Monday, 29 September 2014

गांधी जयंतीची सुट्टी रद्द करण्याचं कारण काय ?

दिनांक : 29/09/2014

प्रति,
मा.श्री. स्वाधीन क्षत्रिय
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य


महोदय,
भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱया  ̒स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय ̓ या मोहिमेची सुरुवात 2 आॅक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधी जयंतीचं अाैचित्य साधून करण्यात येणार आहे. त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. 2 आॅक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. शाळांनाही म्हणून सुट्टी असते. मात्र यावर्षी पंतप्रधानांनी योजना राबवण्यासाठी ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. मुलांना त्यासाठी शाळेत यावं लागणार आहे. वर्गाची, आवाराची, स्वच्छतागृहांची सफाई करावी लागणार आहे. तसं फरमान राज्याच्या शिक्षण सचिवांच्या सहीने केंद्राच्या अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण यांच्या पत्राचा हवाला देऊन सर्व शाळंना पाठवण्यात आला आहे.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्वच्छता मोहिमेचं कुणीही संवेदनशील नागरिक स्वागतच करेल. पण त्यासाठी गांधी जयंतीची सुट्टी रद्द करण्याचं कारण काय ?  हा दिवस राष्ट्रीय सणाचा आहे. बापूंच्या स्मरणाचा आहे. स्वातंत्र्याच्या आनंदाचा आहे. सण आनंदासाठी असतो. तो आनंद हिरावून घेण्याचं कारण काय ?

यासंबंधीचे केंद्र व राज्य सरकारची परिपत्रकं पाहिली असता 25 सप्टेंबर ते 31 आॅक्टोबर या कालावधीत   ̒स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय  ̓ ही मोहिम राबवायची आहे. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह बांधणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. निर्मल भारत योजने अंतर्गतचा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 आॅगस्ट दिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना, प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह बांधण्याचं आवाहन केलं. त्या आवाहनाचा भाग म्हणूनच ही मोहिम आखण्यात आली आहे.

प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह बांधण्याचा आदेश मा. सुप्रीम कोर्टाने दीड-दोन वर्षापूर्वीच दिला आहे. शिक्षण हक्क कायद्यात तशी स्पष्ट तरतूदही आहे. मी स्वतः या दोन बाबींचा पाठपुरावा करत मा. उप मुख्यमंत्र्याकडे मुंबईतल्या शाळांसाठी निधी मागितला. मार्च 2013 मध्ये 36 कोटीचा निधी वित्त विभागाने मंजूरही केला. लालफितीच्या कारभारामुळे मध्ये वर्ष गेलं. मात्र 15 आॅगस्ट 2014 रोजी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन आवाहन करत होते. त्याचवेळी पहिल्या स्वच्छतागृहाचं उद्घाटन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धारावीत झालं. धारावीच्या गणेश विद्यालयात पहिलं बायो टाॅयलेट लागलेलं आहे. येत्या 6 महिन्यात/वर्षभरात प्रत्येक शाळेत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.  ̒स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय  ̓ ही मोहिम भारत सरकारने घोषणा करण्यापूर्वीच राज्यात सुरू झाली  आहे. त्यामुळे 2 आॅक्टोबरला शाळेची सुट्टी रद्द करण्याची गरज नाही. दिवाळीची सुट्टी सुरू होईपर्यंत केव्हाही हा उपक्रम राबवता येईल आणि पुढेही सुरु ठेवता येईल.

गांधी जयंतीचा दिवस हा पारंपारिक सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. भारताला स्वाधीनता आणि स्वातंत्र्य देणाऱया सर्वच स्वातंत्र्यसेनानींच्या आठवणीचा हा उत्सव आहे. महात्माजींचं महत्त्व कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमेचं कारण दाखवत आनंदाची सुट्टीच रद्द करण्याचा छूपा हेतू तर त्यामागे नाही ना ? अशी साधार शंका वाटते.

कृपया याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा. गांधी जयंतीची सुट्टी कायम ठेवावी आणि स्वच्छता मोहिमेचा उपक्रम 31 आॅक्टोबरच्या कालावधीत शाळांनी सोयीनुसार राबवावा. याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, ही विनंती.
धन्यवाद !

