Do not trouble my friends and enemies on this after I am gone.
अखेरचा जय भीम केल्यानंतर
रोहित वेमुलाच्या त्या अखेरच्या पत्रातली ही शेवटची ओळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या सरकारात मंत्री असलेल्या बंडारू दत्तात्रेय यांनी ज्याला जातीयवादी, उग्रवादी
आणि राष्ट्रद्रोही ठरवलं होतं त्या रोहितचे हे शब्द आहेत. बंडारू दत्तात्रेय, स्मृती
इराणी आणि हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचे आप्पा राव यांनी त्या मुलांना हॉस्टेल
आणि मेसबाहेर काढलं होतं. त्यातल्या रोहितने आपल्या दुश्मनांनाही त्रास देऊ नका, अशी
शेवटची विनंती केली होती.
मृत्यूला कवटाळतानाही
रोहितच्या मनात तिथपर्यंत त्याला ओढून नेणाऱ्यांबद्दल कटुता किंवा विखार शिल्लक नव्हता.
आंबेडकरांचा विचार आपल्या मेंदूत आणि धमन्यातून वागवणाऱ्या रोहितने आंबेडकर विरोधकांनाही
माफ केलं. आंबेडकर स्टुडन्टस् असोसिएशनला जातीयवादी, अतिरेकी आणि राष्ट्रद्रोही ठरवणारे
आता रोहितची जात शोधून काढत आहेत.
अभाविप, संघ आणि
भाजप परिवाराचा चेहरा पुन्हा एकदा अनावृत्त झाला आहे.
लखनऊच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर युनिव्हर्सिटीत 'मोदी गो बॅक'च्या घोषणा निनादल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी
आपलं मौन सोडलं. रोहितचा उल्लेख करताना ते भावूक झाल्याच्या बातम्या मीडियात झळकल्या.
'माँ भारतीने अपना लाल खोया है' अशा शब्दांत त्यांनी मलम लावण्याचा प्रयत्न केला. पण
त्यांच्या मंत्रिमंडळात रोहितला देशद्रोही ठरवणारे बंडारू दत्तात्रेय आजही कायम आहेत.
खुद्द संविधानाच्या शिल्पकाराला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशद्रोही ठरवणारे
अरुण शौरी उजळ माथ्याने वाजपेयी सरकारमध्ये मंत्री म्हणून वावरत होते. तिथे बंडारू
दत्तात्रेयना त्यांच्या जघन्य अपराधानंतर संरक्षण मिळतं याचं आश्चर्य काय?
दलित असंतोषाची धग कमी होत नाही हे
लक्षात येताच रोहितची जात शोधून काढण्यात आली. रोहित वडार जातीचा आहे. वडार समूह महाराष्ट्रात
विमुक्त जमाती या गटात येतो. वडार म्हणजे दगड फोडणारे. आंध्र प्रदेशात वडार ओबीसी प्रवर्गात
येतो. महाराष्ट्रातले वडारही मूळ आंध्रतले आहेत. दिल्लीच्या निर्भयाची जात विचारली
नव्हती, मग माझ्या मुलाची जात का विचारता? असा रोहितच्या आईचा सवाल आहे. रोहितची आई
ही मूळ माला या अनुसुचित जाती प्रवर्गातली. वड्डेरा (वडार) कुटुंबात दत्तक गेली. लग्नही
वडार कुटुंबात झालं. म्हणून रोहितची जात वडार लागली. मोदी सरकारात सर्वात पॉवरफूल असलेले
अधिकारी मोदींचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तो वडार असल्याची
कागदपत्रं शोधून काढण्यात आली.
आप्पा राव आणि बंडारू दत्तात्रेय या
दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रोहित दलित असेल तर या दोघांवर अॅट्रोसिटीची कलमं लागू शकतात.
ही कलमं लावल्याशिवाय दलित असंतोष शमणार नाही, हे भाजपचे नेतृत्व समजून आहे. त्यामुळे
रोहित वडार असणं ही भाजपची गरज बनली आहे. रोहितच्या सर्टिफिकेटवर वडार असेल तर आप्पा
राव आणि बंडारू अॅट्रोसिटीच्या कलमातून वाचतील. भाजप नेतृत्वाचा दुसरा गेम
प्लॅन आहे तो आंबेडकरी असंतोषाची धार कमी करणं. रोहित दलित नव्हता हे सिद्ध झालं तर
दलित क्षोभ कमी होईल, असं त्यांना वाटत असावं.
भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हवे
आहेत. पण ते फक्त दलितांच्या मतांसाठी. संघ परिवारालाही बाबासाहेब हवे आहेत. पण ते
फक्त त्यांचा नवा बौद्ध धम्म हिंदुत्वाचा पंथ बनवण्यासाठी. बाबासाहेबांनी ज्या व्यवस्थेला
आव्हान दिलं, ते आव्हान संपवून टाकण्यासाठी. हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नव्हे. भारतातल्या
बहुजनांच्या प्रचलित हिंदू धर्माशी त्यांना देणंघेणं नाही. हिंदू धर्मापेक्षा हिंदुत्व
या संकल्पनेला संघाचा विचार महत्त्व देतो. या हिंदूत्वाचे जनक बॅ. सावरकर आणि डॉ. मुंजे
आहेत. आसेतु हिमालय भूमीला जे पुण्यभू आणि पितृभू मानतात ते सारे हिंदू. याचा अर्थ
या देशाला मातृभू मानणारे हिंदू नाहीत. सिंधू नदीच्या पलीकडे काही श्रद्धास्थान असेल
तर तेही हिंदू नाहीत. एकदा ही व्याख्या मान्य केली की धर्मनिरपेक्षता निकालात निघते.
संघ परिवाराला तेच अपेक्षित आहे. गांधी हे रुढार्थाने हिंदू. पण त्यांना मारणं ही हिंदुत्वाची
प्रायोरिटी बनली. नथुराम गोडसेला धिक्कारलं जात नाही आणि गोळवलकर गुरुजींचं 'बंच ऑफ
थॉटस्' नाकारलं जात नाही, तोवर संघाचा अजेंडा बदलला असं म्हणता येणार नाही. हिंदू धर्मातल्या
अवतार कल्पनेप्रमाणे संघानेही प्रात: स्मरणाची सोय करून ठेवली आहे. तथागत गौतम बुद्धांनाच
अवतार करून धम्म संपवायचा. गांधींना प्रात: स्मरणात घेऊन धर्मनिरपेक्षता ढकलून द्यायची.
तसंच आंबेडकरांना प्रात: स्मरणीय ठरवायचं आणि आंबेडकरी विचाराला आणि संविधानाला निष्प्रभ
करायचं. ही ती चाल आहे. ही चाल फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे दूध प्यायलेला समाज ओळखून
आहे.
(लेखक विधान परिषद सदस्य आहेत.)
पूर्वप्रसिद्धी : दै. पुण्यनगरी - ३ फेब्रुवारी २०१६
No comments:
Post a Comment