Thursday, 29 December 2016

इंतजार नीतीश कुमारांचा


मोदींच्या नोटबंदीवर राहुल, केजरीवाल आणि ममता बनर्जी तुटून पडले असताना बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मात्र नोटबंदीचं स्वागत केलं. मोदी अन् भाजप विरोधकांना नीतीश कुमार यांच्या प्रतिक्रियेचं आश्चर्य वाटत होतं.

नीतीशकुमार यांनी या नोटबंदीचं स्वागत का केलं?

नागपूर अधिवेशनाला ५ डिसेंबरला मी पुण्याहून गेलो. ४ डिसेंबरला राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय मंडळाची आणि विश्वस्तांची बैठक होती. म्हणून पुण्याहून विमान पकडलं. विमानतळावर सुनिल केदार, उल्हासदादा पवार, बाळासाहेब थोरात आणि बरीच आमदार मंडळी लाऊंजमध्ये बसून आम्ही नोटबंदीवरच बोलत होतो. तितक्यात शरद पवार आले. पवार साहेबांना सुनिल केदारांनी तोच प्रश्न विचारला. अख्खा देश लायनीत उभा आहे. पण कतारमध्ये उभे राहणारेही प्रधानमंत्र्यांचाच जयजयकार करत आहेत. इतकी परेशानी आहे, पण लोक सहन करताहेत, हे कसं काय?

शरद पवारांचं उत्तर मार्मिक होतं, ‘तुमच्या ड्रायव्हरला वाटतंय आपल्या साहेबाचं नोटबंदीने नुकसान झालं असणार. गरीब अन् मध्यमवर्गीयांना वाटतंय काळे पैसेवाले आणि राजकारणी आता बरबाद होणार. लायनीत उभा राहण्याचा त्यांचा त्रास तर नेहमीचाच आहे.’

नीतीश कुमारांना त्यांच्या पाटण्यातल्या मुख्यमंत्री निवासस्थानी आम्ही महाराष्ट्रातली मंडळी भेटलो. तेव्हा अनेकांनी राहवून त्यांना त्यांच्या नोटबंदी समर्थनाबद्दलच थेट विचारलं. ख्यातनाम शायर हसन कमाल, ज्येष्ठ उर्दू संपादक सर्फराज आरजू, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे, कामगार नेते शशांक राव, मलविंदरसिंह खुराणा  अशी बरीच मंडळी सोबत होती. प्रख्यात अर्थतज्ञ श्रीपाद हळबे हे जॉर्ज फर्नांडिस, नीतीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना फक्त नीतीश कुमारांचं उत्तर माहीत होतं. बाकी सर्वांनाच उत्सुकता होती. माझ्यासोबत अशोक बेलसरे, अरविंद सावला, अरुण लावंड, डॉ. कैलास गौड, वर्षाताई निकम, शरद कोकाटे, अजित शिंदे आणि अतुल देशमुख हेही होते. त्यांना बिहार समजून घ्यायचा होता आणि नीतीश कुमारांनाही.



नीतीशकुमार म्हणाले, ‘माझ्या नोटबंदीच्या स्वागताची बातमी झाली. पण बेनामी संपत्तीवर हल्लाबोल करण्याची मागणी मी केली, त्याची बातमी झाली नाही...’

जो गरीब आज कठीनाई में है, वो सोच रहा है, अमीरों का जो अच्छा खासा है वो डुब रहा है।

नोटबंदीवर लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र का नाहीत ते त्यांनी नेमक्या शब्दात सांगितलं.

