गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ ला झाली. पण त्यामागे फाळणीचं कारण नव्हतं, कारण होतं २६ वर्षांपूर्वीचं.
'४ जून १९४१' या पुस्तकाचा भाग तिसरा -
.........................
भाग ३
धार्मिक राष्ट्रवादाशी दोन हात करणाऱ्या आणि प्राणांचे सर्वोच्च बलिदान करणाऱ्या काँग्रेस पक्षातही हिंदुत्वाची एक धारा प्रबळ राहिली आहे. ती धारा अनेकदा गांधीजींच्या उदारतेशी फारकतही घेते. धार्मिकतेकडे झुकते. वर्णाश्रमी ब्राह्मणी परंपराही जपते. तरीही त्या धारेला हिंदुराष्ट्रवादाच्या व्याख्येत बंदिस्त करता येणार नाही. कारण हिंदुराष्ट्रवादाच्या कल्पनेला काँग्रेसी हिंदुवाद्यांनीही प्रखर विरोध केला आहे. जसा जीनांच्या पाकिस्तानच्या मागणीला काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांनी प्रखर विरोध केला. मौलाना आझादांनी जामा मशिदीच्या पायऱ्यांवरून जीनांच्या द्विराष्ट्रवादाला ललकारलं होतं. अब्दुल कय्यूम अंसारी यांनी पस्मांदा मोमीन अंसारींची फौज उभी करत धर्माधारीत विभाजनाला स्पष्ट नकार दिला होता. खुदाई खिदमतगार बादशहा खान यांनी अखेरपर्यंत इन्साई खिदमततीत खुदाई मानली. ज्या अर्थाने हिंदुत्ववादी काँग्रेस नेत्यांचा उल्लेख आपण करतो, त्या अर्थाने मौलाना आझाद आणि अब्दुल कय्यूम अंसारी यांचा उल्लेख करता नाही येणार. तिघेही धार्मिक होते. मगर कतही धर्मवादी नेते नव्हते. काँग्रेसमधील हिंदुत्ववादी अर्थातच धर्मवादी होते. तितकेच हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधातही होते. त्यांनी गोळवळकरांचे समर्थन कधीही केलं नाही.
पं. मदन मोहन मालवीय असोत की लोकनायक अणे असोत, स्वामी श्रद्धानंद असोत की गोविंद वल्लभ पंत असोत हे सगळे नेते काँग्रेसमधले. प्रखर राष्ट्रवादी. गांधीजींच्या चळवळीत झोकून देणारे. तरीही त्यांच्या वैचारिक धारणेचा झुकाव हिंदू धर्म आणि हिंदुत्वाकडे होता. ते उदार आणि बऱ्याच अंशी सुधारणावादीही होते. पण गांधीजींनी वर्णाश्रमाची चौकट जशी ओलांडली तशी चौकट या नेत्यांना ओलांडता आली नाही. त्यांच्या उदारतेला रुढीवादाच्या मर्यादा होत्या. पुणे कराराच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी बोलायाला जाणारे पं. मदन मोहन मालवीय यांच्या मनातलं स्पृश्य, अस्पृश्यतेचं जळमट तेव्हाही संपलेलं नव्हतं. अर्थात पुढे त्यांच्यातही बदल झाला.
भारताचं भाग्यविधान डॉ. आंबेडकरच लिहू शकतात, असा आपला आग्रह गांधीजी पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्याकडून हट्टाने पूर्ण करून घेतात. इतका खुलेपणा त्यांचं अनुयायीत्व किंवा नेतृत्व मानणाऱ्या काँग्रेसमधल्या या हिंदू नेत्यांमध्ये खचितच नव्हता. इस्लामकडे एक कडवट धर्म म्हणून पाहणाऱ्या हिंदू दुष्टीकोनाचा विचार केला तर मौलाना आझाद, अब्दुल कय्यूम अंसारी आणि सरहद्द गांधी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या कसोटीवर अधिक उजवे ठरतात. जीनांच्या द्विराष्ट्रवादाचा मुकाबला या मुस्लिम नेत्यांनी उघड्या छातीने केला. तुलना किंवा डिग्री मोजण्याचं कारण नाही. पण काँग्रेसी नेते जसे हिंदुत्ववादी होते तसे मौलाना आझाद, अंसारी आणि बादशहा खान इस्लामवादी कधीही नव्हते. मात्र तरीही काँग्रेस मधल्या या हिंदुत्ववादी विचार धारेने हिंदुराष्ट्रवादाला मात्र थारा दिला नाही, हे कबुल करावं लागेल.
