Friday, 27 September 2019

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन



पत्थरांचा मारा सनातन
पाप्यांची नजर विखारी
बडव्यांचा बाजार सभोती
कालवरीच्या जखम जिव्हारी

परी सुवार्तेची वेळ समिप
होता ख्रिस्त मनात माझ्या...


फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबादला होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, अन् सनातन पत्थरांचा मारा सुरू झाला. फ्रान्सिस दिब्रिटो फादर आहेत. धर्मगुरू आहेत. त्याही पेक्षा ते ख्रिश्चन आहेत. पत्थरांचा मारा त्यासाठी आहे. दिब्रिटोंची ज्यांनी निवड केली त्यात एकही ख्रिश्चन नव्हता. यु. म. पठाणांची निवड झाली तेव्हा मतदार होते काही, पण साहित्य महामंडळावर एकही मुसलमान नव्हता. शंकरराव खरात अन् दया पवारांची निवड झाली तेव्हा एकही बौद्ध नव्हता. आताच्या निवड समितीवर एकही दिब्रिटोंच्या उपासना धर्माचा नव्हता. पण निवड समितीवरच्या प्रत्येक सदस्याचा समाजधर्म आणि साहित्यधर्म समान होता. त्यांची मातृभाषाही अर्थात समान होती, जशी ती वसईच्या फ्रान्सिस दिब्रिटोंची आहे. मराठी. पण समानतेचा हा धागाच ज्यांना मान्य नाही, त्यांनी धमक्यांचे दगड कौतिकराव ठाले पाटील आणि श्रीपाद जोशींच्या शिरावर मारले.

जैसी पुष्पांमाजी पुष्पा मोगरी,
की परिमळांमाजी कस्तुरी
तैसी भाषामांजी, साजिरी मराठिया


असं मराठीचं रसाळ वर्णन करणाऱ्या फादर स्टिफन्स यांची मातृभाषा मराठी नव्हती. सन १५५९ इंग्लंडमधून आले होते फादर स्टिफन्स भारतात. मराठी शिकले. ख्रिस्तपुराण लिहलं. त्यात केलेलं मराठीचं वर्णन संत ज्ञानेश्वरांशी नातं सांगतं. फादर दिब्रिटो यांची मातृभाषा तर मराठी आहे. त्यांच्या एकट्याची नाही. मुंबईत, कोकणात अन् वसईत राहणाऱ्या तमाम कॅथलिकांची मातृभाषा मराठीच आहे. ते मराठीत बोलतात. मराठीत विचार करतात. मराठी शाळा चालवतात. मराठीत शिकतात. मुंबईतील शाळांमध्ये वसईकर ख्रिस्ती शिक्षक मराठीत शिकवतात. कार्डिनल सायमन पिमेंटा यांनी ही मराठी जपली आणि वाढवली.

त्यांचा उपासना धर्म ख्रिस्ती असेल पण त्यांची समाज भाषा मराठी आहे. कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, चंद्रपूर. रेव्हरंड नारायण वामन टिळकांच्या वाटेने गेलेल्या अशा महाराष्ट्रातल्या कैक जिल्ह्यातील प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मीय भूमीपुत्रांची मातृभाषा मराठीच आहे. मराठीचे पहिले कादंबरीकार बाबा पदमनजी धर्माने ख्रिस्तीच होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी थोर स्वातंत्र्य सेनानी बॅ. काका बाप्टीस्टा यांची मातृभाषा मराठीच होती. दोघांच्याही कबरी शिवडीच्या ख्रिस्ती स्मशानभूमीत आहेत. तिथल्या अर्ध्या कबरींवरची प्रार्थना मराठीत आहे.

शांती आणि समतेच्या शोधात उपासनेचा धर्म बदलणाऱ्या या मराठीच्या पुत्रांनी आपली मायबोली आणि समाज भाषा बदलली नाही. कारण त्या मराठीचा वारसा ज्ञानेश्वर, तुकारामांचा आहे. करुणा आणि शांतीच्या शोधात त्यांना ख्रिस्त जवळ वाटला. कौतिकराव पाटील आणि श्रीपाद जोशींवर सनातन पत्थरांचा मारा करणाऱ्यांचा धर्म त्यांना जवळचा वाटला नाही. म्हणून तर त्यांनी धर्मांतर केलं. पण ज्ञानोबा, तुकोबांची मायबोली तीच करुणा आणि शांतीची उब देते म्हणून ती भाषा त्यांनी सोडली नाही. फादर दिब्रिटोंनी सुबोध बायबल लिहलं म्हणून आक्षेप आहे. फादर दिब्रिटो त्यांना धर्म प्रचारक वाटतात. पाणी शिंपडून धर्मांतर करणारे वाटतात. फादर दिब्रिटोंनी कोणाचं धर्मांतर केलं असतं तर बातमी आजवर लपून राहिली नसती. मराठीत भावार्थ दिपिका आणि गीतारहस्य यांचं जितकं महत्वं आहे तितकंच दिब्रिटोंच्या सुबोध बायबलचं आहे. तो काही धार्मिक ग्रंथ नाही. ती रसाळ, सुंदर साहित्य कृती आहे. मानवाच्या महान पुत्राची गाथा सांगताना मराठीचा जिव्हाळा आणि कळवळा सुबोध बायबलमध्ये पानोपानी जाणवतो. पानोपानी तुकाराम अणि ज्ञानेश्वरांचा अभंग हटकून येतो. जेरूसलेमचे राजे डेव्हीड आणि देहुचे तुकाराम बुवा यांची ईश्वर परायण मनं जुळणारी आहेत. 
फादर दिब्रिटो सांगतात -
हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी
लुलपते तसा हे देवा
माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे

- राजे डेव्हीड

कन्या सासूराशी जाये
मागे परतूनी पाहे
तैसे झाले माझे जीवा
केव्हा भेटसी केशवा

- संत तुकाराम

महाराष्ट्रात मराठीची गोची झाली आहे. तशी अन्य राज्यात तिथल्या भाषांची नाही. इथे मराठी म्हणजे हिंदू अशी ओळख बनली आहे. 'वसईकर परेरा, डाबरे, ब्रिटो ख्रिश्चन असूनही मराठी चांगलं बोलतात.' 'शफाअत खान, अब्दुल कादर मुकादम मुसलमान असूनही किती सुंदर मराठी लिहतात.' असं आपण सहजपणे बोलतो. मनाला वेदना होतात तेव्हा. यात कौतुकापेक्षा मराठी असणं म्हणजे धर्मभेद बाळगणं असं अंतर पडलेलं असतं. अरे त्यांचीही मातृभाषा मराठीच आहे. जशी ब्राह्मण, मराठा, साळी कोळी यांची भाषा मराठी आहे. विदर्भातले आदिवासी पूर्ण महाराष्ट्रीय असले तरी त्यांची मातृभाषा मराठी नाही. ती असते गोंडी, माडिया, कोरकू. वसंतराव नाईक, सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची मातृभाषा गोरमाटी (बंजारा). गुजरात, केरळ, तामिळनाडू इथे असा भेद नाही. तिथे भाषेला धर्म चिकटलेला नाही. केरळी ख्रिश्चन, हिंदू आणि मुसलमान यांची मल्यालमच असते. तीच गोष्ट तामिळींची. गोव्यातले हिंदू आणि ख्रिश्चन कोकणीच बोलतात. गुजरातमधले मुसलमान भाषेने गुजराती असतात. 

दिब्रिटोंचं ललित लेखन विपुल आहे. तितकंच वैचारिक लिखाण. पर्यावरणाच्या त्यांच्या लढाईत त्यांनी जे जे लिहलं त्यात धर्माचा संबंध येतो कुठे? ते माणसांसाठी लिहतात आणि समाजधर्म माणूसकी आहे हेच सांगतात. मी अस्सल भारतीय आहे, हे त्यांना सांगायला लागावं. आपल्या समाजातले नतद्रष्टयांनी त्यांचा खुलासा मागावा यासारखं दुःख काय आहे? धर्माव्यतिरिक्त त्यांनी खूप काही लिहलं आहे. पण त्यांनी नुसतं सुबोध बायबल लिहलं, तरीही ती मराठीची फार मोठी सेवा ठरते. जगभर बायबलच्या रोज हजारो प्रती विकल्या जातात. म. गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले अशा महामानवांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतली. त्या बायबयलचा परिचय करून देणं म्हणजे धर्मप्रचार नाही. दिब्रिटोंचा तो ग्रंथ म्हणजे केवळ अनुवाद नाही. ललितरम्य शैलीतला भावानुवाद तर तो आहेच, पण मानवाच्या इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या धर्मग्रंथाचा आणि परंपरेचा शोध घेणारा संशोधनपर ग्रंथ आहे. तो सांस्कृतिक सेतू आहे.

फादर दिब्रिटो लिहतात, 'येशूसाठी मुक्ती केवळ अध्यात्मिक जीवनापुरती मर्यादीत नव्हती. तर तिचा ऐहिक जीवनाशी अनन्य संबंध होता. माणूस केवळ आत्मा नाही. त्याला देहही आहे. म्हणजे तो देहात्मा आहे. म्हणूनच मुक्ती म्हणजे माणसाचे संर्वकष कल्याण साधणे होय. हा विचार या शुभवर्तमानातून आलेला आहे.' तिसरं शुभवर्तमान सांगताना संत लुकने येशूची प्रतिमा रंगवली आहे, 'गोरगरीब, वंचित, पीडित, स्त्री, मुले, विधवा, परित्यक्त्या यांचा मित्र.' फ्रान्सिस दिब्रिटो साहित्यिक म्हणून मोठे आहेतच. पण त्यापेक्षा माणूस म्हणून मोठे आहेत. संत लुक यांनी लिहिलेली तिसऱ्या शुभवर्तमानातली ख्रिस्ताची ती पायवाट दिब्रिटोंनी कधीच सोडली नाही. ख्रिस्त निर्भयपणे क्रुसावर गेला. हरीत वसईचा लढा उभारताना तीच निर्भयता दिब्रिटोंनी महाराष्ट्राला शिकवली. डेव्हीड - गोलिएथच्या कथेसारखी. गांधींच्या सत्याग्रहासारखी. खुद्द दिब्रिटोंनीच गांधींच्या सत्याग्रहाचं नातं डेव्हीड - गोलिएथच्या कथेशी जोडलंय. डेव्हीडने गावकऱ्यांना निर्भय बनवलं होतं. भारतीयांना गांधींनी. वसईतल्या दिब्रिटोंनी वर्तमानाला.

ते निर्भय फादर दिब्रिटो मी पाहिले आहेत. अनुभवले आहेत. अफवांचं विष कालवलेल्या विहिरीत उतरलो आहे. तळ गाठलेल्या त्या निर्मळ पाण्यात सौहार्द आणि सलोख्याचे मासे मुक्त विहरताना पाहिले आहेत. फादर ब्रिटोंच्या ओंजळीने त्या विहिरीतलं पाणी मी प्यायलो आहे.