आपला स्नेहांकीत,
कपिल पाटील, वि.प.स.
kapilhpatil@gmail.com


Monday, 8 September 2014

एका शिक्षिकेची गोष्ट
















शिक्षक दिनाच्या शुभेच्छा खूप आल्या. पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रावरच्या प्रतिक्रियाही खूप होत्या. पण whattsapp वरून आलेली ही गोष्ट मनाला खूपच भावली. फिरत फिरत ती आली असणार. म्हणून मूळ लेखक कोण माहीत नाही. पण प्रत्येक शाळेत अशी एक तरी गोष्ट घडलेली असेलच. शिक्षकाला समाधान कुठल्या पुरस्काराने मिळत नाही. पण कैक वर्षांनी एखादा विद्यार्थी येतो आणि भर बाजारात वाकून नमस्कार करतो, शिक्षक तेव्हा भरून पावतो. 
________________________________________________________________________________

शनिवार जाईल, रविवार जाईल, आणि सोमवारी तुम्ही नेहमीसारखेच शाळेत जाल आणि पहिल्या तासावर आपल्या वर्गात शिराल. अशाच एक मिसेस साठे आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. साठे बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना, “love you All”  असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही. पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत. त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता. तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि साठे बाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं, काहीही नव्हतं !  त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच त्या वागायच्या. कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या. आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या. 

पहिली तिमाही झाली. प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली. शाळेची अशी पद्धत असते की, प्रगतिपुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते. त्याप्रमाणे प्रगतीपुस्तके सहीसाठी गेली. मुख्याध्यापिकेने साठे बाईंना बोलावून घेतले. त्या म्हणाल्या, “अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते. पालकांना कळायला हवे, की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे.  या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाहीये. असं कसं चालेल? त्याच्या पालकांना काय वाटेल ? अहो त्याला ते मारतीलसुद्धा एखादेवेळी !” 

साठे बाई म्हणाल्या, “मी त्या मुलाचं करू तरी काय ? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू ?”

“ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा,” मुख्याध्यापिका म्हणाल्या.

मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले, आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले. आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके साठे बाईंकडे पाठवून दिली. साठे बाईंनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली. तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता, “शैलेश हा वर्गातील सगळ्यांत हुशार विद्यार्थी आहे!” त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे प्रगतीपुस्तक पाहिले, 

त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की, त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतो आहे.

त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती. आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनीत होत होते.
सहावीत शेरा होता, “ शैलेशने त्याची आई गमाविली आहे आणि तो स्वत:ही हरवल्यागत झाला आहे. 

आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू ! 

आतापर्यंत साठे बाईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. 

त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या, “मला कळले काय करायला पाहिजे ते !” पुन्हा सोमवारी, त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, “love you All”! पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत. कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती ! त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं. आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता. त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या. दिवस जात होते.

शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या. एकच ‘गिफ्ट’ एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती. शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यांनी ओळखले, ही कोणाची गिफ्ट आहे ते. एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या. एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते. सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं. काही न बोलता साठे बाईंनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या. आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला, “आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!”

“ती मला सोडून गेली त्या आधी, तिने वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता. आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या !”

एक वर्षानंतर, म्हणजे शाळा संपली तेव्हा, साठे बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वांत छान आहात.”- शैलेश.


त्यानंतर बरीच वर्षे, शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दर वर्षी मिळत असे. वर्षे निघून गेली. त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान, त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअर शोधत आला. त्याने एक पत्र त्यांना दिले. त्यावर प्रेषक म्हणून नाव होतं, डॉ. शैलेश, Ph.D. या दरम्यान, शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळविली होती. पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने. 

“मला जगात खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वांत छान आहात !” “मी लग्न करतोय. आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही  करू शकत नाही.” सोबत विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे. साठे बाईंकडे आता तो परफ्युम नव्हता. पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या.

साठे बाईंना राहावले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे अपरिचितच जास्त होते. त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहात होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले. तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती, “आई”. त्यांना पाहताच, सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच. लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला,  “ह्या नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”

त्यावर साठे बाई उत्तरल्या, 'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं, की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक'

Wednesday, 3 September 2014

Mr. Prime Minister, I have four questions


Hon. Prime Minister, Mr. Narendra Modi,
Sir, you are going to address the nation on September 5, on the occasion of the Teacher’s Day. For the first time it is so happening that the prime minister of India is going to address the nation and this is really a sweet shock. This is also aimed at honouring teachers and therefore I welcome the move and hearty congratulations.

