विजय सातपुते अवचित गेला. जाणार होता. पण इतक्या लवकर जाईल असं वाटलं नव्हतं. त्याला हृदयविकार जडला होता. त्याचं हार्ट मोठं झालं होतं. त्याला मी गमतीने म्हणायचो, आता तू विशाल हृदयाचा झाला आहेस. तो हसायचा. पण त्यातली खिन्नता लपायची नाही. आजारपणाचं ओझं त्याने उगाच घेतलं होतं. अन्यथा आणखी जगला असता. जगायला हवा होता माझा हा मित्र.
सेवा दल आणि छात्रभारती पासूनचा सहकारी होता, विजय सातपुते माझा. अनेक चळवळीत, धडपडीत आम्ही एकत्र होतो. आम्ही आधी सामाजिक न्याय पक्ष काढला होता. विजय अर्थात सोबत होता. नंतर लोक भारतीत तो स्थापनेपासून होता. पण विजय मनस्वी होता. पक्षाच्या चौकटीत न बसणारा. त्याच्या भूमिका अनेकदा अडचणीत टाकायच्या. त्यालाही. पक्षालाही. आम्हालाही. पण म्हणून त्याचा कधी राग येत नसे. तो प्रामाणिकपणे ती भूमिका मांडत असे. त्याच्या मांडणीत गफलती असत. भाबडेपणा असे. भूमिका बदलली की तो टोक गाठायचा. अनेकदा अतार्किक. पण तरीही तो हवा असे आम्हाला. कारण त्याच्या मांडणीत आणि बदलण्यात काही मुद्दा असे. तो मुद्दा कोड्यात टाकायचा. विचार करायला लावायचा. परेशान करायचा. आणि मित्रांच्या परेशानीत तो खूश असायचा.
‘फुले-आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट’ नावाची एक पुस्तिका त्याच्या सरहपा प्रकाशनाने काढली होती. कॉम्रेड शरद पाटलांचाच तो खरा कार्यकर्ता. पक्का आंबेडकरवादी. एकदा तर भिख्खू बनायला निघाला होता. चिवर न घालताही त्याला भिख्खू पदाची जणू मान्यता मिळाली होती. पुढे त्याने इतकं टोक गाठलं की हाच का तो विजय सातपुते असा प्रश्न त्याच्या जवळच्या मित्रांना पडला. धर्मांतराचा प्रश्न असो की मराठी हिंदी भाषिक वाद अशा काही प्रश्नांवरील त्याच्या भूमिका वादग्रस्त होत्या. पण तो सत्यशोधक होता. फुले-शाहू-आंबेडकरांच्या तत्वज्ञानातला सत्यशोधकी बाणा तो सतत वागवत होता. त्यामुळे सागर तायडे असोत किंवा मी, आम्ही त्याच्या मैत्रीत कधीच अंतर येऊ दिलं नाही.
विजयकडे उत्तम लेखणी होती. त्याने कविता खूप लिहिल्या आहेत. त्याच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह यायला हवा. त्याची महामुद्रा कादंबरी वाचनीय आहे. मराठी कादंबऱया मी फारश्या कधी वाचत नाही. साने गुरुजी आणि भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱया तेवढ्या वाचल्या आहेत. म्हणजे वाचण्यासारख्या आहेत. विजयची महामुद्रा मी एका दमात वाचून काढली होती. आपल्या मित्राची कादंबरी म्हणून असेल कदाचित. वैचारिक साहित्य वाचणं आणि वैचारिक लिखाण करणं हे दोन्ही छंद त्याला होते. त्याच्या सत्यशोधक पत्रिकेत तो नियमित लिहीत असे. ती पत्रिका नियमित काढत असे. वैचारिक प्रकाशन चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण विजय सातपुतेने अव्याहतपणे ते केलं. पदरमोड करत केलं. हे करताना घरच्यांवर अन्याय नक्कीच झाला असेल. पण त्याची पत्नी सीरत आणि मुलगा अनिकेत यांनी तसं कधी मानलं नाही. विजयला त्या दोघांनी खूप साथ दिली. सीरत स्वत डीटीपी करायची. त्यांचा घरात कुत्रा होता. त्याची विजयवर खूप माया. खर तर विजयच मायाळू. सीरत आणि अनिकेतला त्याने प्रेम भरपूर दिलं. मित्रांवरही तो तसाच प्रेम करायचा. माझ्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत विजयने मला खूप मोठी साथ दिली. माझ्याबरोबर तो शाळा-शाळांमध्ये येत असे. दौऱयावर गेलो तरी सोबत राहत असे. तो भाषण करत नसे. शांतपणे निरीक्षण करायचा. नंतर मला सांगायचा. माझं प्रचार साहित्य तयार करण्यातही त्याची खूप मेहनत होती.
शरद पाटलांचा त्याच्यावरचा प्रभाव अमिट होता. विजयच्या अनेक पुस्तिका, लेख त्याची साक्ष देतात. बुद्धगया मुक्ती चळवळीचा महाराष्ट्रातला तो जणू एकमेव प्रणेता होता. त्यासाठी तो खूप झटला, हिंडला. भारतीय जाती व्यवस्थांचा कायदा कसा असला पाहिजे याचा मसुदाही विजय सातपुतेने तयार केला होता. त्याच्या पुस्तिका, पत्रकं छापून प्रचार, प्रसाराचा काम त्याने नेकीनं केलं. जाती व्यवस्था विरोधी असलेल्या सर्व दार्शनिक प्रवाहांचा प्रचार, प्रसार व्हावा हा त्याचा आग्रह होता. जात व्यवस्था ज्या पारंपारिक अर्थकारणावर उभी होती ती मोडून काढण्याचा प्रस्ताव त्याच्या या मसुद्यात होता. जाती व्यवस्था विरोधी चळवळीत या पद्धतीने विचार करणारा आमच्या पिढीतला तो एकमेव कार्यकर्ता होता.
त्याच्या मते जाती व्यवस्थेचा अंत हे फुले-आंबेडकरी चळवळीचं प्रधान उद्दिष्ट असले तरी तिचे अंतिम उद्दिष्ट बुद्धाने वर्ण जाती विहीन उपासक-उपासकींचा जो संघ उभा केला त्या संघाचे आजच्या काळात उच्च पातळीवर पुनर्जीवन करणे हे आहे. या ध्येय्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून दिलं पाहिजे असं त्यांनेच लिहून ठेवलं आहे. त्याने स्वत:स त्यासाठी झोकून दिलं होतं.
----------------------------
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
अध्यक्ष, लोक भारती
----------------------------
सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिका -
विजय सातपुते स्मृती विशेषांकमधून
२० जुलै २०१५