Thursday, 8 April 2021

दत्ताला विसरता कसं येईल...

 

दत्ता इस्वलकरांचे वडिल मिलमध्ये जॉबर होते. इस्वलकरही वयाच्या २३ व्या वर्षी १९७० मध्ये मॉर्डन मिलमध्ये लागले. ७२ व्या वर्षी इस्वलकर गेले. गिरणी कामगारांना न्याय मिळवून देणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया वर्तमानपत्रांनी दिली. गिरण्यांची वाताहात झाली त्याला आता ४० वर्ष होतील. गिरण्या म्हणजे काय? हे मुंबईतल्या नव्या पिढीला माहित असण्याचं कारण नाही. आठ एक वर्षांपूर्वी गिरणगावातल्या एका नाईट स्कूलमधल्या मुलांशी बोलत होतो. तुम्ही सारे गिरणगावातले आहात, असं मी बोलल्यावर त्यांची 'नाही' हीच पहिली प्रतिक्रिया आली. मला माझी चूक कळली. मी विचारलं, लालबाग, परळमध्ये राहणारे तुमच्यापैकी कितीजण आहेत? सगळ्यांचे एक जात हात वर आले. इथे गिरण्या होत्या, हे त्यांच्या गावी नव्हतं. मुंबई गिरणी कामगारांच्या घामातून  उभी राहिली, हे नव्या पिढीला माहित नाही.


दत्ता इस्वलकर गिरणी कामगारांचे नेते झाले ते गिरण्या संपल्यानंतर. वाताहात झाल्यानंतर. लढाई हरल्यानंतर. लढाई हरलेले गिरणी कामगार कधीच न संपलेल्या दत्ता सामंतांच्या संपाला कधीच दोष देताना मी ऐकलं नाही. न दत्ता इस्वलकरांकडून. मुंबईतल्या गिरण्या संपानंतर संपल्या. पण संपामुळे नाही. त्याची आर्थिक, राजकीय कारणं गिरणी कामगार जाणून होते. नारायण मेघाजी लोखंडे ते भाई श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या गिरणी कामगारांची आर्थिक आणि राजकीय समज पक्की होती. हा कामगार मुजोर गिरणी मालकांसमोर नमला नाही. कामगारांमध्ये फूट पाडणाऱ्या राजकीय नेतृत्वालाही कधी साथ देता झाला नाही. गिरणी कामगारांची मुलं मात्र उद्ध्वस्त झाली. वैफल्यामध्ये करपून गेली. त्यातुन जाती व धर्म द्वेषाच्या राजकारणाला बळी पडली. म्हाताऱ्या गिरणी कामगारांच्या मनातला आणि विचारातला लाल बावटा मात्र कधीच खाली आला नाही. तो लाल बावटा अखेर पर्यंत खांद्यावर वागवणारे समाजवादी दत्ता इस्वलकर काल गेले.

निखिल वागळे यांचा परवा रात्री उशिरा फोन आला होता. 'अरे आपला दत्ता सिरीयस आहे. जेजे मध्ये आहे. त्याला उपचार नीट मिळतील असं पहा.' मी म्हणालो, जाऊन येतो. वागळे म्हणाले, 'तुझा फोनही पुरेसा आहे. कोविडच्या काळात हॉस्पिटलमध्ये जाणं जोखमीचं आहे.' काल संध्याकाळी जेजे हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलचे डीन डॉ. माणकेश्वर आणि इतर सिनियर डॉक्टरांशी बोललो. आम्ही सर्व काही करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. फक्त कोविडच्या टेस्टची वाट ते पाहत होते. पण उशीर झालेला होता. काही तासही उरलेले नव्हते. एक ईसीजी काढायचं ठरलं होतं. त्यांनी ईसीजी मागवला. तो फ्लॅट निघाला. 