लोक काळ्या पैशाच्या विरोधात आहेत. तो पैसा बरबाद होणार असेल तर लोक स्वागतच करतील. लंबी कतारही सहन करतील. मी नोटबंदींचं स्वागत केलं, ते मर्यादित अर्थाने. बेनामी संपत्तीवर आणि सोन्याच्या गडगंज साठेबाजीवर हल्ला चढत नाही तोवर काळा पैसा संपणार नाही. मोदींना काळा पैसा बर्बाद करायचा असेल तर त्यांनी आधी बेनामी संपत्तीवर हल्ला चढवला पाहिजे. दारुबंदी केली पाहिजे. केंद्राने पूर्ण तयारीनिशी काही केलं नाही. त्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. काळा पैसा कॅशमध्ये असतो, हा चुकीचा समज आहे. तो बेनामी संपत्तीत आहे. त्याचं काय? कॅशलेस व्यवहार भारतात अशक्य आहे. अमेरिकेतही तो ४५% हून अधिक नाही. गरिबांच्या देशात कॅशलेसचा आग्रह अव्यवहारी ठरेल. केंद्र सरकारची खरी कसोटी लागणार आहे ती, ३१ डिसेंबरनंतर. तोपर्यंत वेळ द्यायला हवा.’

अत्यंत संयत अन् मोजक्या शब्दात नीतीश कुमार बोलत होते. केवळ विरोधासाठी विरोध असं राजकारण ते करत नाहीत. सेक्युलॅरिझमच्या प्रश्नावर मोदींशी पंगा घेत त्यांनी बिहारमध्ये पुन्हा बाजी मारली. पण म्हणून विजय डोक्यात गेला नाही. त्यांच्या बोलण्यात कटुता आणि द्वेष कणभरही नसतो. विरोधकांशी ते आधी संवाद साधतात. आम्ही त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा हे पुन्हा जाणवत होतं. भारतीय समाजमनाची नाडी अचूक ओळखलेला नेता त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होता. स्वच्छ, पारदर्शी प्रतिमा असलेल्या देशातील तीन - चार मुख्यमंत्र्यांमध्ये अर्थातच नीतीश कुमारांचा नंबर अव्वल आहे. त्या प्रतिमेला साजेशी त्यांची प्रतिक्रिया होती.



मुंबईकर पुन्हा पुन्हा विचारत होते. ते तितक्याच शांतपणे डोळ्यांतून आणि ओठातून मृदू हास्य करत उत्तरं देत होते. प्रत्येक प्रश्नाला ते कौतुक भरलेल्या डोळ्यांनी पाहत होते.

पुढचा प्रश्न नीतीश कुमारांचाच होता, महाराष्ट्रातून भेटायला आलेल्या मंडळींना.

मूक मोर्च्यांचं काय?

आपल्या मंडळींची उत्तरं गडबडत होती.

नीतीश कुमारांनीच मग उत्तर दिलं, ‘ही शेती संकटाची (Agrarian Crisis) प्रतिक्रिया आहे.’

महाराष्ट्रात मराठे, गुजरातेत पाटीदार, हरियाणात जाट, राजस्थानात गुजर या सगळ्या शेतकरी जाती आहेत. हीच अवस्था आंध्रमधल्या शेतकऱ्यांची आहे. ग्लोबलायझेशन नंतर शेती संकटात सापडली आहे. शेतकरी आत्महत्या करताहेत. शेती जगायलाही पुरत नाही आहे. होल्डिंग कमी होत आहे. नोकऱ्या नाहीत. सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा नाही. हिस्सेदारी नाही. फुले साहब कहते है, तशा या शुद्र जाती आहेत. आरक्षणाच्या मागणीशी तुम्ही सहमत असा वा नसा. त्यांची पीडा समजून घेणार की नाही? एकेकाळी आरक्षणाला विरोध करणारे हे समाज आता संविधानातलं आरक्षण मागत आहेत. ओबीसी जातींशी आता ते नाळ बांधू मागत आहेत. त्यांच्या या बदलाचं स्वागत करायचं की त्यांना ढकलून द्यायचं?’ नीतीश कुमारांनी थेट विचारलं.

