Friday, 16 March 2018

शिक्षणमंत्र्यांची छळछावणी


रविवारी गुढीपाडवा आहे. पण पगाराचा पत्ता नाही. मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे राजकारण खेळताहेत. शिक्षकांना ते माहीत आहे. पण शिपाई एकटा कमावता असतो. पगारही कमी असतो. तो तर हवालदील झाला आहे. शिक्षकांचे घराचे हप्ते चुकले आहे. पेनल्टी बसली आहे. पण तावडे साहेबांना त्याची पर्वा नाही. 'चोराच्या उलट्या बोंबा', अशी एक मराठीत म्हण आहे. म्हणे कपिल पाटलांनीच पगार अडवून ठेवले आहेत. 

दुसरा महिना उजाडला तरी तावडे पगार का करत नाहीत? खुद्द मा. मुख्यमंत्र्यांनी सर्व ज्येष्ठ मंत्र्यांच्या समक्ष सुनावलं, तरी तावडे का ऐकत नाहीत? इतका द्वेष का?   शिक्षणमंत्र्यांच्या छळछावणीत महाराष्ट्रातले शिक्षक आणि महाराष्ट्राचं शिक्षण कैद आहे. 

पत्रकारांनी विचारलं की ते म्हणतात, 'मी शिक्षण मंत्री आहे, शिक्षक मंत्री नाही.'

मुंबई हायकोर्टाने स्पष्ट निकाल दिला आहे. कडक ताशेरे ओढले आहेत. शिक्षणमंत्र्यांचं नाव घेऊन इतके कठोर ताशेरे कोर्टाने ओढले आहेत की दुसरे संवेदनशील मंत्री असते तर त्यांनी राजीनामा देऊन टाकला असता. तुमचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पगार युनियन बँकेत ठेवता. आणि शिक्षकांचे पगार मात्र असुरक्षित बँकेत ठेवता? असा रोकडा सवाल मा. हायकोर्टाने सरकारी वकीलांना विचारला होता. पगाराबाबतचे हायकोर्टाचे जजमेंट ऐतिहासिक आणि लॅण्डमार्क असल्याची प्रतिक्रिया न्यायालयीन वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 

सुप्रिम कोर्टाचे एक ज्येष्ठ निवृत्त न्यायमूर्ती एका कार्यक्रमात मला म्हणाले, 'हे ऐतिहासिक जजमेंट आहे. लॅण्डमार्क आहे. हायकोर्टाचे हे जजमेंट पुढे अनेक लोकांना कामी येणार आहे.'

माजी अतिरिक्त अटर्नी जनरल म्हणाले, 'ग्रेट जजमेंट आहे.'

'अक्षरशः लूट थांबवली. हा सरकारचा पैसा आहे. शिक्षकांना असुरक्षित बँकेतून कोर्टाने वाचवलं आहे.' न्याय वर्तुळातली तिसरी प्रतिक्रिया. 

संतप्त प्रतिक्रिया
मला येणाऱ्या फोनवरच्या प्रतिक्रिया खूप तीव्र आणि संतप्त असतात. म्हणतात सर हाणा त्यांना. एक मुख्याध्यापिका म्हणाल्या, 'असा राग येतो की धरुन ..... वाटतं.' 

एक शिपाई दादा म्हणाले, 'साहेब मला सांगा काय करु ते? माझ्या मुलाची फी भरायची राहिली आहे. सणाला पैसे नाहीत.' 

त्या सर्वांना मी सांगतो आहे, 'आपल्याला असं नाही करता येत. आणखी थोडं सहन करु.'

माझे आई, वडील शिक्षक होते. गावाकडच्या शेतात माझे ८४ वर्षांचे वडील आजही राबतात. त्यांनी माझ्यावर साने गुरुजींचा संस्कार केला आहे. मी गांधींना मानतो. त्यामुळे तो मार्ग सोडून कधी वागू शकत नाही. मी कुणाला कधीही अपशब्द वापरत नाही. आयुष्यात कधी शिवी दिली नाही. राग मलाही येतो. पण संयमात ताकद असते. 

