प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महोदय,
कोरोनाच्या काळातही शिक्षण सुरू रहावं यासाठी आपण आज झूम ऍप द्वारे मीटिंग बोलावली त्याबद्दल आपले आभार.
कोरोनाच्या काळातही शिक्षण सुरू रहावं म्हणून खुद्द मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी आणि मागच्या दहा वर्षात मुख्यमंत्री स्तरावर अशी बैठक प्रथमच व्हावी , याचं सर्वांना अप्रूप होतं आणि आहे. आणि म्हणून आपले मनःपूर्वक आभार मानतो.
दुसरे आभार यासाठी की आपण, सर्वांनाच विश्वास देत आहात की शाळा, कॉलेज सुरू होऊ शकल्या नाहीत तरी शिक्षण खंडित पडता कामा नये. शिक्षण सुरू राहिलं पाहिजे. शिक्षकांना शिक्षण सोडून अन्य कोणतंही काम देता कामा नये. यासाठी कठोरात कठोर कायदा सरकार करील, असं आश्वासन आपण जे दिलंत ते खूपच दिलासादायक आहे.
1 जूनपासून विनाअनुदानित शिक्षक आंदोलन करणार आहेत. त्याकडे मी लक्ष वेधलं होतं. त्याबद्दल बोलताना आपण अनुदानापासून सगळ्यांच प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. येत्या काही दिवसात हे प्रश्न निकाली लागावेत, एवढीच अपेक्षा.
आपण स्वतःच म्हटल्याप्रमाणे, गुरू देवो भव हे केवळ सुभाषित राहता कामा नये. त्यामुळे शासन आणि शिक्षण खातं यापुढे मुख्यमंत्री यांच्या या भूमिकेचा विसर पडू देणार नाही, ही अपेक्षा आहे.
माझी आपणाला विनंती आहे की, 20 टक्क्यांचं जे अनुदान विधिमंडळाने मंजूर केलेलं आहे. त्यात कोणतीही दिरंगाई न करता व नवे निर्बंध न लावता तातडीने वितरित करण्याचे आदेश आपण द्यावेत, ही विनंती.
शिक्षण तातडीने सुरू कसे करता येईल यासंबंधी आपण काही लिखित सूचना मागितल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे -
1) जिथे कोरोनाचा बिलकुल प्रादुर्भाव नाही, त्या अतिदुर्गम भागातील digitally deprived शाळा, कॉलेज योग्य ती काळजी घेऊन फिजिकली सुरू करणं उचित ठरेल.
2) कोरोना प्रादुर्भावीत असलेल्या आणि शक्यता असलेल्या भागांमध्ये शाळा, कॉलेज सुरू करण्याची घाई न करता तिथे आपण सुचवल्याप्रमाणे सर्व पर्याय एकाचवेळी अमलात आणण्याचा प्रयत्न करावा.
3) ऑनलाईन, डिजिटल आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून SCRT ने शिक्षण तातडीने सुरू करावं.
4) दूरचित्रवाणी व्यतिरिक्त राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या वर्तमानपत्रातून रोज किमान 2 पानं शासनाने मागावीत. सवलतीच्या जाहिरात दरात ती उपलब्ध होऊ शकतील. या दोन पानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होमवर्क, वर्कशीट आणि ऍक्टिव्हिटी देता येतील. जेणेकरून जिथे डिजिटली शक्य नाही, तिथे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तीशः अभ्यास करता येईल.
5) 15 ते 30 जून दरम्यान कोरोना काळातील किंवा कोरोनानंतरच्या शिक्षणाबाबत अत्यंत नियोजनबध्द ऑनलाईन प्रशिक्षण शिक्षकांना दिले जावे. शाळा, कॉलेज सुरू होतील तेव्हा काळजी घेण्यापासून आणि शाळा, कॉलेज बंद आहेत तोवर शिक्षण कसे सुरू ठेवायचे यासंबंधी हे प्रशिक्षण असले पाहिजे.
15 जून पासून सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम सुरू करावं. विद्यार्थी आणि पालकांना संपर्क साधणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे आणि त्यांचे फोन, व्हाट्सअॅपद्वारे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे. विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी क्लास टीचर आणि विषय शिक्षकांनी आपल्या फोनवर उपलब्ध राहणे.
6) केंद्र सरकारच्या दिशा अॅप वर अवलंबून न राहता SCRT ने स्वतःचे मॉड्युल्स तयार करावेत. या क्षेत्रात ज्यांनी आधीच काम सुरू केलंय अशा सर्व संस्थांचा उपयोग करून घ्यावा.
7) सर्व विषयांची वर्क बुक, ऍक्टिव्हिटी बुक तयार करण्यात यावीत. सर्व विद्यार्थ्यांना ती पुढच्या महिन्याभरात मोफत पोचवण्यात यावीत. म्हणजे वेगळ्या वह्यांची गरज लागणार नाही. पाठ्यपुस्तकंही मोफत पुरवण्यात यावीत. क्लास टीचर आणि विषय शिक्षक शाळा सुरू नसली तरी विद्यार्थ्यांच्या वर्क बुकचं मूल्यमापन करू शकतील. त्या आधारावर निकाल लावू शकतील.
अभ्यासक्रम कमी करावा. किमान कौशल्य व अध्ययन क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात यावा.
