जगात भारताची ओळख आहे ती, बुद्धाचा भारत म्हणून. भारताचा शोध घेण्याऱ्या पंडित नेहरुंनाही बुद्धाचाच भारत प्रिय होता. बोधगयेत घडवलेले साखळी बॉम्बस्फोट हा हल्ला केवळ बुद्ध विहारावर नव्हता. या प्राचीन देशाची जी खरी ओळख आहे. जी सभ्यता आणि संस्कृती आहे. तिच्यावरचा तो हल्ला आहे.
बॉम्बस्फोट घडवणारे हात कुणाचेही असोत. खरे गुन्हेगार दुसरेच आहेत. ज्या शक्तींनी हे षड्यंत्र रचलं आहे, त्यांचा हेतू स्पष्ट आहे. कारस्थान मोठं आहे.
शक्यता दोन आहेत. अतिरेकी पाकिस्तानी असू शकतात किंवा अतिरेकी देशांतर्गतही असू शकतात. पाकिस्तानी असतील तर लढाई सोपी आहे. फार तपशिलात जाण्याची गरज लागत नाही. आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा तेवढ्या सक्षम नक्कीच आहेत. बाह्य शक्तींनी कितीही हल्ले केले तरी देश कोसळण्याची किंवा त्यातून अस्थिरता माजण्याची कदापि शक्यता नाही. आपला देश मजबूत आहे. बाहेरच्या शत्रुला चीनची सरहद्द सोडली तर पराभवच पत्करावा लागला आहे. सरहद्दी वरचं आव्हान पेलायला आपलं सैन्य समर्थ आहे.
पण शत्रू घरातला असेल तर?
दिग्विजय सिंग यांच्याबद्दल भाजप परिवारामध्ये राग असणं स्वाभाविक आहे. त्यांची विधानं सर्वसामान्यांनाही कधी कधी टोकाची वाटतात. पण कॉंग्रेस पक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच जे सेक्युलर नेते आहेत त्यापैकी दिग्विजय सिंग यांचा नंबर वरचा लागेल. मध्य प्रदेशात ते मुख्यमंत्री होते तेव्हा दलित अजेंडा राबवण्याची त्यांनी हिम्मत केली होती. खाजगी उद्योग क्षेत्रात वंचित, शोषितांना सामाजिक न्याय देण्यासाठी अमेरिकेप्रमाणे affirmative action घ्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली त्याची राजकीय किंमतही त्यांना चुकवावी लागली.
आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी कधीही न चुकवणारा हा भागवतधर्मी विठ्ठल भक्त राजकारणात तुकोबांचीच रोकठोक भाषा बोलतो. माझी त्यांची भेट आषाढी एकादशीला एकदा झाली होती. फोनवर दोनदा बोलणंही झालं आहे. पण बाकी संपर्क नाही. परवा ते काय म्हणाले?
''अमित शहा अयोध्येला भेट देतात. नरेंद्र मोदी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देतात आणि दुसऱ्या दिवशी बॉम्बस्फोट होतो. या घटनांचा काय संबंध, मला माहित नाही.''
दिग्विजय सिंग यांच्या या वक्तव्यावर भाजप परिवारातून संतापाचे फुत्कार बाहेर न पडते तरच नवल. 'अतिरेकी हिंदू असू शकत नाही. सगळेच अतिरेकी मुसलमान कसे?' असे एसएमएस देशभर फिरवणारे असे रागावणे समजू शकतो. पण दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकत नाहीत. कारण शत्रू घरातलाच असण्याची शक्यता अधिक आहे.
