Monday, 22 February 2021

सुशीलाबाई महाराव : प्रेरणादायी शिक्षिका


कर्मवीर भाऊराव पाटील आणि साने गुरुजी यांच्या शिष्या, मुंबईतील ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापिका सुशीलाबाई महाराव यांचे काल ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. अखेरपर्यंत कार्यरत होत्या. चित्रलेखाचे संपादक, सत्यशोधक वक्ते व नाटककार ज्ञानेश महाराव यांच्या त्या आई. 

माझी गोष्ट नावाचे त्यांचे आत्मचरित्र अलीकडेच प्रसिद्ध झाले होते. प्रख्यात साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले होते. अलंकृत भाषा आणि निखळ जीवनानुभव हे त्यांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. बाई मोठ्या निर्धारी होत्या. मुलांना शिकवलं, मोठं केलं. चिकित्सक आणि विवेकी दृष्टिकोन दिला. अखेर पर्यंत स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगल्या. 

मुंबई महापालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका होत्या. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. शिक्षिका असताना अर्ध मागधी भाषा शिकल्या. जैन संस्कृतीचा अभ्यास केला. भारतातील अवैदिक संस्कृतीचा संस्कार त्यातूनच त्यांनी घेतला असावा. त्यांचे अनेक विद्यार्थी नावारुपाला आले. त्याकाळी महापालिका शाळांमध्ये गर्दी असायची. सुशीलाबाई महाराव यांच्यासारख्या शिक्षकांनी तो विश्वास निर्माण केला होता. 

त्यांचं वाचनही अफाट होतं. संगीत आणि नाटकाची आवड होती. अभिनयाचीही. नुसती आवड नव्हे जाण होती. तो वारसा त्यांनी आपल्या मुलांकडे दिला. रंगमंचावरचा ज्ञानेश महारावांचा बहुढंगी अविष्कार पाहिला की त्यांच्या आईने दिलेल्या देणग्या लक्षात येतात. 

सुशीलाबाईंचे वडील साई बाबांचे मित्र होते. भक्त नव्हते. साई बाबांना चमत्कार नंतर जोडले गेले. श्रद्धा, सबुरी आणि सर्व धर्म समभावाचा संदेश त्या संत फकिराने आपल्या आयुष्यात लोकांना दिला. त्यांच्या आठवणी साध्या, सरळ शब्दात त्यांनी लिहिल्या आहेत. 

सुशीला बाई त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही साध्या, सरळ जगल्या. निढळ हाताने मदत केली. हात पसरले नाहीत. ज्ञानेश महाराव यांच्यातला सत्यशोधक आणि चिकित्सक संपादक ही सुशीलाबाई महाराव यांचीच देणगी आहे. 

सुशीलाबाई महाराव यांना विनम्र श्रद्धांजली!

- कपिल पाटील