परवा सभागृहात नाही का चंद्रकांत दादा किती रागावले होते. अत्यंत शांत मानले जाणारे ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. नंतर त्यांचा राग शांत झाला. 

आज सकाळी पायऱ्यांवर बसलो होतो. पगाराचा फलक घेऊन. तावडे साहेबांच्या पाठोपाठ चंद्रकांत पाटील आले. विलेपार्ले येथील भाजपचे आमदार आणि माझे जुने मित्र पराग अळवणी माझ्याशी बोलत उभे होते. चंद्रकांत दादा माझ्याकडे पाहून त्यांना म्हणाले, 'एकटा संघर्ष करत असतो.' ज्येष्ठ मंत्र्यांनी दिलेली ती दाद होती. 


त्रास तर खूप होतोय. ९ फेब्रुवारीला मा. हायकोर्टाचा निकाल आला. तेव्हापासून पाठी लागलोय. दगडावर डोकं फुटावं तसा शिक्षणमंत्र्यांचा प्रतिसाद आहे. १९ फेब्रुवारीला कोर्टाच्या निकालाची अधिकृत प्रत सरकारला प्राप्त झाली. त्यावर शिक्षण खात्याने लगेच आदेश काढला असता तर १ मार्चला युनियन बँकेतून पगार झाला असता. ०५ ऑक्टोबर २०११ चा मूळ जीआर रद्द झालेला नाही. युनियन बँकेत सर्वांची खाती आहेत. पुल अकाऊंट आहे. फक्त एक आदेश हवा होता. पण आदेश काढण्यात आला नाही. सुप्रिम कोर्टात जाण्याची तयारी सुरु झाली. लॉ अॅण्ड ज्युडीशिअरी डिपार्टमेंटला सल्ला विचारण्यात आला. त्यांनी उत्तर दिलं, 'आधी हायकोर्टाच्या आदेशानुसार शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून वितरीत करणे सरकारवर बंधनकारक आहे. सुप्रिम कोर्टाच्या स्टे साठी थांबता येणार नाही.' लॉ सेक्रेटरींचा हा सल्ला मंत्र्यांनी मानला नाही. ५ मार्चला अखेर मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो. त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. पुन्हा ७ मार्चला गेलो. त्यांनी पुन्हा आदेश दिले. पण तरीही हालचाल नाही. 

०५ मार्चचं पत्र आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश (पत्रावर क्लीक करा आणि मोठे करून वाचा)



खोटं बोलणारे शिक्षण सचिव
१२ मार्चला अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चा होती. मी आणि जयंत पाटील हजर होतो. चंद्रकांत दादा, गिरीष बापट, एकनाथ शिंदे, गिरीष महाजन हे ज्येष्ठ मंत्री आणि मोर्च्याचे नेते उपस्थित होते. चर्चा संपल्यानंतर अनौपचारीक गप्पा सुरू होत्या. इतक्यात विनोद तावडे तिथे आले. ते खूर्चीवर बसताच मुख्यमंत्री स्वतःहून त्यांना म्हणाले, 'मी कपिल पाटलांना सांगितलं आहे. सरकार सुप्रिम कोर्टात जाणार नाही. पगाराचे आदेश आजच काढा.' सोमवारी १२ मार्चची ही गोष्ट. १३ तारखेला मी शिक्षण सचिव नंद कुमार यांच्याकडे गेलो. ते म्हणाले 'मला मुख्यमंत्र्यांचे आदेशच मिळालेले नाहीत.' राज्याचे शिक्षण सचिव इतकं खोटं बोलू शकतात? मी त्यांच्या कंप्युटर वरची मुख्यमंत्र्यांचे पत्र पोचल्याची नोंद दाखवली. तेव्हा ते वरमले. म्हणाले 'पण आम्ही सुप्रिम कोर्टात अपिल केलं आहे. दोन महिने पगार होणार नाहीत.' 

