मार्कुस रॅशफोर्ड अवघ्या 23 वर्षांचा आहे. फुटबॉलपटू. ब्रिटिश सरकारने करोनाच्या कहरात काटकसरीचे उपाय जाहीर केले. शाळेतल्या मुलांचं मिड डे मिल बंद करून टाकलं. त्या बातमीने मार्कुस अस्वस्थ झाला. त्याला आठवलं त्याचं लहानपण. गोरा रंग नसलेल्या समाजात जन्मलं की कोणतं दारिद्रय अनुभवायला लागतं, ते त्याला आठवत होतं. शाळेत जेवण मिळतं, म्हणून तो शाळेत नियमित जात होता. मार्कुसने थेट प्रधानमंत्र्यांपर्यंत पत्रापत्री केली. मग स्वतःच पुढाकार घेतला. क्राऊड फंडिंग केलं. मागच्या जून महिन्यातच त्याच्याकडे 190 कोटी जमले होते. अन्न वाया घालवण्याच्या विरोधात काम करणाऱ्या संस्थेची मदत घेतली. मित्रांची, देणगीदारांची, अनेक संस्थांची. उपाशी राहणाऱ्या मुलांना तो मदत करत होता. जे सरकार लक्ष देत नव्हतं, त्याच सरकारने अखेर त्याला Member of the Order of the British Empire (MBE) या पुरस्काराने राणीच्या हस्ते गौरवलं. शनिवारच्या लोकसत्तेत ही कथा येऊन गेली आहे.
आपल्या देशात प्रधानमंत्र्यांनी लॉकडाऊन अचानक जाहीर केला, त्यानंतर किती ससेहोलपट झाली गरिबांची. स्थलांतरित कामगारांची. लॉकडाऊनमुळे शाळा बंद म्हणून अडचणीत आलेल्या मुलांची संख्याही मोठी आहे. मुंबई छात्र भारतीचा अध्यक्ष रोहित ढाले आणि त्याच्या टीमने पहिल्या लॉकडाऊनमध्ये या स्थलांतरीत मजुरांमध्ये धान्याचे किट पोचवले होते. एक, दोन नाही 1 लाख 25 हजार मजुरांपर्यंत.त्याची कथा मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितली होती.
मार्कुस दीपक -
पण मी जिथे राहतो त्या गोरेगावात आणखी एक मार्कुस रॅशफोर्ड राहतो. त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. त्याचं नाव दीपक सोनावणे. दीपक भगतसिंग नगरच्या झोपडपट्टीत राहतो. एकट्या आईने केलेल्या कष्टातून तो बीएसडब्लू झाला. गोरेगावात तो सेवा दलाचं कामही करतो.
पहिल्याच लॉकडाऊनमध्ये भाकर फाउंडेशनच्या मदतीने त्याने घरोघरी रेशन पोचवण्याचा उपक्रम सुरु केला. ज्यांच्या घरी चुल नाही, त्यांना गरमा गरम जेवण देण्याची योजना आखली. भगतसिंग नगर मधील त्याच्या वयाची आरती डोईफोडे, आकाश क्षीरसागर, सरिता पोटे, मयूर जाधव, सिमरन शेख, जमिला शेख, जिनत शेख, सुचिता सोनावणे, सहिल पोटे, करूणा सोनावळे, सुमित कांबळे, अजय भालेराव आणि इतर अशी 27 मुलं त्याच्या मदतीला आली. रोज 700 जणांना तो जेवण देत होता. आता दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ते सगळं चालू आहेच. पण 200 हून अधिक मुलांना तो घरोघरी जाऊन अंडी व केळी पुरवतो आहे. मुलांची आबाळ होऊ नये. त्यांना जीवनसत्व सर्व मिळावीत, म्हणून केळी आणि अंड्यांची आयडिया. या कामात त्याला पार्ले जी, निर्मला निकेतन, टीस, एसार फाउंडेशन, केशव गोरे ट्रस्ट, युआरएफ, ग्रीन कम्युनिटी आणि इतर विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. दीपक आणि त्याची सगळी टीम दिवसभर राबत असते. दीपक सारखे कितीतरी मार्कुस रॅशफोर्ड मुंबईत, राज्यात किंवा देशात असतील. फरक इतकाच की सोनू सूदला जी प्रसिद्धी मिळते ती या मार्कुस दीपकच्या वाट्याला येत नाही.
अस्वस्थ अरविंद -
या मालिकेत मी अरविंदच्या कामाबद्दल लिहलं नाही, तर तो मोठा अन्याय ठरेल. आणि मी अपराधी. पहिला लॉकडाऊन झाला तेव्हापासून अरविंद सावला अस्वस्थ होता. एक दिवसही तो घरात थांबत नव्हता. आपला मित्र आशिष पेंडसेला घेऊन तो बाहेर पडायचा आणि अडचणीतल्या लोकांना मदत मिळवून द्यायचा. व्यापाऱ्यांकडून मदत घेऊन कितीतरी मजुरांना त्याने शिधा बांधून गावी पाठवलं. त्यांच्या तिकीटाची सोय केली. उत्तर भारतीय शिक्षकांसाठी शिक्षक भारतीने स्पेशल ट्रेन सोडली, तर व्यवस्थेला आर्वजून अरविंद हजर होता.
अस्वस्थ असणं हा अरविंदचा स्थायी भाव आहे. पुढे पुढे करणं, पद मिरवणं हे त्याच्या स्वभावात नाही. विचाराने लोहियावादी. महमद खडस आणि गोपाळ दुखंडे यांचा प्रिय सहकारी. महमद भाईंबरोबर तो चिपळूणला कितीतरी वेळा गेला असेल. आता कधीकधी समर खडस बरोबर जातो. गोपाळ दुखंडेंची शेवटच्या काळात सेवा अरविंदच करत होता. दुखंडे सावंतवाडीला जाऊन राहिले, तेव्हा त्यांच्या घराची व्यवस्था तोच पाहत होता. अस्वस्थ असण्याचा त्याचा स्वभाव हा दुखंडेंचा परिणाम असेल कदाचित. 2014 ला केंद्रात भाजपचं राज्य आलं आणि अरविंद एकदम अस्वस्थ झाला. तो गुजराती भाषिक, एक छोटा व्यापारी. पण मोदी राज्याचं संकट त्याला स्पष्ट दिसत होतं. राजकारण आणि निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण करणं हा त्याचा आणखी एक छंद. शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून अरविंद प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो. तो काही शिक्षक भारतीचा पदाधिकारी नाही. पण शिक्षक भारतीचा कार्यक्रम असो की माझी निवडणूक असो अरविंद 24 तास हजर असतो. सेवा दलातही तो काही पदाधिकारी नाही, पण गोरेगावात 14 ऑगस्ट मध्यरात्रीचं झेंडा वंदन तो कधी चुकवणार नाही.
सेकंड लॉकडाऊनमध्ये अरविंद पुन्हा कामाला लागला. अंधेरीला व्यापारी समाजाची एक इमारत आहे. दोन मोठे हॉल आहेत. अरविंदने त्यांना राजी केलं. 45 खाटांचं कोविड हॉस्पिटल इथे सुरु झालंय. हॉस्पिटलचं काम तो काही वर्क फ्रॉम होम करत नाही. स्वतः रोज जाऊन बसतो. त्याला सांगावं लागतं की, स्वतःची काळजी घे.
ऑक्सिजन मॅन -
मालाड, मालवणीला खारोडी व्हिलेज आहे. आता व्हिलेज राहिलेलं नाही स्लम उभी राहिली आहे. इथेच छोटी घरं बांधून देण्याचा व्यवसाय करणारा शाहनवाज शेख राहतो. पहिल्या लॉकडाऊनमध्ये आपल्या मित्राच्या बहिणीला ऑक्सिजन मिळाला नाही, म्हणून झालेली धडपड त्याने पाहिली होती. तेव्हाच त्याने गरजुंना ऑक्सिजन सिलेंडर पोचवण्याचा निर्णय घेतला. आपले मित्र आणि व्यवसायातल्या सहकाऱ्यांची मदत घेतली. ज्यांना गरज आहे, त्यांना तो ऑक्सिजन सिलेंडर पोचवू लागला. डायरेक्ट हॉस्पिटल किंवा होम डिलिव्हरी. एकदम फुकट. एक रुपयाही चार्ज करत नाही. पैसे कमी पडू लागले तर त्याने कुणाकडे मागितले नाहीत. पठ्ठ्याने आपली गाडी विकून टाकली. दुसरा लॉकडाऊन सुरु झाला, शाहनवाजचं ऑक्सिजन पुरवणं थांबलेलं नाही. आतापर्यत त्याने आणि त्याच्या युनिटी अँड डिग्निटी फाउंडेशनच्या टीमने सहा हजार जिंदगी वाचवल्या. त्याला म्हटलं ऑक्सिजन आणतो कुठून? तो म्हणाला, वसई आणि पालघर एमआयडीसीपर्यंत जातो. लागेल ती किंमत मोजून ऑक्सिजन आणतो. आता एमआयडीसीवालेही त्याला त्याचं काम बघून सवलत देऊ लागले आहेत. रमजान सुरु आहे. कुराण शरीफमध्ये म्हटलंय, तुम्ही एकाचा जीव वाचवाल, तर सगळ्या माणुसकीचा जीव वाचवाल. शाहनवाज ते निष्ठेने करतो आहे.
निसार अली -
मालवणी हे सेवा दलाचं जुनं केंद्र. विवेक पंडित आणि पूर्णानंद सामंत यांनी तिथे सेवादल सुरु केलं. प्रमोद निगुडकर, सुरेश कांबळे यांनी पुढे काम वाढवलं. मालवणी मिश्र वस्ती. कैक वर्षांपूर्वी इथे स्फोटक तणावाचं वातावरण तयार झालं होतं. पण पूर्णानंद सामंत, सुरेश आणि प्रमोदच्या पुढाकाराने शांतता प्रस्थापित झाली. काही गडबड होऊ दिली नाही. सुरेश कांबळे आणि निसार अली याच वस्तीत काम करतात. सुरेश कांबळे अखंड मदतीसाठी धावत असतो. पहिल्या लॉकडाऊनमध्ये निसार अलीने गरजुंना धान्य पोचवण्याचा प्रयास केला आणि अजूनही तो करतो आहे. कष्टकरी कामगारांना रेशनची मदत असो, बकरी ईदच्या निमित्तने प्लाझ्मा डोनेशनचा उपक्रम असो, परिसरात सॅनिटायझेशनचं काम असो, रक्तदान शिबीर, लसीकरणासाठी आवाहन निसार अली आणि त्यांची पत्नी वैशाली महाडिक हे दाम्पत्य सतत कार्यरत आहे. कौटुंबिक, आरोग्याच्या अडीअडचणी बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी दिवस रात्र झटत आहेत.