देशभक्त कोण अन् देशद्रोही
कोण? हे ठरवण्याचा मक्ता सध्या भाजपच्या संघटनांना मिळाला आहे. अभाविप, बजरंग दल, विश्व
हिंदू परिषद या संघटनांमध्ये आता वकील संघटनांची भर पडली आहे. माजी सैनिकांना
त्यासाठी उतरवण्यात आलं आहे. ज्यांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अजेंडा मान्य आहे,
ते देशभक्त. ज्यांना मान्य नाही, ते देशद्रोही. देशाची उभी फाळणीच त्यांनी
केली आहे.
भारतीय जनता पक्षात शहाणी
मंडळी नाहीत काय? अटलबिहारी वाजपेयींचा उदार राजधर्म पाळणारी माणसं सत्ताधारी पक्षात
उरली नाहीत काय? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, वसंतराव भागवत यांच्यासारखी सामाजिक
भान असलेली मंडळी काळाच्या पड़द्याआड गेली आहेत. जे आहेत, ज्यांना राजधर्म कळतो ते एकतर
अल्पसंख्य झाले आहेत किंवा त्यांना पक्षांतल्या हुकूमशहांचं भय आहे. शत्रूघ्न
सिन्हांचा अपवाद सोडला आणि अभविपच्या दिल्लीतल्या तीन बंडखोर पदाधिकार्यांची
हिंमत सोडली तर बाकीचे या भयाने गप्प आहेत. एकमात्र खरं देशाच्या स्वातंत्र्य लढाईत
ज्यांना काडीचाही वाटा नव्हता, ज्यांनी तिरंग्याला कधी सलाम केला नव्हता, ज्यांनी
राष्ट्रगीत कधी म्हटलं नव्हतं त्यांच्या हातात चक्क तिरंगा आला आहे. रेशिमबागेत कधी
तिरंगा फडकला नव्हता. यांच्या प्रजाकसत्ताक दिनी तो चक्क फडकला आणि जेएनयुला देशभक्तीचे
डोस पाजणार्या वकीलांच्या मोर्च्यातही तिरंगाच होता. तिरंगा प्रेमाने नाही मजबुरीने
त्यांच्या हातात आहे. कन्हैयाच्या त्या गाजलेल्या १० फेब्रुवारीच्या भाषणातलं पहिलंच
वाक्य होतं, 'ज्यांनी तिरंगा जाळला होता... त्यांच्याकडून देशभक्तीच्या सर्टिफिकेटची
आम्हाला गरज नाही.'
रोहित वेमुला माँ भारतीचा
लाल होता, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्याच पक्षाचे मंत्री
आणि द्वेषउ़द्योगी खासदार रोहितला अतिरेकी, देशद्रोही म्हणत होते. त्या रोहित
वेमुलासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीत मुलं आंदोलनात उतरली, तर त्यांना
देशद्रोही ठरवण्यासाठी कोण आटापिटा चालला आहे. कन्हैयाकुमार जेएनयुनच्या वि़द्यार्थी
मंडळाचा अध्यक्ष म्हणून निवडून आलाय. एकदम गरीब घरातला आहे. आई अंगणवाडी शिक्षिका आहे.
पण जोरदार बोलतो. मांडणीत एकदम क्लॅरिटी. रोखठोक. कन्हैया दलित किंवा ओबीसी नाही.
भूमिहार आहे. बिहारच्या भाषेत फॉरवर्ड. महाराष्ट्रातल्या भाषते देशमुख-मराठा. पण पक्का
कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी. तो घोषणा देत होता, तेव्हा त्याच्या बाजूला उमर खालिदही
उभा होता. घोषणा काय होत्या, हमे चाहिए आझादी... मनुवाद से आझादी, संघीवाद से आझादी,
सामंतवाद से आझादी, भूखमरी से आझादी, पुंजीवाद से आझादी. त्यांना
मिळणार्या प्रतिसादाने खवळलेल्या सत्ताधारी पक्षाच्या एका गटाने त्या व्हिडीओ
क्लीपचा आवाज म्यूट केला. त्यात दुसर्या घोषणांचा (९ फेब्रुवारीच्या) आवाज घातला.
