मोर्चे थांबत नाहीत. पण त्यात घोषणा नाहीत. आवाज नाही. मोर्चे लाखा-लाखांच्या संख्येने निघताहेत. पण त्यात हिंसेचा लवलेश नाही. मोर्चे झुंडी-झुंडीने येत आहेत. पण त्यात झुंडशाहीला शिरकाव नाही. जमावाला शिस्त नसते म्हणतात, इथे नेत्याशिवाय जमाव अथांग आहे. पण बेशिस्तीला जागा नाही. एरव्ही मोर्चानंतर कचरा किती पसरलेला असतो. इथे कचर्याचा मागमूस नाही. मोर्चा जितका मोठा तितकी मोर्चात बाईला जागा कमी असते. इथे आया-बहिणींचा महासागर लोटला आहे. मनात त्यांच्या भितीचा लवलेश नाही. कोपर्डीचं दु:ख उरात आहे. मनात संताप दाटून आहे. पण द्वेषाला त्यात जागा नाही.
कोपर्डीच्या अमानुष घटनेनंतर महिन्याने मोर्चा निघाला. तेव्हा किती नावं ठेवली गेली. मोर्च्यातल्या मागणीवरून प्रश्न केले गेले. शंका उपस्थित केल्या गेल्या. काही चॅनेल्सनी तर मोर्चा तुमच्या विरोधात आहे का? तुम्हांला त्याची भीती वाटते का? असेही प्रश्न करून पाहिले. पण खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच हस्तक्षेप केल्यानंतर भितीचा बागुलबुवा उडून गेला.
मोर्चा दलित विरोधी आहे काय? ओबीसी विरोधी आहे काय? मुख्यमंत्री विरोधी आहे काय? सगळे फाटे फोडून झाले. एका पाठोपाठ निघणार्या मोर्चांनी सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन टाकली आहेत. अॅट्रॉसिटीच्या मागणीवरूनही भडकवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही फक्त गैरवापर थांबवा म्हणतो आहोत. दुसर्याच्या वाट्यातलं आरक्षण मागतो म्हणून आरोप झाला. आम्ही हिस्सेदारी नाही, आमचा अधिकार मागतो आहोत. आमच्या मुलांचं भविष्य सुनिश्चित करू मागतो आहोत. मोर्चेकरांच्या या उत्तरांनी भडकवणार्यांचे मनसुबे पराभूत झाले. आरोप झाले तरी कुणी अंगावर जात नाही. समुद्रात फेकलेला दगड कुठे गडप होतो पत्ता लागत नाही. तरंगही उठत नाही. फेकलेल्या आरोपांचे दगड संयमाच्या जनसागराने गिळून टाकले.
हे सारं विलक्षण आहे. अभूतपूर्व आहे. महात्माजींच्या अहिंसक सामुदायिक सत्याग्रहाचा असा प्रत्यय स्वातंत्र्योत्तर काळात क्वचितच दिसला असेल. एका नाही, प्रत्येक मोर्चातलं हे दर्शन आहे. एका मागोमाग मोर्चे निघताहेत. अतिप्रचंड संख्येने निघाताहेत. आपल्या ताकदीचं विराट दर्शन घडवताहेत. पण मोर्चे मूक आहेत. मूक असूनही खूप बोलत आहेत. गांधीजींच्या सगळ्या शस्त्रांचा इतका अनुपम एकत्रित वापर कुठे झाला नसेल. मौनाची ताकद किती मोठी असते, याचं सामुहिक दर्शन यापूर्वी असं घडलं नसेल. गांधीजींच्या मौनाचा विनोबाजींनी वापर केला होता. अण्णा हजारेंनी ते शस्त्र वापरलं होतं आणि त्या मौनातली ताकद देशाने अनुभवली होती. पण या मोर्चात कुणी एक विनोबा भावे नाहीत. कुणी एक अण्णा हजारे नाहीत. ओठ बंद असूनही बोलता येतं. न बोलताही खूप काही सांगता येतं. धिक्काराचा शब्द न उच्चारताही नापसंतीचा दाहक उच्चार करता येतो. मागणीची घोषणा न करताही मागणीचा बाण अचूक मारता येतो. रक्ताचा थेंब न सांडताही प्रतिपक्षाला जायबंदी करता येतं. लढाई ज्या प्रस्थापितांशी, सरकार पक्षाशी त्यांना बोलायला मात्र बाध्य करता येतं. सत्तेचं सिंहासन हलवता येतं.
