Wednesday, 17 June 2020

सिंहासन हलवणार दिगू टिपणीस


महाराष्ट्राच्या राजकारणावर अरुण साधूंची 'सिंहासन' कादंबरी खूप गाजली. जब्बार पटेलांनी त्यावर चित्रपटही काढला. त्यात दिगू टिपणीस नावाच्या पत्रकाराची व्यक्तिरेखा होती. राजकारणातले ते निर्दय डावपेच, उलथापालथी यांचा साक्षीदार होता दिगू टिपणीस. चित्रपटाची अखेर अस्वस्थ, वेडापिसा झालेल्या दिगू टिपणीसला दाखवून होते.

दिनू रणदिवे आणि जगन फडणीस या दोन पत्रकारांनी महाराष्ट्राची राजकीय पत्रकारिता चार दशके गाजवली. जगन फडणीस आजारपणातून आधीच निघून गेले. दिनू रणदिवे यांना 95 वर्षांचं आयुष्य लाभलं. पण दोघांची अखेर कफल्लक फकिरा सारखीच होती. दोघेही शेवटपर्यंत अस्वस्थ होते. दोघांच्याही जीवाची तगमग सुरू असायची. सामान्य माणसांशी, गरिबांशी, दुबळ्यांशी नाळ त्यांची जोडलेली होती. 
सिंहासन मधला तो दिगू टिपणीस दिनू रणदिवे आणि जगन फडणीस या दोघांचंच प्रतिबिंब होतं. 

दिनू रणदिवे, जगन फडणीस आणि सिंहासनकार अरुण साधू या तिघांच्या सोबत पत्रकारितेत काम करण्याची संधी मला मिळाली. तिघांकडून खूप शिकलो. तिघेही डाव्या विचारांचे. अरुण साधू मार्क्सवादी. दिनू रणदिवे आणि जगन फडणीस समाजवादी. तिघांच्याही जीवन निष्ठा शेवटच्या माणसाला वाहिलेल्या. 

अरुण साधू साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. तशी शैली जगन फडणीस आणि दिनू रणदिवे यांच्याकडे नव्हती. पण या दोघांची बातमीदारी अस्सल होती.  जगन फडणीसांचे 'महात्म्याची अखेर' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रणदिवेंचेही काही दीर्घ वृत्तांत एकत्र केले असते तर दोन, चार पुस्तकं सहज होऊ शकली असती. 

दिनू रणदिवे लोक विलक्षण माणूस. सत्ताधाऱ्यांना हलवण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांनी उघडकीस आणलेल्या सिमेंट प्रकरणात शेवटी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनाही पायउतार व्हावं लागलं. बातमीचा माग काढताना ते पिच्छा सोडत नसत. सत्ताधाऱ्यांची पर्वा करत नसत. पण रणदिवेंनी एकदा बातमी दिली की त्याचा खुलासा परत करावा लागत नसे. 

रेल्वेच्या संपात ते दादर स्टेशनला दिवसभर उभे राहिले. किती ट्रेन जाताहेत हे मोजण्यासाठी. सगळं काही सुरळीत सुरू आहे, असं सांगणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा रणदिवेंनी पर्दाफाश केला. 

रणदिवे मूळ आमच्या चिंचणीचे. पालघर जिल्ह्यातले. तिथल्या शेतकरी आणि आदिवासींशी असलेली नाळ त्यांनी पत्रकारितेतही जपली. राष्ट्र सेवा दल आणि डॉ. राममनोहर लोहियांमुळे त्यांच्या पत्रकारितेला एक समाजवादी दृष्टी होती.

एकदा त्यांना स्मशानभूमीत जावं लागलं होतं. आडोश्याला उभा असणारा एक खिन्न चेहरा त्यांनी पाहिला. रणदिवेंनी त्याला विचारलं, काय झालं? 