ते म्हणाले, ‘बिहारमध्ये दलित, ओबीसींच्या जागांना धक्का लावता आम्ही महादलितांचा प्रश्न सोडवला. धनगरांना आरक्षण दिलं. व्ही. पी. सिंगांच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री होतो. त्याचवेळी या शेतकरी जातींनाही वेगळा कोटा ठेवण्याची मागणी मी केली होती. जाटांचं आंदोलन मी स्वत बाईकवर फिरून अनुभवलं होतं. त्यांच्याशी बोललो होतो. विपन्नावस्थेत ढकलल्या जाणाऱया शेतकरी जातींना आधाराची आणि सहानुभूतीची गरज आहे. म्हणून गुजरातमधल्या पाटीदारांच्या आंदोलनाकडे मी सहानुभूतीने बघतो आहे. एरव्ही टीव्ही पाहत नाही. पण मराठ्यांचे मोर्चे आवर्जून मोबाईलवर पाहिले. त्यांचं मागणं, सांगणं मी माहिती करून घेतलं आहे. या सगळ्या समाजांमध्ये नवं नेतृत्वं उभं राहताना मी पाहतो आहे. कधी काळी आरक्षणाला विरोध करणाऱया समाजातलं नवं नेतृत्वं डॉ. आंबेडकरांना जोडून घेऊ मागत आहे. त्याचं स्वागत नाही करायचं का? त्यांच्याशी बोलायचं नाही का?’

आरक्षणाच्या मागणीचा हा उद्रेक आजवरची आर्थिक धोरणं फसल्याचं लक्षण आहे. त्यामुळे एकूणच आर्थिक धोरणांचा फेरविचार व्हायला हवा. प्रश्न केवळ आरक्षणाचा नाही. संकटातली शेती सावरण्याचाही आहे. अनेक मूलगामी बदल आणि उपाय करावे लागतील.’

नीतीश कुमार तत्त्ववेत्ता नेत्याच्या भूमिकेत शिरले होते. पण त्यांच्या मांडणीत कुठेही तो आव नव्हता. संवाद साधत ते बोलत होते. हसन कमाल त्यांना म्हणाले, ‘महाराष्ट्र को आप से उम्मीद है।

त्यावर बिहारचे मुख्यमंत्री हसून म्हणाले, ‘आमच्या राजकारणाची सगळी प्रेरणा तर महाराष्ट्र आहे. गांधीं इतकाच आमच्यावर फुले साहब, शाहूजी और आंबेडकरजी का प्रभाव है। मधु लिमये आणि एस. एम. जोशी तर आमचे मार्गदर्शक राहिले आहेत. जॉर्ज साहेबांनाच आम्ही नेता मानत राजकारण केलं. मधु दंडवते, मृणालताई गोरे यांची याद आम्हाला नेहमी असते.’

नीतीश कुमार जे बोलत होते, ते बिहारमधल्या त्यांच्या कामातून दिसत होतं. स्वातंत्र्यापासून साठ वर्षात बिहार बिमारू राज्यच मानलं जात होतं. वीज नाही, रस्ते नाहीत. उच्च शिक्षणाच्या सुविधा नाहीत. कारखानदारी नाही. गुंडगिरी मात्र अमाप होती.

आता कुठे उजाडतंय.