९३व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटोंची निवड होणं ही अवघ्या मराठीसाठी सुवार्ता ठरावी.

परी सुवार्तेची वेळ समिप
होता ख्रिस्त मनात माझ्या...


हा ख्रिस्त कोणी देवाचा पुत्र नाही. ख्रिस्ती धर्माचा प्रेषित नाही. हा ख्रिस्त सनातन वेदनेवर फुंकर घालणारा मानवाचा महापुत्र आहे. माणुसकीच्या चिरंतन प्रवाहातून वाहणारी करुणा आहे. झाकोळलेल्या अलम मराठी दुनियेसाठी, द्वेष अन् भेदाच्या जखमांनी विव्हळणाऱ्या भारतासाठी साहित्य संमेलनाची ही घटना सुवार्ता ठरावी. ख्रिस्त अन् ज्ञानेशाच्या करुणेसारखी.

Tuesday, 17 September 2019

बुलंदला मरहूम कसं म्हणू?


बुलंद इकबालच्या नावामागे मरहूम लिहायची हिंमत होत नाही. इतक्या लवकर जाण्याचा त्याला अधिकारही नव्हता. जेमतेम ३६ वय होतं.

साथी निहाल अहमद यांचा तो मुलगा. त्यांचाच राजकीय वारसा तो चालवत होता. वडिलांच्या निधनानंतरही त्याने समाजवादाचा झेंडा खांदावरून उतरू दिला नाही. त्याच्या नावाप्रमाणे त्याचे इरादे, त्याची भाषणाची पद्धत आणि कामाची पद्धतही बुलंद होती. इकबाल म्हणजे यश. ते मिळण्याच्या आधीच तो निघून गेला. कॅन्सरने त्याचा घास घेतला. तो लहान असल्यापासून त्याला पाहत आलो आहे. तो आणि त्याची बहिण शान ए हिंदोस्ताँ दोघंही निहालभाईंचं बाळकडू प्यायलेले. त्यांच्या आईसारखे दोघंही आक्रमक. दोघंही मालेगाव महानगरपालिकेत नगरसेवक झाले. निहालभाईंची लोकप्रियता अखेरपर्यंत टिकून होती.

नव्या पिढीला निहालभाई माहित नसतील. आमदार होते. मंत्री होते. एवढंच ऐकून असतील. मंत्री होते म्हणजे गडगंज असतील, असा समज होईल. पण सायकलवरून फिरायचे. आमदारांचे पगार वाढवण्याचं बिल एकदा सभागृहात शिवाजीराव देशमुख मंत्री असताना मांडत होते. तेव्हा त्याचं कारण सांगताना निहालभाईंच्या फकीरीचं वर्णन त्यांनी केलं होतं. अशा फकीर आमदारांसाठी तरी ही वेतनवाढ आवश्यक असल्याचे समर्थन त्यांनी दिलं होतं. निहालभाई स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एस. एम. जोशींपासून ते शरद पवारांपर्यंत त्यांनी त्यांच्या सोबतीने तेवढंच योगदान दिलं. गरीबांचा कैवार घेणारे. पिवळं रेशनकार्ड आता गरीबांना मिळतं. पण त्यासाठी पहिली लढाई ज्यांनी केली त्यात निहालभाई अग्रभागी होते. नाशिकला आचार्य नरेंद्र देव, अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी, एस. एम. जोशी यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना केली. त्यावेळी निहालभाई तरुण नेते म्हणून त्यात सहभागी होते. आणिबाणीत ते तुरुंगात होते. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते.

एवढा मोठा वारसा त्यांचा धाकटा मुलगा बुलंद पुढे चालवत होता. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्याच्या कार्यक्रमांना गेलो आहे. हाकेसरशी प्रचंड गर्दी जमवायचा. बुलंद वक्ता होता तो. स्वभावही तितकाच प्रेमळ. गोड चेहऱ्याचा. पण करारी मताचा. विचारांचा. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात अनेकांची मुलं कशी सैरावैरा पळत आहेत. मुलांच्या मागे ७५ वर्षांचे बाप हतबल होऊन धावत आहेत. राजकारण सत्तेसाठीच असतं आणि सत्ता कशी मिळवायची असते. विचारांची बांधिलकी कशाला? असा स्वार्थाचा बोलबाला असलेल्या काळात बुलंद इकबाल अपवाद होता. आता तो अपवादही काळाने हिरावून घ्यायचं ठरवलं असेल तर काय करायचं?

बुलंद गेला असं म्हणवत नाही. म्हणून त्याला मरहूम म्हणत नाही. फक्त डोळ्यात पाणी आहे. भाभी आणि शान एकट्या पडल्या असतील. मालेगावलाही तेच वाटत असेल.

- कपिल पाटील

Thursday, 20 June 2019

पुन्हा अनुदानासाठी आझाद मैदानावर यावं लागू नये


अनुदानाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन करणारे घोषित - अघोषित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्वच शिक्षकांना दिलासा देणारी बातमी आहे. नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत जे अश्वासन दिलंय ते खूपच आशादायक आहे. त्यावर विश्वास यासाठी ठेवायचा कारण त्यांनी उत्तर अतिशय प्रामाणिकपणे दिलं, खंबीरपणे दिलं आणि त्यावेळेला खुद्द मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात हजर होते.  

