कुणी मोठं माणूस गेलं तर मोठयांच्या चर्चेपलिकडे मुलांच्या जगात त्याला फारसं स्थान नसतं. पण पहिल्यांदी असं घडताना पाहतो आहे की, या देशातील लहान मुलं काल रात्रीपासून अस्वस्थ झाली आहेत. त्यांचे प्रिय कलाम चाचा गेले आहेत.
अबुल फकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम काल संध्याकाळी अवचित गेले. तुमच्या आमच्यासाठी माजी राष्ट्रपती गेले. भारताला शक्तीवान बनवणारा मिसाईल मॅन गेला. महान शास्त्रज्ञ गेला. ही कसर कदाचित उद्या भरुन निघेल. पण मुलांचे कलाम चाचा गेले. ही कसर कशी भरुन काढणार?
मुलांशी, देशातल्या तरुणाईशी, देशातल्या विद्यार्थ्यांशी बोलू शकणारा दुसरा नेता आहे काय? पंडित नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान. पंडित नेहरु पहिले चाचा होते. साठ वर्षानंतर दुसरे चाचा मिळाले. मुलांना राष्ट्रपतींची नावं विचारा त्यांच्या तोंडी पहिलं नाव असेल ए. पी. जे. अब्दुल कलाम. देशातल्या मुलांपर्यंत, देशातल्या तरुणाईपर्यंत आणि देशाच्या उद्याच्या पिढीपर्यंत पोचलेले ते पहिले राष्ट्रपती.
कलाम साहेब मुलांशी इतक्या सहजपणे कसे बोलू शकत होते? देशासाठी उद्याच्या पिढीमध्ये ते सहज स्वप्न कशी पेरत होते? ही कला त्यांना कुठून अवगत झाली. त्याचे रहस्य त्यांच्या मातृप्रेमात होते.
मुलांशी बोलू शकणारे, उद्याच्या पिढीत स्वप्न पेरु शकणारे, एक महान प्रतिभावंत कवी साने गुरुजी महाराष्ट्राने अनुभवले आहेत. आईचं हदय त्यांच्याकडे होतं. असंच आईचं हदय कलाम चाचांकडेही होतं. लहापणातली एक आठवण त्यांनी लिहून ठेवली आहे. आईच्या मांडीवर डोकं टेकून झोपलेल्या छोटया कलामच्या चेहऱयावर ओघळलेल्या आईच्या अश्रूंबद्दल. आईवर अतोनात प्रेम होतं कलामांचं. तिच्या भेटीसाठी ते व्याकुळ होते. कयामतला पुन्हा भेटू असं ते आपल्या कवितेतून म्हणतात.
पालगडच्या समुद्रावर आई आई अशी हाक मारणारा छोटा शाम आपल्या पिढीने वाचला असेल. कयामतच्या दिवशी तुला मी भेटेन असं सांगणारे कलाम चाचा आपल्यातून निघून गेले हे सर्वात मोठं नुकसान आहे.
कलाम साहेबांना एअरफोर्स मध्ये पायलट व्हायचं होतं. आठ जागा होत्या. त्यांचा नंबर नववा आला. म्हणून त्यांना संधी मिळाली नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. पण कलाम साहेबांच्या संशोधनातल्या पायलटगिरीमुळे अवकाश संशोधनात भारताने जगाला चकित करणारी झेप घेतली.
त्यांच्या क्षेपणास्त्रांमुळे ते मिसाइल मॅन म्हणून ओळखले जात. नाग, पृथ्वी, अग्नी या त्यांच्या क्षेपणास्त्रांनी भारताला हवाई संरक्षण मिळवून दिले. ही क्षेपणास्त्र डागण्यासाठी, भीती दाखवण्यासाठी नव्हेत. हे अग्नी गोल, हे अग्नी पंख भारतीय भावनांचे, अस्मितांचे प्रतिक आहेत असं त्यांनींच लिहून ठेवलं आहे. भारत आक्रमक नाही. हिंसक नाही. पण भारत सुसज्ज आहे. सशस्त्र आहे. उन्नत आहे आणि कुणापुढे झुकणारा नाही. म्हणून शांतीचा वाहक आहे. आश्वासक आहे. ही आश्वासकता देशाला मिळवून दिली ती कलाम साहेबांच्या संशोधनाने. त्यांच्या टीमवर्कने.
एकाच वेळी ईशनिष्ठा, देशनिष्ठा आणि विज्ञानिष्ठा यांचा सुंदर मिलाफ कलाम साहेबांकडे होता.