त्या माणसाचं मुल गेलं होतं. दफनाला जागा नव्हती. पावसाने पाणी साचलं होतं. त्या स्मशानभूमीत दफनासाठी पण स्वतंत्र जागा होती. रणदिवेंनी त्याला ती जागा दाखवली. 

तो म्हणाला, तिथे मला परवानगी मिळाली नाही. कारण ती हिंदू दफनभूमी आहे आणि मी दलित आहे. माझ्यासाठी जागा मिळाली नाही. म्हणून पाणी साचलेल्या जागीच लहानग्या मुलाला दफन करावं लागलं. पाणी साचलंय माझ्या मुलाला सर्दी होईल हो. म्हणून तो ओक्साबोक्शी रडायला लागला. 

त्याच्या उत्तराने रणदिवे हादरले. 'मुंबईतल्या हिंदु दफनभूमीत दलितांना जागा नाही.' ही बातमी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स मध्ये गाजली. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. गजहब झाला. त्याच दिवशी संध्याकाळी शासनाने आदेश काढला, सर्व जातींना एकच स्मशानभूमी आणि दफनभूमी राहील. 

मुख्यमंत्री काय म्हणाले? आणि विरोधी पक्ष नेत्यांनी काय आरोप केला? नेत्याच्या मुलाने काय प्रताप केले? आणि दुसऱ्या युवराजाने मदतीचे फोटो कसे काढले? यावर सध्या वर्तमानपत्रांचे रकाने आणि माध्यमांचे बाईट्स भरलेले असतात. 

पण मुंबईतल्या स्मशानभूमीत जातीभेद चालतो, ही बातमी रणदिवेंच देऊ शकले. 

लॉकडाऊनमध्ये उद्ध्वस्त झालेल्या आणि हजार, दोन हजार किलोमीटर पायी चालत निघालेल्या स्थलांतरित कामगारांच्या रक्ताळलेल्या पायांची बातमी किती माध्यमं चालवतात?

अशा बातम्यांपासून माध्यमं व्यवस्थित Social Distancing  पाळत असतात. रणदिवेंच्या बातमीदारीत ना Social Distancing होतं ना Physical. 

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा वारसा ज्या घरात आहे. त्या घरातले उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत. प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे,शाहीर अमरशेख, सेनापती बापट यांच्या लढ्यातून संयुक्त महाराष्ट्र झाला. 105 हुतात्मे झाले. महाराष्ट्र जन्माला घातलेल्या या आंदोलनाचा जन्मच मुळी दिनू रणदिवेंमुळे झाला. पहिली ठिणगी त्यांनीच टाकली. शिवाजी पार्कच्या पहिल्या सभेचे आयोजक ते आणि प्रभाकर कुंटे होते. 

संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे साप्ताहिक रणदिवेंनी सुरू केलं होतं. पहिला अंक त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दादरच्या रस्त्यांवर ओरडत विकला आणि तासाभरात 2 हजार प्रति संपल्या.  पुढे 50 हजारावर खप गेला होता. गोवा मुक्ती आंदोलनातही रणदिवेंनी तुरुंगवास भोगला. 

संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेसाठी रणदिवे सर्वप्रथम प्रबोधनकार ठाकरेंकडे गेले होते. तिथेच त्यांची बाळासाहेब ठाकरेंशी ओळख झाली आणि पत्रिकेच्या पहिल्या अंकापासून बाळासाहेबांची पहिली वहिली व्यंगचित्र प्रकाशित होऊ लागली. हे मैत्र्य त्या दोघांनी अखेरपर्यंत जपलं. दोघांचे अरेतुरेचे संबंध होते. 

दिनू रणदिवे नेता मानत ते राममनोहर लोहियांना आणि एस.  एम. जोशींना. पण आंदोलन संपल्यानंतर ते राजकारणात गेले नाहीत. पत्रकारीतेतच रमले. महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला. रणदिवे अखेरपर्यंत तिथेच राहिले. चीफ रिपोर्टर म्हणून निवृत्त झाले. 