मला पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं. १४ मार्च. ते ऐकताच मुख्यमंत्री थक्क झाले. त्यांनी थेट नंदकुमारांना फोन लावला, 'तुम्हाला लॉ अॅण्ड ज्युडीशिअरी डिपार्टमेंटने सांगूनही तुम्ही पगार का सुरु केले नाहीत? आजच आदेश काढा.' १५ मिनिटात आदेश तयार झाले. फाईल शिक्षणमंत्र्यांकडे गेली. तीन दिवस झाले. शिक्षणमंत्री अजूनही सही करत नाहीत. आज रात्री (१६ मार्च) विधान भवनातून बाहेर पडताना ते म्हणाले, 'मी सही करुन मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली आहे.' 

१४ मार्चचं पत्र आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश (पत्रावर क्लीक करा आणि मोठे करून वाचा)
छळ करणारे शिक्षणमंत्री
मी जबाबदारीने सांगतो, 'शिक्षणमंत्री खोटं बोलत आहेत.' फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेलेली नाही. शिक्षणखात्यात पडून आहे. सोमवारी सुप्रिम कोर्टात केस आहे. मुख्यमंत्र्यांचं न ऐकता शिक्षण खातं आणि मुंबै बँक सुप्रिम कोर्टात गेले आहेत. सोमवारी काय निकाल लागतो त्याची वाट शिक्षणमंत्री पाहत आहेत. इतकं खोटं बोलणारे शिक्षणमंत्री मी पाहिले नाहीत. शिक्षकांना असे छळणारे शिक्षणमंत्री झाले नाहीत. रात्रशाळा बंद करणारे. दुर्गम भागातल्या छोट्या शाळा बंद करणारे शिक्षणमंत्री जगाच्या पाठीवर कधी पाहिलेत का?

एका मुलीच्या शाळेसाठी जपानची ट्रेन तीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या स्टेशनवर थांबत होती. आमचे शिक्षणमंत्री शिक्षणाच्या ट्रेनमधून गरीब मुलांना ढकलून बाहेर काढत आहेत. शाळांचं कंपनीकरण करत आहेत. शिक्षकांना सरप्लस करत आहेत. कुठे कुठे बदली करुन टाकली आहे सरप्लस शिक्षकांची. छळाला काही अंत हवा. परवा तर तीन गुजराती शाळेतील महिला शिक्षकांना 'उसनवार तत्वावर' मंत्रालयात बदली करण्यात आली. महिलांच्या बाबत इतका अपमानास्पद शब्द वापरावा याचं तारतम्य राहिलेलं नाही. मी मुख्यमंत्र्यांना ते दाखवलं. ते थक्क झाले. त्यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्यामुळे शिक्षण सचिव कार्यवाही करतील, पण मध्ये आडवे शिक्षणमंत्री आहेतच. खरं तर परीक्षांच्या काळात शिक्षकांच्या बदल्या आणि समायोजन करण्याचं कारण काय? समोर गुढी पाडवा दिसतो आहे. हायकोर्टाचे आदेश आहेत. मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. मी अक्षरशः रोज जातो आहे. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे आणि कार्यवाह प्रकाश शेळके, शशिकांत उतेकर, लीना कुलकर्णी गेले महिनाभर कोर्ट, मंत्रालय, शिक्षण उपसंचालक अशा फेऱ्या मारताहेत. पण शिक्षणमंत्र्यांना पाझर फुटत नाही. 

संवेदनशील मुख्यमंत्री
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या साऱ्या काळातला प्रतिसाद संवेदनशील आहे. तक्रारीला जागा नाही. १२ मार्चच्या शेतकरी मोर्च्याला त्यांनी जसा प्रतिसाद दिला. तितक्याच संवेदनशीलतेने आज दुपारी पायरीवर मला ते म्हणाले, 'हायकोर्टाच्या आदेशानुसार तुमचे पगार त्यांना (शिक्षणमंत्र्यांना) करावेच लागतील.'