लोकनायक अणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक राहिलेले वैचारिक गुरू मा. स. गोळवळकर यांच्या 'We or Our Nationhood Defined' या पुस्तकाला प्रदिर्घ प्रस्तावना दिली आहे. हिंदुंच्या एकूण जनसंख्येच्या संदर्भात 'या देशात हिंदु बहुसंख्यांक आहेत. आणि त्यामुळे भारत एक हिंदुराष्ट्र किंवा हिंदुस्थान ठरतो', अशी धारणा लोकनायक अणे व्यक्त करतात. पण लगेचच गोळवळकरांच्या हिंदुराष्ट्रवादाला मात्र नकारही देतात. गोळवळकरांच्या सांस्कृतिक हिंदुराष्ट्रवादाचं अंतर लोकनायक अणे नमूद जरूर करतात. गांधीजींच्या हिंदु - मुस्लिम ऐक्याच्या प्रभावात असलेले लोकनायक अणे हिंदु - मुस्लिम समाजाच्या सहअस्तित्वाचं आणि सांस्कृतिक साहचर्याचं महत्त्व अधोरेखित करतात. 'कोणताही आधुनिक कायदेतज्ज्ञ आणि राजनैतिक दार्शनिक किंवा कायद्याचा अभ्यासक गोळवळकरांच्या हिंदुराष्ट्रवादाच्या प्रस्तावाशी सहमत होणार नाही', असं स्वच्छपणे लोकनायक अणे सांगतात. गोळवळकरांना प्रस्तावना देताना ते म्हणतात, 'या देशात ज्यांचा जन्म झाला आहे, ज्यांच्या अनेक पिढ्या इथेच राहताहेत त्यांना या आधुनिक राज्यात कोणत्याही आधारावर विदेशी म्हणता येणार नाही. धर्माच्या आधारावर भेद करता येणार नाही. आणि धर्माच्या आधारावर नागरिकता निश्चित करता येणार नाही.' लोकनायक अणेंनी पुढे हे मान्य केलं आहे की, 'सुरवातीला धर्म हा राष्ट्रीयतेचा आधार जरूर होता. पण राष्ट्रीय जीवनाचं संचलन करण्यात धर्माची शक्ती आता वर्तमानात कमजोर ठरली आहे. आधुनिक देशांमध्ये आता राजधर्म राहिलेला नाही. अमेरिकेची राष्ट्रीयता धर्मापासून पूर्णपणे मुक्त आहे. धार्मिक सहिष्णुतेच्या विस्ताराने धर्माची सद्दी संपली आहे. राष्ट्राचा धर्म असण्यापेक्षा धार्मिक सहिष्णुता जिथे स्थापित झाली आहे, तिथे राष्ट्रीय एकतेचं सर्वोच्च दर्शनही घडते आहे.'
४ मार्च १९३९ चा तो दिवस होता. नवी दिल्लीतल्या १३, फिरोजशाह रोड वरच्या आपल्या निवासस्थानी ही प्रस्तावना पूर्ण करताना लोकनायक एम. एस. अणे अल्पसंख्यांकांनाही आवाहन करतात खांद्याला खांदा मिळवून एकत्र येण्याचं. धार्मिक सहिष्णुता आणि धार्मिक विश्वासाचं स्वातंत्र्य हे हिंदू धर्माचे आवश्यक सिद्धांत आहेत, यावर ते जोर देतात.
लोकनायक एम. एस. अणे आणि सरसंघचालक एम. एस. गोळवळकर यांच्यातलं हिंदुत्व म्हणूनच एक निश्चित नाही. गोळवळकरांचं हिंदुत्व द्वेषावर उभं राहतं. दोघांची राष्ट्रीय परिभाषा वेगळी आहे. गोळवळकर हिंदू हेच राष्ट्र मानतात. आणि जे हिंदू नाहीत ते राष्ट्र विरोधी नसले तरी हिंदुराष्ट्रासाठी ते बाहेरचे आहेत, असं म्हणतात. चार श्रेणीत विभागला गेलेला समाज, ही हिंदू धर्माची ओळख गोळवळकर राष्ट्राचीही ओळख मानतात. त्यांच्यासाठी एका चांगल्या राष्ट्राचं ते लक्षण मानतात. घुमंतू शिकारी (म्हणजे भटके विमुक्त) आणि म्लेंच्छ यांच्यापासून मुक्त असलेल्या राष्ट्राची ते कल्पना करतात. म्लेंच्छ म्हणजे जे हिंदू धर्म आणि संस्कृती यांनी निश्चित केलेल्या सामाजिक नियमांना मानत नाहीत ते सर्व.
