सभापती महोदय, श्री. रा. सू. गवई यांचा आंबेडकरी चळवळीतील सहभागामुळे व्यक्तीगत स्नेह मी अनुभवला आहे. या सभागृहाचे सभापती, सदनाचे ज्येष्ठ सदस्य, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांचे काम मी गॅलरीतून अनेक वेळा पाहिले आहे. हा माणूस अत्यंत ग्रेट होता. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी या राज्याला अनेक प्रतिभावंत कलावंत, लेखक, कवी, विचारवंत व नेते देखील दिले आहेत. दादासाहेब त्या सर्वांमध्ये अग्रणी होते. श्री. रा. सू. गवई बिहार राज्याचे राज्यपाल असताना आम्हा सर्वांना त्यांनी आवर्जून बोलाविले होते. आम्ही बिहारला गेलो होते. राजभवनावर आम्हाला कधी राहता येईल काय? याबाबत आम्हाला मुंबईतील राजभवनाकडे पाहून फार कौतुक वाटत असे. बिहार येथील राजभवनात त्यांनी आम्हाला दोन दिवस ठेवले होते.त्यांच्या सोबत घालविलेले क्षण कधीही विसरता येणार नाही.
सभापती महोदय, मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतर चळवळीतील रा.सू. गवई यांचे काम अतुलनीय होते. मंडल आयोगाच्या चळवळीच्या वेळी ते दिवसरात्र गावागावात आमच्यासोबत फिरत होते. मुंबईत मंडल आयोगाच्या समर्थनार्थ पहिली परिषद झाली त्या परिषदेसाठी रा. सू. गवई, एस. एम. जोशी, प्रमोद महाजन, अहिल्याताई रांगणेकर असे दिग्गज उपस्थित होते. या सर्व मंडळींना त्यांनी एकत्र केले होते. देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा पहिला आवाज पोद्दार कॉलेजच्या सभागृहात उठला होता. महात्मा फुले यांची बदनामी करण्याचा प्रयत्न बाळ गांगल यांनी केला तेव्हा प्रचंड मोठा मोर्चा मुंबईत काढण्यात आला होता. त्या मोर्च्याचे नेतृत्व रा. सू. गवई यांनी केले होते, त्यांच्याकडे संघटन कौशल्य होते.
सभापती महोदय, दीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याबाबत मला बोलण्याची गरज नाही. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे उचित स्मारक करण्याची कल्पकता व प्रतिभा त्यांच्याकडे होती. ती अभावानेच दुसरीकडे आढळते. ते रसिक व कलासक्त होते. कोणत्याही क्षणी ते अगदी सहजतेने बोलत होते. उगाच ओढून घेतलेले गांभीर्य त्यांच्याकडे नसे. एखादा गंभीर विषय ते हलक्या फुलक्या शब्दांनी हाताळीत असत. ती त्यांची विलक्षण हातोटी होती. दादासाहेबांचे चळवळीतील, आंबेडकरी चळवळीतील व महाराष्ट्रातील संसदीय प्रथा परंपरेचे योगदान अभूतपूर्व आहे. मी त्यांना अखेरचा जयभीम करतो.
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
अध्यक्ष,
लोक भारती
-------------------------
पावसाळी अधिवेशन जुलै 2015 मध्ये
विधान परिषदेत दि.27 जुलै 2015 रोजी केलेलं भाषण.
No comments:
Post a Comment