पंधरा दिवसात याबद्दल निर्णय होणार आहे. अनुदान देण्याबाबत जी समिती गठीत झाली होती त्यातील एक सदस्य बदलून आता नव्याने आशिष शेलार आले आहेत. खुद्द शेलारांनीच हे जेव्हा सांगितलं तेव्हा मी दिलखुलास हसलो. माझ्या हसण्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कळला आणि त्यांनी कोटीही केली, 'उपसमितीतला एक सदस्य बदलला तरी कपिल पाटील किती खुश झालेत बघा!' मुख्यमंत्र्यांची ही कोटी सुद्धा आश्वासक आहे. म्हणून त्यानंतर मला भेटलेल्या वेगवेगळ्या टप्पा अनुदानातील शिक्षकांना मी सांगितलं, 'आता मार्ग खुला झाला आहे.'

शिक्षणमंत्र्यांकडून एक आकडा चुकला होता. पण दत्ता सावंत यांनी तो लगेच दुरुस्त करण्याची मागणी केली आणि सरसकट सगळ्याच शिक्षकांना अनुदान देण्याबाबत शेलार यांनी आश्वासन दिलं. शेलार यांनी असंही सांगितलं की, बजेटमध्ये शिक्षणासाठी पुरेशी तरतूद आहे आणि त्यातून हा खर्च भागवता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे. सर्वच शिक्षक आमदारांनी विक्रम काळे, गाणार, देशपांडे, बाळाराम पाटील, सतीश चव्हाण यांनी आज हा प्रश्न लावून धरला होता. 

मी शिक्षणमंत्र्यांना एक स्पेसिपीक प्रश्न विचारला, अनुदानाच्या टप्प्यासंदर्भातलं स्पष्टीकरण मला हवं होतं. ते स्पष्टीकरण यासाठी आवश्यक होतं, की 20 टक्क्याचं घोडं पुढे जाणार की नाही? प्रश्न पुढच्या टप्प्याचा नाही घायकुतीला आलेल्या माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांच्या मागणीच्या पूर्ततेचा आहे. माझा प्रश्न असा होता की, घोषित असोत वा अघोषित जे शिक्षक ज्या टप्प्यावर आहेत त्या पूर्ण टप्प्याचं अनुदान मूळ प्रचलित धोरण न बदलता देणार काय? शिक्षणमंत्र्यांनी त्यावर अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं. हा प्रश्न मी यासाठी विचारला की बहुतेक सर्व शिक्षक 100 टक्क्याचा टप्पा ओलांडून गेले आहेत. फारच थोडे 60, 80च्या टप्प्यावर आहेत. त्या सर्वांना तो पूर्ण टप्पा मिळायला हवा. आता आणखी 7 वर्ष प्रतीक्षा करायला लावणं हे काही योग्य नाही. म्हणून मी तो प्रश्न विचारला होता. सर्व शिक्षक आमदारांसोबत बैठक घेण्याचे आदेश मा. सभापतींनी दिले आहेत. आणि स्वतः मा. मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांच्या उत्तराकडे काळजीपूर्वक पाहत होते. 

संघर्ष खूप झाला. आपण आज सभागृहात जे घडलं त्यावर विश्वास ठेवूया. आणखी पंधरा दिवसांचा प्रश्न आहे. अधिवेशन संपताच ही बैठक होईल. किंवा आधीही होईल. प्रयत्न बैठक लवकर करण्याचाच राहील. आम्ही सारेजण त्यांच्या मागे लागू. पण पुन्हा अनुदानासाठी आझाद मैदानावर यावं लागू नये, हीच सरकारकडून अपेक्षा आहे. शिक्षकाचा आणखी अंत आता पाहीला जाणार नाही या भरवश्यावर पुढचे पंधरा दिवस वाट पाहायला हरकत नाही. निवडणूका जवळ आहेत. शिक्षकांना नाराज करणं परवडणारं नाही. 


(पावसाळी अधिवेशन - दि. २० जून २०१९, मुंबई)

Wednesday, 5 June 2019

निधी चौधरी म्हणजे प्रज्ञा ठाकूर की पायल रोहतगी?


निधी चौधरींच्या Tweet वर तुटून पडलेल्यांचं डोकं पायल रोहतगी पेक्षा वेगळं नाही. त्यांची तुलना प्रज्ञा ठाकूरशी करत नाही कारण ती पक्की आतंकवादी आहे. निष्पापांचे जीव घेण्याचं समर्थन करणारे आतंकवाद्यांइतकेच भयंकर असतात. पायल रोहतगीची तुलना यासाठी केली की डोक्यात भुसा भरला की काय होतं ते कळावं.

निधी चौधरी महाराष्ट्राच्या केडरमध्ये आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिकेत त्या अतिरिक्त आयुक्त होत्या. आता त्यांची बदली मंत्रालयात झाली आहे. त्या Tweet मुळे.

त्या सुट्टीवर आहेत. बाहेरगावी आहेत. आज सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो. माझं Tweet काहींना समजलं नसेल पण खुद्द मा. शरद पवार साहेबांनी पत्र लिहावं याचं दुःख त्यांना सलत होतं. पवार साहेब पक्के सेक्युलर आहेत. इहवादी आहेत. कर्मकांड, भाकड कथा आणि जातीयवादाला त्यांच्या मनात थारा नाही. त्याहून अधिक म्हणजे साहित्य संस्कृतीचं समृद्ध आकलन असलेले फार थोडे राजकारणी आहेत, त्यापैकी ते एक आहेत. त्यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या गोंगाटात गोंधळून पत्र लिहावं याचं स्वाभाविक आश्चर्य निधी चौधरी यांना वाटत होतं.

