पद्मश्री जीव्या सोम्या मशे. काळाच्या पडद्याआड गेले आहेत. चित्र जगताच्या पडद्यावर वारली चित्रं अमर करून. मशे आमच्या डहाणू तालुक्यातील गंजाड गावचे. सरकारने घर बांधून देईपर्यंत कुडाच्याच घरात राहत होते. आदिवासी पाड्यावरचा हा माणूस महान प्रतिभावान कलावंत आहे, हे भारतीय कला जगताला कुठे ठाऊक होतं? आदिवासी पाड्यांवर जाणारे रस्ते जसे गायब असतात. मशेंची पेंन्टिंग्जही प्रतिष्ठित कलाश्रेष्ठींच्या दृष्टीआड होती. फ्रेंच चित्रकार रिचर्ड लॉन्ग यांच्या भटकंतीत मशे सापडले. थेट फ्रांसला गेले. शेण आणि गेरू मातीच्या रंगवलेल्या कापडावरची ती विलक्षण जिवंत चित्र पाहून जगभरचे चित्रकार स्तब्ध झाले. पुढे त्यांना पद्मश्री मिळाली. शासन आणि देश मान्यता मिळाली.
डहाणू तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांवरची घरं वारली चित्र कलेने रंगलेली असतात. मूळात वारली स्त्रियांची ही पारंपरिक प्राचीन कला. जीव्या सोम्या मशे यांनी कुंचला हातात घेतला तेव्हा या पारंपरिक चित्रांना जागतिक परिमाण मिळालं. निसर्ग आणि माणूस यांच्या सनातन आणि विलक्षण नात्याचा रसरशीत जिवंत चित्राविष्कार म्हणजे वारली चित्र. आज शासनाच्या कार्यक्रमाचा, रसिक धनिकांच्या भिंतींचा, विमानतळावरच्या सजावटीचा आणि चित्र जगतातल्या दालनांचा वारली चित्रे हा अविभाज्य भाग बनला आहे. पण जीव्या सोम्या मशे यांची चित्रं असतील तर त्याला तुलनाच नाही. पालघर जिल्ह्याचे पहिले कलेक्टर तरुण, कला रसिक अधिकारी अभिजित बांगर मशेंच्या घरी घेऊन गेले होते. ज्येष्ठ आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांच्यामुळे तो योग जुळून आला. ऐकून, वाचून खूप होतो. म्हातारे झालेले मशे तेव्हा एक नवं चित्र उतरवत होते. जाळ्यात अडकलेल्या माशांचं पेंटिंग होतं ते. चित्र पूर्ण व्हायचं होतं. तरीही पाहणारे आम्ही सगळे त्या जाळ्यात अडकलेल्या माशांसारखे त्या चित्रात अडकून गेलो होतो. प्रतिभेचं हे लेणं, कलेचं वैभव घरापासून अवघ्या काही मैलांवर होतं तरीही आपल्याला इतका उशीर का झाला, याची लाज वाटत होती.
जीव्या सोम्या मशे यांचं परवा निधन झालं. शासनाने त्यांना सरकारी इतमाम दिला. खूप उचित केलं.
जीव्या सोम्या मशे यांना विनम्र अभिवादन!
- कपिल पाटील