रस्त्यांची प्रचंड कामे सुरु आहेत. फ्लाय ओव्हरची कामं सुरू आहेत. दारुबंदीमुळे बिहारमधल्या महिलांमध्ये नवी जागृती आली आहे. ताकद आली आहे. गावोगावी शाळा निघत आहेत. हजारो मुली सायकलवरून शाळेकडे जाताना सकाळी दिसतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत मुलीला घराबाहेर आणि गावाबाहेर पाठवलं जात नव्हतं. सरकारने मुलींना सायकली दिल्या आणि नजरच बदलली. सायकल स्त्रियांच्या मुक्तीचं एक प्रतीक बनलं. सरकारी नोकऱयांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. बिहारमधून आयएएस, आयपीएस अधिकारी मोठ्या प्रमाणावर निघतात. पण ते क्षेत्र लहान आहे. उच्च शिक्षण घेऊ मागणाऱ्या विद्यार्थ्यांना आडवी येते ती गरिबी. १२वी नंतर व्यावसायिक आणि उच्च शिक्षणासाठी कुठेही जाता यावं म्हणून चार लाख रुपयांचं क्रेडिट सरकारने दिलं आहे. हमी सरकारची आहे. विद्यार्थ्यांना एक क्रेडिट कार्ड दिलं जातं. ते स्वाईप करून कोणत्याही कॉलेजात जाऊन प्रवेश घेऊ शकतात. हे क्रेडिट कार्ड मॉल आणि सिनेमासाठी वापरता येत नाही. फक्त शिक्षणासाठी एवढीच अट. अॅडमिशनसाठी पैसे नाहीत. कर्ज कुठून मिळेल, या सगळ्या चिंता त्यांनी मिटवून टाकल्या आहेत. ना शिष्यवृत्तीचा गोंधळ ना भ्रष्टाचार. सर्वांसाठी हे क्रेडिट कार्ड खुलं आहे. नोकरी शोधणाऱया मुलांसाठी दोन वर्षांपर्यंत जॉब सर्चिंगसाठी दर महिन्याला एक हजाराचा भत्ता सरकारने सुरू केला आहे. उद्यमशील तरुणांसाठी शंभर कोटींचा फंड उपलब्ध करून दिला आहे. नीतिश कुमारांचे सात निश्चय आहेत. त्यातले हे तीन. आणखी चार निश्चय त्यांचे आहेत. हर घर नल का जल. हर घर शौचालय. हर घर बिजली का कनेक्शन. हर बस्ती के पक्की सडक.

भ्रष्टाचाराला आळा घालण्याची भाषा सगळेच करतात. नीतीश कुमारांनी ते बिहारमध्ये करुन दाखवलं. भ्रष्ट अधिकाऱयांची संपत्ती जप्त केली. बेनामी अलिशान बंगले थेट सरकारने ताब्यात घेतले. तिथे शाळा सुरु केल्या. बालगृह सुरू केली. माफियांवर वार केला. कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. ते म्हणतात, ‘रूल ऑफ लॉ बाबत कॉम्प्रमाईज नाही.’

नालंदा विद्यापीठाचं पुनर्जीवन ही नीतीश कुमारांची खास बात. पण या विद्यापीठातून अर्मत्य सेन आणि जॉर्ज यू यांना केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे जावं लागलं. याचं शल्य त्यांना टोचतं आहे. ते अर्मत्य सेन आणि जॉर्ज यू यांच्यासोबत आहेत. विद्यापीठांमध्ये सरकारचा असा हस्तक्षेप त्यांना मान्य नाही.

नीतीश कुमार कुठल्या मोठ्या जाती समूहातले नाहीत. जातीची व्होट बँक त्यांच्या मागे नाही. ते ज्या कुणबी (कुर्मी) समाजातले आहेत तो समाज फक्त 3टक्के आहे. मात्र विचाराने पक्के लोहियावादी, समाजवादी असलेले नीतीशकुमार आज बिहारचे सर्वमान्य नेता आहेत. बिहारच्या विकासाची ते नवी पहाट बनले आहेत. देशातल्या संयमी, संयत राजकारणाचे प्रतीक बनले आहेत. राणा भीमदेवी थाटाची बढाईखोर भाषणं ते करत नाहीत. लोकांशी संवाद साधायला त्यांना आवडतं.

मुंबईच्या टाइम्स फेस्टिव्हलमध्ये पवनकुमार वर्मा (‘ ग्रेट इंडियन मिडल क्लासवाले) म्हणाले, ‘देशात दोन नेत्यांची भाषणबाजी सतत सुरू असते. देशाला भाषण करणाऱया नेत्याची नाही, संवाद साधणाऱया नेत्याची गरज आहे.’

हसन कमालांच्या एका गीताचे शब्द आहेत,
किसी नजर को तेरा इंतजार आज भी है.’


देशाला नीतीश कुमारांच्या राजकारणाचा इंतजार आहे.


(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)