परवा व्हाटस्अपवर कुणाची तरी प्रतिक्रिया होती शेतकऱ्यांच्या मोर्च्यातून वेळ मिळाला असेल तर कपिल पाटलांनी शिक्षकांकडे पहावं. शेतकऱ्यांच्या प्रति इतकी असंवेदना व्यक्त करणारे तावडेचेचं मित्र असू शकतात. त्या मोर्च्यातल्या शेतकऱ्यांची मुंबईतल्या शिक्षकांच्या प्रती आणि विद्यार्थ्यांच्या प्रती किती प्रेमाची आणि काळजीची भावना होती, हे सांगायला हवं. 

रक्ताळलेल्या पायांचा मोर्चा
सोमवारी विधान भवनावर २०० किलोमीटर चालत हजारो आदिवासी आणि शेतकरी बांधव आले. पायातल्या चपला कधीच तुटल्या होत्या. असंख्य अनवाणी. पायांना जखमा. त्यातून भळभळणारं रक्त गरम डांबरी रस्त्यावर सुकत होतं. शहापूर आणि ठाण्यात आले तेव्हा शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं जेवण दिले. तोपर्यंत सुकवलेल्या भाकऱ्या आणि लसणाची चटणी घशाखाली ढकलत बाया बापड्या चालत होत्या. अनेकांचं रक्त कमी झालं होतं. मुलुंड चेकनाक्यापासून रविवारी त्यांच्यासोबत मी चालत होतो. जालिंदर सरोदे सोबत आपले कितीतरी शिक्षक त्या मोर्च्यात चालले. मोर्चा सोमवारी मुंबईत चालणार होता, त्यादिवशी दहावीचा गणिताचा पेपर होता. बारावीचाही पेपर होता. मोर्च्याचे नेते कॉ. जीवा पांडू गावीत आणि कॉ. अशोक ढवळे यांना मी म्हणालो, 'सोमवारी पेपर आहेत. मोर्च्याने मुंबईत ट्रॉफिक जाम होईल. मुलांचे हाल होती. म्हणून मोर्चाचं टाईमटेबल बदलता येईल का? माझी विनंती आहे. मुंबईचा शिक्षक आमदार म्हणून तुमच्या कानावर ही गोष्ट घालणं आवश्यक आहे.'

मुंबईच्या मुलांसाठी ४३ किलोमीटर पायतोड
आणि काय आश्चर्य? गावित, ढवळे आणि नवले यांनी आदिवासी आणि शेतकऱ्यांना विचारलं. निर्णय घेतला, रात्रीच चालायचा. दिवसभर कडक उन्हात चालले होते सर्व. रात्री पुन्हा २ वाजता निघाले. पहाटे सहाच्या आत आझाद मैदानात पोचले. त्याच रक्ताळलेल्या पायांनी एका दिवसात आणि एका रात्रीत ४३ किलोमीटर चालली माणसं. हे लिहताना माझ्या डोळ्यात पाणी आहे. मला खात्री आहे, तुमच्याही डोळ्यात पाणी असेल हे वाचताना. किती त्याग. दुःख त्यांचं मोठं. पण मुंबईतल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून हे आदिवासी चालले. 

मुख्यमंत्र्यांनी मोर्च्याला दिलेला प्रतिसाद संवेदनशील होता. त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना पाठवलं होतं. रविवारी तेही चालत होते. पण रात्रभरही हे लोक चालतील, याची कल्पना त्यांनी केली नव्हती. दहा मिनिटात सौमय्या ग्रऊंड रिकामं झालं. ज्वाइर्ट कमिशनर देवेन भारती यांनी महाजनांना कळवलं. महाजन लगेच आले आणि तेही रात्रभर चालले. 

आदिवासी शेतकरी तसे चालले म्हणून सरकारलाही झुकावं लागलं. संयम, त्याग आणि आत्मक्लेश यांच्याशिवाय विजय प्राप्त होऊ शकत नाही. गांधींनी शिकवलेला सत्याचा मार्ग आहे हा. लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली निघालेल्या त्या मोर्च्याने हाच मार्ग अवलंबला म्हणून ते जिंकले. 