निधी चौधरी यांच्या त्या Tweet वर जितेंद्र आव्हाड तुटून पडले. गांधीद्वेष ज्यांनी वर्षानुवर्षे मनात जपून ठेवला आहे, ते मात्र गंमत पाहत आहेत. निधी चौधरी यांनी त्यांचं ते Tweet आता डिलीट केलं आहे. वाचकाला वक्रोक्ती कळत नसेल तर त्या तरी काय करणार. त्यांचं मूळ Tweet मुद्दाम जसंच्या तसं खाली देत आहे -
What an exceptional celebration of 150th Birth Anniversary is going on -
High time, we remove his face from our currency, his statues from across the world, rename institutions/roads named after him! That would be a real tribute from all of us !
ThankU #Godse for 30.01.1948


ही प्रतिक्रिया व्यंगात्मक आहे. वक्रोक्तीचा उत्तम अलंकार आहे. पण मराठी भाषा आणि साहित्यातला विनोद, व्यंग, उपरोध, 
वक्रोक्ती  या अलंकारांचा गंध नसलेल्यांना त्याचं आकलन कसं होणार? त्यांना वाटलं निधी चौधरी गोडसेचं समर्थन करताहेत. गांधींचं चित्र नोटेवरुन हटवायला सांगताहेत. पुतळे पाडायला सांगताहेत.

दोन दशकापूर्वी असंच काहीसं छगन भुजबळांच्याबाबत घडलं होतं. महापौर होते तेव्हा ते. मंडल आयोगाची ठिणगी पडली होती. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे भुजबळ अस्वस्थ होते. बंडाच्या पवित्र्यात होते. त्याच काळात गोडसेची जयंती हिंदुराष्ट्रवाद्यांनी साजरी केली होती. त्यावर भुजबळ उपरोधाने म्हणाले होते, 'आता गांधींचे पुतळे पाडले जातील आणि गोडसेचे पुतळे उभारले जातील.' त्यांच्या टिकेच्या रोखात शिवसेनाही होती. पण उपरोध कळला नाही आणि भुजबळांना गोडसे समर्थक ठरवण्यात आलं. आता जसं निधी चौधरींना ठरवण्यात आलंय.

निधी चौधरी तरुण आयएएस अधिकारी आहेत. इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत. त्यांच्या बॅचच्या त्या टॉपर आहेत. अधिकारी वर्ग सहसा बाकीच्या भानगडीत पडत नाही. पण निधी चौधरी संवेदनशील आहेत. सोशल मीडियावर त्या कायम जागरुक असतात. सोशल मीडियावरचा अतीउत्साह कधी कधी संकटात टाकतो. तसं त्यांचं झालं आहे. इंग्रजी साहित्यातले Satirist जोनाथन स्वीफ्ट (Jonathan Swift 1667 - 1745) ज्यांना माहित आहेत त्यांना निधी चौधरीच्या प्रतिक्रियेतलं व्यंग लगेच कळलं असेल. मात्र व्यंग, उपरोध, विनोद, वक्रोक्ती ज्यांच्या गावी नाही त्यांना काय कळणार?                  

   
निधी चौधरी पक्क्या गांधीवादी आहेत. गेले काही महिने द्वेषाचं राजकारण करणारे सोशल मीडियावर जो धुरळा उडवत आहेत त्यातून आलेल्या उद्वेगातून निधी चौधरींनी Tweet केलंय. इतिहासाची मोडतोड, महापुरुषांची घृणास्पद निंदा नालस्ती रोज सुरु असते. गांधींवर तर अनाप शनाप लिहणंही सुरु आहे. त्यामुळे निधी चौधरी यांनी चिडून ते व्यंग लिहलं. काळ कसा आला आहे, हे त्यांना सांगायचं होतं. त्यांनी आता सविस्तर खुलासा केला आहे. जुने अनेक स्क्रिनशॉट पुन्हा टाकले आहेत. खरं तर गरज नव्हती त्याची. पण खुलासा करावा लागला त्यांना.

अडचण निधी चौधरींची नाही. केवळ मराठीच नाही एकूणच भारतीय समाजाच्या आकलनाची आहे. आपलं शिक्षण आणि आपला भाषा साहित्य व्यवहार यांचा प्रदेश आपण किती संकुचित करुन ठेवला आहे. व्यंगही आपल्याला कळू नये. भावना लगेच उद्यपीत होतात. हिंसक होतात.

दिनकर मनवरची कविता आली तेव्हाही असंच घडलं. पाणी कसं अस्तं, या त्या कवितेवरुन किती वादळ आलं. पाणी हा शब्द मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये... या पहिल्या ओळीने कवितेची सुरवात होते. भिती शब्दाच्या उच्चाराची तर आहेच. पाणी की पानी. पाण्याला सोवळं आहे. स्पृश्य - अस्पृश्यता आहे. इतिहास आणि वर्तमानातल्या असंख्य वेदना पाणी कसं अस्तं या कवितेल्या प्रतिमा व्यक्त करतात.

काळं असावा पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभ
ळं   
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरुन?

या कवितेतल्या तिसऱ्या ओळीवरुन वादळ उठलं. आदिवासी तरुणांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. नामदेव ढसाळ न वाचलेल्या आंबेडकरी तरुणांचीही 
प्रतिक्रिया तशीच होती. कविता कुणी समजूनच घेत नव्हतं. दिनकर मनवरांनी कवितेत वापरलेल्या प्रतिमा इतक्या भन्नाट आणि अपूर्व होत्या की तोड नाही. त्याअर्थाने ही ऐतिहासिक कविता. मुद्दाम काही ओळी देतो.