The whole nation is eagerly awaiting your message, but the instructions issued by the Central Government compelling students to listen to the prime minister are distressing. What is the need of compelling students? And again the timing is 3.00 PM to 4.45 PM – quite inconvenient.

The Fatwa issued by the Central Government instructs schools to have television sets on hire. From where they would bring so many television sets – one for each class and again they would be compelled to pay the rent. In Maharashtra schools have not received non-salary grants for past ten years. The backlog is huge. There are hardly any funds to repair dilapidated school buildings and the schools are finding it difficult to pay electricity bills. The central government’s Fatwa further instructs the schools to have an internet connection. However, there is no continuous electricity supply in half the villages across India, then how the internet is going to work. A photograph of children from Chhote Udepur village in your own state, Gujrat, was published recently in newspapers. 125 students from a tribal hamlet are required to cross river to reach their school. There is neither any bridge for them nor boats for them to cross the river, they are compelled to swim across it. But, it is most likely that there would be a cable connection for these tribal children to listen the prime minister’s address to the nation. In several villages voting machines are required to be taken on donkeys and probably this time we will also see photographs of donkeys carrying televisions sets to schools.

 

There would be a major event in the country on September 5, so is the eagerness.
But, Mr. Prime Minister, I have four questions:

1)      Finance minister, Mr. Arun Jaitley, presented your government’s first budget in the Parliament. While delivering budgetary speech he clearly said that now there is no need to spend more on education. He has not allocated a rupee more on education.  How would education sector grow and reach every one, if the allocation is not at all enhanced. On September 5, I would like to hear your reasoning behind this decision.

2)      This obviously means that the education would be further privatized. Privatization and commercialization of education has rendered education inaccessible to common people. Now, common people cannot afford to become doctors or engineers, as it requires huge amount, anywhere between Rs 10 lakh and Rs 40 lakh. The children from poor household cannot even dream of becoming either doctor or an engineer. From where would they bring such huge amounts? Will you please address this issue in your address? The country is eagerly awaiting the answer.

3)      Teachers are being exploited through the process of contract in education. In Maharashtra they are called Shikshan Sevak (now, teachers on probation), while in Gujrat they are known as Vidya Sahayyak. In Gujrat they are drawing meager salary of Rs 2,500. In terms of Hon. High court, this amounts to bonded labour. This governmental exploitation began during the first term of NDA. The first experiment was carried out in Gujrat. Will there be a declaration of ending this exploitation through your address to the nation? Teachers across the country are eagerly awaiting to know.

4)      In Gujrat, Dinanath Batra has started a new experiment in education. This “renowned” educationist believes that the modern values are destroying the fabric of our society. He has, therefore, prepared textbooks based on Eighteenth century values. He has created completely new stories in the name of Swami Vivekanand, who gave the call for humanity by starting with “my brothers and sisters” in the religious conference at Chicago. The textbooks also contain untold (and also unheard of) stories of Dr. Radhakrishnan. What the prime minister of the country in store to say about this Batra experiment that is seeking to introduce the poison of division on the basis of caste, creed, religion and language at the school level itself? The country is eagerly awaiting to hear you.


Honorable Prime Ministerji, these are not the questions asked by Vetal to Vikram. Our teachers working in rural areas by crossing huge hurdles and shaping the new generation are simple in nature. The Farmaan of your address has already reached them and they have began preparations for making arrangements so as to ensure that the school children listen to you. They hardly had any time to put forth questions, and you have added burden to that by instructing them to arrange for television sets, cable connections etc. That would take at least two more days. Not an issue. But, they are happy that they are being remembered at least on the Teacher’s Day. Mr. Prime Minister, they would be a lot happier, if they get answers to these four questions. 
Thanking you.


Yours sincerely,
Kapil Patil, MLC.                                                                           
President, Lok Bharati

kapilhpatil@gmail.com

Date : September 1, 2014

Monday, 1 September 2014

सक्तीची काय गरज आहे ?


सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी

सप्रेम नमस्कार,
येत्या दि. 5 सप्टेंबर 2014 रोजी, शिक्षक दिनी देशाला उद्देशून आपण भाषण करणार आहात. शिक्षक दिनी पंतप्रधानांनी असं भाषण करणं, हे पहिल्यांदाच घडत आहे. हा सुखद धक्का आहे. शिक्षकांसाठी सन्मान आहे. म्हणून त्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि या निर्णयाचं स्वागत!