पाकिस्तान झिंदाबादच्या, भारताच्या बरबादीच्या घोषणा त्यात घातल्या. ही डॉक्टर्ड केलेली
व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्यात आली. स्वतः भाजपचे प्रवक्ते संदीप बात्रा ती क्लीप घेऊन
प्रत्येक चॅनलवर जात होते आणि त्यांना दाखवत होते, बघा बघा काय भयंकर सुरु आहे. 'आज
तक'च्या राहूल कंवलला खरी व्हिडीओ क्लीप मिळाली आणि या बनावट व्हिडीओ क्लीपची पोल खोलली
गेली. तरुण आणि हिंमतवान पत्रकार असलेल्या राहुलने संदीप बात्रा यांनाच स्टुडिओत
नेऊन ती बनावटगिरी उघड करुन दाखवली. पण तोवर कन्हैया तिहार जेलमध्ये बंद झाला
होता. देशद्रोहाच्या आरोपाखाली.
सत्तेचा उपयोग किती पाताळयंत्री
असू शकतो याचा हा ताजा पुरावा. पण ही पद्धत खूप जुनी आहे. निशस्त्र आणि
म्हातार्या महात्मा गांधींवर गोळ्या चालवणार्या नथुरामने आपल्या हातावर एक मुस्लिम
नाव गोंदवून घेतलं होतं. तो नथुराम या मंडळींना आजही प्रिय आहे. शरद पोंक्षेंसारखा
सुमार दर्जाचा नट मराठी नाट्य परिषदेत नथुराम जीवंत करण्याची भाषा करतो. नथुरामची उघडपणे
जयंती साजरी केली जाते. त्याच्या बंदुकीची पुजा केली जाते. ते देशद्रोही
नाहीत. गांधी, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या म्हातार्या माणसांना मारणारे देशद्रोही
नाहीत. रोहित आणि कन्हैया मात्र देशद्रोही ठरतात.
स्मृती ईराणी आणि मंडळींना
तिरंग्याचं एकदम प्रेम आलं आहे. प्रत्येक वि़द्यापीठात आता तिरंगा फडकणार आहे. स्वागत
आहे. पण त्याचबरोबर रेशिमबागेतला भगवा उतरवून तिथेही तिरंगा फडकवा. भाजपच्या कार्यालयावरही
तिरंगा फडकवा. संघ शाखेवर जनगणमन म्हणा. सावरकर हिंदूत्वाचे राजकीय जनक. पण त्यांनीही
१५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या घरावर भगवा उतरवून तिरंगा फडकवला. हिंदूत्वाची पिलावळ मात्र
गांधी, तिरंगा आणि जनगणमनबद्दल गेली ६८ वर्षे खोट्या, नाट्या कंड्या पिकवत वाढली
आहे.
तिरंग्यावरील अशोक चक्राचं मौर्य
राज्य कपटाने उलथवून टाकणारा पुष्यमित्र शुंग हा या मंडळींचं प्रेरणास्थान आहे. बोधी
वृक्ष उपटून टाकणारा शशांक यांची प्रेरणा आहे. राष्ट्रपित्याचा खून करणारा नथुराम यांचं
दैवत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान नाही, मनुस्मृती यांचं लाडकं विधान आहे,
ते आता देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण याचं सर्टिफिकेट वाटत आहेत.
(लेखक महाराष्ट्र विधान
परिषद सदस्य आहेत.)
पूर्वप्रसिद्धी -
दै. पुण्यनगरी २४ फेब्रुवारी २०१६
सर मी आपल सदर वाचतो वाचून खुप छान वाटले की तुमच्यासारखी प्रखर आणि निर्भीड मत मांडणारी माणसे आहेत म्हणून इथल्या सनातनी प्रवृत्तीचे खरे स्वरूप समजते
ReplyDeleteDole ughad karnari pratikriya
ReplyDeleteDole ughad karnari pratikriya
ReplyDelete