Tuesday, 1 October 2019

जयंती गांधींची, सत्याग्रह देवींचा


आज गांधीजींची जयंती आहे. राष्ट्रपित्याची १५० वी जयंती. गांधीजींचे आग्रह अनेक होते. त्यातला सोयीचा आग्रह फक्त स्वच्छतेचा असल्यामुळे देशाचं सरकार स्वच्छाग्रही बनलं आहे. हॅण्डग्लोज घालून आज देशभर सफाई होईल. गांधीजींचे बाकीचे सगळे आग्रह कचऱ्यासारखे झाडून टाकले जातील. आज गांधी जयंती खरी साजरी होईल ती फक्त शाळांमध्ये. छोट्या मुलांच्या चित्रांमध्ये. गांधीजींच्या वेशातली ती मुलं, उद्याचा भारत शोधतील. गांधी बनण्यासाठी आता लहान मुलांशिवाय दुसरं निर्मळ मन उरलंय तरी कुठे?

आपणही विसरलो आहोत, गांधीजींचे ते सारे आग्रह. पण गांधींना मानणारा एक माणूस आज धारवाडला उपवासाला बसला आहे. पुढचे नऊ दिवस. २ ते १० ऑक्टोबर. त्याचा हा सत्याग्रहच आहे. पण तो कुणाविरुद्ध नाही. त्याचा आत्मक्लेशाचा निश्चय आहे. कुठल्या मागणीसाठी नाही. सरकारविरूद्ध आंदोलन नाही. मग काय ही भागनड आहे? त्या माणसाचं एवढंच सांगणं आहे, मला रोज शंभर मुलामुलींनी कळवावं की लग्नाचा विचार करताना मी जातीपातीचा विचार करणार नाही. जर रोज शंभर मुलांचे संकल्प त्याच्यापर्यंत पोचले नाहीत तर तो गांधींना मानणारा माणूस त्यादिवशी अन्न प्राशन करणार नाही. फक्त पाणी घेईल.

त्या माणसाचं नाव आहे, डॉ. गणेश देवी. भाषा आणि साहित्याच्या व्यवहारात असलेल्या जगभरच्या सगळ्यांना या माणसाचं नाव माहीत आहे. आदिवासी आणि भटक्यांच्या चळवळीत काम करणाऱ्यांना देवींचं नाव माहीत आहे. जगभरच्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांची भाषणं होतात. या खंडप्रायः देशात सुकणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात तिथल्या भाषा सुकताहेत. ढासळणाऱ्या डोंगर कपारीत भाषा रोज गाडल्या जात आहेत. त्या भाषा वाचवण्यासाठी हा माणूस आटापिटा करतोय. एक देश, एक भाषा, एक धर्म, एक संस्कृतीच्या कोलाहालात देशातल्या अगणित बोली आणि काही शे भाषा वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला वेडाच ठरवलं जाईल. पण तीच खरी या देशाची ओळख आहे. कबीराच्या 'झीनी - झीनी बीनी चदरिया' सारखी.

या माणसाची भीती त्यावेळच्या गुजरात सरकारला वाटत होती. द्वेषाची आग विझवण्यासाठी ते गुजरातभर फिरत होते तेव्हा त्यांच्या पखालीत नरसी मेहता आणि गांधींचं पाणी होतं. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. आणि हा माणूस अस्वस्थ झाला. आपले पुरस्कार त्यांनी सरकारला परत केले. पुरस्कार वापसी तिथून सुरू झाली. पुरुषसत्ताक वर्चस्ववादी राष्ट्रवादाच्या उन्मादी आवाजाने सगळे उत्तर भयकंपीत असताना या माणसाने दक्षिणायन सुरू केलं. 'राजकीय पक्षांच्या निवडणूक पूर्व जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून फॅसिझमशी नाही लढता येणार. त्यासाठी समकालीन नवा विचार हवा', ही त्रिज्या घेऊन देशव्यापी वर्तुळाच्या शोधात निघालेला हा संशोधक काही महिन्यांपूर्वी पुण्यात आला. त्रिज्या ज्या बिंदूतून जन्माला येते तो बिंदू इथेच कुठेतरी आहे याची खात्री त्यांना होती. 'ज्या मातीत शिवबा, तुकाराम, फुले, आंबेडकर जन्मले त्या मातीसाठी हेही शक्य आहे,' या निश्चयाने राष्ट्र सेवा दलाचं राष्ट्रीय अध्यक्षपद डॉ. गणेश देवींनी स्वीकारलं. 'एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या मध्यात महाराष्ट्राने परिवर्तनाचा नवा विचार दिला.' राष्ट्र सेवा दल नव्या लढाईचं अवजार बनू शकतं या खात्रीने गणेश देवी मैदानात उतरले आहेत.

