Tuesday, 25 December 2018

काँग्रेस - राष्ट्रवादीला खुले पत्र




दिनांक : २५/१२/२०१८
प्रति,
मा. श्री. अशोक चव्हाण
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

मा. श्री. अजितदादा पवार
गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

महोदय,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी आपण पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल आपला आभारी आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही संस्था संकटात असताना फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र आलं पाहिजे, याबद्दल कुणाचंही दुमत नाही. पण कोणत्याही मुद्दयांची वा अजेंडयाची चर्चा करता मित्र पक्षांना तीन जागा सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचं जाहीर केलं आहे, याचं आश्चर्य वाटतं. छोटया डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचं कामं करावं, अशी आपली अपेक्षा दिसते. वाजंत्री कोणत्या मुद्दयांची वाजवायची हे मात्र आपण स्पष्ट केलेलं नाही

मा. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरुप येऊ शकणार नाहीमा. प्रकाश आंबेडकर आणि मा.राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली आणि अन्य पक्षांना विधान सभेत जागा सोडण्याचं आश्वासन दिलं की आघाडी झाली, असं आपण मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत. देशातील आणि महाराष्ट्रातील स्थितीमधे काही एक अंतर आहे. महाराष्ट्रात योगी किंवा खट्टर सरकार नाही. मराठा आरक्षण जाहीर झालं आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर करुन टाकला आहे. हिवाळी अधिवेशनात ना सरकारला थंडी वाजली ना विरोधी पक्षांची धग जाणवली. राज्यात १९७२ पेक्षा तीव्र दुष्काळ आहे. आताच पाणी टंचाई आहे. पुढचे सात महिने काढायचे आहेत. शेतकरी परेशान आहे. पण दुष्काळाच्या प्रश्नावर सभागृहात ना साधक बाधक चर्चा झाली. ना सरकारला घेरता आलं

अनेक वर्ष सत्तेवर राहिल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सभागृहात कसं काम करायचं याचा अनुभव कमी पडला असण्याची शक्यता आहे. मला आपल्याला नम्रपणे मा. श्री. शरद पवार आणि मा. श्री. छगन भुजबळ यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून केलेल्या कामाची आठवण करुन दयाविशी वाटते. विधीमंडळाच्या सभागृहात, रस्त्यावर आणि बांधावर शरद पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केलं होतं. पुरोगामी आघाडीतील छोटया घटक पक्षांना सन्मानाने आणि बरोबरीच्या नात्याने ते सोबत घेत असत. छगन भुजबळ यांनी सभागृहात आणि बाहेरही सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं. विलासराव देशमुख यांनी तर स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात पाटबंधाऱ्यातून भ्रष्टाचाराचे पाट वाहत आहेत, असं सांगण्याचं धाडस दाखवलं होतंविधीमंडळातील आपला एक सहकारी या नात्याने मला नम्रपणे नमूद करावसं वाटतं की, ती संसदीय रणनिती, कामाची पध्दत आणि आक्रमकता याबाबतीत आपण सारेच कमी पडलो

समाजातील छोटया घटकांमध्ये होणारी घालमेल संसदीय राजकारणात प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून व्हायला हवा. सत्तेवर आणि विरोधात असतानाही पवार, भुजबळ आणि विलासराव यासारख्या नेत्यांनी त्यांच्या काळात हा प्रयत्न केला होता. राईनपाडयावर भटक्यांचे गेलेले बळी, बेरोजगारी आणि बंद असलेली नोकर भरती, भीमा कोरेगाव, संभाजी भिडे प्रकरण, मुस्लिम धनगर आरक्षण, ओबीसींमधील अस्वस्थता अशा अनेक प्रश्नांवरच्या चर्चा तर अनुत्तरीत राहिल्या. संभाजी भिडे प्रकरणात विरोधी पक्ष भिडे यांच्या बाजूने की विरोधात या संभ्रमाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.अस्वस्थ समाजघटकांना विरोधी पक्षाकडून अश्वासक दिलासा मिळालेला नाही. डाव्या लोकशाहीवादी पक्षांना आपण सोबत कसं घेणार हे स्पष्टपणे सांगायला हवं.