इस्वलकरांची मुलगी आणि जावई यांची भेट झाली. डॉक्टरांनी त्यांना पूर्वकल्पना दिली होती. डॉक्टरांना मी म्हणालो, हरलेल्या गिरणी कामगारांना घर मिळवून देण्याची लढाई जिंकून देणारा हा नेता आहे. तो इथे हरता कामा नये. पण खरंच उशीर झाला होता. त्यांचे रिपोर्ट डॉक्टर मला समजून सांगत होते, तेव्हा त्याची जाणीव होत होती. इस्वलकर तसे गेले चार वर्षांपासून दूर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराने टोक गाठलं. मेंदूतील रक्त स्त्रावाने त्यांचे प्राण घेतले.

निखिल वागळेंना मी फोन करून सगळं सांगितलं. ते खूपच अस्वस्थ झाले होते. आणि इस्वलकर गेल्याची बातमी पुन्हा त्यांनीच फोनवरून सांगितली तेव्हा त्यांचा स्वर व्याकुळला होता. दत्ता इस्वलकरांची गिरणीच्या आवारातली लढाई वागळेंनी पाहिली होती. नंतर दत्ता इस्वलकर वागळेंच्या सोबत 'महानगर' या सांज दैनिकाचे व्यवस्थापकीय काम पाहू लागले होते. वागळेंच्या अडचणींच्या व संघर्षाच्या काळात इस्वलकरांनी त्यांना साथ दिली होती. वागळे झुंजार. तसे इस्वलकरही.

मॉडर्न मिलमधला गिरणी कामगार दत्ता इस्वलकर गिरणी कामगारांचे नेते बनले २ ऑक्टोबर १९८९ ला. बंद पडलेल्या गिरणी कामगारांचे नेते. लढाई हरलेल्या, वाताहात झालेल्या गिरणी कामगारांचे नेते. बंद गिरणी कामगार संघर्ष समितीच त्यांनी स्थापन केली. सगळ्या संघटनांना एकत्र केलं. वर्षभरानंतर त्यांनी बेमुदत उपोषण केलं. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मध्यस्तीनंतर उपोषण सुटलं. नंतर १९९१ नंतर विकास नियंत्रण नियमावली आली. त्याचा फायदा गिरणी मालकांनी उचलला. जमिनी विकल्या गेल्या. एक काळ गिरण्यांच्या चिमण्या जिथे आकाशात धूर सोडत होत्या तिथे त्या चिमणीच्या उंचीची एक इमारत नव्हती. आता स्काय स्क्रॅपर टॉवर उभे आहेत. कामगारांची मुंबई श्रीमंतांची लंका बनली.

दत्ता इस्वलकरांनी त्याच जमिनींवर गिरणी कामगारांना घरं मिळवून देण्यासाठी लढा सुरु केला. कामगारांच्या घरांचा हक्क आज मान्य झाला आहे. तो हक्क मिळवून देणारा नेता मात्र काळाच्या पडद्याआड गेला आहे.

दत्ता इस्वलकर  समाजवादी चळवळीत वाढलेले. पण त्यांच्यावर वैचारिक प्रभाव होता तो गजाजन खातू यांचा. त्यांच्याशी मसलत केल्याशिवाय इस्वलकर पुढचं पाऊल उचलत नसत. राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, माणगावचं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, डॉ. बाबा आढावांचं विषमता निर्मूलन शिबीर, जॉर्ज फर्नांडिस यांची आंदोलनं, मधू दंडवतेंच्या सभा. दत्ता इस्वलकर प्रत्येक ठिकाणी असत.