प्रमोद महाजन यांनी सांगितलेली एक आठवण सांगतो, डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरायचा होता. कोणत्या मुहूर्तावर अर्ज भरुया, असं महाजन साहेबांनी त्यांना विचारलं. कलाम साहेब त्यांना म्हणाले की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून वर्ष होतं. 365 दिवस होतात आणि स्वत:भोवती फिरते म्हणून दिवस रात्र होते. याचा अर्थ प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र सूर्याचा आणि पृथ्वीचा आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण शुभ आहे. मी कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी अर्ज भरायला तयार आहे. कलामांची विज्ञाननिष्ठा अशी होती.
राष्ट्रपती
म्हणून त्यांना सगळयात अवघड काम वाटत होतं, ते फाशीच्या शिक्षेपासून दया मागणाऱया अर्जावर निर्णय घेण्याचं. 50 मृत्यूदंड त्यांनी माफ केले. पण एक माफ केला नाही. एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन ठार मारणाऱया कलकत्यातील धनंजय चॅटर्जीला त्यांनी माफी दिली नाही. आपल्या टर्निंग पाँईट पुस्तकामध्ये मृत्यूदंड विरोधात आपलं मत व्यक्त केलं. त्या माणसाने एका निष्पाप मुलीवर अत्याचार केला, बलात्कार केला आणि त्या मुलीला ठार मारले. म्हणून मी त्याला माफी दिली नाही. केवळ सामाजिक आणि आर्थिक भेदभावामुळे ही प्रकरणं प्रलंबित ठेवली जातात असं त्यांनी लिहून ठेवलं आहे.
कलाम साहेब भारतीय संस्कृतीचे मूर्तीमंत प्रतिक होते. देशातील सर्व नद्या आणि दोन्ही समुद्र जेथे मिळतात त्या धनुष्यकोडी येथे त्यांचा जन्म झाला. त्यामुळेही असेल कदाचित. परंतु, देशातील सर्व तीर्थांचे सार त्यांच्या जीवनात आणि चरित्रात दिसून येतं. ते संगीत प्रेमी होते. वीणा वादक
होते. कवी होते. शास्त्रज्ञ होते. लेखक होते. प्रतिभावंत द्रष्टा नेता होते. तमिळ उच्चारांचे त्यांचं इंग्रजी इतकं सहज सोपं होतं की इंग्रजी भाषणाची फारशी सवय नसणाऱयांनाही ते कळावं. सुभाषितांसारखे ते बोलत.
स्वप्न खरी होतात, म्हणून स्वप्ने पाहिली पाहिजेत.
संकटांचा सामना केलाच पाहिजे कारण त्याशिवाय यश मिळणार नाही.
अडचणींवर स्वार व्हायला शिका, अडचणींना स्वार होऊ देऊ नका.
मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत. विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम गुण प्रश्न विचारणं हाच आहे.
मोठयांना मात्र ते सांगत, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला आजचा दिवस कुर्बान करा.
ते आवर्जून सांगत होते की, भारताने जगाच्या पाठीवर मोठ्या देशांच्या बरोबरीने उभे राहिले पाहिजे. त्याशिवाय या देशाला सन्मान मिळणार नाही, कारण शक्ती संपादन केल्याशिवाय या जगात कोणी सन्मान देत नाही. भारताला शक्तीमान व बलवान करण्याचे ध्येय ऊराशी बाळगून ते आयुष्यभर काम करीत होते. Twenty-Twenty च्या खेळात दंगलेल्या तरुणाईला कलामांनी 2020 चं दुसरं स्वप्न कलामांनी दिलं. बलसागर भारत होण्याचं. फक्त पाच वर्षे उरली आहेत आपल्याकडे सभापती महोदय, मिसाईल मॅन सोबत नाही. पण त्यांनी निर्माण केलेली उर्जा. त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांनी शिकवलेला वेग, अविरत मेहनतीची दिलेली दीक्षा आपल्या सोबत आहे. क्षेपणास्त्राची ताकद असलेला त्यांचा मंत्र ते मागे ठेऊन गेलेत आपल्यासाठी. 20-20 चं स्वप्न पुरी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वंची आहे. या देशाच्या महान सुपुत्राला व महान रत्नाला मी अखेरचा सलाम करतो.
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
अध्यक्ष, लोक भारती
-------------------------
पावसाळी अधिवेशन जुलै 2015 मध्ये
विधान परिषदेत दि.27 जुलै 2015 रोजी केलेलं भाषण.