दिनू रणदिवे माझ्या गावचे. समाजवादी विचाराचे. सेवा दलाचे. त्यामुळे त्यांचं प्रेम खूप लाभलं. अलीकडच्या काळात त्यांची फारसी भेट होत नव्हती. पण काल अखेरचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा गलबलून गेलो. त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचं महिन्यापूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे एकटे पडले होते. घरी करणारं कुणी नव्हतं. महाराष्ट्र टाइम्सचा हॅरीश शेख आणि दीपा कदम हे पत्रकार दांपत्य त्यांची अखेरच्या काळात सेवा करत होते. संजय व्हनमाने लालबागच्या राजाकडून त्यांना रोज डबा पाठवत होता. समर खडस सांगत होता हॅरीस आणि दीपाने खूप सेवा केली. लॉकडाऊनच्या काळात अशा माणसांचे हाल पाहवत नसतात. पण तरुण पत्रकार मित्र आस्थेने काम करतात याचंही कौतुक वाटतं.

काही दिवसांपूर्वी दिनू रणदिवे यांना गृहमंत्री अनिल देशमुख भेटायला आले होते. रणदिवेंनी त्यांना काय विचारलं असेल? 

लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांचे हाल होताहेत. कधी संपेल हे?

महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा दिनू रणदिवे मानदंड होते. मापदंड.

- कपिल पाटील

Monday, 15 June 2020

कोकणातील वादळग्रस्त शाळा, कॉलेजना मदत जाहीर करा


प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्री. अजित दादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्री. उदय सामंत
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
तथा 
पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा

मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड
शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य

महोदय / महोदया,
निसर्ग वादळाने कोकणामध्ये शेतकऱ्यांची आणि बागायतदारांची अपरिमित हानी केली आहे. लोकांच्या घरांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने त्यांना मदतही जाहीर केली आहे. मात्र रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीच्या परिसरात असलेल्या शेकडो शाळा आणि काही महाविद्यालये आपदग्रस्त झाली आहेत. ती अजून बेदखल आहेत. 





बहुतेकांची छपरं उडून गेली आहेत. इमारतींची पडझड झाली आहे. काही शाळांची तर फार दैना झाली आहे. महाविद्यालयांच्या प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, वर्गखोल्या यांची मोठी हानी झाली आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेचे किमान 15 लाख ते 2 कोटींचे नुकसान झाले आहे. या शिक्षण संस्थांना ताबडतोब मदत केली नाही, तर अनेक ठिकाणी नजीकच्या काळात शिक्षण सुरू करणे कठीण जाईल. पावसाळ्यात इमारतींची आणखी हानी होईल.

कोकणातील या गरीब शिक्षण संस्थाना मदतीचे अन्य कोणतेही स्रोत उपलब्ध नाहीत. 





या संस्थांच्या नुकसानीचा पंचनामा अद्यापही झालेला नाही. या संस्थांची झालेली हानी शासन दरबारी बेदखल आहे. तरी कृपया आपण तातडीने लक्ष घालून कोकणातील शिक्षण संस्थांच्या पुनर्रउभारणीसाठी किमान 25 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, ही विनंती.

दि. 13 व 14 जून रोजी मी स्वतः रायगड आणि रत्नागिरी मधील अशा आपदग्रस्त शाळा, महाविद्यालयांना भेट दिली. नुकसानीची पाहणी केली. वरील बाबी आणि शाळांच्या नुकसानीची माहिती मी मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना खासदार विनायक राऊत, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख, काँग्रेस आमदार भाई जगताप यांना दापोली येथे झालेल्या भेटीत निदर्शनास आणून दिली आहे. 

बुक्टोच्या नेत्या ताप्ती मुखोपाध्याय आणि मधु परांजपे यांनी कोकणातील वादळग्रस्त महाविद्यालयांबद्दल माझ्याशी सर्वप्रथम चर्चा केली होती. मदत मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्यांच्याच सूचनेनुसार मी दौरा करून वसुस्थिती जाणून घेतली. याबाबत बुक्टोने तयार केलेल्या रिपोर्टबद्दल मी यापूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्यासोबत चर्चा केली आहे.







