डॉ. बाबा आढावांचा 90 वा वाढदिवस 1 जून 2020 ला साजरा झाला. बाबांवर शरद पवारांनी एक मोठी फेसबुक पोस्ट लिहली. शरद पवार जितके कसलेले राजकारणी आहेत तितकेच संवेदनशील नेते आहेत. परिवर्तनाच्या चळवळीशी नातं जपणारे राजकारणी आहेत. पवार साहेबांनी लिहलं म्हणून नव्या पिढीला डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दल काही कळलं.
महात्मा फुले जेव्हा होते तेव्हा आपण कुणीच नव्हतो. पण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्या परंपरेतला एक जीता जागता माणूस कालपर्यंत आपल्या सोबत होता.
बाबा राष्ट्र सेवा दलात घडले. महात्मा फुले अन् साने गुरुजी हे त्यांचं दैवत. साने गुरुजी हे सेवा दलाची ओळख मानली जाते आणि महाराष्ट्राची माऊली. महाराष्ट्राच्या समतेच्या चळवळीची आजच्या काळातली ओळख एकाच नावात सांगायची असेल तर ते नाव आहे, डॉ. बाबा आढाव.
डॉ. बाबा आढाव म्हणजे एक गाव, एक पाणवठा. बाबा म्हणजे परित्यक्ता स्त्रियांचा मुक्तीदाता. बाबा म्हणजे हमाल मापाड्यांचा कैवारी. बाबा म्हणजे काच पत्रा वेचणाऱ्या हातांच्या जखमा पुसणारा, हडपसरचं साने गुरुजी रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेणारा जणू डॉ. अल्बर्ट श्वाईटझर. बाबा म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पिछड्यांना हाक घालणारा लोहियावादी. बाबा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जेल भोगणारा सत्याग्रही. बाबा म्हणजे जयपूर हायकोर्टासमोर मनुचा पुतळा हटवण्यासाठी लॉंग मार्च काढणारा महाराष्ट्राचा बंडखोर. बाबा म्हणजे गोर गरिबांना परवडणारी, कष्टाची भाकर देणारा अन्नपूर्णादाता. बाबा म्हणजे असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीला धडक देणारा जणू नारायण मेघाजी लोखंडे. बाबा म्हणजे सत्यशोधकांचा इतिहास महाराष्ट्रापुढे जागता ठेवणारा महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक. बाबांचं आयुष्य फुलेमय आहे. पण त्यांच्यात गांधी, आंबेडकर यांचा समन्वयही आहे.
महाराष्ट्राला 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण झाली. त्याचवर्षी डॉ. बाबा आढावांनी नव्वदी गाठली होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' द्यावा, म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहलं होतं. मुख्यमंत्री महोदय, आपण सरकार स्थापन करत असताना शिवरायांचा महाराष्ट्र, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार यांचा महाराष्ट्र असं म्हणाला होतात. ती परंपरा घट्ट करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार शासनाने द्यावा, एवढीच विनंती मी केली होती. आघाडी सरकारने दखलही घेतली नाही, याचं दु:ख मात्र आहे.
बाबा काही पुरस्काराचे भुकेले नव्हते टाइम्स ऑफ इंडियाने त्यांना मॅन ऑफ दी इयरचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार दिला होता. बाबांनी तो स्वीकारला होता. त्यांना आनंद होता हमालाचा घामाला दाम मिळवण्यामध्ये. त्यांना समाधान होतं, देवदासींचे अश्रू पुसण्यामध्ये.
उपाशी पोटी (न) झोपणार्या कष्टकर्यांच्या झोपडीतले उसासे ते ऐकत अन् तळमळत. गरीब घरात सरकारने शिधा देण्याची योजना मनमोहन सिंगांच्या काळात सुरू झाली. पण त्यामागे प्रयत्नांचे आंदोलन होते बाबा आढाव यांच्या सारख्यांचे. फारच थोड्यांना माहीत असेल ते.
बाबा वेशीबाहेरच्या समतेसाठी गावागावात लढत होते. तेव्हा प्रतिगामी त्यांना बाबा आढाव, झगडा बढाव म्हणत असत. मनुवादी शक्तींच्या विरोधात संघर्ष उभा करताना बाबांना किती नावं ठेवली गेली. बाबांना पर्वा नव्हती. प्रत्येक संघर्षात ते आघाडीवर असत. लोकशाही वाचवण्यासाठी आणीबाणीत ते तुरुंगात होते. धरणग्रस्तांसाठी कितीदा तुरुंगात गेले.
मराठा शेतकरी कुटुंबातला बाबांचा जन्म. पण महर्षी शिंदेंप्रमाणे बाबांनी आपलं आयुष्य दलित, शोषित, पीडितांसाठी दिलं. भटक्यांसाठी आणि देवदासींसाठी दिलं. ते अखेरपर्यंत समाजवादी होते. सत्यशोधक समाजवादी.
समाजवादाच्या मुद्द्यावर त्यांना तडजोड मान्य नव्हती. महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्यावर त्यांची श्रद्धा होती. फुलेंच्या अखंडातल्या निर्मिकावरही.
बाबांची आयुष्य रेषा आज खंडित झाली आहे. पण बाबांचं काम, त्यांचा विचार, त्यांची प्रेरणा अखंड राहील. आठवणही अखंड राहील. विनम्र श्रद्धांजली !
- कपिल पाटील
अध्यक्ष, हिंद मजदूर किसान पंचायत महाराष्ट्र

No comments:
Post a Comment