खुशवंतसिंग यांनी म्हटल्याप्रमाणे 'इस्लामाचा द्वेष हे गोळवळकरांच्या हिंदुत्वाचं अभिन्न अंग आहे.' गोळवळकरांवर सावरकरांचा प्रभाव होताच. दोघेही फॅसिझमचे समर्थक आहेत. हिटलरने लाखो यहुद्यांचा जनसंहार केला, त्याचं समर्थन सावरकर आणि गोळवळकर दोघंही करतात.
काँग्रेसमधील कथित हिंदुत्ववादी गोळवळकरांच्या हिंदुत्वाशी सहमत होत नाहीत. पण तेच अंतर सावरकरांशी मात्र राखत नाहीत. टिळकांना मानणारा एक मोठा गट पुढे सावरकरांच्या बाजूने गेला. टिळक अनुयायांमध्ये दोन गट पडले. त्यातल्या एका राष्ट्रवादी गटाने गांधीजींना साथ दिली. दुसरा गट हेडगेवार, मुंजे यांच्या वाटेने सावरकरी हिंदुत्वाचा धागा बनला. टिळक अनुयायांमध्ये पडलेलं हे अंतर हिंदु-मुस्लिम प्रश्नांवरुन केवळ पडलं होतं, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. इतिहासाचार्य राजवाडेंसारखा गट गांधीजींच्या अहिंसा, खादी आणि अस्पृश्यता निवारण यांच्या बाजूने उभा राहिला.
डॉ. सदानंद मोरे यांनी 'लोकमान्य ते महात्मा' या त्यांच्या द्विखंडी ग्रंथात टिळक अनुयायांमध्ये पडलेल्या अंतराची चिकित्सा केली आहे. इतिहासकार शेजवलकरांनी सनातनी ब्राह्मणांवर टिकेची झोड उठवली. 'जोतीबा ब्राह्मणद्वेष्टा, विष्णुबोवा वेडापिसा, लोकहितवादी इंग्रजांचा स्तुतिपाठक व स्वाभिमानीशून्य, दयानंद तर पंडितमन्य मूर्ख' ठरवणाऱ्या सनातनी ब्राह्मणांचा शेजवलरांनी समाचार घेतला आहे.
दुसरीकडे डॉ. बी.एस. मुंजेंच्या नेतृत्वाखालच्या नागपूर जिल्हा काँग्रेसने स्वदेशी किंवा अस्पृश्यता निवारण या दोन अटी पैकी कोणतीही एक अगर दोन्ही मान्य नसणाऱ्यांची स्वयंसेवक म्हणून नोंद करण्याचा ठराव केला होता. नागपुरी हिंदुत्वाला अर्थातच अस्पृश्यता निवारण मान्य नव्हतं. त्यांच्या दृष्टीने गांधी धर्म बुडवायला निघाले होते. गांधींचं आगमन हिंदु - मुस्लिम ऐक्याला आमंत्रण देत होतं. यापेक्षा अतीशूद्रांना हिंदुंच्या विहिरींवर बिनहरकत पाणी भरू देण्याचं आवाहन करत होतं. हे मुंजेंच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या काँग्रेसमधल्याच हिंदुत्ववाद्यांनाही मान्य नव्हतं. सावरकर अस्पृश्यता निवारणाची भूमिका घेतात, पण तो त्यांच्या रणनितीचा भाग होता. मुंजे, हेडगेवार ते नथुरामपर्यंतचा प्रवास हा गांधींनी धर्म बुडवला, ब्राह्मणी वर्चस्व आणि नेतृत्व संपवलं या रागाचा होता. त्याचंच पर्यावसन पुढे गांधींच्या खुनात झालं.