गांधी प्रत्येक प्रयोगाची सुरवात स्वतःपासून करत. गांधींना मानणाऱ्या डॉ. गणेश देवींनी स्वतःपासूनच सुरुवात करायचं ठरवलं आहे. प्रेम करताना, लग्न ठरवताना जाती पातीचा मी विचार करणार नाही. असं सांगणारे किमान शंभर भेटावेत यासाठी त्यांचा आत्मक्लेश आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे रोज शंभरजण मिळणार नाहीत का? पुढचे नऊ दिवस डॉ. गणेश देवी केवळ पाण्यावर राहू नयेत. पुढच्या नऊ रात्री त्यांनी उपाशी झोपू नये. दिवसभरात शंभर निरोप आले नाहीत तर देवी झोपूही शकणार नाहीत. देशात तुम्ही कुठेही असा. धारवाडला किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही. बस फक्त एक एसएमएस करा, किंवा फोन करा. ईमेल करा. 'होय, हा संकल्प करायला आम्ही तयार आहोत.' असं स्वतःशीच सांगा. आणि फक्त कळवा त्यांना.

गांधी जयंतीलाच का हे आंदोलन?
८ मार्च १९४२ च्या हरिजन पत्रात महात्माजींनी लिहलं होतं, 'जैसे - जैसे समय बीतता जाएगा, इस तरह के (आंतरजातीय) विवाह बढेंगे, और उनसे समाज को फायदा ही होगा. फिलहाल तो हम में आपसी सहिष्णुता का माद्दा भी पैदा नहीं हुआ है. लेकिन जब सहिष्णुता बढकर सर्वधर्म - समभाव में बदल जाएगी, तो ऐसे विवाहों का स्वागत किया जाएगा.'

गांधीजी वर्णाश्रम धर्म मानत असल्याची टीका होत आली आहे. पण आंबेडकर भेटीनंतर त्यात अमुलाग्र बदल झाला. पुणे करारानंतर गांधीजी फक्त आंतरजातीय विवाहांना हजर राहत. आपल्या मुलांपेक्षा महादेवभाई देसाईंवर गांधींनी प्रेम केलं. पण महादेवभाईंच्या मुलाचं लग्न जातीतच होत असल्याचं कळताच, गांधी लग्नाला गेले नाहीत.

जातीप्रथेच्या विध्वंसनाचा महामार्ग सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'आंतरजातीय विवाह हाच जातीअंताचा उत्तम मार्ग असल्याचे म्हटले आहे.'

जुलै १९३६ च्या 'हरिजन'मध्ये महात्मा गांधीनी 'A Vindication Of Caste' या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावर भाष्य केले.
'The readers will recall the fact that Dr. Ambedkar was to have presided last May at the annual conference of the Jat-Pat-Todak Mandal of Lahore. But the conference itself was cancelled because Dr. Ambedkar's address was found by the Reception Committee to be unacceptable. How far a Reception Committee is justified in rejecting a President of its choice because of his address that may be objectionable to it is open to question. The Committee knew Dr. Ambedkar's views on caste and the Hindu scriptures. They knew also that he had in unequivocal terms decided to give up Hinduism. Nothing less than the address that Dr. Ambedkar had prepared was to be expected from him. The committee appears to have deprived the public of an opportunity of listening to the original views of a man, who has carved out for himself a unique position in society. Whatever label he wears in future, Dr. Ambedkar is not the man to allow himself to be forgotten.'  