या दौऱ्यात शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे,  शिक्षक भारती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, लोकनेते गोपीनाथ मुंडे कॉलेज मंडणगडचे देवरे सर, रामराजे कॉलेज दापोलीचे संदीप राजपुरे सर, वराडकर बेलोसे कॉलेजचे संदीप निंबाळकर सर, दापोली अर्बन बँकेचे कॉलेज दापोलीचे जगदाळे सर, साबळे कॉलेज माणगावचे टी. एम. जाधव सर, प्राचार्या श्रीमती कुलकर्णी, प्रा. साळुंखे, प्रा. जगदीश ठाकूर, शिक्षक भारती रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब रूपन्नावर, जिल्हा कार्यवाह निलेश कुंभार, माध्यमिक पतपेढीचे चेअरमन अमित कदम, राज्य प्रतिनिधी पवनकुमार माने, दापोली तालुका अध्यक्ष मुबीन बामणे, खेड तालुका अध्यक्ष संदीप पाटील, बाजीराव कोराने, राजेश माळी, सावर्डेकर सर कांबळे सर, मुख्याध्यापक शशिशेखर शिंदे, मुख्याध्यापक भानुदास नागणे, मंडणगडचे सत्तार इम्तियाज, रियाज म्हसळे, नांदगावकर, 
प्राथमिक शिक्षक भारती रायगडचे विनोद कडव, सतिश हुले, विजय शिंदे, संजय पोईलकर, गणेश ढेपे, मोतीवाले परांजपे हायस्कुल चिपळूणचे सावर्डेकर सर, कांबळे सर, नायशीचे (चिपळूण) राजेश माळी सर यांनी मदत केली. 

काही संस्थांची निवेदनं आणि दौऱ्यातील प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे धनाजी पाटील यांनी एक रिपोर्ट तयार केला आहे. तो सोबत जोडला आहे.



कृपया तातडीने मदत जाहीर करावी, ही विनंती.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, विपस

Friday, 12 June 2020

तूर्त शाळा नको ...


प्रति,
मा. मुख्य सचिव
महाराष्ट्र राज्य

1) शाळा, कॉलेज 15 ऑगस्ट पर्यंत सुरू करू नयेत, असे जाहीर निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मा. ना. श्री. रमेश पोखरियाल उर्फ निशंक यांनी दिले आहेत.

2) कोरोनाच्या स्थितीत शाळा सुरू करण्याची घाई करू नका. त्याऐवजी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी इतर सर्व पर्याय शिक्षण विभागाने अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता असल्यास टेलिव्हिजन, प्री लोडेड टॅब, ऑनलाईन किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शिक्षण सुरू ठेवायचा प्रयत्न करावा. त्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग शिक्षकांना देण्यात यावं, असे सुस्पष्ट आदेश मा. मुख्यमंत्री यांनी मा. शालेय शिक्षण मंत्र्यांना झूम बैठकीत दिले होते. या बैठकीला मी उपस्थित होतो.

महोदय,
वरील दोन्ही संदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाने काहीही कार्यवाही केलेली नाही. 

15 जून पासून शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण निरीक्षक / शिक्षणाधिकारी यांनी तोंडी व Whatsapp आदेश दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. 

शिक्षकांना तातडीने शाळेत हजर राहण्याचे आदेश गेलेले आहेत.

15 जून पासून शाळा सुरू करायच्या म्हणजे कसे? असे मुख्याध्यापक आणि शिक्षक विचारत आहेत. 

मुंबईसह राज्यातील बहुतेक शाळा कॉरंटाईन सेंटर झालेल्या आहेत. त्यांच्या निर्जंतुकीकरणाची आवश्यकता आहे. 