२६ वर्षांपूर्वी १९२१ लाच गांधींनी पुण्यात भाषण केलं होतं. आणि अस्पृश्यतेचं पाप त्यांनी ब्राह्मणांच्या पदरात टाकलं होतं. गदारोळ झाला तेव्हा गांधींनी खुलासा केला. 'मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही. नामदार गोखलेंना मी गुरू मानतो. पण अस्पृश्यतेची चाल ही ब्राह्मण्याची निर्मिती आहे.' गांधींना आर्य समाजी स्वामी श्रद्धानंदांची अस्पृश्यांच्या शुद्धीकरणाची कल्पनाही मान्य नव्हती. गांधी म्हणत, 'अस्पृश्यांच्या नव्हे स्पृश्यांच्या किंवा ब्राह्मणांच्या शुद्धीकरणाची आवश्यकता आहे.' गांधींनी वैदीक परंपरेलाच आत शिरून सुरुंग लावला होता.
गांधींची ही भूमिका पुणेरी - नागपुरी सनातनी ब्राह्मणी परंपरेला मान्य असणं शक्यच नव्हतं. महात्मा फुलेंवर त्यांनी मारेकरी टाकले. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना वेडापिसा ठरवलं. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना इंग्रजांचं स्तुतीपाठक ठरवलं. महात्मा फुलेंनी ज्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली, ते आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांना याच परंपरेने मूर्ख ठरवलं. तीच परंपरा पुढे फॅसिस्ट संघटनेत परिवर्तित होते. महात्मा गांधींवर जीवघेणे हल्ले करत राहते. त्यातले पाच हल्ले महाराष्ट्रात झाले. तेव्हा पाकिस्तान किंवा फाळणीचा संदर्भ सुद्धा नव्हता. ना पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्न होता. प्रबोधनकार ठाकरे ते भिलारे गुरुजी ही महाराष्ट्राचीच सत्यशोधक परंपरा जिने गांधींना महाराष्ट्रात मरू दिलं नाही. अखेर नथुराम गोडसेने दिल्लीत जाऊन राष्ट्रपित्याची हत्या केली. हत्या ३० जानेवारी १९४८ ला झाली. पण त्यामागचं कारण २६ वर्षांपूर्वीचं होतं.
खुद्द पुण्यात घडलेल्या या वैचारिक संघर्षाच्या तालमीत एस. एम. जोशी, काकासाहेब गाडगीळ, शिरूभाऊ लिमये, नानासाहेब गोरे घडत होते. त्यांना आरएसएसचा मुस्लिम द्वेष मान्य नव्हता. तितकीच हिंदुत्ववाद्यांची वर्णाश्रमी अस्पृश्यताही मान्य नव्हती. १९२७ च्या डॉ. आंबेडकरांच्या महाडच्या क्रांतीत समाजवादी तरूणांचा सहभाग होता. सुरबानाना टिपणीस, चित्रे, बापूसाहेब सहस्रबुद्धे बाबासाहेबांसोबत उभे होते. तर १९२९ च्या पर्वती सत्याग्रहासाठी एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ, शिरूभाऊ लिमये यांचा पुढाकार होता.
काकासाहेब गाडगीळांचा मुलगा खेळायला म्हणून संघाच्या शाखेत गेला, एवढ्या घटनेनेही हे काँग्रेसमधले समाजवादी तरूण अस्वस्थ होत होते.
एस. एम. जोशींच्याच शब्दात, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुराष्ट्राला विरोध करण्यासाठीच राष्ट्र सेवा दलाचा जन्म झाला होता. एका व्यापक संघटनेची गरज होती. जी तरूणांना संस्कार देईल धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष राष्ट्रवादाचं. राष्ट्र सेवा दलाचं काम सुरू झालं आणि राष्ट्र सेवा दलाचे सैनिक रा. स्व. संघाशी दोन हात करू लागले. चकमकी घडू लागल्या.' तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा ब. ना. भिडे यांनी खुद्द एस. एम. जोशींची भेट मागितली. भिडेंचं म्हणणं होतं की, 'संघ आणि सेवा दलात वैमनस्य नको.' एस. एम. जोशीनींच लिहलंय की, 'ब्राह्मणेतर तरूण सेवा दलाकडे आकृष्ट होत होते तर संघाचं नेतृत्व ते कार्यकर्ते प्रमुख्याने ब्राह्मणच होते.' एस. एम. जोशी आणि ब. ना. भिडे यांच्यात झालेला तो संवाद मुळात वाचण्यासारखा आहे. सेवा दलाच्याच पुस्तिकेत एम.एम. नी तो हिंदीत सांगितलाय.
