मृणालताई खासदार झाल्या आणि पाठोपाठ राम नाईक आमदार झाले. मी नुकताच
दहावी पास झालो होतो. दहिसरच्या कांदरपाड्यात आम्ही राहायचो. मला मताचा अधिकार नव्हता
आणि कांदरपाड्यात त्या वेळच्या जनता पक्षाचं कुणी नव्हतं. या दोघांचेही मी तेव्हा
काम केलं. राम नाईक नंतर खासदार झाले. केंद्रात मंत्री झाले आणि आता देशातल्या सगळय़ात
मोठय़ा राज्याचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत. वय वर्षे ८१; पण बाभूळ झाडासारखे ताठ
उभे आहेत. दिवसाचे बारा-बारा तास आजही काम करतात. नुकतंच त्यांच्या आठवणींचं पुस्तक
प्रकाशित झालं. 'चरैवेति! चरैवेति!!' यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमाला
आवर्जून गेलो होतो.
सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचे राम नाईक. नोकरीसाठी ते मुंबईत आले. चर्चगेट स्टेशनवरच्या बाथरूममध्ये ते सकाळचे विधी उरकत. नोकरी करत लॉ शिकले. जनसंघाचं काम करताना कधी सत्तेत जाऊ, याचा विचारही त्यांना शिवला नसेल. आणीबाणीच्या विरोधात जन लाट उसळली. राम नाईक जनता पक्षाचे आमदार बनले ते बोरिवलीसारख्या नवख्या मतदारसंघातून. तीनदा आमदार व नंतर पाचदा खासदार. अभिनेता गोविंदाने पराभूत करेपर्यंत त्यांना पराभव माहीत नव्हता. मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर राम नाईकांना राज्यपाल होण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची विलक्षण हातोटी नाईकांच्या हाती आहे. मतदारसंघावर पकड कशी मिळवावी, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. राम नाईक पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा कोळीवाड्यांमधून त्यांना एकही मत मिळालं नव्हतं. आता गोराईपासून पालघरमधल्या सातपाटी वडराईपर्यंतच्या कोणत्याही कोळीवाड्यात जा. मच्छीमारांच्या दर्यात राम नाईकांची स्वत:ची एक जागा आहे. बोरिवली-डहाणूच्या ट्रेनला लोकांनी 'राम नाईक एक्सप्रेस' असं नाव ठेवलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्याची मागणी खूप जुनी; पण संसदेत आणि केंद्रात सत्तेत गेल्यानंतर बॉम्बेचं मुंबई करून घेण्याचं श्रेय राम नाईक यांचंच आहे. मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचं नाव बदलून शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव सुद्धा नाईक साहेबांचाच. खासदारांना खासदार निधी मिळतो, त्यामागे नाईकांचाच पाठपुरावा होता. त्यांच्या कामाचा धडाका जसा अचंबित करणारा, तसाच तो विषय लोकांपर्यंत नेण्याची त्यांची हातोटीही तितकीच विलक्षण. वीस-बावीस वर्षांपूर्वी कर्करोगाने त्यांना विळखा घातला होता; पण त्यातून ते सहिसलामत बाहेर पडले. त्यांचा आजचा कामाचा हुरुप आणि या वयातही ताठ चालणं पाहून कुणी विश्वास ठेवणार नाही की, ते कधी काळी कॅन्सरग्रस्त होते; पण त्याकाळात कॅन्सरच्या दुखण्यापेक्षा त्यांना त्रास झाला तो वरिष्ठ निवृत्त अधिकार्याच्या आरोपांमुळे. दहिसरच्या शेतजमिनीवरच्या तीन शेतमजुरांच्या झोपड्या पालिकेने पाडण्याचा निर्णय घेतला होता. राम नाईक शेतमजुरांच्या बाजूने उभे राहिले. अतिरिक्त आयुक्त राममूर्तींनी शेतमजुरांच्या बाजूने निर्णय दिला; पण मुंबईचे आयुक्त सदाशिव तिनईकर यांनी थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली. निवृत्तीनंतर तिनईकरांनी थेट राम नाईकांवरच आरोप केले. वर्तमानपत्रात अशा बातम्यांना लवकर प्रसिद्धी मिळते. मी तेव्हा आज दिनांक या