या त्यागाची शर्थ असते. या तिघांशी ज्यांचा संबंध नाही, ज्यांच्या मनात केवळ वैर आणि द्वेषाचा यज्ञ सतत जळतो आहे, त्यांनी योग दिनावर काय मुक्ताफळं उधळली? योगाची सक्ती मान्य नाही त्यांनी देशाबाहेर चालते व्हावे, असे म्हणणारे सत्ताधारी पक्षातले खासदार आहेत.

शास्त्रीय योग प्रकारांना धर्मश्रद्धेचा शेंदूर आणि राख फासून वैराग्याची भाषा करणाऱया या मंडळींचं वर्णन 300 वर्षांपूर्वीच तुकोबारायांनी केलं आहे -
ऐसे कैसे जाले भोंदू।
कर्म करोनि म्हणति साधु।।
अंगी लावूनियां राख।
डोळे झांकुनी करिती पाप।।
तुका म्हणे सांगों किती।
जळो तयांची संगती।।

योगाच्या मागची संगती डोळे झाक करून कशी चालेल? साक्षी महाराज, योगी आदित्यनाथांपासून राम माधवांपर्यंत यांची वक्तव्यं काय सांगतात? उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना बोलावयचं नाही आणि आले नाहीत म्हणून राळ उठवून द्यायची. हा उद्योग कशासाठी? सूर्य नमस्काराला नकार देणाऱयांना समुद्रात बुडवून टाकण्याची भाषा का केली जाते? सूर्य नमस्कार आणि योगाचा संबंध काय? योगाला धर्माचा रंग देण्याचं कारण काय? योगाच्या निमित्ताने हिंदू आणि मुसलमान भेद करण्याचं कारण काय होतं? या प्रश्नांची उत्तरं शोधली की या योगा मागचा छुपा योग स्पष्ट दिसेल.

बुद्धांचा योग पतंजलीने लांबवला. पुढच्या योगदिनाला डॉ. हेडगेवार आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लागले तर नवल नाही. पतंजली आणि नरेंद्र मोदी यांना योगाला मान्यता मिळवून देण्याचं श्रेय तर
जरूर देता येईल. पण डॉ. हेडगेवारांचा योगाशी संबंध काय? योगापेक्षा विविधतेने भरलेल्या भारतीय संस्कृतीला एकाच साच्यात ओतण्याचा प्रयास आहे.

21 जूनचा घाट त्यासाठी आहे.

----------------------------------------
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ 
अध्यक्ष, लोक भारती 

----------------------------------------
पूर्व प्रसिद्धी - लोकमुद्रा मासिक - अंक तिसरा - जुलै २०१५

1 comment:

  1. बेक्ट्रियन ग्रीक शासकांना भारतातून पिटाळून लावणारा पुष्यमित्र श्रुंग भारतातील सर्वात महान राजा होता. मोदी विरोध आपली राजनीती असेल, पण त्या साठी इतिहासातल्या महान लोकांना दूषण देणे गरजेचे आहे का. आपली मत आजच्या परिस्थितीनुसार ही मांडू शकतात. बाकी बाबा रामदेव १९९६ पासून योग शिकवितात आहेत. त्या वेळी मोदींचे नाव कुणालाही माहित नव्हते.

    ReplyDelete