Monday, 25 September 2017

अरुण साधू यांना विनम्र आदरांजली


अरुण साधू खरंच साधू माणूस होता. एवढा मोठा साहित्यिक. कादंबरीकार. पण मंत्रालयातल्या प्रेस रुममध्ये पत्रकार म्हणून वावरताना त्यांनी कधीही जाणवू दिलं नाही. सामान्य श्रमिक पत्रकारासारखे ते वागत. ते मितभाषी होते. पत्रकार परिषदेत प्रश्न विचारतानाही कधी दिसत नसत. पण आम्हा पत्रकारांना जे दिसत नसे, जे ऐकू येत नसे, ते त्यांना दिसत असे, ऐकू येत असे. सिंहासन आणि मुंबई दिनांक या त्यांच्या कादंबऱ्या ज्यांनी वाचल्या असतील त्यांना महाराष्ट्राचा राजकीय पट खडानखडा समजला असेल. राजकारणातल्या रस्त्यावरच्या अंधाऱ्या जागा, त्यातल्या हालचाली, राजकारणामधला माणूस, त्या माणसाचा सामान्य व्यवहार, त्याच्या राजकीय निर्णयामागचा कार्यकारण संबंध इतक्या सहजतेने ते लिहीत जात. त्या कादंबऱ्यांवर पुढे चित्रपट निघाले. त्यांच्या कादंबऱ्या आणि चित्रपटांनी महाराष्ट्रात थोडी खळबळ झाली. लोक चकीतही झाले. पण त्यावेळच्या राजकारण्यांचेही मोठेपण की त्यांनी साधूंच्या कादंबऱ्यांचा आणि चित्रपटांचा आस्वाद घेतला. मग ते यशवंतराव चव्हाण असोत, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील की शरद पवार की जॉर्ज फर्नांडीस. अरुण साधू यांच्या राजकीय कादंबऱ्यांमध्ये सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू होता. 

इंग्रजीत ते लिहीत असत. इंग्रजी पत्रकारिकेतला त्यांच्या काळातला तो मोठा माणूस. पण मराठीवर विलक्षण प्रेम. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही झाले. पण कुठेही बडेजाव नाही. प्रेस रुममध्ये त्यांच्याशी अनेकदा गप्पा मारायला मिळाल्या. मी शिक्षकांचा आमदार झालो त्याचं कौतुकही त्यांना वाटलं. माझ्या विधान परिषदेतील निवडक भाषणांचा आयुध नावाचा संग्रह प्रकाशित झाला त्यासाठी नुसतं एका फोनवर त्यांनी अभिप्राय लिहून पाठवला. आता ते नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र सोबत आहेत. 

अरुण साधू यांना विनम्र आदरांजली. 

- कपिल पाटील, वि.प.स.


4 comments:

  1. विनंम्र आदरांजली !!!

    ReplyDelete
  2. विनंम्र आदरांजली !!!

    ReplyDelete
  3. विनंम्र आदरांजली !!!

    ReplyDelete
  4. !!!!!विनम्र आदरांजली!!!!!!

    ReplyDelete