नांदेड, परभणी आणि मालेगावचे बॉम्बस्फोट कुणी घडवले हे सांगायला आता नागपूरच्या आरशाची गरज नाही. समझोता एक्प्रेसमध्ये ६९ लोकांचे जीव कोणी घेतले हे जगापुढे कधीचं आलं आहे. शहीद हेमंत करकरे यांनी देशांतर्गत लपलेला शत्रू शोधून काढला नसता तर अतिरेक्यांची ही दुसरी बाजू कधीच समोर आली नसती. देशाबाहेरच्या शत्रूंनी मुंबईवर जो सर्वात मोठा हल्ला केला तो केवळ हल्ला नव्हता ते युद्ध होतं. त्या रणांगणात बाकीचे अधिकारी पळून जात असताना. कामटे, साळसकर, ओंबाळे यांच्या समवेत हेमंत करकरे नावाचा त्यांचा सेनापती शहीद झाला. पण त्याच सकाळी हेमंत करकरे यांच्या कुटुंबावर अत्यंत निलाजरी, जीवघेणी टीकेची झोड उठवण्यात आली होती. घाणेरडे फोन आणि एसएमएस यांनी त्यांच्या कुटुंबाला छळून सोडलं होतं.
हेमंत करकरे यांनी नथुरामी परंपरेचा तो चेहरा बेनकाब केला. वर्दी सेक्युलर असते. देशभक्त असते. तिला धर्म नसतो हे दाखवून दिलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आणि त्या संविधानाने निर्माण केलेल्या न्याय संस्थेने नथुराम आणि कसाब यांच्यात फरक केलेला नाही. मुंबई अन महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट ही की, या देशाचे संविधानकर्ते अन भाग्यविधाते डॉ. आंबेडकर या भूमिचेच पुत्र. आपल्या प्राणाचे मोल देत आपल्या तुकाराम ओंबळे यांनी कासाबला याच भूमीत गाडण्यासाठी जिवंत पकडलं. नथुराम हा एकच कलंक असेल पण पुण्याच्याच आपल्या काकासाहेब गाडगीळांनी त्याला ओळखलं म्हणून तो फासावर चढू शकला. देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या अशा दोन्ही शत्रुंशी लढत शहीद होणारे हेमंत करकरे या महाराष्ट्राचेच. मला खात्री आहे बिहारमधल्या बॉम्बस्फोटाची पाळमुळं महाराष्ट्राचीच एटीएस खणून काढील.
दहशतवादी इथले असोत की तिथले. त्यांच्या प्रेरणा समान आहेत. या देशाच्या सांस्कृतिक बहुविधतेला भेद आणि द्वेषात परिवर्तित करण्याचा तो डाव आहे. बिहार आणि महाराष्ट्रातल्या ताज्या राजकारणाचा संदर्भ त्याला आहेच. दिल्ली आक्रमणाच्या तयारीचा तो भाग आहे. जगभरचे सांस्कृतिक संघर्ष तीव्रतर करण्यामागे आणि दहशतवाद्यांच्या निर्मिती आणि पोषणामध्ये जगातल्या तेल साठ्यांवर कब्जा मिळवणाऱ्या जागतिक भांडवलदारांचा सहभाग लपून राहिलेला नाही. दहशतवादी कृत्यांमागच्या या प्रेरणा सामान्य माणसालाही आता कळू लागल्या आहेत. म्हणून या शक्तींचे डाव तो आपल्या भूमीवर खेळू देत नाहीत.
बोधगयेवरच्या हल्ल्याचा निषेध बौद्ध जनतेने अत्यंत संयमाने केला. तथागत गौतम बुद्धांच्या शांती मार्गाने केला. त्या संयमाला सलाम केला पाहिजे.
माणसाच्या दुःखाचा, वेदनेचा शोध सर्वप्रथम बुद्धानेच घेतला. माणसाला दुखः आहे. दुःखाला कारण आहे. त्यावर उपाय आहे आणि दुखः दूर करता येतं. अशी चार आर्य सत्ये तथागतांनी जगाला दिली. दहशतवादी आणि अतिरेक्यांना धर्म नसतो. असतो तो फक्त द्वेषाचा धर्म. या द्वेषाला माणसाच्या मनातून हद्दपार करणारं तत्वज्ञान बुद्धाने जगाला दिलं. बोधगयेवरच्या संयमी प्रतिक्रिया अतिरेक्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत.
आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com
Aapan mhanata te barobar aahe. Deshachya ekyala gharatil shatrnpaunach jast dhoka ahe aani yenarya loksabhechya election paryant dharmik tanav vadhavnyach kam modibhakta ani sangh pariavar karnar ahe. social media madhun tyamulech modistuti suru ahe.
ReplyDelete