सगळा देश आपला संदेश एेकण्यासाठी उत्सुक आहे. पण हे भाषण विद्यार्थ्यांना एेकवण्याची सक्ती करणारा फतवा केंद्र सरकारने काढला आहे, हे वाचून मन खट्टू झालं. सक्तीची काय गरज आहे ? आणि वेळही दुपारी 3 ते 4.45 ची. अडचणीची.

आदेशात टिव्ही संचही उसनवारीने आणण्याचे फर्मान आहे. प्रत्येक वर्गात इतके टिव्ही संच आणायचे कुठून ? उसनवारीने पैसे तर द्यावेच लागतील. महाराष्ट्रात वेतनेतर अनुदान दहा वर्षात मिळालं नाही. मोठा बॅकलाॅग आहे. मोडकळलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठीही पैसे नाहीत. महागडं वीज बील भरतानाही नाकीनऊ येताहेत. इंटरनेटची व्यवस्था करायला सांगितली आहे. देशातल्या अर्ध्या अधिक खेड्यांमध्ये वीज असते कुठे ? तर इंटरनेट कुठू येणार ? आपल्या गुजरातमध्ये छोटे उदेपूर जिल्ह्यातल्या सजनपूर गावाच्या मुलांचा फोटो अलिकडेच प्रसिद्ध झाला होता. नदीच्या पल्याड आदिवासी पाड्यातल्या 125 मुला-मुलींना शाळेसाठी नदी पोहून जावं लागतं. त्यांच्यासाठी नदीवर साकव किंवा पुलही अजून झालेला नाही. ना होडीची सोय आहे. त्या मुलांना तुमचं भाषण एेकण्यासाठी टिव्ही केबलची जोडणी बहुदा नक्की होईल. निवडणुकीसाठी मतदान यंत्रे गाढवांवरून घेऊन जावी लागतात अनेक खेड्यात. 6 सप्टेंबरला टिव्ही संचही बहुदा असे गाढवांवरून वाहून नेताना फोटो प्रसिद्ध होतील.

 

5 सप्टेंबरला देशात मोठीच इव्हेंट असणार आहे. उत्सुकताही मोठी आहे.
पण 4 प्रश्न आहेत प्रधानमंत्रीजी,
1) आपले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत नव्या सरकारचं बजेट मांडलं. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी भाषणात स्पष्ट सांगून टाकलं की, शिक्षणावर आता आणखी खचर् करण्याची गरज नाही. एक रुपयासुद्धा त्यांना वाढवून दिलेला नाही. शिक्षणावरचा खर्चच वाढवायचा नाही. तर शिक्षण सर्वत्र पोचणार कसं ? वाढणार कस ? तुम्ही असं का करतांय ? हे 5 सप्टेंबरला समजून घ्यायला आवडेल.

2) याचा अर्थ शिक्षणाचं खाजगीकरण आणखी वाढत जाणार हे उघड आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणातून आणि व्यापारीकरणातून महागलेल्या शिक्षणाच्या संधी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाहीत. मध्यमवर्गीयां उच्च शिक्षण परवडत नाही. डाॅक्टर, इंजिनिअर व्हायला 10 ते 40 लाख रुपये लागतात. आणणार कुठून ? गरीबांच्या मुलांना स्वप्नही पाहता येत नाही. शिक्षक दिनी आपल्या भाषणातून आपण याबद्दल काही सांगणार का ? एेकायला देश उत्सुक आहे.

3) शिक्षकांच्या कंत्राटीकरणातून शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचं शोषण सुरू आहे. महाराष्ट्रात शिक्षण सेवक (आता टिचर आॅन प्रोबेशन) म्हणत होते. तिथे गुजरात मध्ये विद्या सहायक म्हणतात. गुजरातमध्ये त्यांचा पगार आहे, फक्त रुपये 2500/-. हायकोर्टाच्या भाषेत याला वेठबिगारी म्हणतात. या सरकारी शोषणाला एनडीएच्याच काळात सुरुवात झाली. पहिला प्रयोग गुजरातमध्येच झाला. या शोषणाच्या समाप्तीची घोषणा आपल्या भाषणातून होईल का ? एेकायला देशातील शिक्षक उत्सुक आहेत.