सायंदैनिकाचा संपादक होतो. मी राम नाईकांची बाजू घेतली. वीस वर्षांनंतर राम नाईकांनी आपल्या आठवणी लिहिताना आवर्जून त्याबद्दल लिहिले आहे. '... त्या मन:स्तापाचा तब्येतीवर परिणाम झाला. पुन्हा रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली; परंतु औषधाच्या जोडीने पत्रकार कपिल पाटील यांच्या शोध पत्रकारितेमुळे मला काहीसा आराम पडला. समाजवादी विचारसरणीचे कपिल पाटील. खरं तर माझे वैचारिक विरोधक. त्या वेळी ते आज दिनांक चालवत. ते तसे लोकप्रिय होते; पण माझ्या शुचितेबद्दल विश्वास वाटत असेल किंवा शोध पत्रकारितेच्या स्वभावामुळे, कोणलाही न सांगता कपिल पाटील त्या वादग्रस्त जागेवर गेले. राम नाईक कसे बरोबर आहेत, हे सांगणारा छायाचित्रानिशीचा लेख त्यांनी प्रसिद्ध केला. परिणामी, सर्व वृत्तपत्रांनी या वादावर पडदा टाकला.' आपल्या वैचारिक विरोधकाची आठवण इतक्या आवर्जून राम नाईकांनी सांगावी, याचंच अप्रुप वाटतं. काही महिन्यांपूर्वी मी लखनौला गेलो होतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी बोलावून घेतलं होतं. तिथल्या जवळपास दोन लाख शिक्षक मित्रांची नोकरी हायकोर्टाच्या निर्णयामुळे गेली होती. मोठी अस्वस्थता होती. महाराष्ट्रातल्या वसतिशाळेतल्या शिक्षकांचा प्रश्न कसा सोडवला, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी बोलावलं होतं. या प्रश्नावर मी राज्यपालांनाही भेटलो. कारण केंद्राची मदत आवश्यक होती. यूपीचं समाजवादी सरकार भाजपच्या राज्यपालांबद्दल थोडेसे साशंक होतं. राम नाईकांनी राजभवनात मोठय़ा प्रेमाने मला बोलावलं. प्रश्न समजून घेतला. मदतही केली. राजकारण मध्ये आणलं नाही. राम नाईकांच्या राजकीय जीवनातलं सगळय़ात मोठ काम कोणतं असेल तर ते कुष्ठरोग्यांना त्यांनी दिलेल्या सन्मानाचं. बोरिवलीतल्या कुष्ठपीडितांचे प्रश्न त्यांनी सोडवलेच; पण एकदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कुष्ठपीडितांचे गार्हाणे घेऊन ते मंत्रालयात गेले होते. कुष्ठपीडितांना मंत्रालयात प्रवेश मिळेना. राम नाईकही हटून बसले. मुख्यमंत्र्यांच्या कानी ही गोष्ट गेली. त्यांनी आवर्जून बोलावलं. खरंच वसंतदादाही मोठे. राम नाईकही मोठे. |
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष
आहेत.)
पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी ११ मे २०१६
Dear Sathi Kapilji, good rememberance of healthy moments in Party & Parliamentry politics- Avinash Patil, MANS.
ReplyDeleteमोठे राम नाईक आणि राम नाईकांचे मोठेपण.
ReplyDeleteVery nice and we proud of your work nature
ReplyDeleteप्रिय कपिल,
ReplyDeleteछान लिहिलंयस .
आवडलं .
-प्रवीण
lekh chan ahe thodkyat pan muddesud
ReplyDeleteThis is call gentleman's view
ReplyDeleteवैचारिक विरोधाची जागा व्यक्तिगत शत्रूत्वाने घेतली गेली नाही हा आपल्या दोघांचाही मोठेपणा.
ReplyDeleteवैचारिक विरोधाची जागा व्यक्तिगत शत्रूत्वाने घेतली गेली नाही हा आपल्या दोघांचाही मोठेपणा.
ReplyDeleteकपिल पाटील साहेब, तुमच्यातला सच्चेपणा आणि राम नाईक साहेबांचा मोठेपणा मनाला खूप भावला.
ReplyDeleteकपिल पाटील साहेब, तुमच्यातला सच्चेपणा आणि राम नाईक साहेबांचा मोठेपणा मनाला खूप भावला.
ReplyDeleteसर...आपण हृदयस्पर्शी आठवण प्रभावी शब्दात ताजी आहे.
ReplyDeleteसर...आपण हृदयस्पर्शी आठवण प्रभावी शब्दात ताजी आहे.
ReplyDelete