Thursday 29 November 2018

विनाअनुदानाचं ग्रहण


पगार आणि अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या विनाअनुदानित शाळा व कॉलेजातील माझ्या हजारो शिक्षक बांधवांनो आणि भगिनींनो,

मा. मुख्यमंत्र्यांसोबत काल (28 नोव्हेंबर) बैठक झाल्यानंतर माझा मोबाईल सारखा वाजतो आहे. 250 हून अधिक फोन येऊन गेले असतील. प्रत्येक फोन अटेंड करणं केवळ अशक्य होतं. काहींशी बोललो. प्रतिक्रिया संतापाच्या होत्या. 10 ते 15 वर्षे वाट पाहिल्यानंतर हातात चतकोरही गवसत नसेल तर भावनांचा विकोप होणारच. पण भावांनो आणि बहिणींनो थोडं माझं ऐकाल का?

माझ्यावर विश्वास ठेवा. माझं फक्त थोडं ऐका. तुम्हाला खात्री देतो ही लढाई आपण हरणार नाही. पण लढाई अत्यंत हुशारीने लढावी लागते. रणनीती आखून लढावी लागते. भावनातिरेकाने जिंकता येत नसते. 

वस्तीशाळेचे शिक्षक हे काय माझे मुंबईतील मतदार शिक्षक नव्हते. खेड्यापाड्यातली ती मुलं होती. उशिरा ती संपर्कात आली. पण त्यांनी विश्वास ठेवला. अभेद्य एकजूट केली. व्यवस्थित आखणी करून लढाई केली. मी त्यांना एकच अट घातली होती. कोणालाही वर्गण्या देत बसू नका आणि मंत्रालयात कोणीतरी दलालाला पैसे देऊन आपलं काम होत नसतं. शिक्षकी पेशात आहोत आपण. या पेशाला साजेशी लढाई करायला हवी. महात्मा गांधींनी साध्य आणि साधन यांचा विवेक सांगितला होता. त्याच रस्त्याने वस्तीशाळेच्या माझ्या बांधवांनी संघर्ष केला. ते जिंकले. 

मुंबईतील नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांवरील शिक्षक, मुंबईतील विकास प्रकल्पांमुळे स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांमुळे वाढलेल्या तुकड्या, पट वाढला म्हणून शाळांनी नेमलेले शिक्षक. 650 हून अधिक संख्या होती त्यांची. मुंबईतील शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यावेळच्या सरकारला आम्ही पटवून दिलं. मुंबईच्या त्या शिक्षकांचा अनुदानाच्या चक्रव्यूहात अभिमन्यू होऊ दिला नाही. हे कसं झालं म्हणून चौकश्याचं शुक्लकाष्ठ लावण्यात आलं. छळण्याचा प्रयत्न झाला. पण नियमाने, शासन निर्णयाने त्या शिक्षकांना न्याय मिळाला. 