4) गुजरातमध्ये दिनानाथ बात्रांचा नवा प्रयोग सुरू झाला आहे. या  ̒महान  ̓ शिक्षण तज्ज्ञाला शिक्षणातल्या समाज मूल्यांमुळे समाजाचा ऱहास होतोय असं वाटतंय. त्यांनी थेट अठराव्या शतकातल्या समाज मूल्यांचा पुरस्कार करणारी पुस्तकं तयार केली आहेत. शिकागोच्या धर्म परिषदेत सर्वांना  ̒माझ्या बंधु, भगिनींनो ̕ , अशी आपुलकीच्या नात्याची हाक घालणाऱया स्वामी विवेकानंद यांच्या नावावर भलत्याच कथा त्यांनी तयार केल्या आहेत. डाॅ.राधाकृष्णन यांच्याही कधीही कुणीही न वाचलेल्या (ना त्यांनी सांगितलेल्या) संस्कार कथा त्यात आहेत. जात, धर्म, रंग, भाषा भेदाचं विषारी जहर शाळेतच संस्कारीत करणाऱया या बात्रा प्रयोगाबद्दल देशाच्या मा. प्रधानमंत्र्यांचं काय म्हणणं आहे..... एेकायला देश उत्सुक आहे.

माननीय प्रधानमंत्रीजी, विक्रमादित्याला वेताळाने विचारलेले हे प्रश्न नाहीत. खेड्या-पाड्यात अडचणींच्या डोंगर-दऱया पार करत उद्याच्या पिढ्या घडवणारे आपले शिक्षक खूपच साधे आहेत. तुमच्या भाषणांचं फर्मान पोचलंय त्यांच्याकडे. तुमचं भाषण आपल्या मुलांना एेकवण्याच्या तयारीला लागले आहेत. प्रश्न विचारायला त्यांना वेळ आहेच कुठे ? जनगणनेपासून गुरंढोरं मोजण्यापर्यंत सगळीच कामं करावी लागतात त्यांना. त्यात आता टिव्ही, केबल किंवा डिश एन्टेना आणण्याचं काम. दोन दिवस त्यात जाणार आहेत. काही हरकत नाही. पण शिक्षक दिनी आपली आठवण होते आहे. यावर ते खूश आहेत. या न विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली तर ते भलतेच खूश होतील, प्रधानमंत्रीजी.

कळावे. लोभ असावा. धन्यवाद!

आपला स्नेहांकित 
आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती 

kapilhpatil@gmail.com

Wednesday, 27 August 2014

मोदी, मिझोराम, महाराष्ट्र आणि शंकरनारायणन





के. शंकरनारायणन यांनाही अखेर जावं लागलं. त्यांचाही अपमान करण्याची संधी मोदी सरकारने सोडली नाही. राज्यपाल हे पद घटनात्मक आहे. त्यांना दूर करायचं असेल तर घटनात्मक मार्ग वापरायला हवेत. पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना झालेल्या त्रासाचा दिल्लीत पोचताच सूड घेतला. 87 वर्षांच्या कमला बेनीवाल यांची गुजरात मधून मिझोरामला बदली केली. नंतर त्यांना निलंबित केलं. त्यांच्या जागी आता त्यांनी शंकरनारायणन यांना पाठवलं. तेही 81 वर्षांचे आहेत. वयोवृद्ध माणसांचा दिल्लीचं सरकार आदर राखत नाही. घटनात्मक पदांचा योग्य आदर करत नाही. हा मुद्दा राजकीय कारण्यासाठी एकवेळा छोटा मानता येईल. भाजपची सभ्यता आणि संस्कृती हीच आहे. म्हणून वेगळी अपेक्षाही करता येणार नाही. पण तथाकथित अखंड भारताचं स्वप्न पाहणाऱया भाजपने मिझोरामच्या जनतेचा जो अवमान केला आहे, तो दुर्लक्षित करण्यासारखा नाही. ईशान्यकडची राज्यं या देशाचा भाग आहेत की नाहीत? की ती सावत्र राज्यं आहेत. नको असलेल्या अधिकाऱयांना राज्यकर्ते गडचिरोलीला पाठवतात. ब्रिटीश सरकार काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमानला पाठवत. राज्यपालांच्या राजकारणासाठी मिझोराम आणि नागालॅंडला ज्या पद्धतीची वागणूक केंद्र सरकार देत आहे, ती अपमानास्पद तर आहेच. पण देशाच्या एेक्य भावनेला सुरुंग लावणारी आहे. घटनेला स्मरुन देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतलेली असते. त्या घटनेने देशाची एकता, अखंडता आणि सार्वभाैमता अक्षुण्ण राखण्याची जबाबदारी त्या शपथेनेच त्यांच्यावर टाकलेली आहे. त्याचं स्मरण किमान राष्ट्रपतींनी तरी त्यांना करून द्यायला हवी.