प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडणं म्हणजे महाआघाडीची बेरीज झाली असं आपण मानलं तर ती मोठी फसवणूक ठरेल. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील उपेक्षित आणि वंचित वर्गाचं प्रतिनिधीत्व करतात. संख्येच्या भाषेतच बोलायचं तर चाळीस ते पन्नास टक्के वर्गाच्या प्रश्नाला महाआघाडीच्या अजेंडयावरच स्थान नसेल तर प्रकाश आंबेडकरांशी सन्मानाने चर्चा कशी होणार? मुस्लिमांच्याबाबत महाआघाडी सॉफ्ट हिंदुत्वाच्या पायी राजकीय अस्पृश्यता पाळते काय, याची शंका वाटतेराजू शेट्टी म्हणजे केवळ हातकणंगलेची जागा नव्हे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव आणि संपूर्ण कर्जमुक्ति याबाबतचं धोरण स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाला महाग आणि नोकरीला पारखी झालेली शेतकऱ्यांची मुलं सैरभैर आणि वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी आघाडीचं धोरणं स्पष्ट होणं आवश्यक आहे

शिक्षणाच्या क्षेत्रातलं भगवीकरण आणि खाजगीकरण या दोन्ही मुद्दयांवर आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. गरीबांना प्रवेश नसलेली खाजगी विद्यापीठांची बीले आणि शिक्षणाच्या कंपनीकरणाचं बील यावर आघाडीचं मत काय आहे? सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सींग म्हणजे कर्मचारी आणि कामगारांच्या शोषणाला अमर्याद सूट आहे. शिक्षण सेवक आणि सफाई कामगारांपासून सुरु झालेलं हे कंत्राटीकरण आता थेट मंत्रालयातील सचिव पातळीपर्यंत पोचलं आहे. आघाडीने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. विनाअनुदानाच्या नावावर शिक्षणाचं वाटोळं करण्याची प्रक्रीया आपल्याच राज्यात सुरु झाली. युतीच्या राज्यात कडेलोट होण्याची वेळ आली आहे. आघाडीचं सरकार आल्यावर १००टक्के अनुदान देणारं काआंगणवाडीताई, कंत्राटी कर्मचारी, आयसीटी शिक्षक, अंशकालिन निदेशक, मानसेवी शिक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अर्धवेळ कर्मचारी यांचं शासनमान्य शोषण सुरु आहे. ते थांबवणार का? जुन्या पेन्शनच्याबाबत २००५ नंतरचे कर्मचारी टाहो फोडत आहेत. केंद्रात आपलं सरकार आल्यावर समान काम, समान वेतन आणि समान पेन्शन या मागणीचा विचार होईल काय

विक्रमादित्याच्या पाठीवरच्या वेताळाचे हे प्रश्न नाहीत. तुमची राजकीय अडचण करण्यासाठी हे प्रश्न विचारत नाही. न्याय आणि समतेच्या मागणीचे आहेत. समता आणि न्याय यांची हमी संविधानाने दिली आहे. संविधान विरोधी सरकार घालवताना आपलं सरकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानानुसार अंमलबजावणी करील. सर्वांना न्याय आणि समता देईल, याचं आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला हवं आहे

उत्तराच्या अपेक्षेत

आपला स्नेहांकित


कपिल पाटील, वि...
प्रदेशाध्यक्ष, लोकतांत्रिक जनता दल, महाराष्ट्र


Tuesday, 11 December 2018

दिलीपकुमारांच्या त्या एका कॉलने भारत-पाक युद्ध टळलं


दिलीप कुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतले महानायक.

अत्यंत संयत अभिनयासाठी प्रसिद्ध. ते अभिनय करतात असं कधी वाटतच नाही. अभिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत प्रत्येकावर दिलीप कुमार यांचा ठसा आहे.

भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीप कुमार.

पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. माणुसकीने ओतप्रेत भरलेला हा अभिनय सम्राट तितकाच रसिक वाचक आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि मराठी या चार भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांच्याकडे विपुल ग्रंथ भंडार आहे.