मी सदैव विरोधात उभा असतो. सरकार कुणाचंही असो. निखिल वागळे म्हणाले तसं, 'सामान्यांच्या बाजूने आपण परमनंट विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे.' विलासराव देशमुख यांचं माझ्यावर किती प्रेम होतं, हे सर्वांना माहित आहे. पण विचारांना पटलं नाही तेव्हा सरकारवर टीका करत होतो. विधेयकाच्या विरोधात मतदान करत होतो. विलासराव देशमुख यांनी कायम शिक्षकांच्या बाजूने कौल दिला. तेव्हाही नाही का वसंत पुरके आपल्याला किती छळत होते. पण पुरके परवडले असं म्हणायची आता वेळ आहे. मला खात्री आहे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोच कौल देतील. तावडेंचा शिक्षकांना छळणारा मसुदा माझ्या सांगण्यावर याच मुख्यमंत्र्यांनी स्क्रॅप केला होता. म्हणून माझा भरोसा आहे. 

आपला 

32 comments:


  1. Patil sir maharashtra rajyatil sanga nak shikshak (ict teacher)( 3000 ) berojgar zale aahet .Aani lavkarch 5000 ict teacher pan Dec 2018 made berojgar honar aahet.aapnala vinTi aahe computer teacher la vachava.

    ReplyDelete
  2. Sir,I salute you and your dedication for teacher's problems.

    ReplyDelete
  3. सर्व शेतकरी बांधवांना लाल सलाम !!!
    शिक्षक बांधवांना आव्हाहन यापूर्वी आपण खूप मोर्चे काढले. वस्तीशाळेचा लढ्याला मिळालेलं सर्वात मोठं यश आपल्या समोर आहे. त्यामुळे निराश न होता एकजुटीने आमदार कपिल पाटील साहेबांचा सोबत या ना -लायक सरकारचा विरोधात लढत राहणार आहोत. नक्कीच एक दिवस आपलाच आसेल.

    ReplyDelete
  4. सर्व शेतकरी बांधवांना लाल सलाम !!!
    शिक्षक बांधवांना आव्हाहन यापूर्वी आपण खूप मोर्चे काढले. वस्तीशाळेचा लढ्याला मिळालेलं सर्वात मोठं यश आपल्या समोर आहे. त्यामुळे निराश न होता एकजुटीने आमदार कपिल पाटील साहेबांचा सोबत या ना -लायक सरकारचा विरोधात लढत राहणार आहोत. नक्कीच एक दिवस आपलाच आसेल.

    ReplyDelete
  5. Saheb saheb saheb ....
    Purn article wachlo dodyat pani ala,
    Pan shame ya shikshan mantri ani sachiv .
    Mala evdhach mhanaycha ki
    BJP la nuskan pochayla fakt shikshan mantrich kafi ahe.

    ReplyDelete
  6. खरं तर मुख्यमंत्री लेचापेचा आहे त्यांनी आदेश देऊन मंत्री ऐकत नसतील तर त्यांनी राजीनामा दिलेला बरा. या मुख्यमंत्री चा काळात शिक्षक,शेतकरी,राज्य कर्मचारी,मराठा समाज,धनगर समाज,ict शिक्षक,समाधानी नाहीत. या मुख्यमंत्र्याच्या काळात अनेकांचे लाखोंनी मोर्चे आले नुसती तोंडाला पाने पुसली आणि तुम्ही म्हणे मुख्यमंत्री संवेदनशील आहे.महाराष्ट्र राज्याच्या आतापर्यंत सगळ्यात असंवेदनशील मुख्यमंत्री आहे.

    ReplyDelete
  7. सर आम्हाला तुमचा बद्दल अभिमान आहे !!!!

    ReplyDelete
  8. आपली शिक्षकाप्रती कळकळ आम्हाला जाणवते सर त्यामुळेच अन्यायाविरुद्ध सयंतपणे लढण्याचे बळ आपल्या प्रेरणेने आम्हाला मिळते कारण आमचे नेतृत्व दंडूका हातात घेण्याची भाषा करीत नाही तर लेखनीच्या आणि बुद्धी मत्तेच्या जोरावर विधान परिषद गाजवते

    ReplyDelete
  9. सर तुम्ही आमच्या साठी किती प्रयत्न करतायत ते सर्व महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला माहित आहे.आयुष्यभर फक्त शिक्षकांचाच नव्हे तर शेतकरी, कष्टकरी यांचा कैवार घेणारा शिक्षक आमदार आम्ही कधी पहिला नाही.खरे म्हणजे शिक्षक आमदार एव्हडे कार्य करू शकतो हेच आम्हाला आपल्यामुळे समजले.आमदार असावा तर आपल्या सारखा.