के. शंकरनारायणन यांना महाराष्ट्रातील जनता विसरू शकणार नाही. महाराष्ट्रातील किमान वंचित प्रदेश आणि वंचित वर्ग त्यांची आठवण काढत राहील. शंकरनारायणन काही रबर स्टॅम्प नव्हते. राजभवनातली शोभेची वस्तू नव्हते. खाजगी विद्यापीठाचं बिल विधान सभेत चर्चेविना मंजूर झालं होतं. विधान परिषदेत माझा विरोध एकाकी पडला. पण राज्यपालांनी ते बिल परत पाठवलं. सामाजिक न्याय व आरक्षण नाकारणारं हे बिल होतं. सभागृहात त्याची चर्चाही होऊ दिली गेली नव्हती. माननीय शंकरनारायणन यांनी तेच आक्षेप घेत विधेयक परत पाठवलं. अखेर सरकारला ती तरतूद करावी लागली. पुढचं अधिवेशन समोर नसताना आणखी दोन खाजगी विद्यापीठाची विधेयकं सरकारने आणण्याचा प्रयत्न केला. त्यालाही राज्यपालांनी विरोध केला. मराठावाडा आणि विदर्भाच्या बॅकलाॅगच्या प्रश्नावर के. शंकरनारायणन ठाम राहीले. सरकारला अनेक निर्णय त्यांनी बदलायला भाग पाडलं. विरोधी पक्षांचा आवाज दडपला गेला तेव्हा राज्यपालांनी सरकारचे कान अोढले. 


मुंबईच्या विद्यापीठाच्या कुलगुरुंनी प्रा. नीरज हातेकर यांच्या सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्यापीठातल्या प्राध्यापकाला निलंबित केलं होतं. हातेकरांनी त्या विरोधात अभूतपूर्व अनोखं आंदोलन केलं. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पण सरकार कुलगुरुंचीच तळी उचलून धरत होते. हातेकर सरांना घेऊन मी राज्यपालांकडे गेलो. राज्यपालांनी पाऊण तास दिला. खूप प्रश्न विचारले. पाहुणचारही उत्तम केला. प्रेमाने त्यांना जवळ बोलावलं. आमच्या सोबत फोटो काढू दिले. जाताना मला म्हणाले, काळजी करु नका. मी करतो. आणि खरंच दुसऱया दिवशी कुलगुरुंना त्यांनी बोलावून घेतलं. अवघ्या दोन दिवसात विद्यापीठाने निलंबन मागे घेतलं.

राज्यातलं सरकार काॅंग्रेस-राष्ट्रवादीचंच आहे. राज्यपाल काॅंग्रेसचेच होते आणि म्हणूनच शंकरनारायणन यांची निस्पृहता अधिक जाणवते.

भाजपला हवे असलेले कोहली आले. म्हणून महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना आनंद नक्कीच झाला असेल. पण विरोधी पक्षांना समान वागणूक देणारे के. शंकरनारायणन राज्यपाल पदावरून गेले याचं दुःखही त्यांना झालं असेल.


आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

kapilhpatil@gmail.com

Tuesday, 12 August 2014

एकनाथ ठाकूरांना घेऊन जाईपर्यंत मृत्यूचाही दम निघाला होता.




80 टक्के नोकऱया मराठी माणसाला हा नारा देत शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार चळवळ उभी राहीली त्याच काळात एकनाथ ठाकूरांचं नॅशनल स्कूल आॅफ बॅंकिंगही उभं राहीलं. स्थानिय लोकाधिकार चळवळीतून मराठी माणसाला नोकऱया किती लागल्या? हा वादाचा प्रश्न आहे. पण एकनाथ ठाकूरांनी 80 हजार मराठी तरुणांना नोकऱया मिळवून दिल्या. किमान त्या संधीचा दरवाजा त्यांच्या नॅशनल स्कूल आॅफ बॅंकिंग मधून उघडला गेला.