दिलीप कुमारांचं कुटुंब पेशावरवरुन आलं नाशकात. देवळाली जवळ राहिलं. नाशिककडचं कुणी भेटलं की ते नाशिकच्या ढंगातलं मराठी आवर्जून बोलतात. मराठीतली अनेक गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. तमाशा त्यांच्या आवडीचा. अनेक लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत. मूड मध्ये असले की अगदी तालासुरात ते लावणी गात असत.

मला एकदा ते म्हणाले, मी मराठी बोलतो ती नाशिककडची. मुंबई, पुण्याची मराठी मला काही जमत नाही.

खूप आधीची गोष्ट. औरंगाबादला त्यांचं शुटींग सुरु होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाबासाहेबांना जाऊन भेटले. खूप बोलले. खूप गप्पा मारल्या. बाबासाहेब त्यांना म्हणाले, मुस्लिम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा.

दिलीप कुमार मला म्हणाले, तेव्हा मला नाही जमलं. पण मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना माझ्या मनात आंबेडकरांची ती याद होती.

इस्लाममध्ये जात पात नाही. भेदभाव नाही. पण भारतीय मुस्लिम समाजात त्याच जाती पाती आहेत. बिरादरी आहेत. मुस्लिम समाज हा जातीग्रस्त भारतीय समाजाचा अभिन्न अंग आहे. त्यामुळेच मंडल आयोगाने ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम जातींचा समावेश केला. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुस्लिम ओबीसींची चळवळ उभी राहिली. वरिष्ठ मुस्लिम वर्गीयांकडून आधी विरोध झाला. पण दिलीप कुमार ठामपणे उभे राहिल्यानंतर विरोध संपुष्टात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा झाल्या. लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रत्येक ठिकाणी स्वतः दिलीप कुमार गेले. मुस्लिम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय शरद पवार यांनी प्रथम घेतला तेव्हा, मुस्लिम ओबीसींच्या सवलती आणि सर्टिफिकेटचा प्रश्न विलासरावांनी सोडवला तेव्हा आणि युतीच्या काळात रद्द झालेल्या सवलती गोपीनाथ मुंडे यांनी पुनर्स्थापित केल्या तेव्हा त्यामागची खरी ताकद दिलीपकुमार यांचीच होती. हिंदू ओबीसी आणि मुस्लिम ओबीसी एक कसे आहेत, एका जातीचे, एका बिरादरीचे कसे आहेत हे शरद पवार यांना सांगताना दिलीपकुमार म्हणाले, 'छगन भुजबळ माळी आहेत आणि मी बागवान. जात एक. सवलत त्यांना मिळते मग बागवानाला का नको?' शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे डोळे त्याक्षणी विस्मयचकीत झाले होते. 

दिलीप कुमारांकडे, ही प्रेरणा आणि हिम्मत आली कुठून?  मी एकदा विचारलं. तेव्हा त्यांनी मला सुभेदारी गेस्ट हाऊस मधला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  भेटीचा प्रसंग सांगितला. त्यांच्या सामाजिक जाणिवांच्या मागची प्रेरणा होती डॉ. आंबेडकर.  त्या आधीचा आणखी एक प्रसंग आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत फुटबॉल टूर्नामेंटमध्ये दिलीप कुमार खालसा कॉलेजकडून खेळत होते. सामना जिंकल्यावर टीमच्या कॅप्टनने बाबूने संध्याकाळी सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. बाबूने स्वतः कोंबडी शिजवली होती. पण जेवायला फक्त दिलीप कुमार पोचले. टीम मधले अन्य कुणीच आलं नाही. दिलीप कुमारांनी बाबूला विचारलं अरे इतर कुणी का नाही आले? विजेत्या टीमचा कॅप्टन बाबू म्हणाला, युसुफ भाई मी दलित आहे. माझ्या हातचं ते कसं खातील? तो प्रसंग सांगताना दिलीप कुमारांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरलेला होता.