धरण फुटल्यावर पांगापांग करतं माणसांची
ते ही पाणी पाणीचं अस्तं.?

पाणी स्पृश्य असतं की अस्पृश्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?

आदिवासींच्या आदिम दुःखालाही पाझर फोडणारी कविता समजली नाही. दिनकर मनवरही अधिकारी आहेत. त्यांना माघार घ्यावी लागली. निधी चौधरी यांनी माघार घेऊ नये.

असंच काहीसं घडलं होतं वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या कवितेबद्दल तीही कविता अशीच व्यंगात्मक होती. कळली नाही कुणाला. त्यातले शब्दप्रयोग श्लील अश्लीलतेच्या वादात सापडले. गोडसेवादी पतीतपावन संघटनेने गांधी कैवाराचा देखावा करत कवीला कोर्टात खेचलं. त्याबद्दलचा लेख सोबतची लिंक क्लीक करुन वाचता येईल - 
https://kapilpatilmumbai.blogspot.com/2015/06/blog-post_66.html


काही समजून न घेता जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा समजायचं वैचारिक मांद्य आलं आहे. आपण सगळेच त्याचे शिकार आहोत. चिंता करणारी सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर ती ही आहे. हे वैचारिक मांद्यच फॅसिझमला स्वार करत असतं.

माझी नम्र विनंती आहे आदरणीय शरद पवारांना त्यांनी त्यांचं पत्र मागे घ्यावे अन्यथा एका संवेदनशील आणि महात्माजींच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या अधिकारी बाईंचा बळी जाईल.

- कपिल पाटील

Tuesday, 4 June 2019

येईल तो दिवस



राष्ट्र सेवा दलाची पुनर्स्थापना झाली तो हा दिवस. 

ना. सु. हर्डीकरांच्या पुढाकाराने १९२३ मध्ये काकीनाडा काँग्रेसमध्ये हिंदुस्थानी सेवा दलाची स्थापना झाली. प्रामुख्याने स्वयंसेवकांचं ते दल होतं. म्हणून सेवा दलाचा दल दिन २८ डिसेंबरच असतो. त्याचं पुनर्जीवन राष्ट्र सेवा दल या नावाने शिरूभाऊ लिमये यांनी पुण्यात ४ जून १९४१ रोजी केलं. 

एस. एम. जोशी पहिले दल प्रमुख बनले. पण सेवा दलाला चेहरा आणि आत्मा दिला तो साने गुरुजी यांनी. अवघ्या एका वर्षात सेवा दल महाराष्ट्रभर आणि देशातल्या अनेक भागात पोचलं. अच्युतराव पटवर्धन, युसुफ मेहेरअली, उषा मेहता, मधु लिमये, नानासाहेब गोरे, शहानवाज खान, भाई वैद्य, डॉ. ना. य. डोळे, अनुताई लिमये, मोईद्दीन हॅरीस, निहाल अहमद, बापू काळदाते, मृणालताई गोरे, अभिनेत्री स्मिता पाटील, अभिनेता निळू फुले ही सारी सेवादलाची माणसं. 

महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांच्या हाकेला ओ देत हजारो सेवा दल सैनिक स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले. कितीतरी तरुण आणि कोवळ्या वयातील मुलांनी बलिदान दिलं. शिरीषकुमार, लाल दास, शशीधर केतकर, काशिनाथ पागधरे, भाई कोतवाल, धनसुकलाल वाणी किती नावं सांगायची? 

साने गुरुजींनी तीन मोठे वारसे सेवा दलाला दिले. एक स्वातंत्र्य चळवळीचा. दोन सामाजिक न्यायाचा. पंढरपूरच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने त्यांनी सेवा दलाची चळवळ फुले, शाहू, आंबेडकरांशी जोडली. अस्पृश्यता हटल्याशिवाय स्वराज्य आणि स्वातंत्र्याला काय अर्थ? असं ते विचारत होते. 

तिसरा वारसा आंतरभारतीचा. केशवसुतांच्या भाषेत सांगायचं, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे. हीच साने गुरुजींची वृत्ती होती. अनेक भारतीय आणि विदेशी भाषांमधील साहित्य त्यांनी मराठीत आणलं. माझ्या घराच्या खिडक्या आणि दारं उघडी राहू देत. चारी बाजूचे वारे माझ्या घरात येऊ देत. साने गुरुजींना आपल्या घराला कोणतीच कुंपणं मान्य नव्हती. सेवा दलाला सेवावृत्तीचा वारसा दिला तोही साने गुरुजींनीच. तो वारसा एस. एम. जोशी यांनी साने गुरुजी सेवा पथकाच्या नावाने जीवंत ठेवला.

राजा मंगळवेढेकरांनी नदीत अंघोळ करणाऱ्या साने गुरुजींना जानव्याशिवाय पाहिलं आणि विचारलं गुरुजी तुमचं जानवं कुठंय? गुरुजी म्हणाले, जानवं त्री वर्णाचं प्रतीक आहे. शुद्रांना तो अधिकार नाही. म्हणून मी ते फेकून दिलं. बंडखोर होते साने गुरुजी. ज्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाही ते मंदिर व तो देव माझा नाही, अशी कडक भूमिका घेणारे महात्मा गांधी आणि ब्रिटिशांपासून मुक्त होणाऱ्या भारतात माझ्या अस्पृश्य बांधवांच्या स्वातंत्र्याचा काय? असा गांधींना सवाल करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांशी साने गुरुजींचं नातं होतं. आणि या दोन्ही विचारांशी सेवा दलाचं नातं जोडलं ते ही साने गुरुजीनीचं. 