एकनाथ ठाकूर बॅंकिंग क्षेत्रातला फार मोठा माणूस. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं हे काम लक्षात घेऊन पुढे त्यांना खासदार केलं. पण एकनाथ ठाकूर काही शिवसैनिक नव्हते. ते नाथ पै आणि मधु दंडतेंचे निष्ठावान कार्यकर्ते होते. दंडवतेंनी त्यांना राजकीय वारस केलं असतं तर कोकणातली समाजवादी चळवळ टिकून राहिली असती. जाॅर्ज फर्नांडिस यांनी मात्र एकनाथ ठाकूरांचा गुण अोळखला होता. स्टेट बॅंक आॅफ इंडियाचा आणीबाणीच्या विरोधात राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या ठाकूरांच्या हातात त्यांनी मुंबईची लेबर बॅंक सोपवली. आणीबाणीत सगळे समाजवादी नेते तुरुंगात असताना लेबर बॅंकेचं रुपांतर एकनाथ ठाकूरांनी न्यू इंडिया को आॅपरेटिव्ह बॅंकेत केलं. बॅंक नावारुपाला आणली. अपना बाजारच्या नावारुपात जसा गजानन खातूंचा वाटा आहे. तसा लेबर ते न्यू इंडिया बॅंक या प्रगतीत एकनाथ ठाकूरांचाही वाटा होता. त्याची दखल फारशी कुणी घेतलेली दिसत नाही.

सुरेश प्रभूंकडून सारस्वत बॅंक ताब्यात घेतल्यानंतर एखाद्या कार्पोरेट बॅंके सारखं वैभव त्यांनी प्राप्त करुन दिलं. ते खरे सारस्वत. नुसते जातीने नाही. साहित्य, कला संस्कृतीच्या अर्थाने एकनाथ ठाकूर खरे सारस्वत. ज्ञानाच्या भांडवलावर उद्योग व्यवसायाचंही भांडवल उभं करता येतं, हे ठाकूरांनी दाखवून दिलं.

बाबा आमटेंचे ते खास भक्त. आनंदवनाच्या मदतीत त्यांचा हात नेहमी असे. बाबांनी भारत जोडो यात्रा सुरू केली, तेव्हा मुंबईची जबाबदारी एकनाथ ठाकूरांकडे होती. यदुनाथ थत्तेंनी मला त्यांच्याकडे पाठवलं. माझ्याकडे जबाबदारी होती काॅलेजच्या तरुणांना या यात्रेत उतरवायचं. आमच्या डहाणूकर काॅलेजचे म.द.लिमये प्रकुलगुरु झाले होते. मी त्यांच्याकडे ठाकूरांना घेऊन गेलो आणि मग अक्षरशः हजारो काॅलेजचे तरुण बाबांच्या सावगताला रस्त्यावर उतरले. त्यासाठी जी यंत्रणा मला लागायची ती सगळी त्यांनी मोठ्या उत्साहाने पुरवली होती.

तरुण वयात झालेल्या कर्करोगावर त्यांनी कितीदा मात केली हे त्यांचं त्यांनाच ठावूक. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत म्हणजे आपल्या अंतिम यात्रेची व्यवस्था स्वतःच लावण्यापर्यंत त्यांचा उत्साह कायम होता. त्यांच्या उत्साहाचं कोणत्या शब्दात वर्णन करायचं. त्यांना घेऊन जाईपर्यंत मृत्यूचाही दम निघाला होता.

त्यांना विनम्र श्रद्धांजली!!!

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

kapilhpatil@gmail.com

Tuesday, 5 August 2014

बात्रायण आणि दवेंचा हुकूमशाह




नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री तेव्हाही त्यांची हिंमत झाली नाही, ते त्यांच्या उत्तराधिकारी आनंदीबेन पटेल करु शकतात काय ?

आनंदीबेन करु शकतात. कारण नरेंद्र मोदी आता देशाचे सर्वेसर्वा झाले आहेत.