'मैंने उनसे कहा, ''हम हिंदू, मुसलमान, सिक्ख, ईसाई सबका एक भारतीय राष्ट्र मानते हैं। हमारा राष्ट्रवाद, असांप्रदायिक है। और आप तो हिंदूराष्ट्रवाद के समर्थक है।'' इस पर भिडे बोले, ''यह सच है कि हम हिंदूराष्ट्रवाद की शिक्षा देते है।'' मैने कहा कि इसका अर्थ यह है कि ''मुसलमान और अन्य गैर हिंदू समुदाय आपके राष्ट्रवाद मे नही आते।''
आगे मैने पूछा, ''क्या खान अब्दुल गफार खां अराष्ट्रीय है?'' वे बोले, ''हां।'' मैने फिर पूछा, ''और मौलाना अबुल कलाम आजाद?'' उन्होंने कहा, ''हां, वे भी।'' मैंने सवाल किया, ''आप यूसुफ मेहरअली को राष्ट्रवादी मानते है या नही?'' भिडे का उत्तर था, ''नहीं।'' इस पर मैने कहा, ''तब हमारी और आपकी कैसे पटेगी? हमारा और आपका दृष्टिकोण ही मूलतः भिन्न है। जाने दीजीए, हम अन्य विषयों की चर्चा करें।'' मगर भिडे को अन्य विषयों में दिलचस्पी नहीं थी और हमारी मुलाखत खत्म हो गयी।'
'मी एस. एम.' या आत्मकथेत त्यांनी तसाच तो मराठीतही सांगितला आहे. एस. एम. जोशींच्याच शब्दात-
'याच वेळची आणखी एक घटना नमूद करण्यासारखी आहे. आमचे यशस्वी शिबिर पाहिल्यामुळे संघाच्या पुढाऱ्यांना देखील त्याबाबत कुतुहल निर्माण झाले. संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते ब. ना. भिडे यांनी चितळे आडनावाचे दुसरे एक संघाचे चाहते होते, त्यांच्याकडून मला भेटीला बोलाविले. ही भेट श्रीमती इंदिराबाई मायदेव यांच्यामार्फत घडवून आणली गेली होती.
सेवा दल आणि संघ यामध्ये वितुष्ट येत आहे आणि एक निराळी शक्ती उभी राहत आहे हे त्यांना जाणवले होते. खेड्यातील ब्राह्मणेतर तरूण मंडळी आमच्याकडे आकृष्ट होत आहेत हे विशेष महत्त्वाचे होते. संघ आणि सेवा दल यांच्यामध्ये संघर्ष वाढू नये, वितुष्ट तर येऊच नये, असे त्यांचे म्हणणे होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ''आम्ही हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्वांचे मिळून भारतीय राष्ट्र मानतो. आमचा राष्ट्रवाद अजातीय आहे, तुम्ही तर हिंदु राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते आहात.''
त्यावर भिडे म्हणाले, ''आम्ही हिंदूराष्ट्रवादाचे शिक्षण देतो ही गोष्ट खरी आहे. ''
तेव्हा मी म्हणलो, 'म्हणजे मुसलमान व अन्य बिगर हिंदू तुमच्या राष्ट्रवादात बसत नाही. खान अब्दुल गफार खान अराष्ट्रीय आहेत काय? ''
त्यावर त्यांनी ''होय'' असे उत्तर दिले.
मी पुन्हा विचारले, ''अबुल कलाम आझाद यांचे काय? ''
तेव्हा भिडे यांनी त्या प्रश्नालाही होकारार्थीच उत्तर दिले. मी पुन्हा प्रश्न केला, ''तुम्ही युसुफ मेहेरअलींना तरी राष्ट्रवादी म्हणाल की नाही? '' त्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळाले. त्यावर मी म्हटले, ''असे असेल तर तुमचे आमचे कसे जमायचे? आपले दृष्टिकोन मूलतः भिन्न आहेत, यावर न बोलता दुसऱ्या विषयावर बोलू.'' अर्थात त्यांना इकडच्या तिकडच्या गप्पात रस नव्हता. त्यामुळे आमची बैठक संपली.'
क्रमशः
- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल
--------------------------
याच संदर्भातील इतर ब्लॉग -
४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT
राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १
Tap to read - https://bit.ly/3uKBIfH
जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ
भाग २
Tap to read - https://bit.ly/2RLh41D