9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांना आपण सुचवल्याप्रमाणे लोडेड टॅब देता आले तर प्रयत्न करावा. किंवा ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध ठेवावा.
8) कोरोनाचं संकट कमी झाल्यावर शाळा, कॉलेज पुन्हा फिजिकली सुरू करता येतील. त्या सुरू करण्यापूर्वी इमारतींचे निर्जंतुकिकरण करणं आणि शिक्षकांनी त्याआधी किमान 15 दिवस होम कॉरंटाईन राहणं आवश्यक करण्यात यावं.
9) मुख्यमंत्री महोदय आपण सुचवल्याप्रमाणे शिक्षकांना आता कोणतंही अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये. याबाबत महसूल विभागाने खास आदेश काढण्याची आवश्यकता आहे. शाळा, कॉलेज व्यतिरिक्त कोरोना ड्युटी करणारे सर्व शिक्षक किंवा अन्य शासकीय, निमशासकीय कामकाजावर असलेले अतिरिक्त शिक्षक त्या सर्वांना तातडीने परत बोलवण्यात यावं. सरप्लस शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळा, कॉलेज मध्ये तातडीने पाठवण्यात यावं.
10) शाळांना यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणून तातडीने 10 टक्के नॉन सॅलरी ग्रँट दोन टप्प्यात in advance वितरित करण्यात यावी. त्यासाठी कोणतेही अन्य निकष लावण्यात येऊ नयेत. रक्कम आधी पोचणं आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण करता येणार नाहीत.
11) शिक्षकांच्या उपलब्धतेसाठी मीटिंगमध्ये सुचवल्याप्रमाणे 28 ऑगस्ट 2015 संचमान्यते बाबतचा जीआर, 7 ऑक्टोबर 2015 कला क्रीडा विषयावर अन्याय करणारा जीआर आणि 17 मे 2017 चा रात्रशाळा बंद करणारा जीआर हे तिन्ही शासन निर्णय तातडीने रद्द करावेत. बंद पडलेल्या रात्रशाळा पुन्हा पूर्ववत सुरू करणं आवश्यक आहे.2012 मध्ये नियुक्त शिक्षकांवर
2018 मध्ये करण्यात आलेली बेकायदेशीर कारवाई तातडीने रद्द करण्यात यावी.
यामुळे शिक्षक उपलब्ध होतील. शिक्षकांना एक नवा विश्वास मिळेल. आणि ते जोमाने कामाला लागतील.
12) सफाई आणि आरोग्य विषयक सुविधांसाठी नॉन टिचिंग स्टाफच्या भरतीसाठी परवानगी देण्यात यावी.
13) स्थलांतरित कामगारांच्या मुलांची नोंद त्यांच्या गावच्या शाळांमध्ये तातडीने करण्यात यावी. ते जेव्हा शहरांमध्ये परत जातील तेव्हा त्यांचं रिपोर्ट कार्ड सोबत पाठवावं. स्थलांतरामुळे शहरी शाळांचा पट कमी होणार आहे. त्यामुळे संचमान्यता पुढील दोन वर्षांसाठी स्थगित ठेवण्यात याव्यात.
14) मुलीचं शिक्षण याकाळात बंद होण्याची शक्यता रजनीकांत गरुड आणि अन्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. ती साधार आहे त्यामुळे मुलींचे शिक्षण बंद पडणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत.
15) अनुदानाचा प्रश्न हा सुटू शकतो. अनुदान नव्हे तर हा पगाराचा प्रश्न आहे. शिक्षण विभागाच्या सध्याच्या मंजूर निधीमधून सर्व विनाअनुदानित शिक्षकांचा पगार भागवता येऊ शकतो. फक्त शासनाची त्यासाठी तयारी हवी. सर्व घोषित, अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विनाअनुदानित पात्र शिक्षकांना तातडीने वेतन देण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी. त्यासाठी कोणत्याही नव्या निकषांची, तपासणीची अट ठेवण्यात येऊ नये.
16) ऑनलाईन शिक्षणाच्या दृष्टीने मदत होईल अशा ICT, संगणक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावेत. वाड्या - वस्त्यांवर, आश्रम शाळांमध्ये आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळा यांच्याबाबत स्वतंत्र आढावा घेण्यात यावा.
17) यावर्षी अभ्यासक्रमात कपात पण कला, क्रीडा अशा मुलांच्या उर्जाना वाट करून देणाऱ्या विषयांना अधिक महत्त्व द्यावं. दहावीच्या परीक्षेमध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये कला व क्रीडा विषयाचा समावेश करावा.
18) कृपया शिक्षण विभागाला यासंबंधी संपूर्ण आराखडा व नियोजन तयार करायला सांगावं. हा आराखडा आधी जाहीर करुन, त्यावर पुन्हा मतं मागवावीत. अंतिम निर्णय घ्यायला थोडा उशीर झाला तरी चालेल. परंतु कोणत्याही नियोजनाशिवाय कोणताही निर्णय घाईचा व अपुरा ठरू शकतो.
धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, विपस
दिनांक : 31 मे 2020
-------------------------------------
कोरोना काळातलं शिक्षण ...
Tap to read - https://bit.ly/2X2pUI7
-------------------------------------