आणखी एक प्रसंग आहे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. तर पाकिस्तानात नवाज शरीफ. भारत-पाकिस्तान समोरासमोर ठाकले होते. प्रसंग मोठा बाका होता. अचानक बांद्रा पाली हिलला दिलीप कुमार यांच्या घरात फोन खणखणला. खुद्द वाजपेयी साहेब बोलत होते. त्यांनी तातडीने दिल्लीला बोलावलं. डॉ. जहीर काझी यांना घेऊन दिलीप कुमार थेट दिल्लीला पोचले. जहीर काझी हे त्यांचे जवळचे डॉक्टर, मित्र. जहीर काझींच्या घरात आणि सासरी स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा. त्यामुळे असेल कदाचित.

वाजपेयींनी दिलीप कुमारांना सांगितलं, की तुम्ही हे करु शकता? थेट नवाज शरीफांना फोन गेला. पलिकडे दिलीप कुमारांचा आवाज ऐकून नवाज शरीफ एकदम चाट पडले. ते दिलीप कुमारांचे प्रचंड फॅन. त्यांचे अनेक सिनेमे, डॉयलॉग आणि गाणी त्यांना पाठ. दिलीप कुमारांच्या शब्दांने जादू केली आणि तो भयावह युद्ध प्रसंग टळला. अटलबिहारी वाजपेयींचं मोठेपण हे की त्यांना ते अचूक सुचलं. दिलीप कुमारांची शिष्टाई कामाला आली. 

मुस्लिम ओबीसींच्या आंदोलनामुळे दिलीपकुमार, शब्बीर अन्सारी, हसन कमाल, डॉ. झहीर काझी या सगळ्यांशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोस्ती जमली. राज्यसभेची निवडणूक होती. मायनॉरिटी कोट्यातून बरेच काँग्रेसजन प्रयत्नात होते. पण विलासरावांना वाटत होतं की दिलीपकुमारांनी राज्यसभेवर जावं. त्यांनी दिलीपकुमारांशी मला बोलायला सांगितलं. दिलीपकुमार म्हणाले, अरे या निवडणूकीत घोडेबाजार होतो. मी कुठून पैसे आणू? मी विलासरावजींना फोन लावून दिला. ते मस्त हसले. त्यांना म्हणाले, 'दिलीपसाब आप को कुछ नही करना है जिम्मेदारी मेरी है.' विलासरावजी त्याच दिवशी दिल्लीला निघाले होते. सोबत प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक होते. आदिक स्वतःच्या प्रयत्नात होते. दिलीपकुमारांचं नाव सांगताच सोनिया गांधी यांनी आनंदाने स्वागत केलं. 



दिलीपकुमारांचं प्रेम हा माझ्यासाठी फार मोठा ठेवा आहे. भेंडी बाजारात घांची म्हणजे मुस्लिम-तेली समाजाच्या पुढाकाराने झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांच्या हातून झालेला सत्कार मी कधीच विसरू शकणार नाही. लखनौच्या मुस्लिम - ओबीसी परिषदेत माझ्याबद्दल ते किती प्रेमाने बोलले. औरंगाबाद, जालना दिलीपकुमार असले की मोठ्या सभा होत. त्यांच्या सोबतीचे हे क्षण विसरता येणार नाहीत. 

दिलीप कुमार यांच्या या दीर्घ आयुष्यात त्यांना साथ आहे ती सायरा बानोंची. त्या त्यांच्या धर्मपत्नी. पण आता जणू त्यांच्या आई बनल्या आहेत. लहान मुलासारखी त्या दिलीप कुमारांची काळजी घेतात. दिलीप कुमारांच्या अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतात. लोकांना मदत करतात. सायरा बानोंनी आपलं सगळं आयुष्य दिलीप कुमारांना समर्पित केलं आहे. अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या आहेतच. पण जीवनसाथी म्हणून आणखी मोठ्या आहेत.

दिलीप कुमार सिनेमातला तर तो मोठा माणूसच आहे. पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा आहे. मुस्लिम समूहातल्या पसमांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अफाट आहे. हिंदू-मुस्लिम एकीसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. 

अशा या आपल्या देशाच्या महानायकाचा केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च किताब प्रदान करून गौरव करायला हवा. आज ११ डिसेंबर. दिलीप कुमारांचा जन्मदिन. दिलीप कुमार आणि सायरा बानो या दोघांना शुभेच्छा आणि सलाम!

- कपिल पाटील