गुजरातच्या 42 हजार सरकारी शाळांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षण भारतीचे राष्ट्रीय कार्यवाह दीनानाथ बात्रा यांनी तयार केलेली पुरवणी अभ्यासाची पुस्तकं मोफत वाटली जाणार आहेत. शिक्षणनु भारतीयरण या नावाखाली आधुनिकीकरणाचा कडेलोट करण्याचा विडा संघ परिवारातल्या या मंडळीनी उचलला आहे. दीनानाथ बात्रांच्या पुस्तकांमधल्या आचरट कथांचा वृत्तांत इंडियन एक्सप्रेसच्या रितू शर्मा यांनी दिला आहे. लोकसत्तेने तो अनुवादीन करुन प्रकाशित केला त्याबद्दल त्या दोन्ही वर्तमानपकत्रांचे आभार मानले पाहिजेत.

प्रेरणादीप भाग - 1 या पुस्तकातल्या पान 10 वरची ही कथा बघा,
“ स्वामींचे बूट - एक दिवस स्वामी विवेकानंद व्याख्यान देण्यासाठी गेले होते. समोर बसलेल्या जनसमुदायाला उद्देशून ते म्हणाले, की आपण नेहमी भारतीय वस्त्रे परिधान केली पाहिजेत...त्या वेळी स्वामी विवेकानंद यांच्या अंगावर भगवी वस्त्रे होती आणि पायात परदेशी बूट होते. ब्रिटनहून आलेल्या एका महिलेच्या ती गोष्ट लक्षात आली. ती म्हणाली, स्वामीजी तुम्ही इतरांना स्वदेशी कपडे घाला, असा आग्रह धरीत आहात, परंतु तुमच्या पायात तर परदेशी बूट आहेत ! स्वांमीनी ते शांतपणे एेकून घेतले आणि हसून म्हणाले, मला तेच तर सांगायचेय की, आमच्या लेखी परदेशी लोकांसाठीची जागा पायातच आहे. यावर ती महिला निरुत्तर झाली.”

जागतिक धर्म परिषदेत Sisters and Brothers of America, अशी हाक घालणारे विवेकानंद यांच्या तोंडी अशी कथा घालणं हा केवळ विपर्यास नाही. विकृती आहे. हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांवर आणि विषमतेवर घणाघाती प्रहार करणारे आधुनिकतेची कास धरा असे सांगणारे, विश्व बंधूतेचा नारा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या नावावर इतकी तद्दन कथा खपवण्याचं धाडस बात्रा करतात तेव्हा या पुरवणी पुस्तकांमागचा त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होतो.

देशाचे दुसरे राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावावर खपवलेली कथा तर संतापजनक आहे. “ देव भाकरी करत होता. भाकरी कच्ची राहीली तेव्हा ब्रिटीश जन्माला आले. करपून काळी पडली तेव्हा निग्रो जन्माला आले. अगदी योग्य भाकरी भाजली तेव्हा भारतीय जन्माला आले.”

केवळ मूर्ख या शब्दात बात्राकरणाची संभावना करुन चालणार नाही. हा एक जाणून बुजून ठरवून केलेला प्रयास आहे. एक सोची समझी चाल आहे. प्रेरणा आणि संस्काराच्या नावाखाली मध्ययुगीन काळातील मूल्यांचं पुनर्जीवन करण्याचा तो प्रयत्न आहे. जाती, वर्ण वर्चस्वाचं समर्थन आहे. रंगभेदाचं समर्थन आहे. समताधिष्ठीत मानवी मूल्यांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे.

बात्रांच्या पुढे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.आर.दवे गले आहेत. मी हुकूमशाह असतो तर गीता सक्तीची केली असती, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. गीतेच्या अभ्यासाला कोणीच विरोध करणार नाही. गीतेवर टीका लिहणाऱया संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं. विवेकानंद आणि गांधींनी आपल्या चळवळीसाठी आधार शोधला. पण या तिघांचाही विरोधात द्वेष आणि भेद यांचं तत्वज्ञान ठासून भरलेल्या बात्रायणाची भाषा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती करत असतील तर ती चिंतेची बाब आहे. दवे यांनी भारतीय संविधानाची शपथ घेतलेली आहे. न्यायमूर्ती म्हणून ते फक्त भारतीय संविधानाला बांधलेले आहेत. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला हुकूमशाह बनण्याची आणि धर्मग्रंथांच्या सक्तीची भाषा करता येणार नाही. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग खुशाल ही मागणी करावी.

बात्रायणानंतर दवे हुकूमशाहीची भाषा करतात. येणाऱया संकटाची चाहुलच या दोघांनी दिली आहे.


आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com
www.facebook.com/kapilpatil.mlc