लोकल ट्रेन, बस सुरू झालेल्या नाहीत. शिक्षकांनी यायचे कसे? त्यामुळे वर्क फ्रॉम होमबाबत विचार होण्याची गरज आहे.

बाहेरगावी अडलेल्या शिक्षकांना आपापल्या कार्यक्षेत्रात जाण्यासाठी पास उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

70 टक्क्यांहून अधिक शिक्षक हे कोविडच्या विविध ड्युटीवर अद्यापी कार्यरत आहेत. त्यांना परत बोलवण्यात आलेले नाही. 

केंद्र सरकार आणि मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशाची दखल अद्यापी शिक्षण विभागाने घेतलेली नाही. 

शाळा सुरू होऊ शकणार नाहीत ही बाब लक्षात घेऊन शाळाबाह्य (ऑनलाईन, टेलिव्हिजन, वर्कबुक, वर्कशीट इ.) शिक्षण कसे सुरू ठेवावे. याबद्दल कोणतेही प्रशिक्षण शिक्षण विभागाने शिक्षकांना आजतागायत दिलेले नाही. 

संचमान्यतेचे निकष निश्चित करणारा 28 ऑगस्ट 2015 चा अन्यायकारक जीआर, कला - क्रीडा विषयांवर अन्याय करणारा 07 ऑक्टोबर 2015 चा जीआर आणि रात्रशाळा बंद पाडणारा 17 मे 2017 चा जीआर हे अशैक्षणिक शासन निर्णय तातडीने रद्द करण्याबाबत सर्व मान्यवरांनी विनंती करूनही शिक्षण खात्याने त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. 

शिक्षकांची मोठ्या संख्येने गरज असताना सरप्लस शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत तातडीने बोलावून घेण्याबाबतही शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

शाळा प्रत्यक्ष सुरू होत नाहीत तोवर शाळाबाह्य शिक्षण सुरू ठेवण्याबाबत अडचणी असल्यातरी आणि कामाचा बोजा वाढत असला तरी शिक्षक त्यासाठी तयार आहेत. मात्र ते कधीपासून व कसे सुरू करायचे याबाबत अद्यापही कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. 

शिक्षक हे सर्व काम वर्क फ्रॉम होम करण्यास तयार आहेत. ग्रामीण भागातील शाळांबाबत वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. 

हे ऑनलाईन / शाळाबाह्य शिक्षण सुरू ठेवले तरी त्यातून मिळणारा परिणाम हा फार असण्याची शक्यता कमी आहे. सबब शाळा फिजिकली दिवाळी नंतरच सुरू कराव्यात किंवा वॅक्सिन आल्यानंतर सुरू कराव्यात आणि दरम्यानच्या काळात झालेले शैक्षणिक नुकसान पुढील वर्षाच्या काळात भरून काढावे. येत्या दोन वर्षात दीर्घ सुट्ट्या कमी करून झालेले नुकसान भरून काढता येईल. त्यासाठी शिक्षण विभागाने आखणी करण्याची आवश्यकता आहे. 

स्थलांतरीत कामगारांची मुले आपापल्या गावी किंवा अन्य राज्यात गेलेली आहेत. त्यांना शोधणे, त्यांचा ट्रॅक ठेवणे व त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी शिक्षकांचे सहकार्य लागणार आहे. याबाबतही शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री यांनी घेतला असताना. शाळा, कॉलेज सुरू ठेवण्याचा आग्रह ज्या पद्धतीने केला जात आहे. ती चिंता वाटणारी बाब आहे. 