उद्या रमजान ईद आहे म्हणून आठवलं. भारतीय संस्कृती तिची महती सांगणाऱ्या साने गुरुजींनी इस्लामी संस्कृतीची ओळख करून देणारं अप्रतिम पुस्तक लिहलं. माणुसकीचा कैवार घेणाऱ्या पैगंबर महंमद साहेबांची जीवन गाथा लिहिली. राष्ट्र सेवा दलाची स्थापना, सेवा दलाचा वारसा आणि सेवा दलाचं भविष्य यामागे साने गुरुजींचीच प्रेरणा होती, आहे आणि राहणार आहे. साने गुरुजी मुलांमध्ये रमत असत. त्या मुलांना घडवणारं सेवा दल म्हणून त्यांना प्राणप्रिय होतं. 

आपली जीवन यात्रा संपवताना साने गुरुजींनी एकच इच्छा व्यक्त केली होती, देशात लोकशाही समाजवाद फुलू दे. कठीण काळातून आपण आज जात आहोत. उन्मादी राष्ट्रवादाचे हात देशातच नव्हे, जगभर अक्राळ विक्राळ पसरले आहेत. त्याच्याशी लढण्यासाठी साने गुरुजींचं सेवा दल साने गुरुजींचं ते क्रांतीगीत पुन्हा गाईल का, एकदिलाने... ?

उठू दे देश, उठू दे देश
येथून तेथून सारा पेटू दे देश, पेटू दे देश 

कमावता तुम्ही गमावता कसे
सिंह असून तुम्ही बनला रे कसे
तेजे उठा आता पडा ना असे
माणसे बना आता बनु नका मेष 

- कपिल पाटील 

फादर ग्रेगरी लोबो यांना श्रद्धांजली


मुंबईतल्या सामान्यातल्या सामान्य घरातल्या पालकांना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं अ‍ॅडमिशन कॉन्व्हेंट शाळेत व्हावं अशी इच्छा असते. इंग्रजी शिक्षणाच्या ओढ्यामुळे हे कारण असेल कदाचित, पण ते काही खरं कारण नाही. मुंबईतल्या पालकांना ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालवलेल्या शाळांमध्ये आपल्या मुलांची अ‍ॅडमिशन झाली पाहिजेत असं वाटत असतं. मिशनरी शिक्षण संस्थांबद्दल असलेला हा विश्वास आणि मूल्यांच्या भविष्याची हमी कशातून निर्माण झाली? मिशनऱ्यांच्या शाळेत घातल्याने आपला धर्म बाटत नाही. पण पुढे जाण्याचे दरवाजे उघडतात, असा त्यांना विश्वास असतो. ख्रिस्तेतर समाजातली भीती कशामुळे दूर झाली. ख्रिस्ती शिक्षण संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा आणि शिस्त याचं त्यांना कायम अप्रूप वाटत आलं आहे. कशामुळे हे झालं?

हा विश्वास निर्माण केला दोन माणसांनी. एक कार्डिनल सायमन पिमेंटा आणि दुसरे फादर ग्रेगरी लोबो. पिमेंटा यांनी निर्माण केलेला हा वारसा लोबो यांनी केवळ जपलाच नाही तर संवर्धित केला. पिमेंटा यांची मातृभाषा मराठी तर लोबो यांची कोंकणी. पण मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी दोघांनी दिलेलं योगदान मोठं आहे. फादर स्टीफन यांनी ज्ञानेश्वरांशी नातं सांगत मराठीचं पाहिलं गौरव गीत लिहलं... 
जैसी हरळांमाझी रत्नकिळा 
कि रत्नांमाजी हिरा निळा 
तैसी भाषामांजि चोखळा 
भाषा मराठी 

मराठीचा तो गौरव या दोघांच्या हृदयात होता. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीही तेवढ्याच ताकदीने शिकवली जाते. मुंबईतील बहुतांश कॉन्व्हेंट शाळेत मराठी भाषक शिक्षकांची संख्या मोठी आहे. धर्माने ते ख्रिस्ती आहेत की हिंदू आहेत हे त्यांनी पाहिलं नाही. त्यांची मायबोली मराठी आहे आणि अध्यापन कौशल्य उत्तम आहे एवढे दोनच निकष ते पाहत होते.  अन्य भाषक विद्यार्थ्यांचं मराठी चांगलं होतं याचं कारण पिमेंटा आणि लोबो यांनी घालून दिलेली चौकट आणि परंपरा. शिक्षण संस्थांमधली शिस्त आणि अध्यपनाचा दर्जा यांच्याशी फादर ग्रेगरी लोबो यांनी कधीही तडजोड केली नाही. सरकारला प्रसंगी सुनावण्याची हिंमतही त्यांच्याकडे होती. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताच्या विरोधात सरकारने निर्णय घेतले तर त्या विरोधात फादर ग्रेगरी लोबो ठामपणे उभे राहत असत. 



शिक्षक भारतीच्या आंदोलनात ते अनेकदा सहभागी झाले होते. अनेक कठीण प्रसंगात फादर लोबो यांचा पाठीवरचा हात मला मोठा दिलासा देऊन गेला आहे. 

फादर ग्रेगरी लोबो यांच्या जाण्याने मुंबईतील शिक्षणाची मोठी हानी झाली आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. 



Friday, 3 May 2019

आपल्या पत्रकारांची हाडं अजून शिल्लक आहेत!


आज World Press Freedom Day आहे. मुक्त पत्रकारितेचा कितीही पुरस्कार होत असला तरी पत्रकारिता कधीच मुक्त नसते. कधी सरकारची सेन्सॉरशिप असते. तर कधी मालकांची दडपशाही. कधी मार्केटमधल्या गुंडांची दहशत असते. तर कधी सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध दुखावतात म्हणून त्यांच्या यंत्रणांची जुलूम जबरदस्ती असते. जिथे न्यायसंस्थाच घुसमटली आहे तिथे मीडिया किंवा प्रेस स्वतंत्र आहे असं कसं मानणार? 

पत्रकार असलेल्या आईच्या खुन्यांचा शोध तिचाच मुलगा मॅथ्यू कॅरुआना गॅलिझिया घेतो आहे. त्याने ब्लॉग लिहिला आहे. त्याच्या ब्लॉगच्या मराठी अनुवादाची लिंक पुढे देत आहे. 

पण त्याच्या आईचे खुनी अजूनही मिळालेले नाहीत. खाशोगीला तर सत्ताधाऱ्यांनी वितळवून मारला. हाडंही शिल्लक राहिली नाहीत. तीही वितळली. आपल्याकडच्या पत्रकारांच्या शरीरातली हाडं अजून शिल्लक आहेत एवढंच म्हणता येईल. पण मुक्त मीडियाचं नरडं कधीच दाबलं गेलं आहे. सत्ताधाऱ्यांना नको असणाऱ्या पत्रकारांना मालकच ठेवत नाहीत. कारण त्यांचं चॅनल, त्यांचं माध्यम, त्यांचा प्रेस, त्यांचा व्यवसाय त्यांना चालू ठेवायचा असतो. त्यांचे आर्थिक हितसंबंध त्यात गुंतलेले असतात. त्यामुळे प्रचंड घुसमटीखाली आजचा भारतातला प्रेस वावरतो आहे. अपवाद फक्त एखाद्या रवीशकुमारचा, पुण्यप्रसून वाजपेयीचा, राजदीप सरदेसाईचा. पुण्यप्रसून वाजपेयीला तर कितीतरी नोकऱ्या सोडाव्या लागल्या. आपले निखिल वागळे तर कुणालाच नको असतात. निरंजन टकलेंना तर न्यायमूर्ती लोयांची स्टोरी छापून येत नव्हती म्हणून नोकरी सोडावी लागली होती. अडचणीचे पत्रकार कुणालाच नको असतात. आणि त्यामुळे नाना दडपणं त्यांच्यावर टाकली जातात. सत्ताधाऱ्यांना खरं सांगणारा पत्रकार कधीच नको असतो. सत्ताधाऱ्यांचा आश्रय असला की गौरी लंकेशवर फॅसिस्ट गोळ्या चालवतात. 

संविधानाने दिलेलं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, मुक्तपणे बोलण्याचं स्वातंत्र्य, वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य हा देशवासीयांना त्यांच्या नागरिकत्वाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. तो वाहून नेण्याचं काम पत्रकार करत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जो वाहून नेतो किंवा ज्यांच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात उतरतं त्या प्रेसचं नरडं दाबलं की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहतच नाही. मग त्यासाठी वेगळी सेन्सॉरशिप लादायची गरज लागत नाही. आज नेमकी तशी स्थिती आहे भारतात. निवडणुका सुरु आहेत. अंतिम टप्यात आहेत. तरी सुद्धा सगळंच खरं कुठे सांगितलं जातंय? त्यांचं उत्तर नाही असंच आहे. ही घुसमट दूर करणं, मोकळा श्वास घेणं यासाठी आपल्याच निर्धाराची गरज आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य टिकलं तरच आपल्याला लोकशाहीचा मोकळा श्वास घेता येईल. 

मी स्वतः पत्रकार असताना यातून गेलेलो आहे. सत्ताधाऱ्यांना नको होतो म्हणून 'आज दिनांक' बंद पाडण्यात आला. पंधरा दिवसात मी 'सांज दिनांक' सुरु केला. पण त्यानंतरही मार्केटमधून सगळ्या बाजूने कोंडी करण्यात आली. त्या कोंडीतून बाहेर पडणंच शक्य नव्हतं. सत्ताधारी बलाढ्य होते आणि पत्रकार म्हणून आपला जीव लहान असतो. तडजोड न करता त्यावेळी दिलेल्या संघर्षात माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप साथ दिली होती. त्याच दिवशी मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीच्या संवर्धनासाठी राजकीय जागरूकता, राजकीय शक्ती तेवढीच महत्त्वाची असते आणि त्यात सक्रीय राहणं आवश्यक असतं. 

मॅथ्यू कॅरुआना गॅलिझिया याचा ब्लॉग आज मुद्दाम पुढे देत आहे. बीबीसी मराठीवर त्यांचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. जरूर वाचा. https://www.bbc.com/marathi/international-48137041

गेल्या वर्षभरात जगभरात 95 पत्रकारांचा बळी गेला. त्यांना आणि त्याआधीही पत्रकारितेचं स्वातंत्र्य जपण्यासाठी जे पत्रकार शहीद झाले त्यांना सलाम! 

आमदार 
अध्यक्ष, लोक भारती