केंद्रात २०१४ मध्ये मोदींची राजवट आली आणि सगळ्याच डाव्या, समाजवादी, पुरोगामी चळवळींमध्ये अस्वस्थता पसरली. पुरोगाम्यांचं विखुरलेपण आणि प्रतिक्रियावाद्यांची संघटीत, हिंसक एकजूट यामुळे दत्ता इस्वलकर अस्वस्थ झाले नसते तरच नवल. पाच वर्षांपूर्वी संघमुक्त भारतची घोषणा घेऊन नितीशकुमार पुन्हा सत्तेवर आले होते. ते पर्यायी राजकारण उभं करू शकतील या अपेक्षेने मी आणि लोक भारतीने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा अनेकांशी चर्चा करत होतो. २२ एप्रिल २०१७ ला नितीशकुमार मुंबईत येणार होते. त्यानिमित्ताने सहयोगी, समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन करणारं पत्रक ८ मार्च २०१७ रोजी दत्ता इस्वलकरांनी काढलं होतं. त्यात ते म्हणाले होते, 'मोदींची राजवट आल्यापासून चळवळीतीलच नव्हे तर सर्वच संवेदनशील नागरिक अस्वस्थ आहेत. देशात लोकशाही समाजवादी विचारांचा पर्याय उभा राहावं असं आपल्या सर्वानाच प्रामाणिकपणे वाटते. आपण सारे गटातटात विखुरलेले असलो तरी या मुद्द्यावर आपल्या सर्वांचं एकमत व्हावं. महाराष्ट्रात तरी किमान आपण साऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे.'

'परस्परांशी संवाद व्हावा', हे  दत्ता इस्वलकरांचं आवाहन होतं. नितीशकुमारांबरोबर जाण्याचा तो प्रयोग बिहारमध्ये बदललेल्या राजकारणामुळे पुढे जाऊ शकला नाही. पण किमान पर्यायी राजकारण उभं राहण्यासाठी परस्परांशी संवाद व्हावा, हे  दत्ता इस्वलकरांचं आवाहन अप्रस्तुत झालेलं नाही. त्यांच्या दूर्धर आजारापेक्षा मतभिन्नतेची कर्कशता त्यांना अधिक त्रास देत होती. कोविडच्या काळात होत असलेली असंघटीत मजुरांची वाताहात आपल्यासमोर आहे. कामगार संपले. कामगारांचे नेतेही. हे वास्तव अस्वस्थ करतं.

दत्ता इस्वलकर यांच्या जाण्याने ही अस्वस्थता आणखीनच तीव्र केली आहे. आजार तीव्र होतो तशी. आजार दूर्धर होता त्यांचा. अवस्थतेच्याबाबत तसं व्हायला नको. हरलेल्या कामगारांना हक्काचं घर मिळवून दिलं होतं दत्ता इस्वलकरांनी. विसरता कसं येईल ते. ती जिद्द बाळगणं हेच खरं त्यांना अभिवादन ठरेल. 

- कपिल पाटील    

7 comments:

  1. भावपूर्ण श्रध्दांजली पुरोगामी नेतृत्व.. महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशन च्या वतीने

    ReplyDelete
  2. विनम्र अभिवादन आणि आदरांजली

    ReplyDelete
  3. ददत्ता ईस्वलकरांचे निधन मनाला चटका लावून गेले.गिरणी कामगारांचा सच्चा नेता हरपला.मध्यंतरी गिरणी कामगारांच्या लढ्यात संदर्भात त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूरी संघात छायाचित्रांचं सुंदर प्रदर्शन लावले होते.त्यावेळी त्यांची झालेली भेट ही अखेरची होती.त्या प्रदर्शनामुळे गिरणगावाचे दिवस आठवले.ते हरवलेले दिवस पुन्हा येणार नाहीत.दत्ताजीही गेले.गिरणी कामगारांच्या स्मरणात ते दीर्घ काळ राहतील.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

    ReplyDelete
  4. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  5. गेल्या 10 वर्षात गिरणी कामगारांना एकही घर मिळालं नाही, पृथ्वीराज साहेबानी दिली त्यानंतर एकालाही न्याय द्यावासा वाटलं नाही. घर बांधून असताना वाटप का नाही

    ReplyDelete
  6. गिरणी कामगारांना न्याय मिळवून देणारे असामान्य नेतृत्व समाजवादी नेते स्वर्गवासी दत्ता इस्वलकर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली . डॉक्टर रोहित रमेश गडकरी उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग पुणे शहर

    ReplyDelete