कृपया याबाबत तातडीने कार्यवाही करावी आणि 15 जून पूर्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना अवगत करावे, ही विनंती.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, विपस

दि. 12 जून 2020

-------------------------

याच संदर्भात यापूर्वी लिहलेले ब्लॉगही जरूर वाचा -

शाळा नाही पण शिक्षण सुरु
Tap to read - https://bit.ly/3gLnPbF

-------------------------

कोरोना काळातलं शिक्षण ...
Tap to read - https://bit.ly/2X2pUI7

Wednesday, 10 June 2020

बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या


प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

महोदय,
कोविडची महामारी रोखण्यासाठी  देशात लॉकडाऊन करण्यात आलं. माणसं घरात गेली. कारखाने बंद पडले. हाताचं काम गेलं. आणि लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात लक्षावधी स्थलांतरित मजूर रस्त्याने चालू लागले. कुणाच्या पायातून रक्त येत होतं. कुणी स्त्री हायवेवरच बाळंत होत होती. कुणी ट्रक उलटून त्यात दबून मरत होतं. पटरीवर मान ठेवून डोळा लागलेल्या मजुरांच्या मानेवरून तर मालवाहू गाडी निघून गेली. अंग मेहनत करणाऱ्या या वर्गाचे हाल पाहून शरद पवारांना कुणाची आठवण आली असेल तर ती बाबा आढावांची. 

डॉ. बाबा आढावांचा 90 वा वाढदिवस 1 जूनला साजरा झाला. बाबांवर शरद पवारांनी एक मोठी फेसबुक पोस्ट लिहली. शरद पवार जितके कसलेले राजकारणी आहेत तितकेच संवेदनशील नेते आहेत. परिवर्तनाच्या चळवळीशी नातं जपणारे राजकारणी आहेत. पवार साहेबांनी लिहलं म्हणून नव्या पिढीला डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दल काही कळलं. 

महात्मा फुले जेव्हा होते तेव्हा आपण कुणीच नव्हतो. पण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ही महाराष्ट्राची ओळख आजही आपण साऱ्यांनी जपली आहे. त्या परंपरेतला एक जीता जागता माणूस आपल्या सोबत आहे हीच महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट आहे. 

बाबा राष्ट्र सेवा दलात घडले. साने गुरुजी हे त्यांचं दैवत. साने गुरुजी हे सेवा दलाची ओळख मानली जाते आणि महाराष्ट्राची माऊली. महाराष्ट्राच्या समतेच्या चळवळीची आजची ओळख एकाच नावात सांगायची असेल तर ते नाव आहे, डॉ. बाबा आढाव.

डॉ. बाबा आढाव म्हणजे एक गाव, एक पाणवठा. बाबा म्हणजे परित्यक्ता स्त्रियांचा मुक्तीदाता. बाबा म्हणजे हमाल मापाड्यांचा कैवारी. बाबा म्हणजे काच पत्रा वेचणाऱ्या हातांच्या जखमा पुसणारा जणू डॉ. अल्बर्ट श्वाईटझर. बाबा म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पिछड्यांना हाक घालणारा लोहियावादी. बाबा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जेल भोगणारा सत्याग्रही. बाबा म्हणजे जयपूर हायकोर्टासमोर मनुचा पुतळा हटवण्यासाठी लॉंग मार्च काढणारा महाराष्ट्राचा बंडखोर. बाबा म्हणजे गोर गरिबांना परवडणारी, कष्टाची भाकर देणारा अन्नपूर्णादाता. बाबा म्हणजे असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीला धडक देणारा जणू नारायण मेघाजी लोखंडे. बाबा म्हणजे सत्यशोधकांचा इतिहास महाराष्ट्रापुढे जागता ठेवणारा महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक. बाबांचं आयुष्य फुलेमय आहे. पण त्यांच्यात गांधी, आंबेडकर यांचा समन्वयही आहे.

महाराष्ट्राला 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि डॉ. बाबा आढाव नव्वदी पार. महाराष्ट्र शासनाने त्यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' देणे उचित ठरेल. 

मुख्यमंत्री महोदय, आपण सरकार स्थापन करत असताना शिवरायांचा महाराष्ट्र, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार यांचा महाराष्ट्र असं म्हणाला होतात. ती परंपरा घट्ट करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार शासनाने द्यावा, एवढीच विनंती. 
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,


कपिल पाटील, विपस

दि. 10 जून 2020