    ReplyDelete
    Replies
    1. खरा समाजवादी नेता

      Delete
  10. श्री.शिंदे द.कि.
    माननीय आमदार श्री. कपिल पाटील यांच्या कार्याला मनापासून व शिक्षका विषयीच्या तळमळिला मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete
  11. शिक्षकांचा छळ कचऱ्यांची परंपरा ते परत विधानसभेत येत नाही

    ReplyDelete
  12. I really hate such type of attitude towards the teachers. Dear education minister, what is your problem? Do want teachers would die in front of u?
    Think twice before u appealing in the supreme Court.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. खरोखरच शिक्षकांचा नेता.

    ReplyDelete
  15. मा.कपिल पाटील आपण केलेले शिक्षकांच्या पगारासाठी प्रयत्न आणि चिकाटी खरोखरच कौतुकास्पद आहे. यातूनच दोन गोष्टी समोर आल्या.त्याम्ह्णणजे शिक्षकाबाबत असलेला जिव्हाळा आणि सरकारने केलेला छळवाद .....तरिही आम्ही सर्वं आपल्या पाठीशी आहोत.....

    ReplyDelete
  16. मा.कपिल पाटील आपण केलेले शिक्षकांच्या पगारासाठी प्रयत्न आणि चिकाटी खरोखरच कौतुकास्पद आहे. यातूनच दोन गोष्टी समोर आल्या.त्याम्ह्णणजे शिक्षकाबाबत असलेला जिव्हाळा आणि सरकारने केलेला छळवाद .....तरिही आम्ही सर्वं आपल्या पाठीशी आहोत.....

    ReplyDelete
  17. Yes sir you are right those who not want to know general people problem why we have to choose for next election at least this to be read by Fernandez sir now time has come to speak something which is right Jago shikshak jago

    ReplyDelete
  18. शिक्षकांचा छळ भोवणाऱ सरकारला!

    ReplyDelete
  19. Yes sir you are right now time has come to choose right person who knows middle class problem at least Mr Devendra Fernandez sir has to read this blog please Jago shikshak Jago

    ReplyDelete
  20. Waooo great .....kiti savendanshil Bhumika.....
    .

    ReplyDelete
  21. Waooo great .....kiti savendanshil Bhumika.....
    .

    ReplyDelete
  22. Waooo great .....kiti savendanshil Bhumika.....
    .

    ReplyDelete
  23. Waooo great .....kiti savendanshil Bhumika.....
    .

    ReplyDelete
  24. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  25. आपल्या दृढ निश्चयी स्वभावाचे कौतूक करावं तितकं थोडं आहे

    ReplyDelete
  26. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  27. आमदार पाटलांचे विचार वाचून खूप आनंद झाला.शिक्षकांची बाजू मांडणारे सभागृहात असणे ही समाधानाची बाब आहे

    ReplyDelete
  28. Respected Patil sir,
    I read all struggle of your role for all teachers problem, I Salute you from our whole Maharashtra teachers, Sir as like you 100 MLA are sufficient for change our system, once again congrats and we all with you for good vision, Best luck
    SP Waghmode Islampur.sangli

    ReplyDelete
  29. Vilas Mali17 March 2018 at 01:37
    मा.कपिल पाटील आपण केलेले शिक्षकांच्या पगारासाठी प्रयत्न आणि चिकाटी खरोखरच कौतुकास्पद आहे. यातूनच दोन गोष्टी समोर आल्या.त्याम्ह्णणजे शिक्षकाबाबत असलेला जिव्हाळा आणि सरकारने केलेला छळवाद .....तरिही आम्ही सर्वं आपल्या पाठीशी आहोत..

    ReplyDelete