बाबासाहेबांनी येवल्यात धर्मांतराची घोषणा केली होती. १९३५ साली. प्रत्यक्ष सीमोल्लंघन केलं दसऱ्याला. १४ ऑक्टोबर १९५६. अशोक विजया दशमीला बौद्ध धर्माची त्यांनी दिक्षा घेतली. बाबासाहेबांचे धर्मांतर हिंदुत्ववादी सावरकरांना पचले नाही. पण गांधी खूप आधीच आंबेडकरांच्या समर्थनार्थ उतरले होते. ८ मार्च १९४२ ला त्यांनी भाकित केलं होतं. इशारा दिला होता. गांधी म्हणाले होते, 'आने वाले समाज की नवरचना में जो धर्म संकुचित रहेगा और बुद्धि की कसौटी पर खरा नहीं उतरेगा, वह टिक न सकेगा; क्योंकि उस समाज में मूल्य बदल जाएंगे. मनुष की कीमत उसके चरित्र के कारण होगी. धन पदवी या कुल के कारण नहीं.'

डॉ. गणेश देवी दक्षिणायन करत बसवण्णांच्या प्रदेशात सध्या वस्ती करुन आहेत. महात्मा बसवेश्वर बिज्जल राजाकडे पंतप्रधान होते. स्वतः ब्राह्मण जातीत जन्माला आलेले पण ब्राह्मण्य नाकारणारे. आपल्या अनुयायांचं आंतरजातीय लग्न करुन दिलं म्हणून सनातनी ब्राह्मण खवळले. राजाने शिरच्छेदाचा आदेश दिला. बसवेश्वरांचे प्राण आणि प्रण वाचवण्यासाठी घनघोर युद्ध झालं. बसवेश्वरांचे अनेक अनुयायी शहीद झाले. एका आंतरजातीय विवाहासाठी. ८५० वर्षे होऊन गेली. वर्णव्यवस्थेचा किल्ला अजून शाबूत आहे. हा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा मार्ग डॉ. आंबेडकरांनी सांगितला आहे. तोच मार्ग गांधींनी पुरस्कारीत केला आहे.

स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली होती. एस. एम. जोशी अन् साने गुरुजींच्या हाकेला ओ देत शिरीषकुमार, कमलाकर पागधरे सारखे कितीतरी नवतरुण शहीद झाले. स्वातंत्र्य समीप येताच साने गुरुजी अस्वस्थ झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सवालाने. हे स्वातंत्र्य कुणाचं? त्या सवालाने पंढरपूरच्या सत्याग्रहाची सुरवात झाली.सामाजिक न्यायाच्या नव्या आंदोलनात सेवादल उतरलं. सेवा दल ओळखलं जातं ते साने गुरुजींचं सेवा दल म्हणूनच. त्या सेवा दलाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी. आजपासून धारवाडला सत्याग्रह करत आहेत. स्वतःशीच. त्या सत्याग्रहात स्वतःच्याच संकल्पाचा आग्रह धरत नवतरुणांनी उतरावं. रस्त्यावरचा कचरा उचलण्याचा कार्यक्रम 'सेल्फी'वाल्यांना करू देत. मना मनातली जाती पातीची जळमटं झाडण्यासाठी स्वतःच्याच संकल्पाचा झाडू हाती घ्यायला काय हरकत आहे. महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी आणखी दुसरं निमित्त काय हवं?

गणेश देवींच्याच शब्दात सांगतो. त्यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या 'त्रिज्या' या पुस्तकातील 'लोक' या वैचारिक लेखात ते म्हणतात,
'जय आले. पराजय आले.
विनाश आला. विवेक आला.
विवेकाचे नवे नवे आवाज आले.
सिद्धार्थ आला. येशू आला. त्यांच्या उजेडात बसवण्णा,
कबीर, अक्कामा, मीरा, तुकाराम आले.
सतत घेरणाऱ्या अंधाराला थोपवण्यासाठी कोपर्निकस आला.
देकार्ते आला. गॅलिलिओ आला.
नंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रांती आली,
स्वातंत्र्य आले,
समानतेचा विचार आला. मार्क्स आला.
आले फुले, आले आंबेडकर. गांधी आले.
त्यांचा पाठलाग करत अंधारही येत आहे.
हा प्रकाश, हा अंधार.
हा विवेक, हा विनाश.
हा हवा. हा जावा.
त्यासाठी माणूस तयार व्हावा.'


संकल्प करणाऱ्या तरुणांनी आपलं नाव, वय, पत्ता, मोबाईल नं. ईमेल आयडी सह -
ईमेल rsd@beyondcaste.com करा
गुगल फॉर्म  https://forms.gle/U25bdt4uysMYMDoj7  भरा
संपर्क 7820940519  करा

- कपिल पाटील

9 comments: