Monday, 25 July 2022

धेय्य धुंद, मस्त देशभक्त कवी वसंत बापट



'धुंद फुंद शीळ घुमे
युवकांच्या ओठी
गोड गोड गीत घुमे
युवतींच्या ओठी
आज तुझ्यासाठी भारता'



युवकांच्या ओठांवर गाणी कोणती आहेत, त्यावरून त्या देशाचं भविष्य सांगता येतं. साने गुरुजींच्या पाठोपाठ सेवा दल फुललं ते वसंत बापटांच्या गाण्यांवर. वसंत बापटांनी धुंद, मस्त गाणी लिहली. ती गाणी होती धेय्य धुंदीची. मस्त देशभक्तीची. बापटांनी धमाल गाणी लिहली. गंभीर प्रार्थना लिहली. गोड गीतं लिहली. धुंद, मस्त शीळ घातली. ती सेवा दलापुरती राहिली नाहीत. महाराष्ट्राची, देशाची बनली.

स्वातंत्र्याच्या चळवळीत बापटांनी क्रांती गीतं लिहली. गीतांमधून 'जय सुभाष'चा नारा दिला. पंढरपुरच्या सत्याग्रहात समतेची गर्जना दिली. कलापथकासाठी नृत्य गीतं लिहली. कामगार, शेत मजुरांच्या घामाची गाणी केली.
'भाग्य लिहलेलं माझं तुझं
घाम आलेल्या भाळावरी
स्वप्न लपलेलं माझं तुझं
इथे बरड माळावरी'

स्वातंत्र्योत्तर सेवा दलाचा इतिहास वसंत बापटांच्या गाण्यांनी लिहावा लागेल.
'सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे'

हे सेवा दलाचे धेय्य गीत तर सेवा दलाचा इतिहास आणि ओळख सांगताना बापट लिहतात,
'सेवा दल सेवा दल ध्यास जयां
हर्षाने उल्लेखिल भावी इतिहास तयां

कोणाचे दास्य नको, परक्यांचे धनिकांचे
सर्वांचे राज्य असो, देशातील श्रमिकांचे

तोवरि रूचणार नसे सोन्याचे घास जयां
सोन्याने उल्लेखिल भावी इतिहास तयां'

स्वातंत्र्याचा जयजयकार करताना बापट लिहतात,
'कुणी कुणाहूनी मोठा नाही,
कुणी कुणाहूनी छोटा नाही
समान सारे भाई भाई,
हा आमुचा निर्धार
जाती पाती ह्यांच्या भिंती
आता कोसळणार
मानव तितुका एकच आहे,
हेच खरे ठरणार'

आणखी एका प्रार्थनेचा उल्लेख करावा लागेल. कारण ती प्रार्थना लहानपणापासून मनात आहे. सेवा दलाशी जो जोडला गेला आहे, त्याच्या मनात ती आहे. अर्थात कवी वसंत बापट यांचीच,
'देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना'

बापटांच्या पत्नी नलूताई बापट सांताक्रूझला साने गुरुजी शाळा चालवत होत्या. त्यांनी बापटांना सांगितलं, 'भिन्न देव, धर्म आणि पंथ आड न येणारी एखादी प्रार्थना लिहून दे.' आणि बापटांनी लिहलं,
'भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना'

कवी वसंत बापट हे सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्तही होते. साने गुरुजींच्या सहवासात त्यांनी स्वतःचं जानवं तोडलं. पंढरपूरच्या सत्याग्रहात ते गुरुजींसोबत होते. पण नंतर कधी मंदिरात गेले नाहीत. देह आणि चित्ताला मंदिर मानून त्यांनी ही प्रार्थना लिहली.

वसंत बापट विद्वान होते, व्यासंगी होते. मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर अध्यासनाचे ते विभागप्रमुख होते. पक्के समाजवादी होते. देशात लोकशाहीसाठी झालेल्या संघर्षातही त्यांनी भाग घेतला. आणीबाणीच्या विरोधात आणि नंतर जनता प्रयोगातही. जनता पार्टीचा प्रयोग फसला. दोष समाजवाद्यांना दिला गेला. तेव्हा पार्ले टिळक मंदिरात त्यांनी दिलेल्या भाषणातून त्यांचा सात्विक संताप मी प्रत्यक्ष पाहिला आहे. जातीभेदाचा आणि मनातूनही न गेलेल्या अस्पृश्यतेचा दाह रामसुंदर दास आणि कर्पूरी ठाकूर या मुख्यमंत्र्यांना का भोगावा लागला? असा संतप्त सवाल करत त्यांनी जनसंघीयांवर जोरदार टीका केली होती. समाजवाद हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या गीतागीतातून तो व्यक्त झाला. संगमरवरातून मूर्ती घडवणाऱ्या अभिजात मूर्तिकाराच्या शिल्प प्रक्रियेचे संगमरवरी वर्णन त्यांच्या एका कवितेत आहे. वसंत बापटांची प्रत्येक कविता तशीच संगमरवरी शिल्प कृती सारखी आहे. ते सौंदर्याचे पूजक होते. आणि शब्द शिल्पकारही.

आज त्यांचा जन्मदिवस.
जन्मशताब्दी.
विनम्र अभिवादन!

- आमदार कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

No comments:

Post a Comment