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक 10 ते 15 वर्षांपासून डोळ्यात पाणी आणून अनुदानाची वाट पाहत आहेत. काहींच्या डोळ्यातलं पाणी आटलं आहे. मागचं सरकार असतानाच नागपूरच्या अधिवेशनात मा. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मी त्यांचे आदरणीय पिताश्री शंकररावजी चव्हाण यांचा दाखला देत कायम विनाअनुदान शब्द काढण्याची मागणी केली होती. अशोक चव्हाण यांनी तो मान्य केला. कायम शब्द गेला. राहिला प्रश्न अनुदानाचा. गेली पाच वर्षे सगळेच आशेवर आहेत. घोषित, अघोषित, टप्यावरचे आणि नैसर्गिक वाढीच्या तुकडीवरचे सगळ्यांचाच प्रश्न आहे. पण गट आणि तट पडले आहेत. एकजूट नाही. गेली तीन वर्षे मी पाहतो आहे, आणि मला अधिकच वाईट वाटतं आहे. नुसतं आश्वासन दिलं तर आपण अभिनंदनाचा वर्षाव करतो. मंत्र्यांबरोबर सेल्फी काढण्यात धन्यता मानतो. मी काही विनाअनुदानित कृती समितीचा नेता किंवा पदाधिकारी नाही. ती मंडळी बोलवतही नाहीत. पण माझ्या मनात त्याबाबत राग नाही. मी कधीही मा. शिक्षणमंत्र्यांचं अभिनंदन केलं नाही. नुसती यादी घोषित झाली, घोषित करतो म्हणून सांगितलं, अनुदान देतो म्हणून सांगितलं, पहिला टप्पा नुसता जाहीर केला एवढ्या साध्या घोषणांवर सरकारचं सगळेच अभिनंदन करतात. मी कधीही अभिनंदन केलं नाही. मी या प्रत्येकवेळेला निषेध केला. आपल्यातल्या काही मंडळींना माझ्या या निषेधाचं आश्चर्य वाटत होतं. कोडं पडत होतं. पण माझी स्वच्छ भूमिका आहे. कवी केशवसुतांच्या शब्दात किंचित बदल करून, 'खादाड नसे माझी भूक, चतकोराने मला न सुख' कारण हा माझा अधिकार आहे. घामाचा मेहनतीचा पैसा आहे जो आजवर मिळत आलेला नाही. 

काल मा. मुखमंत्र्यांच्या बैठकीत कोणताही फारसा वाढीव बोजा न येता अनुदान देणं शक्य आहे , 100 टक्के अनुदान देणं शक्य आहे हे मी मांडलं. किमान ज्यांना 10 वर्षे उलटून झाली आहेत त्यांना तरी किमान विनाविलंब 100 टक्के अनुदान द्या. आता कोणताच भेदभाव करू नका. सगळ्या अघोषित याद्या घोषित करून टाका. जे घोषित आहेत त्यांना सूत्रानुसार तरी वेतन द्या. सरकारने जे सूत्र ठरवलं आहे त्याला चिकटून रहावं, ते बदलू नये एवढीच माझी प्रार्थना आहे. 20 टक्के द्यायचे आणि पुढचा आदेश येईपर्यंत फक्त 20 टक्केच देत रहायचं, पुन्हा पुन्हा 20 टक्याचं आश्वासन द्यायचं ही घोर चेष्टा आहे. सरकारच्या अडचणी आहेत हे मान्य केलं तरी शिक्षणाला प्रायॉरिटी मिळायला हवी. उपाशीपोटी लोकांनी जगायचं कसं? शिक्षकांनाही मुलं आहेत. संसार आहे. याचा विचार व्हायला हवा. काल मा. शिक्षणमंत्र्यांनी जे काही जाहीर केलं आहे, ते तुमच्या समोर आहे. ते मला मान्य असतं तर मा. शिक्षणमंत्र्यांच्या सोबत जाऊन माध्यमांच्या समोर मी उभा राहिलो असतो. पण मी ते कधीच करत नाही. अनुदान नाकारणाऱ्या किंवा आश्वासन देणाऱ्या शिक्षणमंत्र्यांबरोबर सेल्फी काढण्यात मला आनंद नाही. मी अन्यायग्रस्त, शोषित, पीडित शिक्षकांच्या सोबत आहे. 

मी आता महाराष्ट्रभर दौरा करणार आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्हाला भेटेन. नंतर आपण एक होऊ आणि लढाईची रणनीती आखू. 10, 20 टक्के नाही 100 टक्के अनुदान मिळवू. तोपर्यंत तुमच्या प्रत्येकाचा फोन उचलणं आणि प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलणं मला शक्य होणार नाही, कृपया त्याबद्दल मला माफ करावं. पण मी तुमच्या सोबत आहे. आपण एकत्रपणे संघर्ष करू. आपण लढूया, जिंकूया!

आपला,

17 comments:

  1. God bless you saheb
    And best wishes too
    .

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब आपले मनापासून अभिनंदन

      Delete
  2. साहेब मग तुम्ही त्यांना विधान परिषदेत विरोध का नाही केला?

    ReplyDelete
  3. साहेब न्याय अथवा १०० % अनुदान मिळेपर्यंत आमची रिटायरमेंट आलीय , पेन्शन नाही , फंड नाही , मेडीकल क्लेम नाही , सेवा संरक्षण नाही , मुला मुलींची लग्नाला पैसा नाही , सर्रास शिक्षक ५० ते ५५ वय वर्ष ओलांडली आहेत एवढा अन्याय होत असताना आम्ही कोणाकडे पहावे नाही तर आमची स्थिती मागता येईना भीक मग मास्तरकी शीक अशीच आहे , एकाला पाझर फुटेना २० वर्ष काम करून , देव तुम्हा सगळयांचं भलं करो.

    ReplyDelete
  4. साहेब न्याय अथवा १०० % अनुदान मिळेपर्यंत आमची रिटायरमेंट आलीय , पेन्शन नाही , फंड नाही , मेडीकल क्लेम नाही , सेवा संरक्षण नाही , मुला मुलींची लग्नाला पैसा नाही , सर्रास शिक्षक ५० ते ५५ वय वर्ष ओलांडली आहेत एवढा अन्याय होत असताना आम्ही कोणाकडे पहावे नाही तर आमची स्थिती मागता येईना भीक मग मास्तरकी शीक अशीच आहे , एकाला पाझर फुटेना २० वर्ष काम करून , देव तुम्हा सगळयांचं भलं करो.

    ReplyDelete
  5. Saheb,asa sakhol vichar phakt ani phakt tumhich Karu shakta..Salam tumchya kamala....

    ReplyDelete
  6. Saheb,2011_12 prastavit pdanchi manyata gyavi.sahkaryya baddal dhanyawad.

    ReplyDelete
  7. Saheb,2011_12 prastavit pdanchi manyata gyavi.sahkaryya baddal dhanyawad.

    ReplyDelete
  8. धन्यवाद साहेब आणि खुप खुप आभार

    ReplyDelete
  9. लढवय्ये आमदार मा.कपिल पाटील साहेब जिंदाबाद.आम्ही आपल्या सोबत आहोत.लढू या..जिंकू या.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  10. काळाची गरज आहे. योग्य रणनीती गरजेचीच आहे.

    ReplyDelete
  11. बरोबर आहे सर .नेहमीच ज्या पोटतीकडीने तुम्ही आमचे प्रश्न मांडता त्यासाठी सलाम सर.

    ReplyDelete
  12. साहेब आपल्या कामाला यश येवो व उच्च व ज्युनिअर कॉलेज चे 1349+146 या सर्वांना व आणखीन काही प्रस्ताव असेल त्यांना अनुदान मिळो हि परेमेश्वरजवळ विनंती

    ReplyDelete
  13. साहेब आपने और गानार साहब ने हम विनानुदानित के प्रचलित का मुद्दा रखा इसके लिए आपको सत सत धन्यवाद।
    सर जी आगे भी हमारा ध्यान रखना ।हमें आप पर गर्व है।

    ReplyDelete
  14. साहेब आपण करत असलेल्या कार्याला सलाम पण, 100 % अनुदान मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा आंदोलन हाच पर्याय उरतोय,सत्ता बदलते मंत्री बदलतात आणि अनुदानासाठी वेगवेगळे नियम लावले जातात, हे सर्व थांबले पाहिजे शिक्षकांना त्यांच्या हक्काचा पगार जर मिळत नसेल तर तो कसा जगणार😢
    तरी सुद्धा आम्ही आमचे शिक्षणाचे कार्य अविरत चालू ठेवतोय कारण त्या लहान चिमुकल्यांना घडवणे हेच आमचे कर्तव्य आहे ,आम्ही त्यांच्याशी जर अप्रामाणिक वागलो तर पूर्ण पिढी बरबाद होईल,
    मग का हो आमच्या हक्काचे अनुदान देण्यात शासन अप्रामाणिकपणा दाखवत आहे.

    साहेब आपण आम्हांस न्याय मिळवून द्यावा हीच एक विनंती👍👍👍👍👍👍

    ReplyDelete