अखेर
सचिनने मैदानाचा निरोप घेतला. डोळ्यात त्याच्या तेव्हा अश्रू होते. स्टेडियम स्तब्ध
होतं. अख्ख्या इंडियाच्या डोळ्यात तेव्हा पाणी होतं. कारण सचिन खेळतो तेव्हा इंडिया
खेळत असते. सचिन आऊट होतो तेव्हा इंडिया आऊट होतो. प्रत्येक भारतवासीयाचं त्याच्यावर
प्रेम आहे. म्हणूनच त्याचा हा निरोप चटका लावतो. जणूकाही आपणच आता खेळणार नाही आहोत.
खेळायचा आनंद आता घेता येणार नाही. आनंद इतक्या लवकर थोडाच रिटायर करायचा असतो. प्रत्येक
भारतीयाचं सचिनशी असलेलं हे विलक्षण नातं जोडलं होतं ते सचिनेच. परवा अभिषेक बच्चनची
प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. सचिनने 10 रन्स केल्या, 50 केल्या काय किंवा सेंच्यूरी ठोकली काय, ती प्रत्येक रन जणू आपण स्वतः करतो आहोत असं प्रत्येक भारतीयाला
वाटतं.
असं
नातं आजपर्यंत कुठल्याही खेळाडूचं भारतात निर्माण झालं नव्हतं. प्रत्येकजण त्यात
स्वतःला पाहतो. सचिन म्हणून खरा भारतरत्न आहे.
खेळाडू
म्हणून तो किती महान आहे, हे सांगण्याची आपली पात्रता नाही. पण तो माणूस म्हणूनही खूप
मोठा आहे. 200 अनाथ मुलांचा तो सांभाळ करतो, म्हणून हे सांगत नाही. त्यांच्या सासूबाई
अनाबेल मेहता यांच्या संस्थेत आणि तसंच अनेकांना तो मत करतो, म्हणून तो केवळ मोठा
नाही. क्रिकेटचं पिच तयार करणार्या आणि मैदानाचं रखरखाव ठेवणार्या माळ्यांची
तो आठवणीने विचारपूस करतो. आऊट होणार्या सेहवागवर कोच जॉन राईटने हात उगारला म्हणून
सौरभने माफी मागायला सांगितली. तेव्हा वडिलांच्या जागी असणार्या राईट सरांकडून माफी
मागायला लावणं बरं नाही, हे सचिनच सांगू शकला. शेवटचा सामना बघायला आपल्या आईबरोबर
आपल्या गुरुलाही आणण्याची व्यवस्था त्याने केली. पण आचरेकर सरांच्या आजारपणात
त्यांची सगळी काळजी आणि व्यवस्था एखाद्या मुलाप्रमाणे सचिननेच केली. अडचणीतल्या
अनेक सहकारीक्रिकेटपटूंना व मित्रांना सचिनने मतीचा हात अनेकादा दिला. तोही कोणतीही
अपेक्षा न करता.
तो
कोणत्याही वादात जात नाही. कुणाशी भांडत नाही. अगी लताबाईंसारखी प्रतिक्रिया देऊन अडचणीतही येत नाही. मी मराठी आहे याचा अभिमान तो बाळगतो. पण सर्व प्रथम भारतीय
आहे, असं छातीठोक सांगायलाही तो कचरत नाही. त्याचा एक वेडा चाहता आहे, सुधीरकुमार
चौधरी मुझफ्फर नगर, बिहारचा. त्याच्याही आनंदाला तो आवर्जून साथ देतो. सचिन रमेश तेंडुलकर
या माणसाचं हे असं नातं अख्ख्या देशाशी जोडलेलं आहे. पूर्वी गांधी, नेहरु आणि मौलाना आझाद यांच्या सारखे नेते देश जोडण्याचं
काम करत. आताचे राजकारणी देश तोडण्याचं काम करतात. आता देश जोडण्याचं काम फक्त एपीजे
अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ आणि सचिन तेंडुलकर सारखे महान खेळाडूच करतात.
भारत रत्न एकाचवेळी सचिन आणि सी. एन. आर. राव यांना जाहीर व्हावा, याचा म्हणूनच अधिक आनंद आहे.
आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com
No comments:
Post a Comment