मराठा मोर्चाने हे सारं करून दाखवलं आहे. एकेकाळचा सत्ताधारी वर्ग शेतीतून उद्ध्वस्त झाला आहे. दुष्काळाने खंगला आहे. शेती परवडत नाही. नोकरी मिळत नाही. शिक्षण महाग आहे. वरून राज्यकर्ता म्हणून रोज अवमान आहे. कर्जात घर बुडालं आहे. फास घेणार्यांची संख्या वाढते आहे. नसलेल्या पावसाने होरपळवलं आणि राज्यकर्त्यानीच लुबाडलं. पाटलाची ओटीच शिल्लक राहिलेली नाही. आता लेकही सुरक्षित नाही. यामुळे जखमी झालेला मराठा समाज एकवटला आहे. लाखा लाखाने जमतो आहे. त्याच्या मागणीबाबत जे बोलायचं ते सरकारने बोललं पाहिजे. मागच्या सरकारने काय केलं तो पाढा वाचून आता चालणार नाही. राज्यकर्ता वर्ग म्हणून या समाजाची उपेक्षा यापुढे करून चालणार नाही. महाराष्ट्रातला एक तृतीयांश समाज आहे हा. काही हजार कुटुंबांमधील सत्ता सोडली तर बाकीचा समाज आजही कुणबी आहे. संत तुकारामांच्या आणि महात्मा फुलेंच्या भाषेत कुळवाडी कुणबी आहे. ब्रिटींशापुढे महात्मा फुलेंनी ज्यांचं दु:ख मांडलं होतं, ज्यांच्यासाठी आसूड ओढला होता तोच हा समाज आहे. त्याचं दर्शन घडवण्यासाठी प्रिन्सला भेटायला महात्मा फुले पागोटं घालून गेले होते. आता ते पागोटेही फाटलेलं आहे. त्या फाटलेल्या पागोट्याची कैफियत कोण ऐकणार?
मागच्या सरकारने नाही काय केलं. फक्त समित्या नेमल्या. आयोगाकडे पाठवलं. पण त्यातून निर्णय आणण्यासाठी जे करायला हवं ते केलं नाही. दोष त्यांच्या पदरात मोठा आहे. पण दोषाचा कोळसा नव्या सरकारला उगाळता येईल काय? नवं सरकार आपलं नाही, ही अविश्वासाची भावना अधिक आहे. ज्या सहकाराने इतके वर्षे सांभाळलं, ते सहकार क्षेत्र मोडून टाकलं जात आहे. बाजार समित्या मोडल्या जात आहेत. शिक्षण संस्थांवर आघात होतो आहे. ज्यांनी शिक्षण उभं केलं, त्यांनाच अवमानित केलं जात आहे. शेतकरी बळीराजा दारिद्रय़ाच्या पाताळात गाडला जात असताना वामन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विश्वास निर्माण होणार कसा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माथाडी कामगारांच्या सभेत गेले. बोलले. ते पुरेसं नाही. करावं लागेल. दोष विरोधकांना, पक्षांतर्गत विरोधकांना देऊन चालणार नाही. बळीराजाला साथ द्यायची की नाही हे त्यांना ठरवायचं आहे. नियतीने ती जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे.
(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)
पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी २८ सप्टेंबर २०१६
Sir Aplya Vivecnala Tod Naste Hech Khara ! Atantya Samarpak Bhaset Vivechn Kele Ahe
ReplyDeleteGreat article boss
ReplyDeleteGreat article boss
ReplyDelete✌
ReplyDeleteWe salute Kapil Patil sahab
ReplyDeleteखरी परिस्थिती मांडली आहे.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteप्रस्थापित नेत्यांना कोलून हा समाज रस्त्यावर येतो आहे। धडकी तर भरणारच। आपले विवेचन सर्वसमावेशक आहे
ReplyDeleteहे चुकीचे की बरोबर हे प्रत्येकाची समज असेल त्या प्रमाणे प्रत्येकजण मांडत राहील.पण कपीलजी या लेखातून आपल्यातल्या पत्रकाराला अजूनही जिवंत ठेवल्याचा आभास होतो हे आम्हा समस्ततुमच्याकडे आशेने बघणा-यांना सुखद अनूभव आहे.
ReplyDeleteधन्यवाद !
हे चुकीचे की बरोबर हे प्रत्येकाची समज असेल त्या प्रमाणे प्रत्येकजण मांडत राहील.पण कपीलजी या लेखातून आपल्यातल्या पत्रकाराला अजूनही जिवंत ठेवल्याचा आभास होतो हे आम्हा समस्ततुमच्याकडे आशेने बघणा-यांना सुखद अनूभव आहे.
ReplyDeleteधन्यवाद !
सर तुमचा लेख वाचुन मला अभिमान होत आहे की आज पन पत्रकार पेशा जिवनत आहे सर तुमच्या लेखा तिल गाधी सत्याग्रहचा उल्लेख मनाला भिड़ला
ReplyDeleteसर खुप सुंदर लेख आजचा लोकमत चा लेखही खूपच सुंदरआपन समाजाच्या वेदना खुप कमी शब्दात विस्तृत मांडल्या आहे सरकारचे सहकार विरोधी धोरण छे वास्तव मांडले आहे सरकारने याचा विचार करावा अन्यथा 2019 या सरकारचा अस्त निश्चित आहे
ReplyDeleteसर खुप सुंदर लेख आजचा लोकमत चा लेखही खूपच सुंदरआपन समाजाच्या वेदना खुप कमी शब्दात विस्तृत मांडल्या आहे सरकारचे सहकार विरोधी धोरण छे वास्तव मांडले आहे सरकारने याचा विचार करावा अन्यथा 2019 या सरकारचा अस्त निश्चित आहे
ReplyDelete